डिझेल वाहनांवर, विशेषत: व्यापारी वाहनांवर मोठय़ा प्रमाणातील वाढीव कराचा बडगा यंदाच्या अर्थसंकल्पात उगारला जाणार असेच वातावरण २८ फेब्रुवारीपूर्वी होते. सरकारसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या वित्तीय तुटीला काही प्रमाणात ठिगळं लावण्याचा पर्याय यामाध्यमातून सरकारपुढे होता. काही दिवसांपूर्वीच डिझेलचे आणि नंतर पेट्रोलचे दर वाढवून तिजोरीवरील वाढत्या इंधन अनुदानाचा भार कमी करण्याचा प्रयत्न झाला. पण एकूणच वाहन उद्योगाला फार कडकही नाही आणि नरमाईचीही नाही अशी वागणूक अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली.
आपल्या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी निर्मित कंपन्या काय काय उपाययोजना करतात. मग ती अगदी लोकल, मेल ट्रेनमधील वस्तूंची विक्री असो किंवा एसएमईद्वारा तयार होणारी वस्तू. किंवा अगदीच मोठय़ा कॉर्पोरेट जगताचे प्रॉडक्ट. असे उत्पादन विक्रीच्या दृष्टीने सुमार ठरू नये म्हणून कंपन्या आटोकाट प्रयत्न करतात. आणि हेच उत्पादन प्रतिसादाच्या व्यासपीठावर सुमारेही ठरणे अनेकदा घातक असते.
वाहन उद्योगाचाच विषय निघाला तर त्याचे उदाहरण ही व्याख्या अधिक स्पष्ट करेल.  केवळ प्रवासी वाहनांची शृंखला चालविणाऱ्या मारुती सुझुकीची वाहन विक्री बिकट कालावधीतही वधारती असते. मोजके पर्याय असलेली ह्युंंदाईही जुन्या महिंद्र ते नव्या होन्डा, फोर्डला मागे टाकून देशातील दुसरी मोठय़ा कंपनीच्या पायरीवर असते. उलट प्रवासीसह स्पोर्ट युटिलिटी, व्हॅन, पिक-अप ते भले मोठे ट्रक-बस अशा जवळपास सर्वच रेन्जमध्ये वाहने असणाऱ्या टाटा मोटर्सची विक्री महिनोन महिने खालावत चालली आहे.
याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नवे वाहन सादर झाल्यानतर निदान त्या श्रेणीतील आधीच्या वाहनाचे उत्पादन न थांबविणे.
लोकप्रिय कोणत्याही वस्तूला अधिक-सर्वाधिक असलेली ग्राहकांची मागणीही व्यवसाय-नफ्याच्या हेतूने प्रसंगी तोटय़ाचीही ठरते, हे उद्योग क्षेत्रातील सर्वसाधारण गणित. प्रवासी वाहनांच्या बाबतीतही तेच. गेल्या अनेक महिन्यांपासून या वर्गाची विक्री सातत्याने घसरत आहे. मारुतीच्या बहुप्रतीक्षित यादीतील अल्टो, व्हॅगनआर, स्विफ्ट किंवा ह्युंदाईची आय१०,आय२० सोडल्या तर या कंपन्यांसह इतरांचीही प्रवासी वाहनांची विक्रीही खालावत चालली आहेत. नेमके उलट स्पोर्ट युटिलिटी व्हेकलबाबत (एसयूव्ही) घडत आहे.
कुटुंबासह पर्यटनावर भर, तेही स्वत:च्या वाहनाने आणि फ्युएल, मायलेजमध्ये अग्रणी या धर्तीवर अशा वाहनांना असलेली खरेदीदारांची पसंती वाढली आहे. लिटरमागे ७५ रुपयांच्या पुढे गेलेले पेट्रोलचे दर आणि कारसाठी असलेली प्रतीक्षा यादी यामुळेही या वाहन वर्गाने विक्रीतील झेप घेतली आहे. एरवी एकेरी आकडय़ातील कारची विक्री केवळ या वाहन प्रकारामुळे घसरणीत आणि तेही दुहेरी आकडय़ात आपटत आहे. प्रवासी वाहने, दुचाकी, व्यापारी वाहने असे सारे गेल्या फेब्रुवारी महिन्यात घसरले असताना याच कालावधीत स्पोर्ट युटिलिटी वाहन क्षेत्राने मात्र तब्बल ३५ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
खुद्द वाहन उद्योगालाही हा कल मोडायचाय. या वाहन प्रकारात मातब्बर असलेल्या महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रालाही व्हेरिटो (रेनॉबरोबरच्या घटस्फोटानंतर लोगानने धारण केलेल्या नव्या नावाची प्रवासी-सेदान श्रेणीतील कार) अधिक विकली जावी, अशी मनीाषा नसेल, असे कसे म्हणता येईल?
सरकारनेही मग एक पाऊल या दिशेने टाकले. अशा एसयुव्हीवरील उत्पादन शुल्क (एक्साईज) थेट ३० टक्क्यांवर नेले. यापूर्वी ते २७ टक्के होते. वाहनचालकांची सर्वाधिक पसंती असलेल्या या वाहन प्रकाराच्या वाढत्या विक्रीसमोर हा एक स्पीड ब्रेकर ठरेल. ऑडी, बीएमडब्ल्यूच्या आलिशान कारही आता २५ लाखांच्या घरात उपलब्ध झाल्याने उच्च मध्यमवर्गीयाचा त्याकडचा वाढलेला कल काही प्रमाणात थोपविण्याच्या हेतूने यंदाच्या अर्थसंकल्पात अशा आयात कारसह दुचांकीवरही कर एकदम १०० टक्क्यांवर नेऊन ठेवला. या दोन्ही उपाययोजना कदाचित प्रवासी कारना पुन्हा तीच ग्राहकसंख्या मिळवून देऊ शकेल, हाच उद्देश यामागे सरकारचा आहे.

फेब्रुवारीमधील वाहन विक्रीचा कल
प्रवासी वाहने     : -२५.७१ टक्के
व्हॅन        : -१२.३६ टक्के
स्पोर्ट युटिलिटी     : + ३४.८५ टक्के
तीन चाकी    : + ४.४५ टक्के
दुचाकी        : -२.७७ टक्के
व्यापारी वाहने    : -११.०६ टक्के