निसर्गसौंदर्याने नटलेला, बाराही महिने बर्फाच्छादित असलेला लेह-लडाख बाइकवरून पालथा घालणे हे प्रत्येक बाइकप्रेमीचे स्वप्न असते. त्यासाठी बरेच प्लॅनिंग केले जाते. तयारी केली जाते. ग्रुप ठरवले जातात. या पूर्वतयारीनंतरही अनेक जण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माघार घेतात आणि मग फारच थोडे जण उरतात. मग ठरल्यानुसार जाण्याचे धाडस केले जाते. या धाडसातूनच विक्रमाची नोंद होते. असाच एक विक्रम केला आहे सुनील वैद्य यांनी..
या धाडस आणि विक्रमाविषयी..

असे साध्य झाले दिव्य..
माजी आयपीएस अधिकारी असलेले सुनील वैद्य २००६ पासून बुलेटवरून भारतभर िहडताहेत. त्यांचा ग्रुपच आहे म्हणा ना. ग्रुपने बाइकवरून फिरणे, नवनवीन भागांना भेट देणे हा त्यांचा छंद. गेल्या वर्षी १४ जून ते ६ जुल या कालावधीत त्यांनी लेह-लडाखची टूर आखली. २४ जणांच्या त्यांच्या चमूत सहा महिलाही होत्या. त्यात सुनील वैद्य सर्वात ज्येष्ठ. १४ जूनला त्यांचा प्रवास सुरू झाला. सर्वाच्या मोटारसायकली ट्रकमध्ये टाकून अंबाल्याला रवाना करण्यात आल्या. त्यानंतर सर्व जण रेल्वेने अंबाला येथे पोहोचले. तेथून बाइकचा प्रवास सुरू झाला.
लेह लडाख म्हणजे निसर्गसौंदर्याची लयलूट असलेल्या काश्मीरचाच एक भाग. हिमालयाच्या अनेक पर्वतराजी याच भागातून जातात. त्यामुळे गिर्यारोहकांना या भागाचे आकर्षण जास्त. याच भागात खार्दुगला नावाची िखड आहे. वाहनाने प्रवास करता येईल, अशी जगातील सर्वोच्च िखड (उंची : १८३८ फूट म्हणजेच ५६०२ मीटर) ही खार्दुगलाची ख्याती. ही सर्वोच्च िखड वाहनाने चढून जाणे हे लिहिताना जेवढे सोपे वाटते, तेवढेच ते कठीण आहे. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतशी हवा विरळ होते आणि श्वसनास त्रास होऊ लागतो, हे आपण भूगोलाच्या पुस्तकात वाचलेले असते. तेच इथे अनुभवास येते. तेव्हा अशा ठिकाणी बाइकने जाणे म्हणजे आव्हानच. यात जरा चूक झाली तर गाठ प्राणाशीच. मात्र, हे आव्हान पेलले मुंबईतील गोरेगावच्या सुनील वैद्य यांनी. वय वष्रे अवघे ६७! सुनील वैद्यांनी आव्हान केवळ पेललेच नाही तर खार्दुगला पार करून त्यांनी विक्रमाची नोंदही केली. जगातील सर्वोच्च खिंड बाइकवरून पार करणारे सर्वात वयस्कर बाइकर अशी त्यांच्या नावाची नुकतीच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे.

अडथळ्यांची शर्यत
हा सर्व बाइकप्रेमींचा ग्रुप १६ जूनला रात्री सिमलामाग्रे नारकांडला पोहोचला. रात्री मुक्काम करून पहाटे लवकर प्रवास सुरू करून सांगला गावी पोहोचायचे नक्की झाले होते. मात्र, येथूनच अडथळ्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे दरडी कोसळणे, ढगफुटी या प्रकारांमुळे पुढील मार्ग दहा दिवस बंद ठेवण्यात आल्याचे समजले. ही अडथळ्यांची शर्यत टाळण्यासाठी मग वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पथकाने माघारी सिमल्याला येऊन मनालीमाग्रे रोहतांग पासला जाण्याचे ठरवले.

दमछाक
रोहतांग पासचा संपूर्ण रस्ता बर्फाच्छादित. या अशा रस्त्यावरून बाइक चालवताना सर्वाचीच दमछाक झाली. प्रत्येक जण एकदा तरी घसरून पडलाच. मात्र, खार्दुगला गाठायचीच हे एकच ध्येय होते. अखेरीस मजल-दरमजल करीत सर्व जण सरचू या गावी पोहोचले. सरचूचे वैशिष्टय़ म्हणजे या टापूत एकही वनस्पती नाही. त्यामुळे हवेत प्राणवायूची कमतरता. श्वास घेताना नाकी नऊ येणे म्हणजे काय, याचा अनुभव येथे सर्वाना आला. कमी प्राणवायूमुळे हालचाली मंदावल्या होत्या. गाडीच्या कॉब्र्युरेटरने राम म्हणायला सुरुवात केली. तरीही चिकाटी कायम ठेवून सर्व जण निघालेच. कमी प्राणवायूचा सराव होऊन सर्व जण २४ जूनला लेह येथे पोहोचले.

स्वप्नपूर्ती
लेह ते खार्दुगला हा प्रवासातला शेवटचा टप्पा. २५ जूनला वैद्य यांच्या पथकाने या अखेरच्या टप्प्यासाठी सुरुवात केली. दगडधोंडे, खाचखळगे, चिखल, बर्फामुळे तयार झालेली निसरडी जागा या सर्व अडथळ्यांना पार करत सर्व जण खार्दुगला येऊन पोहोचले. स्वप्नपूर्ती झाली. ग्रुपमधल्या सर्वानीच सुनील वैद्य यांचा सत्कार केला. आनंद साजरा करून सर्व जण परतीच्या प्रवासाला निघाले. नुब्रा व्हॅली, पँगाँग लेक, झोझीला पास, कारगिल, श्रीनगर व जम्मू असा हा परतीचा प्रवास होता. ठरल्याप्रमाणे ६ जुलला मुंबईत सर्व जण सुखरूप परतले.

बाइकची साथ
या संपूर्ण प्रवासात वैद्य यांना खरी साथ दिली ती त्यांच्या रॉयल एन्फिल्ड या बाइकने. ३५० सीसी इलेक्ट्रा बुलेट बाइकने त्यांची ही स्वप्नपूर्ती केली. संपूर्ण प्रवासात बाइकने मला कधीच धोका दिला नसल्याचे वैद्य प्रामाणिकपणे कबूल करतात. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्यांच्या मार्चच्या अंकात वैद्य यांचा सन्मान केला आहे. सर्वात वयस्कर बाइकर अशी त्यांच्या नावाची नोंद त्यात करण्यात आली आहे.