तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..! शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com

२४ तासांत १६०० किमी
लोणावळा, पुणे की गोवा, अशा प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची नसतात. वेध असतात ते फक्त बाइक हायवेवर चालविण्याचे. लांबच लांब हायवे असोत किंवा जंगलातले निमुळते रस्ते, माझी पहिली पसंती असते ती बाइकलाच. सरळ रस्त्यांवरचा सुसाट वेग किंवा नागमोडय़ा रस्त्यांवरची तोल साधण्याची किमया, सारं जगण्याचा आनंद देऊन जातं.
खरं तर बाइकवरची ट्रीप ही नेहमी पद्धतशीर असावी. हेल्मेट, ग्लोव्जबरोबर एक्स्ट्रा क्लच वायर आणि पंक्चर कीटही असावे. तरीही अचानक जाण्याची मजादेखील काही औरच आहे. मला आठवतं, बाबांनी बाइक घेतेवेळी विचारलं होतं, ‘‘सांभाळेल काय तुला वजन?’’ मीदेखील जरा साशंकच होतो, पण नीट विचारपूर्वक मी स्पोर्ट्स टूरर बाइकची निवड केली होती. तीन वष्रे तिने ती सार्थ ही ठरवली. ५०००० किलोमीटरचा पल्ला गाठायच्या तयारीत आहे माझी याम्मी!
फार वाईट वाटतं जेव्हा रहदारीच्या रस्त्यावर बाइकस्वारांना हेल्मेटशिवाय जिवाशी खेळ करताना पाहतो. सगळ्यांना इतकंच सांगावंसं वाटतं की, तुम्ही बाइकचा आदर करा, बाइक तुम्हाला ओळख देईल. आजवर मला बाइकने ओळख दिली. माझ्यातर्फे बाइकला गिफ्ट म्हणून मी एक रेकॉर्ड करायच्या तयारीत आहे. एका नामांकित वेबसाइटवर २४ तासांत १६०० किलोमीटरचा टप्पा पार पाडणारे फार कमी भारतीय आहेत. मला माझ्या याम्मीचा तुरा त्यात खोचायचा आहे. ‘मी बाइकवेडा’ आहे हे जगाला दाखवून द्यायचं आहे.
विनय सोनवणे, खारघर, नवी मुंबई</strong>

शान राखली
मला बाइक चालवायला खूप आवडते. गेल्या वर्षीच्या जूनमधली ही गोष्ट आहे. नुकत्याच घेतलेल्या होंडा शाइन बाइकवरून मी चाललो होतो. एका आजोबांनी मला हात केला आणि खेडपर्यंत सोडण्याची विनंती केली. त्यांना मी माझ्या मागे बसवून घेतले. गाडी मिळत नव्हती म्हणून थांबवले असेही त्यांनी सांगितले. रात्री ताप व खोकला आल्यामुळे खेडला डॉक्टरांकडे चाललो असल्याची माहिती त्यांनी दिली. मग त्यांना मीच घेऊन गेलो डॉक्टरांकडे. आजोबांना वेळेत दवाखान्यात घेऊन आल्याबद्दल डॉक्टरांनी मला शाबासकी दिली. मला खूप आनंद झाला. ही सर्व किमया माझ्या बाइकचीच होती. माझ्या बाइकने माझी शान राखल्याचा अभिमान मला वाटला.
– रवींद्र सांडभोर, मु. पो. सांडभोरवाडी, ता. खेड, जि. पुणे

माझी अर्धागिनी
मला लहानपणापासूनच बाइकची आवड. लहानपणी खेळण्यातल्या विविध प्रकारच्या बाइक जमवण्याचा मला छंद होता. परंतु मोठा झाल्याशिवाय बाइक घेऊन देणार नसल्याचे बाबांनी स्पष्ट केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला लागल्यावर मला त्यांनी बाइक घेऊन दिली. मी ऑटोमोबाइल इंजिनीअर आहे, त्यामुळे मला बाइकच्या प्रत्येक पार्टविषयी माहिती आहे. त्यामुळेच तिचे काही दुखलेखुपले की मला लगेचच समजते. म्हणूनच तर मी माझ्या बाइकमागे ‘द मशीन इज अलाइव्ह’ असे लिहिले आहे. मी जेव्हा माझी पहिली बाइक घेतली तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ६ ऑक्टोबर हा तो दिवस. मी दरवर्षी या दिवशी बाइकचा वाढदिवस साजरा करतो. दर रविवारी बाइक धुणे, तिची साफसफाई करणे या गोष्टी मी न चुकता करतो. मी जेव्हा पहिल्यांदा बाइकवरून पडलो, त्या वेळी माझ्या पायाला दुखापत झाली; परंतु मला माझ्यापेक्षा बाइकचीच जास्त काळजी होती. तिला काही झाले नाही ना, याची खात्री मी आधी करून घेतली, मगच डॉक्टरकडे गेलो. अगदी जिवापाड जपत असतो मी माझ्या बाइकला. ती माझी अर्धागिनीच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अनिकेत जाधव, भांडुप

सात दिवस सात गाडय़ा
माझ्या घरचे बाहेरगावी गेल्यामुळे मी माझ्या मित्राच्या घरी राहायला गेलो होतो. तेव्हा मी आणि माझा मित्र त्याच्या वडिलांची गाडी घेऊन बाहेर पडलो. त्याच रात्री मी गाडी चालवायला शिकलो. लग्नानंतर सासुरवाडीकडून गाडी मिळाली. आता माझ्याकडे एकूण सात गाडय़ा आहेत. मी दररोज एक गाडी घेऊन शाळेला जातो. सोमवारी स्प्लेंडर, मंगळवारी हंक, बुधवारी सुझुकी असे प्रत्येकीचे वार ठरले आहेत. मी दर रविवारी बाइकवरून ट्रेकिंगलाही जातो. मी एसटी किंवा इतर कोणत्याही वाहनाने प्रवास करत नाही. मला बाइकच चालवायला आवडते.
– राजेंद्र शेळके, नांदेड.