भारतातील तरुणांमध्ये सुपरबाइकचे आकर्षण वाढत आहे. तरुणाईची ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी हर्ली डेव्हिडसन, ट्रायम्फ, कावासाकी, केटीएम या विदेशी कंपन्या मोठय़ा प्रमाणात भारतात गुंतवणूक करू लागल्या आहेत. दक्षिण कोरियाची ह्योसंग ही त्यातलीच एक. २५० सीसीपासून १००० सीसीपर्यंतच्या ह्योसंग बाइक सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यातीलच अकिला पीआरओ ही ६५० सीसी सुपरबाइक यंदाची प्रीमियम बाइक (ब्लूमबर्ग अ‍ॅवॉर्ड फॉर बेस्ट प्रीमियम बाइक ऑफ दि इयर) ठरली आहे. डीएसके-ह्योसंगच्या या यशाबद्दल डीएसके मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांच्याशी विनय उपासनी आणि वीरेंद्र तळेगावकर यांनी केलेली बातचीत..
अवघ्या वर्ष-दीड वर्षांतच डीएसके मोटोव्हील्सचे चांगली कामगिरी बजावली आहे..
*गरवारे समूहाकडून आम्ही ह्योसंग हा प्रीमियम मोटरसायकल ब्रँड विकत घेतला. सुरुवातीला देशभरात ह्योसंगचे मोजकेच डीलर होते. मात्र, आम्ही टेकओव्हर केल्यापासून डीलरच्या संख्येत वाढ केली आहे. आज देशभरात आमचे ३१ डीलर आहेत. अगदी ईशान्य भारतातही आम्ही दोन ठिकाणी शोरूम्स सुरू केले असून तेथेही ह्योसंग सुपरबाइक्सना चांगली मागणी आहे.
आगामी वर्षांत डीलरची संख्या वाढणार ?
*पुढील वर्षी मार्चपर्यंतच आम्ही आमच्या डीलर्सची संख्या ४० पर्यंत वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत. महाराष्ट्रात सध्या पाच शोरूम्स असून त्यांचीही संख्या पुढील वर्षी वाढेल.
सुपरबाइक सेगमेंटमध्ये स्पर्धा आहे?
*तरुणांमध्ये चारचाकीपेक्षा दुचाकीची जास्त पॅशन-क्रेझ आहे. त्यामुळेच मंदीच्या फेऱ्यातही कारपेक्षा टू व्हीलरचं मार्केट वधारलेले आपल्याला दिसते. सुपरबाइक ही त्यापुढची पायरी आहे. तरुणांना असलेले वेग आणि लूकचं आकर्षण या सुपरबाइक्स पूर्ण करतात. त्यामुळे सुपरबाइकला जास्त मागणी आहे आणि म्हणूनच ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. त्यातही २५० ते ७०० सीसीच्या गाडय़ांना तरुणांची जास्त पसंती आहे. त्यामुळेच ट्रायम्फ, हर्ली डेव्हिडसन, बजाज, कावासाकी, केटीएम ड्यूक यांच्याही गाडय़ा सध्या बाजारात लाँच होताहेत. स्पर्धा चांगलीच आहे.
जीटीई २५० बद्दल थोडंसं..
*जीटीई २५० ही एन्ट्री लेव्हल बाइक आम्ही जून महिन्यात लाँच केली. विशेष म्हणजे या गाडीचे पेंटिंग पूर्णपणे आमच्या वाईतील प्लान्टमध्ये करण्यात आले आहे. आतापर्यंत दक्षिण कोरियातूनच सर्व प्रक्रिया होऊन अंतिम उत्पादन येथे यायचे. मात्र, प्रथमच आम्ही आमच्या प्लान्टमध्ये गाडी पेंट केली आहे. जीटीईला सहा महिन्यांत चांगला प्रतिसाद मिळाला. तीन लाख रुपये किमतीच्या या गाडीचा खप सहा महिन्यांत १२०० एवढा झाला. तिची लिमिटेड एडिशन आम्ही लाँच केली असून तिलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सध्याच्या बाजारस्थितीबद्दल काय मत ?
*सध्याची स्थिती खरंच खूप कठीण आहे. निदान ऑटो सेक्टरसाठी तरी यंदाचे वर्ष कठीण गेले. पुढील वर्षांकडून खूप अपेक्षा आहेत. पुढील वर्ष निवडणुकीचे असल्याने नवीन सरकार काहीतरी धोरणात्मक बदल घडवेल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या करपद्धती, विविध प्रकारचे उपकर यांमुळे उत्पादनावर परिणाम होतो आणि त्याचा अंतिम फटका ग्राहकांनाच बसतो. पुढील सहा महिने तरी ऑटो सेक्टरची परिस्थती जैसे थेच राहील असे वाटते.
आगामी वर्षांत काय नवीन?
*पुढील वर्षांच्या सुरुवातीला दिल्लीत होत असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आम्ही काही नवीन सुपरबाइक्स लाँच करणार आहोत. शिवाय १२५ सीसीची सुपरबाइक तयार करण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला किमान दोन र्वष तरी लागतील. १२५ सीसीची सुपरबाइक ही पूर्णपणे नवीनच संकल्पना असेल. सध्याच्या बाजारस्थितीनुसार तिची किंमत ७० हजार ते एक लाख रुपयांच्या घरात असेल. मात्र, अजूनही योजना कागदावरच आहे. प्रत्यक्षात यायला थोडा कालावधी लागेलच. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत हे नक्की.
१२५ सीसीची सुपरबाइक भारतातच तयार होईल का?
*हो. आमचा कराड येथील नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीत मोठा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या दिशेने बोलणीही सुरू आहेत. या ठिकाणीच आम्ही आमच्या सर्व सुपरबाइकचे उत्पादन सुरू करू. वाईतील प्रकल्प याच प्रकल्पात मर्ज केला जाईल. या ठिकाणीच १२५ सीसीची सुपरबाइकही आम्ही तयार करू.
सुपरबाइकचे भवितव्य काय?
*येत्या तीन ते पाच वर्षांत आम्ही या सुपरबाइक सेगमेंटमध्ये आमचा बाजार हिस्सा २७ टक्क्यांपर्यंत वाढवू असा आम्हाला विश्वास आहे. १००० सीसीच्या सुपरबाइकही बाजारात आणायच्या आहेत. नवनवीन सुपरबाइक्स बाजारात येत असल्यामुळे एकूणच या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे.