20 November 2017

News Flash

तंत्र.. इलेक्ट्रिक कारचे

पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाऐवजी विजेवर चालणाऱ्या मोटारी किमान भारतातील लोकांच्यादृष्टीने भविष्यामधील नवी चाहूल आहे. अद्याप

रवींद्र बिवलकर - ravindra.biwalkar@expressindia.com | Updated: February 7, 2013 1:03 AM

पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाऐवजी विजेवर चालणाऱ्या मोटारी किमान भारतातील लोकांच्यादृष्टीने भविष्यामधील नवी चाहूल आहे. अद्याप तरी महिन्द्राची रेवा ही विजेवर चालणारी मोटार व काही कंपन्यांच्या दुचाकी यांच्याशिवाय अन्य विजेवर चालणाऱ्या मोटारी बाचारपेठेत आलेल्या नाहीत. अमेरिका वा युरोपमध्ये या मोटारींची गरज आता सर्वसामान्य नागरिकांना भासू लागली असली तरी त्यांचे उत्पादन म्हणावे तितके मोठय़ा प्रमाणात झालेले नाही. हे खरे असले तरी पेट्रोल व डिझेलसारख्या इंधनांचा साठा संपणार हे नक्की आहे, कारण त्यांचा उपयोगही इतक्या मोठय़ा प्रमाणावर सर्वत्र होत आहे, की अजून काही वर्षांमध्ये तो साठा संपुष्टात येणार, अशी भाषा आतापासूनच केली जाऊ लागली आहे. त्यासाठी शंभर वर्षे जायची गरज नाही, हे ही तितकेच खरे.
विजेवर  चालणाऱ्या या मोटारींमध्ये भविष्यात आणखीही अन्य काही शोध लागतील, सुधारणा होतील, त्यामुळे अन्य काही फायदेही मिळू शकतील. ही जर तरची भाषा बाजूला राहू द्या. पण सध्याची स्थिती काय आहे ते पाहू. ही विजेवर  चालणारी मोटार कशी चालते, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे. त्याचे फायदे किती आहेत.
इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी, नियंत्रक, पोटेन्शोमीटर या काही प्रमुख बाबी विद्युतऊर्जेवरील मोटारीला आवश्यक आहेत.
घरातील पंखा चालविताना जी मोटर त्या पंख्यात असते, त्या पंख्याची गती नियंत्रित करण्यासाठी जो रेग्युलरेटर असतो तशाच प्रकारचा हा कार्यकारण भाव या मोटारीच्या चालण्यामागे आहे. त्यात नवीन वेगळे काही नाही. आहेत त्या सुधारणा, दुरूस्त्या केलेल्या व उपयुक्त अशा नव्या रचना.
वीज ही ऊर्जा चार्जेबल बॅटरीमध्ये साठवून त्या साठविलेल्या ऊर्जेद्वारे ती मोटर चालणार. इंजिनाऐवजी मोटर तुमच्या मोटारीला गती देणार.
बॅटरीमधून नियंत्रकाद्वारे ऊर्जा प्राप्त केली जाईल व ती पुढे मोटरीप्रत पोहोचविली जाईल. बॅटरी म्हणजे थेट करंट (डीसी) त्यातून नियंत्रक बॅटरीद्वारे ही वीज मिळवेल. ज्या ऊर्जेद्वारे मोटर फिरते, त्या प्रकारच्या उपकरणांमध्ये आपण पंखा, ड्रिल मशीन, लाद्या पॉलिश करण्याचे मशीन, शिवण यंत्रला बसविलेली मोटर अशा वस्तू पाहातो, त्याच प्रकारात ही मोटर वीजेऐवजी बॅटरीद्वारे चालविली जाईल.
ही बॅटरी जितका काळ अधिक राहील व अधिक काळ ऊर्जा पुरवठा करू शकले, अशी ही या विजेवर चालणाऱ्या मोटारीची सर्वसाधारण ढोबळ रचना आहे.
यामध्ये पोटेन्शोमीटर हा एक प्रमुख घटक मानला जातो व्हेरिएबल रेसिस्टन्स असणारा हा घटक असून मोटारीला गती प्राप्त करून देण्यासाठी असणाऱ्या अ‍ॅक्सलरेटरशी तो संलग्न असतो. नियंत्रकाला तो किती ऊर्जा द्यायची आहे याची सूचना हा पोटेन्शोमीटर देतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही विजेवर चालणारी ही मोटारगाडी थांबविता तेव्हा नियंत्रक शून्य ऊर्जाही प्रदान करतो व अ‍ॅक्सलरेटरवर पाय देऊन चालक गती वाढवितो तेव्हा त्यासाठी किती ऊर्जा पुरवायची आहे याची सूचनाही या पोटेन्शोमीटरद्वारे नियंत्रकाला दिली जाते. डीसी नियंत्रक व अ‍ॅक्सलरेटरची कळ या दरम्यान हा पोटेन्शोमीटर असतो. अ‍ॅक्लरेटर ही कळ असते जसा घरातील वापरतो त्या पंख्याला रेग्युलरेटर असतो तसा हा पोटेन्शोमीटर असतो.
मोटारीला ही विद्युतऊर्जा मिळते ती त्या मोटारीत ठेवलेल्या बॅटरीद्वारे. ही बॅटरी त्यामध्ये बसविण्यात आलेल्या सेलद्वारे जे सध्या लिथियम आयन या प्रकारचे सेल वापरले जातात. ते चार्ज करण्यासाठी वेळ खूप जात असतो. एककेकाळी त्यासाठी सर्वसाधारण वीज पुरवठय़ातून हे चार्जिग केले जात होते. आजही त्या प्रकारचे जार्चिग केले जाते. मात्र त्यात बॅटऱ्या चांगल्या क्षमतेच्या व प्रकारच्या लावण्यात येतात. त्याचप्रमाणे आता नव्या तंत्राद्वारे पेट्रोलव वा डिझेलवरील मोटारगाडी चालू असताना त्याचवेळी चार्जिग करण्याचे कामही केले जाते. त्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही. हायब्रीड तंत्रज्ञानातील ही प्रक्रिया आता रूढ होईल व चांगल्या प्रकारे त्यात अन्य सुधारणाही होत राहातील.
युरोपामध्ये पूर्णपणे विजेच्या वापरावरील मोटारी येण्याच्या आधीपासूनच विद्यमान पद्धतीच्या म्हणजे पेट्रोल वा डिझेलवर चालणाऱ्या मोटारी विद्युत ऊर्जेवर चालण्यासाठी त्यात बदल करण्याचे वा अतिरिक्त साधने जोडण्याचे कामही मोठय़ा प्रमाणात सुरू होऊ लागले. त्यानुसार त्या मोटारी विद्युतऊर्जेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ा म्हणून कन्व्हर्ट करण्यासाठी नेटवरही ते काम कसे कराल, त्याला किती खर्च येईल याचे अंदाज जाणकांरांकडून मांडले जाऊ लागले. अजून काही काळानंतर हा प्रकारही थांबेल व पूर्ण विद्युत ऊर्जेचा वापर केला जाणारी मोटार लोकप्रिय होईल. कंपन्यांऐवजी विशिष्ट ग्राहकांसाठी वा संबंधित ग्राहकांसाठी सध्या करण्यात येत असलेले हे प्रयोगात्मक काम काही काळानंतर थांबेलही. वास्तविक विजेवर चालणारी ही मोटारगाडी म्हणजे एक प्रकारचे वायरींग असेल, त्यात विशिष्ट सर्किट- आरेखन आवश्यक असतील, ट्रान्झिस्टर्स, फ्यूज अशा बाबी असतील. आवाजविरहीत असणाऱ्या या मोटारी उपयुक्त असतील, आरामदायीही ठरतील. अर्थात त्यामुळे अन्य काही प्रश्नही उपस्थित ठाकणार आहेत. ते नव्या युगातील एक वेगळे आव्हान असेल, हे नक्की.
(क्रमश:)

First Published on February 7, 2013 1:03 am

Web Title: tecnic of electric car