नांदेड जिल्ह्य़ातील राज्यमार्गावरील भरभराटीस असलेली एक बाजारपेठ म्हणून लोहा या गावाची ओळख. वडिलांची कापड पेढी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. महाविद्यालयीन उच्चशिक्षण पूर्ण न करणारा मी परंपरागत व्यवसायात स्थिरावत होतो. गावात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या कृषिविस्तार शाखेस (१९८२) जीप भाडेतत्त्वावर पाहिजे होती. जीप कुठून खरेदी करावी, याबाबत ‘सिंधी’ डॉक्टरकडे विचारणा केली. त्याने हैदराबादला मिलिटरीच्या जीप्स विकल्या जातात, ती घ्यावी असे सुचवले.
पंचायत समितीच्या सभापतीचा मुलगा माझा शालेय वर्गमित्र, माणिक कार्यालयीन जीपवर ड्रायव्हिंग शिकलेला. त्याच्यासह रेल्वेने हैदराबाद गाठले. त्या काळी हैदराबादला स्टँडर्ड मोटार्सच्या ‘गझल’ या जुन्या कारचे रूपांतर ‘जीप’मध्ये केले जात असे. तशी एक गाडी पसंतही केली, पण बँकेची पसंती ग्रामीण भागात चालणाऱ्या दणकट पेट्रोलच्या ‘वीलीस्’ जीपलाच होती. मिलिटरीच्या जीप्स नियमित ऑक्शन होत नसल्याचे समजले. शोधाशोध करून तेथील एका नवाबाकडे मिलिटरीकडून घेतलेली जीप विक्रीस असल्याचे समजले. पाहताक्षणी गाडी पसंतीस उतरली. ऑलिव्ह ग्रीन कलर, ताडपत्रीचे टॉप. जीपची ट्रायल घेतली. घासाघीस करून किंमत निश्चित केली, कागदपत्रे, इतर सोपस्कार पूर्ण करून नवाबाचा हैदराबादी पाहुणचार घेईपर्यंत रात्र झाली. पहिली चार चाकी नावावर झाली. ३०० किमी- लांबचा पल्ला असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर प्रवासास निघावयाचे ठरवून मुक्कामी रात्र काढली. सकाळी गाडीची पूजा करून पहिल्या प्रवासास सुरुवात केली. गावी पोहोचल्यावर गाडीचे पूजन, शेजाऱ्यापाजाऱ्यांत कोण कौतुक. दुबईहून आलेल्या मित्राच्या भावाने ‘याशीका’ कॅमेरात कलर फोटो घेतला. एक-दोन दिवसांत जीप ड्रायव्हरसह बँकेच्या सेवेत रुजू. दर रविवारी, जीप वापरास मिळत असे. असाच केव्हा तरी नांदेडला आलो. ड्रायव्हरकडून गाडीची चावी काढून घेतली, जीप सुरू केली. सरळ घरासमोर आणून उभी केली. मी प्रथमच ४० किमी गाडी स्वत चालवली. कसे जमले? हैदराबाद-नांदेड या पहिल्या प्रवासात मनस्तापामुळे जीप चालवता आली नाही, पण मित्राने गाडी कशी चालवली याचे निरीक्षण कामी आले. पुढे ५ वर्षांत जीपने भरपूर मनस्ताप दिला. जीप विकली, १९८९ मध्ये मारुती व्हॅन घेतली. विनारजिस्ट्रेशन, टेम्पररी पासिंगवर व्यावसायिक मित्रासह केमिस्ट संघटनेच्या बठकीस गोव्यास गेलो. आठ दिवस मनमुराद भटकलो. एकटय़ानेच ड्रायव्हिंग केले. कोकणातून महाड- शिवथरघळ- भोर घाटाने थकवले. पुणे माग्रे परत. २००० किमीचा ‘लाँग ड्राइव्ह’. व्हॅन विकली. मध्यंतरी ५ वष्रे कुठलेच वाहन वापरले नाही. मोटार सायकलही नाही. आता स्मॉल वंडर ‘नॅनो’ आहे. सेल्फ ड्राइव्ह, मला, कुटुंबाला शहरात भटकण्यापुरती व मातोश्रीला महिनाभर पंढरपूरच्या वारीसाठी.
लक्ष्मण संगेवार, नांदेड.

बायकर्स अड्डा
बाइक काढायची आणि मनसोक्त भटकंती करायची ही अनेकांची आवड. त्यानिमित्ताने बायकर्स ग्रुप तयार होत असतात. ग्रुपने दूरदूरवर भटकंती करायची हा मुख्य हेतू. या प्रवासात आलेल्या अडचणी व बाइकने दिलेली साथ, यामुळे अनुभवाची शिदोरी मोठी होते. अशाच बायकर्स ग्रुपना आम्ही स्पेस देणार आहोत, ड्राइव्ह इट पानावर.. नव्या वर्षांत..! एकच करायचं, तुमच्या ग्रुपचा एक छानसा फोटो आम्हाला पाठवायचा. तुम्हाला बाइकचे आलेले कटुगोड अनुभव शेअर करायचे..सर्व मजकूर फक्त २०० शब्दांतच बसवायचा..
आमचा पत्ता.. Email – bikersadda.loksatta@gmail.com