संजय डोळे,  
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून अशा वाहनाला अपघात होऊन रसायन गळती झाल्यास मोठय़ा प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका असतो. धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी मोटार वाहन कायद्यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा वाहनांना विशिष्ट पद्धतीने चिन्हांकित केलेले असणे गरजेचे असते. या वाहनावर चारही बाजूंनी इमर्जन्सी इन्फम्रेशन पॅनेल लावणे गरजेचे असते. या पॅनेलवर क्लास लेबल, केमिकलचे नाव, केमिकलचा यू एन क्रमांक , इमर्जन्सीमध्ये काय करावे यासाठी तज्ज्ञाचा सल्ला, या प्रकारची माहिती असते. क्लास लेबलवर केमिकल स्फोटक आहे, विषारी आहे, ज्वलनशील आहे किंवा कसे याबद्दल वर्णन तसेच क्लाससाठी संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेली चिन्हे असतात. केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये एकूण १५ क्लास वर्णन केले आहेत. यू एन नंबरवरून अग्निशमन दलाला कोणत्या प्रकारे संकटाशी सामना करावा याचा बोध होतो. पेट्रोल, क्लोरिन वायू, किरणोत्सारी रसायने, दारूगोळा इत्यादी पदार्थ धोकादायक रसायनांची काही उदाहरणे आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये एकूण २३१९ रसायनांची यादी आहे. या वाहनामध्ये वाहन मालकाने ट्रेमकार्ड ठेवणे गरजेचे असते. यामध्ये वाहनातून नेल्या जाणाऱ्या रसायनांची माहिती दिलेली असते. वाहनाच्या चालकाला केमिकल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालवण्याचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असणे गरजेचे आहे. हे प्रशिक्षण मान्यताप्राप्त संस्थांमध्ये घेणे गरजेचे असते. हे प्रशिक्षण घेतल्याची नोंद लायसेन्सवर घेणे अनिवार्य आहे .धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये ब्रेकसाठी विशेष नियम आहे. या प्रकारच्या वाहनाच्या ब्रेकमध्ये अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम असणे अनिवार्य आहे. एबीएसमुळे वाहन स्किड होण्यापासून बचाव होतो. मोटार वाहन विभागातर्फे या प्रकारच्या वाहनांसाठी सतत तपासणी करण्यात येते. नियमभंग करणाऱ्या वाहनावर असुरक्षित वाहन रस्त्यावर चालवल्याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो. या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तडजोड शुल्क वसूल करण्याची तरतूद नाही.