पेट्रोल पिणाऱ्या व कित्येक वेळा असह्य़ आवाज करणाऱ्या दुचाक्यांच्या जंगलात काही वर्षांपासून आपल्याला अजिबात कणभरही आवाज न करता शांतपणे व संथपणे धावणाऱ्या, धूर न सोडणाऱ्या दुचाक्यांची संख्यादेखील वाढताना दिसत आहे. कित्येक वेळा रस्त्यांवरील गोंगाटात अशी एखादी मौन व्रतातील दुचाकी पाहून मनास फार बरे वाटते आणि मग नकळतच मन विचार करते, की जर सगळ्याच गाडय़ा अशा शांतपणे चालू लागल्यात तर?
या ई-बाइक्स म्हणजेच इलेक्ट्रिक बाइक्स भारतात जरी गेल्या काही वर्षांत दिसू लागल्या असल्यात तरीदेखील त्यांचा प्रवास फारच जुना आहे. ई-बाइक्सचा हा प्रवास म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रगतशील प्रवाह असून काळानुसार शास्त्रज्ञांनी केलेल्या अचाट प्रगतीचा आढावा आहे. आज जगभरात लक्षावधी ई-बाइक्सची विक्री होत असून ही बाजारपेठ एक मोठी व वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहे. अमेरिका, नेदरलँड्स इत्यादी देशातील ई-बाइक्सची विक्री दरवर्षी दुपटीने-तिपटीने वाढत असून लक्षावधी लोक त्यांचा अंगीकार करीत आहेत. या ई-बाइक्सचा जन्म झाला तो १८६७ मध्ये. १८६७ साली वाफेवर चालणाऱ्या दुचाकीचा शोध लावण्यात आला होता, परंतु लोकांच्या मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे काही काळातच या दुचाकी नामशेष झाल्या. मोटरचा वापर करून बनविलेल्या दुचाकीचे पहिले पेटंट आहे १८९५ सालचे. ओग्डेन बोल्टन नावाच्या शास्त्रज्ञाने हे तंत्रज्ञान विकसित केले होते. या दुचाकीमध्ये ६ पोल्सची ऊउ मोटर होती व ही मोटर मागच्या चाकावर बसविण्यात आली होती. एकूण 10 ५’ ३ ची बॅटरी या दुचाकीत वापरण्यात आली होती.
ई-बाइकचे हे पहिले पेटंट दाखल होताच नवनवीन तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक प्रगत दुचाकी बनविण्याचा जणू सपाटाच सुरू झाला. यानंतर पुढचे पेटंट दाखल झाले ते केवळ दोन वर्षांनी. ऌ२ीं ह. छ्रुी८ या बोस्टनमधील शास्त्रज्ञाचे हे पेटंट. त्याने एका मोटरऐवजी दोन मोटर्स वापरून या ई-बाइकची निर्मिती केली. या बाईकचे वेगळेपण असे, की ती सामान्य सरळ रस्त्यांवर एकाच मोटरचा वापर करीत असे, तर चढावर तिच्या दोन्ही मोटर्स चालू होत असत. या दुचाकींमध्ये मोटर व चाक हे एका ू१ंल्ल‘ च्या साह्य़ाने जोडण्यात आले होते. १८९८ मध्ये बेल्टचा वापर करून चालणाऱ्या ई-बाइकचे पेटंट दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रवासातील क्रांतिकारक टप्पा होता १९४६ साली. जेसी टकर नामक एका तंत्रज्ञाने गिअरचा वापर ई-बाइक्समध्ये करण्याचे पेटंट दाखल केले. याच पेटंटमध्ये त्याने असे तंत्रज्ञान शोधले, की जेणेकरून पेडल व मोटर यांचा वापर एकाच बाइकवर करणे शक्य झाले. या आधीच्या ई-बाइक्स या पूर्णपणे मोटरवर चालायच्या व त्यात पेडलचा वापर करणे शक्य नव्हते. परंतु टकरच्या या शोधाने पेडल व मोटरचा एकाच बाइकमध्ये वापर करणे शक्य झाले.
ई-बाइक्सचे वर्गीकरण :
वर पाहिल्यानुसार, ई-बाइक्सच्या क्षेत्रात अनेक पेटंट दाखल होऊन त्यामुळे अनेक प्रकारच्या ई-बाइक्स रस्त्यांवर दिसू लागल्यात. त्यामुळे साहजिकच या दुचाकींचे वर्गीकरण करणे गरजेचे होते. ढोबळमानाने या दुचाकींचे विभाजन दोन प्रकारांत होते. पहिला प्रकार पेडल असिस्ट म्हणून ओळखला जातो तर दुसरा प्रकार पॉवर ऑन डिमांड म्हणून ओळखला जातो. या दोन्ही प्रकारांची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊ.
पेडल असिस्ट :
या तंत्रज्ञानात दुचाकी पूर्णपणे मोटरवर कधीच चालत नाही. थोडक्यात, पेडल असिस्ट तंत्रज्ञानामध्ये चालकाला पेडल मारणे भागच आहे, परंतु मोटर त्याला या कार्यात मदत करून त्याच्या पायावरील ओझे कमी करते. याचा अर्थ असा की पेडल असिस्ट तंत्रज्ञान असलेल्या दुचाकीमध्ये चालकास पेडल फारच हलके जाणवते, कारण की मोटरदेखील त्याला मदत करीत असते.   
पॉवर ऑन डिमांड :
पॉवर ऑन डिमांड तंत्रज्ञान हे पेडल असिस्ट तंत्रज्ञानापेक्षा अधिक कार्यक्षम व अधिक उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानात वापरली जाणारी मोटर ही बहुतांश वेळा अधिक शक्तिशाली असते. या प्रकारच्या दुचाकींमध्ये ही मोटर खालील दोन प्रकारे वापरली जाऊ शकते-
पूर्णपणे मोटरचा वापर- यात चालकास पेडिलग करण्याची आवश्यकता नसून दुचाकी पूर्णपणे मोटरच्या जोरावर चालवली जाते.
संयुक्त- या प्रकारात चालक पेडिलग करतो, परंतु त्यास मोटर या कार्यात सहकार्य करते. एकंदर परिणाम असा की चालकास दुचाकी चालवण्यास खूप हलकी वाटते.
पॉवर ऑन डिमांडमध्ये दुचाकीस थ्रोटल असतो. त्याच्या साह्य़ाने मोटर चालू अथवा बंद करता येते.
ढोबळमानाने जरी ई-बाइक्स या दोन प्रकारांत विभाजित केल्या जात असल्या तरी त्यांचे अन्य अजून प्रकार केले जाऊ शकतात. कित्येक देशांत दुचाकींच्या वेग मर्यादेनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. ई-बाइक्सचा फायदा असा की त्यांचा वेग जर एका पूर्व-निश्चित मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना सध्या दुचाकींना लागणारे काही नियम लागू होत नाही व त्यापासून सवलत मिळते.
ई-बाइक्सचा हा प्रवास केवळ इथपर्यंतच थांबला नसून तो अजूनही सुरूच आहे. मोटर, बॅटरी, गीअर, चाके इत्यादी अनेक बाबींमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत असून दुचाकींच्या सुधारित आवृत्ती बाजारपेठेत दाखल होत आहेत. चीन, अमेरिका, नेदरलँड्स, जर्मनी इत्यादी देशांत ज्या प्रमाणावर ई-बाइक्सचा वापर होतो आहे, त्या तुलनेत भारत फारच मागे आहे. शहरांतील प्रदूषण व अन्य समस्या बघता ई-बाइक्सचा वापर अधिकाधिक होणे सर्वाच्याच हिताचे आहे. भारतीय बाजारपेठेत या दुचाकींना हवी तशी मागणी नसायला काही करणे आहेत. भारतातील ई-बाइक्सचे अस्तित्व, त्यांचा स्वीकार न होण्यामागची कारणे या सर्वाचा विचार आपण पुढील लेखात करू.