गेल्याच आठवडय़ातली गोष्ट आहे, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढवल्या. ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणतात तो हाच. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ म्हणजे महागाईच्या आलेखाच्या उंच उंच झोकाच. म्हणजे ‘पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं’ तर दाद कोणाकडे मागायची अशीच गत. पाऊस तर नाहीच नाही, त्यात महागाईचा भडका. असो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’. येईल त्या परिस्थितीला सामोरे जात ‘हेही दिवस जातील’ असं म्हणत आपला आध्यात्मिक बाणा जपायचा आणि मुकाटपणे गाडीला किक मारून ऑफिसला निघायचं. गाडीवरनं आठवलं, पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन कार आणि बाइकनिर्माते डिझेलवर चालणाऱ्या गाडय़ांच्या निर्मितीत वाढ करण्याची चिन्हे असल्याचं आपण एकदा म्हटलं होतं. तसंच होताना दिसतंय. हिरो होंडा (हो हो हिरो होंडाच, दोन्ही कंपन्यांतील करारानुसार २०१४ पर्यंत हे नाव त्यांना वापरता येणार आहे) आता डिझेल बाइक घेऊन येतेय. बातमी तशी जुनीच आहे पण दसरा-दिवाळीपर्यंत ही बाइक बाजारात येईल अशी ‘अंदर की बात’ नवीन आहे! (अर्थात याला अधिकृत दुजोरा नाही).
आता डिझेल बाइक म्हणजे तिचं फायिरग, लुक्स, किती सीसीचं इंजिन, मायलेज, अ‍ॅव्हरेज, किंमत अशी प्रश्नांची रांगच लागते. पण फारसं काळजीचं कारण नाही. गाडीचा लुक अत्यंत स्टायलिश असेल असं समजतंय. डिझेल बाइकसाठी पुढाकार घेतलाय तो हिरो मोटोकॉर्पने. आणि हिरो मोटोकॉर्प व होंडा मोटर्स या विभक्त झालेल्या कंपन्यांच्या करारानुसार या बाइकचं नाव असेल हिरो होंडा डिझेल ४००!!!
तमाम भारतीयांच्या दिलाची धकधक बनलेला हिरो होंडा ब्रँड गेल्याच वर्षी विभक्त झाला. हिरो मोटाकॉर्प आणि होंडा मोटर्स या दोन स्वतंत्र कंपन्या झाल्या. आधी एकदिलाने काम करणाऱ्या या कंपन्यांमध्येच आता ग्राहकाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी ‘रेस’ लागली आहे. यात कधी हिरो मोटाकॉर्प बाजी मारते तर कधी होंडा. असो, मुद्दा हा नाही. तर यांच्यातील हिरो मोटोकॉर्पने दसरा-दिवाळीपर्यंत हिरो होंडा डिझेल ४०० ही बाइक बाजारात आणण्याचा निश्चय केला आहे.
काय असतील गाडीची वैशिष्टय़े?
४०० सीसीचं एअर कूल्ड इंजिन, ज्यात असेल डायरेक्ट फ्युएल इंजेक्शनचे तंत्रज्ञान, ३० बीएचपी पॉवर, आणि तरुणाईला भुलवणारी स्टायलिश मेटॅलिक बॉडी. ही या गाडीची यूएसपी असतील. डिझेल बाइकच्या बाजारात क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीनेच हिरो मोटोकॉर्पनी ही पावले उचलली असून आजच्या काळाला साजेशीच या गाडीची रचना असेल, असं सांगण्यात येतंय. सध्या डिझेल बाइकच्या रचनेचा अभ्यास सुरू असून ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या संघटनेचे प्रमाणपत्र मिळून या गाडीच्या उत्पादनाला सुरुवात करण्याचे प्रयत्न कंपनी स्तरावर सुरू आहेत.
बाइक अधिकाधिक कम्फर्टेबल असेल यावर भर देण्यात येत असून हंक किंवा करिझ्मासारखा तिचा लुक असेल असे संकेत मिळत आहेत.
मायलेज
हिरो होंडा डिझेल ४०० बाइक किमान ३० किमी प्रतिलिटर मायलेज देणारी असेल. इंधन टाकीची क्षमता १७ लिटरची असेल तर साडेतीन लिटरला रिझव्‍‌र्हला लागू शकेल.
डिस्क की ड्रम ब्रेक
सध्या डिस्क ब्रेक बाइक्सची चलती आहे. त्यामुळे बहुतांश गाडय़ांच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्सची सुविधा असते. ड्रम ब्रेकच्या गाड्याही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, डिस्क ब्रेक्सच्या गाडय़ांना तरुणाईची अधिक पसंती असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आलंय. काही बाइक्समध्ये पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक्स आणि मागच्या चाकाला ड्रम ब्रेक्स अशीही सोय असते. मात्र, हिरो होंडा डिझेल ४०० बाइकच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक असतील असे समजते.
किंमत
डिझेल बाइक असल्यामुळे या गाडीची किंमत साधारणत: दीड लाख रुपयांच्या आसपास असेल. ही बाइक कोणत्या रंगात उपलब्ध असेल याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही.

पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त असलेल्या डिझेलवर चालणा-या बाइक बाजारात आल्या तर या क्षेत्रातील स्पर्धा अधिक बळावणार आहे. त्याचा अंतिम फायदा अखेरीस ग्राहकांनाच आहे. हिरो मोटोकाँर्पने डिझेल बाइकच्या निर्मितीत पाऊल टाकण्याची जय्यत तयारी चालवली आहे. हिरो होंडा डिझेल ४०० ही बाइक दसरा-दिवाळीपर्यंत बाजारात आली तर आश्चर्य वाटायला नको.