जुलैनंतर ऑगस्टने वाहन क्षेत्राला चांगली साथ दिली. आता सप्टेंबरची वाट पहायची आहे. ऑक्टोबर स्थिर गेला तरी पुन्हा नोव्हेंबरबाबत आशा आहेच. चांगल्या मान्सूनची साथ यापुढील आकडेवाढीला निमित्त ठरू शकेल. तसेच सणांच्या निमित्ताने सुरू असलेली सवलत तूर्त राहण्याचाही फायदा या क्षेत्राला होऊ शकतो. तो कदाचित वाढत्या इंधनदरवाढीवर मात करू शकेल..

सण-सवलतींच्या निमित्ताने सूट-सवलतींचा मोठा आधार भारतीय वाहन क्षेत्राला गेल्या महिन्यात मिळाला. इंधन दरवाढीनंतरही या उद्योगाने ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत वाढ नोंदविली. यावेळी केवळ वाढच राहिली नाही तर गेल्या सलग नऊ महिन्यातील घसरणीला ऑगस्टमधील वाहन विक्रीने छेद दिला. १५.३७ टक्क्यांसह भारतीय प्रवासी वाहन क्षेत्राने १.३५ लाख विक्रीला स्पर्श केला.
ऑगस्टमध्येच इंधन दरवाढ झाली होती. आणि आता सप्टेंबरच्या सुरुवातीपासून अनेक वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. तेव्हा मासिक वाहन विक्री वाढीच्या आकडय़ाचे चित्र येत्या महिन्यातही कायम असेल की नाही, याबाबत शंका आहे. सप्टेंबरमध्ये कदाचित गणेशोत्सव आदी सणांमुळे वाहनांची वाढ राखली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबर ‘ड्राय’ जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी. तेव्हा वाढीचा आशेचा किरण.
ऑगस्टमधील इंधन दरवाढीनंतर सप्टेंबरच्या सुरुवातीपासून अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती १.५ टक्क्यांपासून पुढे वाढविल्या. याच महिन्याच्या प्रारंभापासून डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला असला, तरी एप्रिलपासून दुहेरी आकडय़ात भक्कम झालेल्या डॉलरमुळे वाहन कंपन्यांची आयात महागडी ठरली आहे. अमेरिका, जर्मनी, जपान बनावटीच्या अनेक गाडय़ा भारतात अधिक विक्री नोंदवितात. त्याचबरोबर या विदेशी कंपन्या मोठय़ा प्रमाणात सुटे भाग आयात करून येथील त्यांच्या प्रकल्पात वाहनांची जुळवणी करतात. या आयातीचा हिस्सा प्रत्येक कंपन्यांचा भिन्न भिन्न असतो. मात्र त्याचे वाढते प्रमाण त्यांचा खर्च वाढवीत असते. तो वसूल करण्यासाठी किंमतवाढी वाचून पर्याय नसतो. त्यातच गेल्या महिन्यापासून इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सीरिया-अमेरिका युद्धसदृश वातावरणामुळे कच्च्या तेलाचे दर ११५ च्या वेशीला जाऊन आले आहेत.
एकूण प्रवासी वाहनांची महिन्याला सध्या होणारी विक्री ही कोणे एकेकाळी केवळ मारुती सुझुकीच्या महिन्याला संपणाऱ्या वाहनांची होती. बरोबर वर्षभरापूर्वी देशातील पहिल्या क्रमांकाच्या या कंपनीला कामगार-व्यवस्थापन संघर्षांला सामोरे जावे लागले होते. मात्र गेल्या दोनेक महिन्यांपासून तिच्या विक्रीत वाढ होत आहे. ‘सियाम’ या वाहन उत्पादक संघटनेला मात्र विक्री वाढ पूर्वपदावर येऊ लागली आहे, हे मान्य नाही. मारुतीचे यंदाचे वाढीचे आकडे हे गेल्यावेळच्या आंदोलनामुळे झालेल्या कमी आकडय़ांमुळे आहेत. इंधन दरवाढीचे सावट या उद्योगावर कायम असल्याने आगामी कालावधीत या उद्योगाकडून फारशा अपेक्षा नाहीत, असेच संघटनेच्या उपमहासंचालक सुगातो सेन यांचे म्हणणे आहे. त्यांना तर एकूणच चालू आर्थिक वर्षांपर्यंत वाढीची आशा नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा उद्योग पूर्वपदावर येण्यास आणखी दोन तिमाही जाऊ द्यावी लागेल.
निर्यात, सेन्सेक्स, रुपया असे सारेच वधारणेच्या पंक्तीत असताना मंगळवारी जाहीर झालेल्या वाहन विक्रीच्या आकडय़ानेही भर घातली. या महिन्यात प्रवासी वाहनांसह दुचाकीनेही वाढ नोंदविली. गेल्या महिन्यात एकूण विक्रीप्रमाणेच निर्यातही (२४.९०%) वाढली आहे. तर उत्पादनही १७ लाखांच्यानजीक पोहोचले आहे. दुचाकी विक्रीही जवळपास ४ टक्क्यांनी उंचावली आहे. एकूण विक्री ४.५० टक्क्यांनी वाढली असताना तीनचाकी, व्यापारी वाहनांनी मात्र घसरण राखली.
चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते जुलैमधील वाहन विक्रीदेखील २ टक्क्यांनी खालावलेलीच राहिली आहे. यामध्ये प्रवासी वाहनांची विक्री ७.४९ तर निर्यातही ३.३७ टक्क्यांनी घसरलेली राहिली. वाहनचालकांची पसंती असलेल्या स्पोर्ट युटिलिटी क्षेत्रानेही या महिन्यात दगा दिला होता. कमी मागणीमुळे टाटा, महिंद्रसारख्यांना तर महिन्यातील काही दिवस काम बंद ठेवावे लागले.
जुलैनंतर ऑगस्टने वाहन क्षेत्राला चांगली साथ दिली. आता सप्टेंबरची वाट पाहायची आहे. ऑक्टोबर स्थिर गेला तरी पुन्हा नोव्हेंबरबाबत आशा आहेच. चांगल्या मान्सूनची साथ यापुढील आकडेवाढीला निमित्त ठरू शकेल. तसेच सणांच्या निमित्ताने सुरू असलेली सवलत तूर्त राहण्याचाही फायदा या क्षेत्राला होऊ शकतो. तो कदाचित वाढत्या इंधन दरवाढीवर मात करू शकेल. सूट-सवलतींचा टेकू कायम असल्याची अपेक्षा करतानाच कंपन्यांमार्फत नव्या उत्पादनांची घोषणा या उद्योगाला तग धरण्यास कारणीभूत ठरू शकते. पैकी अनेक कंपन्यांनी तिची नवीन वाहने सादर केली आहेत; काही घोषणा करताहेत. तर काही ऐन दिवाळीच्या तोंडावर ती प्रत्यक्षात आणतील.
गेल्या आर्थिक वर्षांत वाहन उद्योगाने विक्रीच्या बाबत दशकातील नीचांक गाठला होता. चालू आर्थिक वर्षांतील पहिले चार महिने तर सुमारच गेले आहेत. ऑगस्टच्या आशेवर उर्वरित कालावधी चांगला गेल्यास २०१३-१४ ची वाढ सकारात्मक नोंदली जाऊ शकते. मंदीच्या छायेतील वाहन उद्योगाला आर्थिक सहकार्य देण्याच्या केवळ घोषणाच होत आहेत. मात्र सरकारच्या तिजोरीवरील वाढता भार कमी करण्यासाठी या उद्योगावर यापूर्वी लादलेला करहतोडा तूर्त बाजूला ठेवला तरी तो एखाद्या ‘पॅकेज’पेक्षा निश्चितच कमी नसेल.

अशी ही आकडेवारी
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १ लाख १५ हजार ७०५ मोटारींची विक्री झाली, तर या ऑगस्ट महिन्यात १ लाख ३३ हजार ४८६ मोटारींची विक्री झाली. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकलींच्या विक्रीत ३.८२ टक्के वाढ झाली असून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ७ लाख ६६ हजार १२७ मोटरसायकलींची विक्री झाली तर या वर्षी ती ७ लाख ९५ हजार ३७८ इतकी होती. ऑगस्ट २०१३ मध्ये दुचाकी वाहनांची विक्री ६.६८ टक्के वाढली. गेल्या वर्षी १० लाख ५७ हजार ९२५ दुचाकी वाहने विकली गेली. या वर्षी ऑगस्टमध्ये ११ लाख २८ हजार ५९८ दुचाकी वाहने विकली गेली. सर्व वाहन प्रकारात विक्रीतील वाढ ४.४७ टक्के असून गेल्यावर्षी १३ लाख ५२ हजार २५ वाहने ऑगस्टमध्ये विकली गेली, तर यावर्षी ऑगस्टमध्ये १४ लाख १२ हजार ५१२ वाहने विकली गेली.