फियाट कंपनीने भारतात बऱ्याच वर्षांपूर्वी आपले पाऊल रोवले होते, ते भारतीय कंपन्यांबरोबर जाऊन. पण आता पुन्हा त्यांनी स्वत:चा संसार स्वतंत्रपणे मांडला आहे. एकंदर फियाट म्हटले की दणकटपणा, टिकाऊपणा व दर्जा यांचा मिलाफ मानला जातो. फियाटचे इंजिन हा मोटारीचा प्राण, ज्यामुळे अनेक मोटारींना भारतातच नव्हे तर अन्य देशांमध्येही मानाने स्वीकारले गेले आहे. अनेक जाणते लोक अजूनही फियाटच्या इंजिनावर डोळे मिटून विश्वास ठेवतात, हीच फियाटची खरी कमाई आहे. फियाटच्या मल्टिजेट इंजिन असणाऱ्या या लिनिआ- इमोशनची कमाल अनुभविण्याचा आनंदही या टेस्ट ड्राइव्हमध्ये घेता आला. लिनिआचा अनुभव कसा आहे, त्याचा हा वृत्तान्त..

सुमारे तीन वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत लिनिआचे आगमन झाले त्यानंतर तिच्या वेगवेगळ्या आवृत्तीही सादर झाल्या. टाटा मोटर्सबरोबर सहकार्याचा करार झालेला असताना टाटाच्या शोरूम व सेवा केंद्राचा लाभही घेतलेली फियाट आता स्वतंत्रपणे भारतीय बाजारपेठेत उतरली आहे. त्यामुळे सेवाकेंद्रातील अनेक गुणावगुण ज्ञात झाल्यानंतर फियाटचे हे स्वतंत्र अस्तित्व अनुभविता येणार आहे.
सेदान प्रकारातील लिनिआची इमोशन ही आवृत्ती मल्टिजेट डिझेल इंजिनाचा अतिशय दर्जेदार व सुरक्षित अनुभव देणारी आहे. चांगला दर्जा, वाहनचालनाचा सुखद आणि सुरक्षित अनुभव, अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेसा व संतुलित वापर, अंतर्गत सुविधा, रचना, सौंदर्य यांचा मेळ आदी बाबींमुळे लिनिआ टिकाऊपणात कणखर ठरू शकेल, असे जाणवते. मल्टिजेट इंजिन असणारी लिनिआ- इमोशन ही सेदान मोटार असून ४,५६० मिमि म्हणजे ४ मीटरपेक्षा अधिक लांब असणारी व १९० मिमि इतका मोठा ग्राऊंड क्लीअरन्स असणारी आणि २६०३ मिमि इतका व्हीलबेस असणारी मोटार आहे. शहरी रस्त्यांपेक्षा दीर्घपल्ल्याच्या व महामार्गावर लिनिआ चालविण्याचे व त्यात बसण्याचे अनुभविणे हे केवळ आरामदायी नाही तर सुरक्षित वाटते ते यामुळेच. अधिक वेगातही रस्ता पकडून पुढे जाण्याची ताकद सक्षमपणे वाहनचालनास प्रोत्साहक आहे, तसेच चांगल्या ग्राऊंड क्लीअरन्समुळे रस्त्यावरील दगड, खडय़ांचा मार्ग यातही सुरक्षितपणे लिनिआ पुढे जाते.
मॅन्युअल गीअर असणारी लिनिआ वायपर, हेडलॅम्प या बाबींसाठी मात्र सेन्सरवर अवलंबून आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी विशिष्ट प्रमाणात प्रकाश कमी झाला की हेडलॅम्प आपोआप चालू होतात. विंडस्क्रीनवर पावसाचे पाणी पडताच वायपर सुरू होतो. स्टिअरिंग वरखाली करून उंचीच्या आवश्यकतेनुसार जुळवून घेण्याची सुविधा असल्याने वाहन चालकाला लांबवरच्या प्रवासात मान, खांदे यांवर येणारा ताण कमी करता येतो.
गीअर टाकताना जोर लावावा लागत नसला तरी सर्वसाधारण ते फार सॉफ्ट नाहीत वा फार कडकही नाहीत. गीअर टाकताना हात ठेवण्यासाठी असलेला फोल्डिंग बार (हॅण्डरेस्ट) मात्र तो खाली असल्यास अडथळा वाटतो. त्यामुळे त्या हात ठेवण्याच्या बारची चालकाच्या दृष्टीने अडचण वाटते. अर्थात तो मागे करून ठेवण्याचा पर्याय असल्याने त्याचा अडथळा बाजूला सारता येतो. चालकाची आसन व्यवस्थाही आसन वर खाली करणे, पुढे मागे सरकविणे यासाठी उपयुक्त आहे, आसन रुंद असल्याने लांबच्या प्रवासात त्रास होत नाही. सर्व आसनांवर असलेले लेदर चांगल्या प्रतीचे आहे.  
लिनिआ ही सेदान प्रकारातही मोठय़ा आकारातील मोटार असून त्यामुळे एकंदर दिसण्यात व वापरण्यातही प्रशस्तपणा आहे. यामुळे शहरातील अति त्रासदायक अशा वाहतूक व्यवस्थेत ती चालविणे छोटय़ा मोटारींच्या तुलनेमध्ये काहीसे कंटाळवाणे होते. अर्थात अशा स्थितीतही ती चालविणे सोयीचे व्हावे यासाठी असणारी आरशांची रचना व्यवस्थित असल्याने वाहनाचा अंदाज पूर्णपणे येतो. दुसरी बाब म्हणजे पॉवर स्टिअरिंगही प्रभावी आहे. खरे म्हणजे आरामदायी अशी ही सेदान असल्याने मागे बसणाऱ्याच्या दृष्टीने विचार करता लिनिआ आरामदायी आहे. अलीकडच्या सेदान मोटारींच्या तुलनेत लिनिआला दिलेली ताकद व वजन याचा विचार करता झटकन वेग घेण्याची क्षमता नाही. मात्र एकदा वेग घेतल्यानंतर हळूवारपणे तो वाढवीत नेणे आणि वेगात असतानाही रस्ता पकडून धावणे ही लिनिआची कमाल अन्य अनेक मोटारींमध्ये आज सहजासहजी दिसून येत नाही. मल्टिजेट हे इंजिन १३०० सीसीचे असून त्याची क्षमता वाढविल्यास पिकअप चांगला मिळू शकेल. आजकालच्या पिकअप हव्या असणाऱ्या ग्राहकाला लिनिआच्या वजनाच्या दृष्टीने इंजिनाची ताकद काही कमी पडल्यासारखे वाटते. अर्थात ही लंबी रेस की गाडी आहे हे लक्षात घेतल्यास कणखरपणा, सुरक्षितपणा व आरामदायी प्रवास यासाठी लिनिआचे वेगळेपण अजूनही टिकून आहे.
सुरुवातीच्या लिनिआमधील पेट्रोल व डिझेलचे इंजिन अन्य प्रकार व श्रेणीचेही मिळते. पण त्यातही मल्टिजेट हे इंजिन जाणकार चालकाच्या दृष्टीने गुणवान आहे. याचे कारण त्याची ताकद, सुरक्षितपणा व दणकटपणा. अजूनही इंजिनाची ताकद वाढविली गेली तर नवीन पिढीतील वेगवेडय़ा वाहनांमध्येही लिनिआ चपखल बसू शकेल.
डय़ुएल टोनमधील अंतर्गत रंगसंगतीची रचना, मागील बाजूला आसनामध्ये असणारी हात ठेवण्यासाठीची ग्लोव्हबॉक्सची तरतूद त्यात ग्लासही ठेवता येतो. त्याचप्रमाणे एअरबॅग ही सुरक्षिततेची सुविधा जी वरच्या श्रेणीतील लिनिआमध्ये आहे, उत्कृष्ट ब्रेकिंगसाठी एबीएस ईबीडी तंत्रासह असलेली सुविधा मोटारीला वेगात असतानाही झटकन ब्रेक लावायचा झाल्यास नियंत्रित करताना सुरक्षितपणे थांबविते, त्यामुळे मोटार घसरत नाही वा रस्ता सोडत नाही. एकंदर चांगली सेदान असे लिनिआबाबत म्हणता येते.
वातानुकूलित यंत्रणाही मागील आसनस्थ व्यक्तीला स्वतंत्रपणे वापरता यावी यासाठी मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या समोर त्याच्या साधारण गुडघ्याच्या उंचीवर वातानुकूलित यंत्रणेच्या थंड हवेचा झोत मिळण्याची रचना केलेली आहे. त्यामुळे मोटारीतील सर्व प्रवाशांना वातानुकूलित यंत्रणेचा लाभ मिळू शकतो. ही यंत्रणाही ऐन कडक उन्हाळ्यातही प्रभावी वाटली. अतिउच्च अशा श्रेणीमधील मोटारींची तुलना मात्र लिनिआशी करता येणार नाही. त्यामध्ये असणाऱ्या सेन्सरसंलग्न अनेक सुविधा लिनिआमध्ये नाहीत.  

लिनिआची वैशिष्टय़े
 अंतर्गत हवामान नियंत्रणासहित वातानुकूलित यंत्रणा
 प्रकाशाच्या आवश्यकतेनुसार हेडलॅम्प आपोआप चालू बंद होण्याची सुविधा
 वैयक्तिक पर्यायानुसार उपयुक्तता वापरण्याची सुविधा- यामध्ये डिजिटल ऑडोमीटर, देखभाल करण्याच्या दिवसाची आठवण, वेगनियंत्रण राखण्यासाठी लक्षवेधी आवाज, पुढील प्रवाशासाठी असणारी एअरबॅग सुविधा चालू-बंद करण्याची सुविधा, मायलेज किती मिळू शकेल यासाठी सूचित करणारी डिजिटल यंत्रणा अशा बाबी अंतर्भूत आहेत.
 वर-खाली करण्याची सोय असणारे पॉवर स्टिअरिंग
 मागील आसनामध्ये अंतर्भूत आर्मरेस्टबार त्यात अंतर्गत ग्लोव्हबॉक्सची सुविधा
 अंतर्गत रचनेत दुहेरी रंगाची रंगसंगती
 मागील बाजूच्या प्रवाशांना गुडघ्याच्या उंचीवर वातानुकूलित यंत्रणेच्या हवेचा झोत मिळण्याची रचना
 कोलॅप्सेबल स्टिअरिंग कॉलम  ईबीडीसब एबीएस ब्रेक यंत्रणा
 चोरीपासून रक्षणकारक असणारा रोलिंग कोडसह इंजिन इम्मोबिलायझर