फोर्टमधील द अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिटय़ूशन या शाळेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे विण्टेज कार प्रमाणेच शाळाही एक प्रकारे प्राचीन संस्था, शाळेची दिमाखदार इमारतही प्राचीन वास्तू ठरली आहे. शाळेची दीडशे वर्षांची ही परंपरा अनोख्या पद्धतीने मिरवावी म्हणूनच जहांगीर एस फारूख यांनी यानिमित्त विण्टेज कार आणि विण्टेज बाइक्सचे प्रदर्शन शाळेच्या आवारात भरविण्याचे ठरविले आहे. १२ व १३ जानेवारी अर्थात वीकेण्डला हजारीमल सोमाणी मार्ग, फोर्ट येथील द अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिटय़ूशनच्या आवारात विण्टेज कार आणि विण्टेज दुचाकी मांडण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांना या गाडय़ा तसेच बाइक्ससोबत फोटोही काढून घेता येणार आहे. १९२५ ते १९६० या कालावधीतील ही वाहने आहेत.
जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये आणि त्यातून दाखविण्यात येणाऱ्या जुन्या मुंबईत अनेक लोकांकडे चारचाकी वाहने मोठय़ा प्रमाणावर होती. इम्पाला, शेव्हर्ले, फियाट यांसारख्या जुन्या कंपन्यांच्या गाडय़ा, त्यांचे विविध आकार, पुढच्या बाजूने दरवाजा उघडण्याची पद्धत यांसारख्या गोष्टी आता पाहायला मिळत नाहीत. आजघडीला १९५०-५५ सालच्या कृष्णधवल हिंदी चित्रपटांतून दाखविलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांवरून फिरणाऱ्या जुन्या गाडय़ा पाहताना गंमत वाटते.
ऑटोमोबाइल क्षेत्रात झालेली क्रांती, त्यामुळे आपल्या देशात गेल्या ७-८ वर्षांत आलेल्या आंतरराष्ट्रीय बलाढय़ कंपन्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या गाडय़ा, त्यांचे रंग या चकचकाटातही जुन्या गाडय़ा, त्यांचे आकार, त्यांचे नजरेत भरणारे रंग याची मजा काही औरच. म्हणूनच की काय आपल्या जुन्या गाडीला जीवापाड जपणाऱ्या हौशी गाडीमालकांनी या जुन्या गाडय़ांची देखभाल चांगल्या प्रकारे केली आणि आजघडीला त्या विण्टेज कार म्हणून ओळखल्या जातात.  
जुन्या गाडय़ा, जुन्या दुचाकी यांची देखभाल करणे, त्या चालू अवस्थेत ठेवणे यासाठीही बरेच श्रम पडतात. कारण वाहनाचा एखादा स्पेअरपार्ट हवा असेल तर त्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागते. परंतु, तरीसुद्धा हौसेला मोल नसते या उक्तीप्रमाणे विण्टेज वाहनांचे मालक आपल्या या वाहनांची विशेष काळजी घेताना दिसतात.
आजच्या पिढीला कार किंवा बाइक्सचे असे कौतुक पाहणे हेही एक प्रकारचे अप्रूप आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. विशेषत: ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’च्या आजच्या काळात आपण चप्पल किंवा बूट एकदा फाटली एक शक्यतो ती दुरुस्त करण्याच्या फंदात पडत नाही तर लगेच दुसरी चप्पल किंवा बूट खरेदी करतो. परंतु, विण्टेज कार आणि विण्टेज बाइक्स बाळगणारे हौशी मालक  आपल्या वाहनांची विशेष काळजी घेतात ही बाबही ‘विण्टेज’ म्हणावी अशीच आहे.
प्रस्तुत प्रदर्शनात काळ्या रंगाची एजेएस बाइक (१९२७), दोन बीसीए बाइक्स, नॉर्टन बाइक्स, वेस्पा स्कूटर, हॅण्ड गिअरची बाईक पाहण्याची संधी मिळणार आहे. विण्टेज कारमध्ये शेव्हर्ले (१९३०), फोक्सव्ॉगनची बीटल कार, चार डॉज मोटारी अतिशय उत्तम स्थितीत असणाऱ्या चारचाकी गाडय़ाही पाहायला मिळतील. शाळेची दीडशे वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाळेलाही एक प्रकारे ‘विण्टेज’ मूल्य असून हे वर्ष साजरे करण्यासाठी विण्टेज गाडय़ा, बाइक्सचे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.