* मी एका खासगी कंपनीत कामाला आहे. माझे मासिक उत्पन्न ३० हजार रुपये आहे. पत्नीही शिक्षिका आहे. मला कुटुंबासाठी गाडी घ्यायची आहे. कोणती घेऊ?
– हर्षद दळवी, डहाणू
* तुम्ही सेकंड हँड गाडी घेण्याच्या विचारात आहात. मात्र तुमचे व पत्नीचे उत्पन्न असे मिळून कार लोनसाठी अर्ज केलात तर तुम्हाला नवीन कार घेणे अगदी सहज शक्य आहे. मारुती अल्टो किंवा तत्सम गाडय़ा हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. जुनी कार घ्यायचीच असेल तर फार फार तर तीन वष्रे वापरलेली गाडीच घ्या. कारण त्यात तुम्हाला जास्त मेन्टेनन्स करावा लागणार नाही. परंतु शक्यतो नव्या गाडीचाच विचार करावा हे उत्तम.
* आम्ही दोघेही कमावते आहोत. आमचे बजेट दहा लाख रुपये आहे. आम्हाला एसयूव्ही घेण्याची खूप इच्छा आहे.
– डॉ. मदनसिंग गोलवल
* तुमचे बजेट पाहता तुम्हाला अर्टगिा, शेवरोलेची एन्जॉय, रेनॉची डस्टर या गाडय़ा घेता येऊ शकतील. मात्र यातील अर्टगिा आणि डस्टर या कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत. तसेच फोर्डची इकोस्पोर्टही चांगला पर्याय आहे. यातून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. थोडे बजेट वाढवले तर इनोव्हाही घेता येऊ शकेल.
* मी स्टेट बँकेत कामाला आहे. माझा वार्षकि पगार अडीच लाखांच्या घरात आहे. माझे कार घेण्याचे स्वप्न असून बजेट तीन-चार लाख रुपये आहे. कुटुंबात चौघेजण आहोत.
    – मल्लिकार्जुन गुंड
* तुमचा मासिक पगार लक्षात घेता तुम्ही मारुती अल्टोच घ्या. कारण तुमच्या बजेटमध्ये बसणारी ही गाडी आहे. शिवाय चौघांसाठी पुरेशी आहे. तुम्ही म्हणता तसे तुम्हाला आठवडय़ातून दोनदा लांब चक्कर मारणेही शक्य आहे अल्टोतून. त्यामुळे फारसा विचार न करता अल्टो घ्यावी हेच बरे.
* माझे बजेट तीन ते पाच लाख रुपये आहे. माझा महिनाभरातून साधारण १०० किमी प्रवास होतो. कोणती कार घेऊ?
    – विठ्ठल भानुसे, लोणार (बुलढाणा)
* तुम्ही म्हटले आहे की मारुतीची सेलेरिओ घेऊ की वॅगन आर. तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर दडले आहे. दोन्ही गाडय़ा चांगल्या आहेत. तरीही तुम्ही शक्यतो वॅगन आरला पसंती द्यावी. सेलेरिओही चांगली असली तरी तिची उपलब्धता कितपत आहे, याबाबत सांगता येणे कठीण आहे.
* मी एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. मला गाडी चालवायची खूप हौस आहे. आमच्या चार जणांच्या कुटुंबासाठी कोणती गाडी योग्य ठरेल, शक्यतो स्वदेशीच असावी.
– विशाल शिर्के, पुणे
* मारुतीची कोणतीही गाडी, किंवा मग टाटांची नॅनो वा इंडिका, इंडिगो या गाडय़ाही तुम्हाला परवडू शकतील. मारुतीची इको तुम्हाला सीएनजीवर कन्व्हर्ट करता येऊ शकेल. तसेच वॅगन आरही आहेच सीएनजीवर चालणारी.