* माझा एक छोटा व्यवसाय असून मी शेतीही करतो. मला उत्तम आणि मजबूत अशी गाडी पाहिजे आहे.
-गोरख देवकर
* मग तुम्हाला मिहद्राची एक्सयूव्ही ५०० ही एसयूव्ही घ्यायला हरकत नाही. शिवाय तुम्हाला टाटा स्टॉर्मही चांगली परवडू शकते. कारण या रांगडेबाज आणि मजबूत गाडय़ा आहेत. विशेषत: मिहद्रा आणि टाटाच्या एसयूव्ही खास भारतीय रस्त्यांची एकूण परिस्थिती पाहूनच डिझाइन केल्या असतात. या गाडय़ा तुम्हाला परवडू शकणाऱ्या तर आहेतच, शिवाय तुम्हाला शोभू शकतील अशाही आहेत.
* माझ्याकडे १४ वष्रे जुनी टाटा इंडिका आहे. मला ती बदलायची आहे. माझा रोजचा प्रवास ५० किमीचा आहे. तर माझे मूळ गाव ४०० किमी अंतरावर आहे. वर्षांतून तीन-चार वेळा जाणे होते. मला कोणती कार घेणे परवडेल?
– ज्ञानेश्वर भोसले
* तुम्ही कामाच्या ठिकाणी रोज गाडी घेऊन जात असाल तर एन्ट्री लेव्हलची हॅचबॅक घ्या. तुमच्या बजेटमध्ये येऊ शकणाऱ्या होंडा अमेझ, वॅगन आर, अल्टो, ह्य़ुंदाई आय १० या गाडय़ा आहेत. यापकी कोणतीही घेतलीत तरी काही हरकत नाही. कारण सगळ्यांचे रिझल्ट्स चांगले आहेत आणि वर्षभरातून चार-पाच वेळा मूळ गावी जाण्यासाठी या गाडय़ा योग्यच आहेत. तुमच्याकडची टाटा इंडिका विकताना मात्र तिची किती किंमत येते ते पाहा, ती रक्कम तुमच्यासाठी बोनसच असेल.
* मी नुकताच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून बँकेत लागलोय. किमान सात-आठजणांना बसता येऊ शकेल अशी गाडी मला घ्यायची आहे, शिवाय तिचा लूकही डिसेंट हवा आणि डिझेल व्हर्जन असावे. बजेट आठ लाख रुपये आहे.
– धीरज गजभिये
* तुमच्या प्रश्नाला सोप्पं उत्तर आहे. एकतर तुम्हाला शेवरोलेटची एन्जॉय ही एमयूव्ही परवडू शकेल किंवा मग मारुतीची अर्टगिा. अगदी तुमच्या सर्व अटींमध्ये बसणाऱ्या या गाडय़ा आहेत. फक्त थोडं बजेटचं इकडेतिकडे होऊ शकेल. पण तुम्हाला तुमची ड्रीम कार तर घेता येईल.
* माझा रोजचा प्रवास दहा किमीच्या परिघातला आहे. तोही शहरातला. मला वीकेंडला बाहेरगावी फिरण्यासाठी जायला कोणती गाडी घेणे परवडेल. माझे बजेट पाच लाखांपर्यंत आहे.
– किरण घुले
* तुम्हाला चांगली दिसणारी आणि मायलेजही चांगला देणारी गाडी हवी आहे. तुमचे बजेटही चांगले आहे. यात तुम्ही डॅटसनची अलीकडेच लाँच झालेली गो ही गाडी घेऊ शकता. तुम्हाला अगदीच पारंपरिक ब्रँड पाहिजे असेल तर मग मारुती हाच त्याला पर्याय आहे.
* माझा शेतीचा व्यवसाय आहे. शेत माझ्या घरापासून २५ किमी अंतरावर आहे. कोणती गाडी घेऊ?
– पराग सोनार
* टोयोटा, इनोव्हा आहे, बोलेरो घेऊ शकता. शिवाय मिहद्राच्या इतरही दणकट एसयूव्ही आहेत की ज्या तुम्हाला पसंत पडू शकता. कारण या गाडय़ा कोणत्याही रस्त्यावर व्यवस्थित चालतात. त्यांची रचनाच तशी असते. डस्टर तुम्हाला परवडू शकेल, परंतु ती कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे.
* कुटुंबातील पाचजणांसाठी कोणती गाडी घ्यावी? पुणे-नाशिक येथे वारंवार जावे लागते. लगेज स्पेस असलेली, चांगली दिसणारी कोणती कार आहे, जी पाच लाखांत किंवा त्यापेक्षा कमी किमतीत मिळू शकेल.
– तनुलता वालावलकर
* टोयोटा इटिऑस लिवा हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवरोले स्पार्कही चांगला पर्याय आहे. मारुतीची इकोही तुम्ही घेऊ शकता. या सर्व गाडय़ा तुमच्या अटींमध्ये अगदी परफेक्ट बसतात. शिवाय मायलेजही चांगले आहे.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com  वर पाठवा.