14एकमेव मर्सिडीज
अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी विनोदी नाटकांतील भूमिका तसेच छोटय़ा छोटय़ा पण आपला ठसा उमटविणाऱ्या भूमिका मराठी चित्रपटांमधून केल्या आहेत. सध्या खलनायिका छटेतील सुरेखा ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ या मालिकेत लोकप्रिय ठरली आहे. त्याशिवाय ‘राधा ही कावरीबावरी’ हे नाटक सुरू असून आगामी ‘प्रेमाचे साईड इफेक्ट्स’, ‘एक होती राणी’ या चित्रपटांमधून त्या झळकणार आहेत.

विनोदी भूमिका सुरुवातीच्या काळात अधिक वाटय़ाला आल्या हे खरे असले तरी त्या प्रतिमेमध्ये मला अडकून पडावे लागले नाही. देवयानी मालिकेमधील अतिशय गंभीर आणि खलनायिका छटेची भूमिका साकारायला खूप मजा येते आहे. वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची आवड जशी मला आहे तशीच वेगवेगळ्या गाडय़ा वापरण्याची हौसही आहे. मी स्वत: ड्रायव्हिंग करीत नाही. परंतु, निरनिराळ्या गाडय़ा माझ्याकडे आहेत. अलीकडेच झायलो ही जावा ब्राऊन रंगाची गाडी घेतली आहे. पण त्याचबरोबर आय टेन आणि मारुती ओम्नी या गाडय़ाही मी वापरते. झायलो ही गाडी घेण्यामागचे कारण म्हणजे ती अतिशय ऐसपैस आणि दूरवरचा प्रवास करायचा असेल तर कुटुंबासह फिरण्यासाठी अतिशय ‘सेफ कार’ या प्रकारातील गाडी आहे. ‘कम्प्लिट फॅमिली कार’ म्हणून तिची गणना करता येते. आय टेन ही गाडी त्या मानाने आकाराने लहान असली तरी मुंबईत शूटिंगच्या ठिकाणी जाताना मी आय टेन वापरते. झायलो ही आकाराने मोठी असली तरी टबरे कार असल्यामुळे खाचखळग्यांच्या रस्त्यांवरून मुंबईबाहेर फिरताना ती आरामदायक ठरते. ड्रीम कार असे विचाराल तर फक्त मर्सिडीस एवढेच मी सांगू शकते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या लहानपणी फियाट आणि अ‍ॅम्बॅसॅडर एवढय़ा दोनच कारची मॉडेल्स बहुतांशी दिसायच्या. मारूती कारही नंतरच्या काळात आली. परंतु, श्रीमंत लोक ऐटत वेगळी गाडी घेऊन जाताना दिसले की नेहमी पाहत असलेल्या गाडय़ांच्या तुलनेत ही गाडी एकदम उठून दिसायची. तेव्हा मी बाबांना ही गाडी दिसली की ही कोणती गाडी अशी चौकशी करायचे, तेव्हा ही ऐटबाज गाडी मर्सिडीज असल्याचे त्यांनी सांगितल्यावर तेच डोक्यात बसले. ऐट, शानदार दिसणारी म्हणजे मर्सिडीज. स्टेटस सिम्बॉलपेक्षाही मर्सिडीज गाडीला एक वलय मूळातच आहे. भविष्यात शक्य होईल तेव्हा संपूर्ण लाल रंगाची मर्सिडीज घेणे हे माझे स्वप्न आहे. लहानपणापासून अप्रूप वाटत आल्यामुळे आज अन्य ब्रॅण्डच्या खूप गाडय़ा बाजारात मिळत असल्या तरी मर्सिडीज ही गाडी मनात घर करून राहिली आहे.