एकमेकांना सहाय्य करून, एकमेकांच्या ज्ञान, भांडवल, साधन संपत्तीचा वापर करून यशाचे नवे शिखर गाठता येते व विशिष्ठ कालावधीत अचाट प्रगती करता येते आणि स्वतचे नवे विश्व उभारता येते याचा प्रत्यय येतो हिरोहोंडा (सध्याची हिरो मोटोकॉर्प) कंपनीच्या पाउलखुणा चाळताना. जपानमधील होंडा मोटरसायकल जपान कंपनी लिमिटेड यांचे तंत्रज्ञान आणि भारतातील हिरो सायकल्स या कंपनीचे व्यवस्थापन आणि मनुष्यबळ यांच्या एकत्रीकरणाने १९८४ मध्ये स्थापन झालेली हिरोहोंडा कंपनी म्हणजे भारतातील दुचाकींच्या जगातील एक विश्वासाचे नाव आहे. हिरोहोंडा म्हणजे भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी. फोर्ब्सच्या जगातील सर्वात आदरणीय कंपन्यांच्या यादीत हिरोहोंडाने १०८वा क्रमांक मिळवला होता. या कंपनीची ही कामगिरी म्हणजे तिने जगभरातील ग्राहकांच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. २०१० साली भारतीय भागीदार हिरो सायकल्स आणि जपानी भागीदार होंडा मोटरसायकल्स जपान कंपनी लिमिटेड यांची ही २६ वर्षांची भागीदारी संपुष्टात आली आणि हिरो सायकल्स ने ‘हिरो मोटोकॉर्प’या नव्या नावाने सुरुवात केली आहे. हिरोहोंडा ची २६ वर्षांची कारकीर्द आणि हिरो मोटोकॉर्पने गेल्या दोन वर्षांत आखलेली नवी धोरणे आणि त्यांनी बाजारात दाखल केलेली नवीन उत्पादने हा सर्वच प्रवास अनोखा आहे.

हिरोहोंडा : स्वस्त, विश्वासू आणि दर्जेदार उत्पादने
कुठलीही निर्मितीची प्रक्रिया निर्माता काय बनवू शकतो यापेक्षा लोकांना काय बनवून हवे आहे इथपासून सुरु होते. हीच नाडी हेरून हिरोहोंडाने १९८५ मध्ये आत्ताही बाजारात तग धरून असलेली CD१०० बाजारात उतरवली. या पाठोपाठ काही काळाने स्प्लेंडरने बाजारात प्रवेश केला. या दोन्ही गाडय़ा अतिशय किफायती, विश्वासू आणि दर्जेदार असल्याने या गाडय़ांनी भारतीय दुचाकी बाजारपेठेत अक्षरश राज्य केले. हिरोहोंडाच्या गाडय़ा कित्येक वष्रे दर्जेदार सेवा देणाऱ्या आणि मेंटेनन्स फ्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. या गाडय़ांमध्ये कंपनीने वेळोवेळी आवश्यक ते बदलही केले. सुरुवातीच्या काळात CD १०० मध्ये इंधन पातळी दाखवणारा फ्लोटही नव्हता. परंतु हिरोहोंडा ने काळानुसार सर्व दुचाकींत योग्य ते बदल केले. CD१००ची CD डिलक्स या नावाने बाजारात आलेली सुधारित आवृत्ती  म्हणजे कमी किमतीत उच्च गुणवत्ता देण्याचा एक प्रयत्न म्हणावा लागेल. आज CD१०० किंवा स्प्लेंडर सारख्या किफायती गाडय़ांमध्येही ऑटो स्टार्ट, अलॉय व्हील्स, मल्टी रिफ्लेक्टर हेडलाइट इत्यादी सोयी आपल्याला दिसतात. थोडक्यात, सामान्य ग्राहकांना असणारया सगळ्या अपेक्षा माफक किमतीत  हिरोहोंडाने पूर्ण केल्या आहेत.

महिलांसाठी स्वतंत्र दुचाकी
हिरोहोंडा ने प्लेजर या गिअर रहित दुचाकीची निर्मिती खास महिलावर्गासाठी सुरू केली.  मध्यमवर्गाला, तरुणांना, ड्रायिव्हगची आवड असणाऱ्या तरुणांना लक्षात घेऊन दुचाकी निर्मितीचे प्रयत्न अनेक वेळा झालेत पण महिलावर्गासाठी दुचाकीची निर्मिती करण्याचा हिरोहोंडाचा हा निर्णय त्यांची बाजारपेठेची असणारी जाण दर्शवतो. प्लेजर ने Activa, TVS स्कूटी इत्यादी समांतर वाहनांना चांगलीच स्पर्धा दिली. या सर्व धोरणांतून कंपनीच्या निर्मिती प्रक्रियेतील वेगळेपणा प्रकर्षांने दिसून येतो.

CD १०० ते करिझ्मा ZMR
किफायती आणि इंधनाचा खर्च कमी करणाऱ्या गाडय़ांची निर्मिती करीत असतानाच हिरोहोंडा ने अधिकाधिक वेगवान गाडय़ांचीही निर्मिती केली. हिरोहोंडाच्या एकूण कारकीर्दीवर नजर टाकताच असे लक्षात येते की बाजारपेठेत जेव्हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण, वेगवान दुचाकींना मागणी येऊ लागली तेव्हा हिरोहोंडा ने हंक, करिझ्मा, CBZ  आणि CBZ एक्स्ट्रीम अशा कित्येक वेगवान व देखण्या दुचाकींची निर्मिती केली. २००९ मध्ये कंपनीने करिझ्मा ZMR या २२० CC आकारमानाचे इंजिन असणाऱ्या दुचाकीची निर्मिती केली. या दुचाकीची तुलना झाली ती थेट काही परकीय रेसिंग बाइक्स बरोबर. थोडक्यात, गेल्या २६ वर्षांत हिरोहोंडा ने आपला सामान्य ग्राहकवर्ग तर टिकवून ठेवलाच पण त्याच्या बरोबरीने तरुणांना भुरळ पडणाऱ्या अत्याधुनिक अन वेगवान दुचाकींचीही निर्मिती केली.

इम्पल्स : एक ऑफ रोड निर्मिती
हिरो आणि होंडा च्या विभाजनानंतर हिरो मोटोकॉर्प ची सवप्र्रथम निर्मिती म्हणजे हिरो इम्पल्स. हिरो इम्पल्स ही गाडी दोन्ही प्रकारच्या ग्राहकांच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे- शहरात वापरण्याचे वाहन आणि त्याचबरोबरीने ऑफ रोड प्रवासंकारिता वापरण्याजोगे वाहन. इम्पल्सकडे नजर टाकताच लक्षात येते की तिची निर्मिती ही शहरी रस्ते आणि ऑफ रोड माळराने दोघांकारीताही करण्यात आली आहे. परंतु, हिरो इम्पल्स ऑफ रोड दुचाकी असली तरी तिचे इंजिन आकारमान हे १५० cc असून हेच इंजिन होंडा च्या युनिकॉर्न हा नावाजलेल्या दुचाकीत वापरले आहे. १५० cc इंजिन च्या निवडीमुळे या गाडीचे मायलेज इतर ऑफ रोड दुचाकींच्या तुलनेत फारच चांगले असून ही गाडी रोजच्या शहरी उपयोगासाठीही सोयीची आहे. केवळ १५० cc इंजिन हे ऑफ रोड दुचाकीसाठी पुरेसे आहे का हा मुद्दा कित्येकांच्या मनात उपस्थित झाला परंतु बाजारपेठेत प्रत्यक्ष इम्पल्स उपलब्ध झाल्यावर हे लक्षात आले कि इंजिन जरी आकारमानाने छोटे असले तरीदेखील त्याची निर्मिती व गिअर ची रचना अशाप्रमाणे करण्यात आली आहे कि माळरानांवर प्रवास करतांना गाडीत पुरेशी उर्जा नाही असे कधीही चालकाला जाणवत नाही. हिरो मोटोकॉर्प येणाऱ्या काळातही ‘देश की धडकन’ म्हणून ओळखल्या जावी हीच इच्छा.
(क्रमश:)