सांताच्या ‘सुटी’च्या बाता

नवे वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांना यंदाचा सांताक्लॉझ त्याच्या पेटाऱ्यातून भरघोस सूट,सवलतींचा खजिना घेऊन आला आहे. दसरा-दिवाळीलाही नसेल इतकी स्वस्तातील वाहने या माध्यमातून उत्पादक कंपन्या उपलब्ध करून देत आहेत.

18
नवे वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांना यंदाचा सांताक्लॉझ त्याच्या पेटाऱ्यातून भरघोस सूट,सवलतींचा खजिना घेऊन आला आहे. दसरा-दिवाळीलाही नसेल इतकी स्वस्तातील वाहने या माध्यमातून उत्पादक कंपन्या उपलब्ध करून देत आहेत. सतत घसरत्या विक्रीने हैराण झालेल्या आणि आता पुन्हा वाढीव कराचे संकट समोर असलेल्या कंपन्यांनी २०१४ च्या अखेरच्या टप्प्यातही असे केले नसते तरच नवल होते.उत्पादक कंपन्यांनी हातात आकर्षक सुटीचे वेष्टन असलेल्या वाहनरूपी भेटवस्तू असलेला सांताक्लॉझ वाहनप्रेमींच्या पुढय़ात वर्षसमाप्तीच्या दिवसांत स्वागताला आणून ठेवला आहे.
वर्षसमाप्ती आता जवळ येऊ लागली आहे. ३१ डिसेंबरला काय करायचे, नवीन वर्षांसाठी काय संकल्प करायचा, सरत्या वर्षांत केलेले संकल्प सिद्धीस नेले काय, याचा लेखाजोखा आताशा मांडायला सुरुवातही झाली असेल. नवीन काय खरेदी करायची नवीन वर्षांत याचीही गणिते मांडली जात असतील. थोडक्यात काय, नवीन वर्षांत नवीन काय, याचा लेखाजोखा मांडला जात असेलच. एक मात्र आहे, तुम्हाला नव्या वर्षांत नवीन कार घ्यायची असेल तर ती आताच घ्या, उगाच पुढील वर्षांची वाट पाहू नका. कारण नामांकित वाहननिर्मात्या कंपन्यांनी घसघशीत ऑफर्स दिल्या आहेत, सरत्या वर्षांसाठी!
19
वाहन उत्पादक कंपन्यांनी भरघोस सवलतींचा धडाका जाहीर केला आहे. ही सूट ३१ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत देऊ केली आहे. म्हणजेच न्यू इयरसाठी बचतीचा संकल्पमंत्रच म्हणा ना. खरे तर वाहन विक्रीचा जोर हा मार्च-एप्रिलला येणारा गुढीपाडवा अथवा दिवाळीपूर्वी येणाऱ्या दसऱ्याला असतो. हे हेरूनच विक्रेतेही गाडय़ांची आगाऊ मागणी नोंदवत असतात. या एकदोन दिवसांच्या मदारीवरच त्यांचे हजारो वाहन विक्रीचे बजेट तयार असते.
यंदा मात्र ख्रिसमस व न्यू इयर असे एकाच दमात कॅच करण्याचा कंपन्यांचा यत्न सुरू आहे. या पंधरवडय़ात काय ती वधारणारी विक्री नोंदवून घ्यायची असाच निर्धार त्यांनी केला आहे. म्हणजे जाता जाता कॅलेंडर इयरमधील सकारात्मक आकडेवारीच्या जोरावर नवे वर्ष काढणे त्यांना सुलभ होईल.
याचे एक मुख्य कारण म्हणजे केंद्रातील (काँग्रेसप्रणीत) मावळत्या व विद्यमान (भाजपप्रणीत) अशा दोन्ही सरकारने दिलेली उत्पादन शुल्कातील सवलत. मंदीच्या कालावधीत दिलेली ही सूट थेट पाच ते दहा महिन्यांपर्यंत टिकली. नव्या वर्षांबरोबर आता तीदेखील जाणार हे निश्चितच आहे.
या पाश्र्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या सवलती या एक्स्चेंज ऑफर, ऑफर प्राइज, लो इन्टरेस्ट रेटच्या माध्यमात आहेत. होन्डापासून विभक्त झालेल्या हिरोने तर वार्षिक अवघ्या ६.९९ टक्क्यांपुढील व्याजदराने दुचाकी खरेदीची संधी देऊ केली आहे. अर्थात प्रक्रिया शुल्क व कागदपत्र व्यवहार शुल्क अतिरिक्त आकारले जाणार आहेत. टोयोटाने तिच्या सर्वच प्रवासी कारवर ३० हजार रुपयांपर्यंतचे लाभ सादर केले आहेत. जपानच्याच होन्डानेही वीकेन्ड एक्स्चेंज कार्निवलच्या मोहिमेंतर्गत कमी मासिक हप्त्यातील अमेज, ब्रायोसारखी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. याच दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर आयोजित वाहन मेळा गर्दी खेचण्यात अपयशी ठरला.
सवलत संपुष्टीनंतर वाहनांच्या किमती वाढणार हे निश्चित आहे. तशी घोषणाही अनेक कंपन्यांनी करून टाकली आहे. मारुती, ह्युंदाई या स्थानिक कंपन्यांबरोबरच बीएमडब्ल्यू आदी विदेशी कंपन्यांनीही १ जानेवारी २०१५ पासून तिच्या वाहनांच्या किमती वाढतील, असे जाहीर केले आहे. यावर अन्य कंपन्यांचेही पाऊल उरलेल्या दिवसात पडेलच.
सवलत नाहीशीबरोबरच आणखी एक निमित्त कंपन्यांना मिळाले आहे ते म्हणजे चलनाचे. येथे भारतात रुपयाचे अवमूल्यन ६३ च्या तळात जवळपास पोहोचले आहे. तर अन्य आशियाई तसेच मुख्यत: युरोपीय चलनानेही अमेरिकी डॉलरपुढे नांगी टाकायला सुरुवात केली आहे. आणि वाहन कंपन्या म्हटले की त्या अधिकतर युरोपीयनच. तेव्हा घसरत्या चलनामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होत आहे. म्हणजे त्यांना आपले कमी किमतीचे चलन देऊन महागडय़ा विनियम दरात सुटे भाग मागविणे, वाहतूक खर्च करणे अनिवार्य होत आहे. ८० टक्क्यांहून अधिक आयातीवर भारतात वाहनांची जुळवणी करणाऱ्या विदेशी कंपन्यांना तसे ते महाग ठरणार आहे.
20
दुसरा कळीचा मुद्दा आहे तो व्याजदराचा. रिझव्‍‌र्ह बँकेने गेले जवळपास वर्षभर व्याजदर स्थिर ठेवल्याने गृहबरोबरच वाहनांवरील कर्ज व्याजदरही कमी झालेले नाहीत. हप्त्यावर वाहनांची हौस भागविणाऱ्यांची संख्या वाढत असताना मोठय़ा व्याजदरांपोटी त्यांच्यावर मागे वळण्याची वेळ येत आहे. अन्य उद्योगांप्रमाणेच वाहन उद्योगानेही प्रत्येक पतधोरणापूर्वी कमी व्याजदराचा धोशा लावला होता. कमी मागणीपोटी टाटा मोटर्स, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रासारख्या कंपन्यांना तर सलग आठवडाभर उत्पादन विक्री ठप्प ठेवावी लागली होती. (याच २०१४ मध्ये १४ वाहन कंपन्यांना स्पर्धा आयोगाने ठोठावलेला जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचा दंड हा तर उद्योगासाठी मिठाचाच खडा म्हणावा लागेल.) (सदोष वाहनांमुळे नव्या कोऱ्या सिआझ माघारी घेण्याचे शल्य याच कालावधीत मारुतीला बोचले.)
त्यातच गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाहनांची विक्री सातत्याने घसरत आहे. कमी होत असलेल्या इंधन दरांचा नुकताच मिळालेला दिलासा काहीसा उत्साहवर्धक ठरला. नोव्हेंबरमध्ये मात्र पुन्हा एकदा वाहन विक्रीतील वाढीने उद्योगाला बळ मिळाले. सलग दोन महिन्यांतील घसरणीनंतर या कालावधीत वाहने वाढली. वर्षभरापेक्षा ती कमी असली तरी आधीच्या दोन महिन्यांतील उणे स्थितीतून बाहेर येणारी ती ठरली. महिन्यातील जवळपास टक्केवारीत दुहेरी आकडय़ांपर्यंत पोहोचणे तसे अशा वातावरणात कठीणच होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy discount on car buying for christmas occasion