जर तुमच्याकडे भारतातील वाहन चालवण्याचा परवाना असेल तर तुम्हाला परदेशात वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. त्यासाठी ज्या कार्यालयातून तुम्ही अनुज्ञप्ती (लायसेन्स) काढलेले असेल त्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. पासपोर्टवरील पत्ता व अनुज्ञप्तीवरील पत्ता सारखा असणे गरजेचे आहे. जर तसे नसेल तर आधी अनुज्ञप्तीवरील पत्ता पासपोर्टवरील पत्त्याशी जुळणारा करून घ्यावा. त्यासाठी पत्त्यात बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
आंतरराष्ट्रीय ड्रायिव्हग परवाना मिळण्यासाठी तुमच्या पासपोर्टवर व्हिसाची नोंद असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय ड्रायिव्हग परवान्यासाठी नमुना ४-अ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. फॉर्मसोबत तीन पासपोर्ट साइज फोटोग्राफ असणे आवश्यक आहे.  आय. डी. पी.साठी शुल्क रु. ५००/- भरणा करायचे असते. शुल्कभरणा केल्यानंतर स.प्रा.प. अधिकारी यांच्याकडे मुलाखत घेऊन समक्ष सही घेतली जाते. यानंतर आय. डी. पी. रजिस्टरमध्ये सदर नोंद घेतली जाते व फोटो डकवला जातो. आय. डी. पी. नमुना (६-अ) पुस्तिकेवर उमेदवाराची सही घेतली जाते तसेच आय. डी. पी. नोंदवहीवर उमेदवाराची सही घेतली जाते.
आय. डी. पी.ची मुदत वितरण दिनांकापासून एक वर्षांची असते. वाहन अनुज्ञप्ती काढताना चाचणी झालेली असल्याने आय. डी. पी. काढताना वाहन, वाहनाची कागदपत्रे इत्यादी नेऊन चाचणी देण्याची गरज नसते. आय. डी. पी.ची पुस्तिका साधारणपणे परीक्षा झाल्याच्या दिवशीच उमेदवाराला दुपापर्यंत हातात प्राप्त होते. परदेशात वाहन चालवताना तुमचे लायसेन्स आणि आय. डी. पी. सोबत असणे गरजेचे असते. सदर आय. डी. पी. युनायटेड नेशन्सच्या विषयावरील करारामध्ये सहभागी सदस्य असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये विधिग्राह्य असते. या देशांची यादी आय. डी. पी.वर छापलेली असते.
संजय डोळे,(उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे)