मी बाइकवेडा..

जानेवारीच्या कडक थंडीत मी व माझा मित्र गणेश भांगरे आम्ही दोघांनी भंडारदऱ्याला जाण्याचे ठरवले.

आत्मविश्वास देणारी धन्नो ..

13कॉलेजला सायकलवरून जाताना मनात मी टू व्हिलरचे स्वप्न कायम मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेले होते. ते मधेच उसळी मारून मला अस्वस्थ करायचे, पण प्रत्येक गोष्टीला त्या त्या गोष्टीची म्हणून एक वेळ यावी लागते. लग्नानंतर नवरा माझे स्वप्न सत्यात उतरावयाला फारसा राजी नव्हता. कारण त्याच्या दृष्टीने त्याचे ठाम आणि प्रामाणिक मत होते की टू व्हिलर, आणि ती पण रिक्षावाल्यांची मक्तेदारी असलेल्या ठाण्यासारख्या शहरात चालवणे म्हणजे खूप रिस्क घेण्यासारखे आहे. पण अखेर माझ्या हट्टामुळे सरावासाठी तो सेकंड हँड स्कूटी घ्यायाला तयार झाला. आणि हेल्मेट कसे घालायचे इथपासून ड्रायिव्हगचे सगळे धडे त्याने मला दिले.
मी पण मनापासून या स्कूटीवर सराव केला. आणि नवऱ्याला बहुतेक माझ्या ड्रायव्हिंगबद्दल विश्वास निर्माण झाला आणि एक दिवस माझी नवी कोरी अ‍ॅॅक्टिवा दारात आली. शोलेमधल्या बसंतीप्रमाणे माझी अ‍ॅक्टिवा माझी धन्नो झाली.
माझी मोठी लेक तर माझ्या मागे मला धरून अगदी विश्वासाने बसायला शिकली, पण छोटीच्या वेळेस प्रेग्नंट असताना मी सातव्या महिन्यापर्यंत माझ्या अ‍ॅॅक्टिवावरूनच माझ्या ऑफिसचा ठाणे-मुलुंड आणि परतीचा प्रवास करत होते. आता मला रिक्षावाल्याला हात केल्यावर त्याचा पानाने भरल्या तोंडानी नाही म्हणणारा मुखडा बघावा लागत नाही. किंवा अगदी चुकून एखाद्या रिक्षावाल्याची मेहेरबानी घ्यावी लागत नाही. किंवा रिक्षा चालवताना कधी रिक्षा खडय़ात घालेल की काय अशी भीती पण बाळगावी लागत नाही. स्टेशनवर थांबून बसची वाट बघणे, बससाठी असणाऱ्या लांबच लांब रांगा, बसमध्ये चढताना होणारी धक्काबुकी, या सर्वाना माझ्या अ‍ॅॅक्टिवामुळे मी कधीच रामराम केला. माझ्या या धन्नोनं मला आत्मविश्वासाबरोबर एक वेगळी ओळख दिली.
अपर्णा फडके, ठाणे

14
खरा मित्र

जानेवारीच्या कडक थंडीत मी व माझा मित्र गणेश भांगरे आम्ही दोघांनी भंडारदऱ्याला जाण्याचे ठरवले. घरात कोणालाही सांगायचे नाही, यावर आमचे एकमत झाले. घरचे सर्वजण कार्यक्रमासाठी गावी गेले होते. त्यामुळे आम्हाला आयतीच संधी प्राप्त झाली. सकाळी साडेसात वाजता कडाक्याच्या थंडीत मी माझी डिस्कव्हर काढली आणि कॉलेजला जाऊन गणेशला पिकअप केले. भंडारदरा फार काही लांब नव्हतेच. मात्र, तरीही कडाक्याच्या थंडीने आमची अशी काही हालत झाली की विचारता सोय नाही. कसेबसे भंडारदरा गाठले आणि लगेचच परतण्याचा निर्णय घेतला. पोटात काही नव्हते. मध्येच एका ठिकाणी थांबून मिसळ पावावर ताव मारला. येताना विठा घाटात मस्तपैकी गवती चहाचा आस्वाद घेतला. या सर्व प्रवासात माझ्या डिस्कव्हरने मात्र अजिबात दगा दिला नाही. घरी आलो त्या वेळी घरचे गावाहून आलेच नव्हते, त्यामुळे हायसे वाटले. डिस्कव्हर होती तशी परत लावून दिली. मात्र, प्रथमच एवढय़ा लांब बाइक घेऊन गेल्याचा तो थ्रिल आजही अंगावर काटा उभा करतो. आयुष्यात पहिल्यांदाच असे केले होते. आता मी आणि माझी डिस्कव्हर अगदी जिवाभावाचे मित्र झालो आहोत.
अमन तांबोळी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I am crazy for bikes

Next Story
कार आणि मुखवटे
ताज्या बातम्या