फोक्सवॉगनच्या पोलो या हॅचबॅक मोटारीची नवी आवृत्ती जीटी-टीएसआय अलीकडेच भारतीय ग्राहकांपुढे दाखल झाली. गीअरचे काम झटपट करणारी व टबरेचे काम जागतिक स्तरावरील नव्या तंत्राने सिद्ध केलेली ही पोलो कार्यक्षम इंजिनाने सक्षम बनवली आहे. मात्र विद्यमान पोलोचे दोष कायमच आहेत. विशेष करून नवीन पोलो दिसायला, प्रवासातील आरामदायीपणासाठी काही वेगळी असेल अशी अपेक्षा मात्र येथे फोल ठरली असल्याचे जाणवते.
पूर्णपणे ऑटोमॅटिक गीअर असणारी पोलो, पेट्रोलवर चालणारी असून ड्राइव्ह व स्पोर्ट या मोडबरोबरच मॅन्युअल म्हणजे हाताने गीअर टाकण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. वेग झटकन पकडणारी ही नवी तंत्रशैली असल्याने स्पोर्ट मोडमध्ये अतिशय झटकन वेग पकडणारी पोलो, सर्वसाधारण ड्राइव्ह मोडमध्येही चांगल्या पद्धतीने गतिमान होऊ शकते. १२०० सीसीचे इंजिन असणाऱ्या मोटारीमध्ये वेग पकडण्याची चांगली क्षमता व गीअर्सचे सहजसुलभ गतीने पडण्याची क्षमता ही पोलोच्या या नव्या आवृत्तीची वैशिष्टय़े म्हणता येतात.  गती असणारे डीएसजी गीअर्समुळे (डय़ुएल शिफ्ट गीअरबॉक्स) सर्वसाधारण गीअर प्रणालीपेक्षा अधिक गतिमान पद्धतीने ते कार्यरत होतात. त्यामुळे मोटारीचा वेग पकडण्याची क्षमता वा नियंत्रणाची क्षमता चांगलीच वाढली आहे.
मुंबई ते राजगुरूनगर व परत मुंबई या मार्गावरील टेस्ट ड्राइव्हमध्ये पोलो जीटी- टीएसआयने रस्त्यावरील वळणे, सरळ रस्ता, वाहतुकीची शहरी व महामार्गावरील वर्दळ आणि खराब रस्त्यापासून ते डांबरी व काँक्रीचा रस्ता असा चालनानुभव दिला. रात्री हेडलॅम्पचा प्रकाश मात्र तितका प्रभावी वाटला नाही. पावसाळी वातावरणामध्ये असणारा रस्त्याचा पृष्ठभाग हा नीटपणे दिसणे गरजेचे होते. त्या प्रकारचा आवश्यक प्रखरपणा पोलो जीटी- टीएसआय देऊ शकली नाही. डिप्पर लाइटमध्ये जवळचे खड्डे, रस्त्याच्या कडा या नीटपणे दिसणे जितके स्पष्ट असायला हवे ते दिसू शकले नाही. हा एक वाहन चालविताना रात्री मिळणारा अनुभव सोडला तर वाहन चालविण्याच्या दृष्टीने पोलो जीटी- टीएसआय समाधानकारक आहे.
व्हीलबेस व ग्राऊंड क्लीअरन्स यांचे प्रमाण पाहाता रस्त्यावरून वळणे घेताना रस्ता न सोडता व झपाझप स्टिअरिंग नियंत्रणातून पोलो पुढे सरकते, वळणावर व चढ असताना नियंत्रित वेगात कमी एक्स्लरेशन देऊनही ताकदीने पुढे सरकण्याची ताकद पोलोला मिळाली आहे. प्रति लिटर पेट्रोलला १७.२ किलोमीटर इतके मायलेज मिळते असा कंपनीचा दावा आहे. अर्थात तुमच्या वाहनचालन सवयी व वाहतुकीची स्थिती यावर सारे अवलंबून असते, त्यापेक्षा अधिक मायलेजही मिळविता येते.
सेंट्रल कन्सोलमध्ये असणारा गीअरचा दट्टय़ा ड्राइव्ह मोड, व तोच खाली दाबल्यानंतर स्पोर्ट मोडमध्ये (म्हणजे अधिक वेग घेण्याची क्षमता देणारी यंत्रणा) टाकता येते. तर ड्राइव्ह मोड मध्ये असताना डाव्या बाजूला हा दट्टय़ा सरकवून मॅन्युअल पद्धतीने गीअर यंत्रणेचा वापर होतो. त्या स्थितीत गीअरचा दट्टय़ा वेगानुसार वर दाबत नेत राहिल्यास अधिक गती प्रदान करणारे गीअर पडतात तर तोच दट्टय़ा खाली दाबत राहिल्यास एक एक करीत लोअर गीअर पडले जातात. त्यामुळे तुम्हाला मॅन्युअल पद्धतीने गीअर टाकल्याचे व त्याद्वारे वेग नियंत्रित केल्याचा आनंद वा सुरक्षितता मिळविता येते.
किंमतीच्या तुलनेत त्यात दिल्या गेलेल्या सुविधा या मात्र तशा महाग वाटू शकतात. हॅचबॅक मोटारीला असणारी किंमत व त्यातील सुविधा यांचा ताळमेळ हवा. केवळ वेगदायी गीअरप्रणाली व टबरेचे नवे तंत्रज्ञान हे मोटार ग्राहकासाठी पुरेसे नाही. आतमध्ये बसण्यासाठी असणारी आसनव्यवस्था ही देखील समाधानकारक हवी. त्याचप्रमाणे मोटार रात्रीही चालविली जात असते, ही बाब लक्षात घेतली गेली पाहिजे.
काहीशा बसक्या उंचीची वाटणारी पोलो जीटी टीएसआय रस्ता न सोडता गतीने मार्गक्रमण करू शकते. उंची बसकी असली तरी आत बसल्यानंतर हेड स्पेस (डोक्यावर उरणारी जागा) तशी कमी नाही. अर्थात बाह्य़रूप काहीना आवडू शकते तर काहीना आवडणारे नसते. मात्र उंची बसकी असली तरी हेड स्पेस चांगली आहे. मात्र मागील आसनस्थ व्यक्ती आरामात पाय पसरून बसू शकत नाही. काहीशा खोलगट आसनावर बसल्यासारखे वाटल्याने प्रवासातील आनंद, आराम तसा मिळू शकेल असे वाटत नाही. तशात  मागील आसनापर्यंत सेंट्रल कन्सोल आल्याने मागील आसनावर तीनजण बसल्यानंतर मधील व्यक्तीला अवघडूनच बसावे लागते. सध्याच्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विद्यमान हॅचबॅकमध्ये वरच्या किंमतीत असलेल्या पोलोबाबत आसनव्यवस्थेत आरामदायी रचना अपेक्षित होती. मात्र पूर्वीच्याच पोलोसारखा हा दोष बदलता आला असता तर बरे झाले असते. पुढील व मागील रांगेतील आसनामध्ये असणारी जागा काहीशी अधिक हवी होती. वेग पकडणारी आधुनिक गीअर शैली हे एकमेव वैशिष्टय़ पोलो जीटी १.२ टीएसआय मध्ये आहे, इतकेच या निमित्ताने जाणवते.
अर्थात गाडी चालविताना वेग घेण्याचा, नियंत्रणाचा आनंद देणारी, चालनसुख देणारी अशी ही मोटार आहे, हे नक्की!

अंतर्गत सुविधा-सौंदर्य
*    ओरखडे उठणार नाहीत असे, उच्च दर्जाचे प्लॅस्टिक
*    दरवाज्यात कप्पे,  ग्लोव्ह बॉक्स तसेच विविध छोटय़ा वस्तू ठेवण्यासाठी जागा
*    बूट स्पेस वर मजबूत पार्सल ट्रे
*    ब्रेक, एक्लरेटरसाठी अ‍ॅल्युमिनियमचे पेडल
*    स्अिरिंग व्हीलवर चामडय़ाचे उच्च दर्जाचे आवरण
*    आसनांसाठी मिलान टायटनस्वॉर्झ फॅब्रिकचा वापर
*    अंतर्गत रचनेत रंगसंगतीचे सौंदर्य
*    दरवाजाच्या पायालाच जीटी-टीएसआय हा अ‍ॅल्युमिनियम लोगोचा सौंदर्यपूर्ण वापर
*    सर्व खिडक्यांसाठी पॉवर विंडो
*    डिजिटल क्लॉक, ओडो मीटर, टेको मीटर आदी विविध सुविधा
*    दक्षतादायी विविध सूचना देणारे इंडिकेटर्स
*    टू डीन आरसीडी ३२० म्युझिक सिस्टिम, चार ध्वनिक्षपेकांसह
*    फोन, ब्लूटूथ, युएसबी, एसडी कार्डची खाच, ऑक्सिलरी सोयी

तांत्रिक वैशिष्टय़े
*    लांबी/रुंदी/उंची/व्हीलबेस/ग्राऊंड क्लीअरन्स
*    (सर्व एमएममध्ये) – ३९७०/१६८२/१४५३/२४५६/१६८
*    इंजिन – ४ सिलेंडर, ११९७ सीसी
*    कमाल ताकद – १०५ पीएस (७७ किलोव्ॉट) ५००० आरपीएम
*    कमाल टॉर्क – १७५ एनएम १५००-४१०० आरपीएम
*    टायर – १८५/६० आर १५
*    रंगसंगती – डीप ब्लॅक, कॅण्डी व्हाईट, फ्लॅश रेड
*    मूल्य (एक्सशोरूम- मुंबई) अंदाजे ६ लाख ९९ हजार (कर, जकात, अतिरिक्त साधनसामग्री, विमा, नोंदणी वगळून)

सुरक्षितता
*    इलेक्ट्रॉनिक इंजिन इम्मोबिलायझर
*    फॉग लाइट
*    चढावर गाडी मागे सरकू नये यासाठी हिल होल्डची सुविधा
*    चावीच्या सहाय्याने खिडक्यांच्या काचा उघडबंद करण्याची सोय
*    एबीएस यंत्रणा
*    इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅम
*    डय़ुएल फ्रंट एअरबॅग्ज
*    स्टिअरिंग वरखाली व पुढे मागे करण्याची सुविधा
*    चालकाचे आसन वर खाली करण्याचीही अतिरिक्त सुविधा
*    रस्त्यावर मार्गक्रमण करताना रांग बदलताना तीन फ्लॅश देणारा इंडिकेटर