व्हॅन, माझी लाडकी

१८ जुलै २०१५. हाच तो दिवस ज्या दिवशी आमच्या घरासमोर पहिल्यांदा एक चारचाकी उभी झाली होती.

१८ जुलै २०१५. हाच तो दिवस ज्या दिवशी आमच्या घरासमोर पहिल्यांदा एक चारचाकी उभी झाली होती. सेकंड हॅन्डच, पण ती आता आमच्या मालकीची होती. यातच गगनात न मावणारा आनंद होता. मी तसा व्यवसायाने दुकानदार. त्यामुळे सामानाची ने-आण करण्याकरता घरी एक व्हॅन हवी हा विचार मनात होता. तो हिशोब लावून ती घेतली. पण त्याकरता फारसा तिचा उपयोग झाला नाही. मात्र ‘ती’ आल्यापासून मूळ गावाकडच्या चकरा. छोटे-मोठे दौरे मात्र भरपूर वाढले. घरच्या आप्तांना प्रवास आता सुखकर झाला. एस.टी.ची कटकट गेली. आम्ही जशी गाडी घेतली तसा आमच्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला हिला चालवणार कोण? आणि गाडी नेमकी शिकायची कशी- ड्रायव्िंहग स्कूलमधून की मित्रांकडून! ड्रायव्हिंग स्कूलच्या मर्यादा पाहून मी गाडी मित्राकडून शिकायचा निर्णय घेतला व माझा मित्र तेजस याने अक्षरश: दोन दिवसात मला गाडी शिकविली आणि तिसऱ्या दिवशी पहाटे सकाळी मी स्वत:च गाडी रस्त्यावर काढण्याची हिंमत केली. मनात भीती होती, पण इच्छाशक्ती एवढी प्रबळ असताना त्या भीतीची काय हिंमत की ती मला रोखेल! फक्त एक चूक वगळता मी माझ्या ड्रायव्हिंगवर खूश होतो.

दुसऱ्या दिवशी बाबांना बाजूला बसवून गाडी काढली. बाबा एस.टी.त कंडक्टर होते. त्यामुळे त्यांना ओव्हरटेक, ब्रेकिंग, सिग्नल्स व ड्रायव्हिंगमधले बारकावे चांगलेच माहीत होते व ते त्यांनी मला शिकवले व माझ्या बहुतांश समस्या दूर झाल्या. मग त्यांनी पण त्यांच्या एस.टी.तल्या ड्रायव्हर मित्रांना घेऊन गाडी शिकण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला या गाडीची एक गंमत होती. हिचा रिव्हर्स गियर फक्त काही मोजक्या ड्रायव्हर्सना (एसटीतल्याच) मारता यायचा. माझ्या मित्रांना तो लागायचाच नाही. त्यामुळे मी गाडी रिव्हर्स गियर जणू गाडीला नाहीच हे मनात ठेवून शिकलो. एक-दोनदा त्यामुळे आमची पंचायतदेखील झाली. मग मात्र ते गाडीचं काम आधी करून आणलं. आता मात्र गाडी चालवण्यात फुल ट्रेंड झालोय.

पंधरवडय़ातून आता कुठेना कुठे दौरा (छोटासा) निघतच असतो. कधी बाबांच्या गावाकडे, कधी नातेवाईकांकडे, कधी अमुक स्थळी, कधी तमुक स्थळी हे आता नित्याचंच झालंय. एकदा गावाकडे जात असताना आमची गाडी वणीसमोर (जि. यवतमाळ) राजुर फाटय़ाजवळ ट्रॅफिक पोलिसांनी अडवली. सगळं क्लियर असूनही मी मात्र जाम घाबरलो तरी त्यांनी शेवटी सीटबेल्ट न लावल्याच्या कारणाखाली १०० रु.ची पावती फाडलीच. आता मात्र आवर्जून कुठेही जाताना सीटबेल्ट अगोदर लावून जातो. काहीही का असेना, पण आमच्या मित्रमंडळींमध्ये मी गाडी घेणारा पहिला ठरलो याचं कौतुक तर आहेच. मित्रांसोबतदेखील घोडाझरीचा आम्ही एक दौरा केला. आता पुढे हेमलकसाला जायचा प्लॅन आहे गाडीनेच. बघू कधी दिवस उजाडतो तो! सुरुवातीला जरी गाडीने थोडा त्रास दिला असला (या व्हॅनची पासिंग पुण्याची असल्यामुळे असेल कदाचित. एमएच १४- कारण गुणधर्म हा उतरतच असतो) तरी मात्र आता ती आमच्या घरची सदस्यच झाली आहे.

 

मराठीतील सर्व Drive इट ( Driveit ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: My favorite 4 wheeler van

Next Story
कोणती कार घेऊ?
फोटो गॅलरी