मारुती-सुझुकीपासून ते रेनॉ किंवा डॅटसनपर्यंत विविध कंपन्या आपल्या नवीन गाडय़ा येत्या वर्षांत भारतीय बाजारपेठेत उतरवत आहेत. गेल्या भागात नव्या वर्षांत येणाऱ्या काही नवीन गाडय़ांची माहिती आपण घेतली होती. याच लेखाचा पुढील भाग काही नव्या गाडय़ांसह..

रेनॉ लॉजी
dr12भारतीय कुटुंबव्यवस्थेचा विचार करून रेनॉ कंपनी आता एक नवीन गाडी बाजारात आणत आहे. ही गाडी काहीशी इनोव्हा किंवा मारुती सुझुकी एर्टिगासारखी म्हणजेच एमपीव्ही असेल. फ्रान्समधील ऑटोमोबाइल कंपनी रेनॉ आपली नवीन गाडी, लॉजी नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच म्हणजे कदाचित जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत दाखल करणार आहे. रेनॉची आतापर्यंतची सर्वात गाजलेली गाडी म्हणजे डस्टर! ही नवीन गाडी काहीशी डस्टरसारखीच असेल. मात्र ही गाडी होंडा मोबिलिओ आणि मारुती सुझुकी एर्टिगा या गाडय़ांना टक्कर देईल. ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. १.२ लिटर पेट्रोल आणि १.६ लिटर डिझेल टबरेचाज्र्ड इंजिनमुळे ही गाडी रस्त्यावर अत्यंत भन्नाट परफॉर्मन्स देईल. या गाडीबाबत रेनाँने अजून फारशी माहिती उघड केली नसली तरी गाडीची किंमत साधारण सात लाखांच्या आसपास असेल.

मारुती एमआर वॅगन
dr13जपानमधील कार कंपनी सुझुकी भारतीय बाजारपेठेचा विचार करून नेहमीच नवनव्या गाडय़ा तयार करीत असते. आता ही कंपनी जपानमधील ‘केई’ या प्रकारच्या गाडय़ांच्या धर्तीवर एमआर वॅगन ही गाडी जानेवारीत दिल्लीत होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये मांडणार आहे. हॅचबॅक किंवा छोटय़ा गाडय़ांच्या श्रेणीत केई कार्सचा समावेश होतो. अशा प्रकारच्या गाडय़ा जपानमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. या गाडीचं इंजिन ३ सिलिंडर ६५७ सीसी पेट्रोल श्रेणीतील आहे. जपानमध्ये ही गाडी साधारणपणे लिटरमागे तब्बल २२ किलोमीटर पळते. त्यामुळे भारतातील मायलेजप्रेमींसाठी ही गाडी म्हणजे पर्वणी ठरेल. सुरुवातीला ही गाडी म्हणजे टाटांच्या नॅनोला टक्कर देण्यासाठी बाजारात आणण्याचं ठरवण्यात आलं होतं. पण त्यानंतर सुझुकीने हा विचार बाजूला सारून भारतीय लोकांच्या छोटय़ा गाडय़ांच्या प्रेमावर विश्वास ठेवण्याचं ठरवलं. या महिन्यातच भारतात दाखल होणाऱ्या या गाडीची किंमत तीन ते पाच लाख यादरम्यान असेल, असं मारुती-सुझुकीतर्फे सांगण्यात आलं आहे.

ह्युंदाई आयएक्स-२५
dr14ह्युंदाई या कंपनीने भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात सेंट्रो या गाडीपासूनच जम बसवला आहे. त्यानंतर आय-१०, आय-२० या दोन गाडय़ांनी तर बाजारपेठेतील मोठय़ा भागावर कब्जा केला. तसंच व्हेर्नासारख्या किंवा सोनाटासारख्या गाडय़ांनाही पसंती मिळाली. अ‍ॅसेंटसारख्या लो बजेट सेडान गाडीने मध्यमवर्गीयांचे लांबलचक गाडीचं स्वप्नही पूर्ण केलं. आता ह्युंदाई आपली स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल बाजारात आणण्यास सज्ज झाली आहे. ऑगस्ट २०१५ पर्यंत भारतीय बाजारपेठेत येणारी ही एसयूव्ही असेल आयएक्स-२५! ह्युंदाईने नव्याने आणलेल्या एलिट आय-२० या गाडीतील सर्व आरामदायक सुविधा या गाडीतही असतीलच. ही गाडी सध्या १.६ लिटर आणि २.० लिटर पेट्रोल इंजिन प्रकारात उपलब्ध आहे. मात्र भारतात ही गाडी उतरवताना १.४ लिटर पेट्रोल आणि १.६ लिटर डिझेल इंजिन प्रकारांत उतरवण्यात येईल, असा ऑटोतज्ज्ञांचा कयास आहे. डिझेल प्रकारात ही गाडी जास्तीत जास्त २१ किमी प्रतिलिटर आणि कमीत कमी १५ किमी प्रतिलिटर मायलेज देईल, तर पेट्रोल प्रकारात हेच आकडे अनुक्रमे १६ आणि १३ किमी एवढे असतील. या गाडीच्या दणकट इंजिनामुळे ही गाडी १०० किमीचा वेग पकडायला फक्त १६ सेकंद घेईल. त्यामुळे गाडी चालवताना एसयूव्हीचा एक वेगळा फील नक्कीच मिळेल. या गाडीची अंदाजे किंमत आठ लाखांच्या आसपास असेल.

मारुती सुझुकी एसएक्स-४ क्रॉस
dr15काही महिन्यांपूर्वी याच पानावर भारतीय बाजारपेठेतील नवीन कार सेगमेण्ट या विषयाखाली क्रॉस गाडय़ांबद्दल एक लेख लिहिला होता. क्रॉस या नव्या प्रकाराबाबत भारतीय बाजारपेठ सजग होत आहे, असं निरीक्षण त्यात नोंदवण्यात आलं होतं. याचंच प्रत्यंतर देणारी एक गाडी मार्च २०१५ पर्यंत बाजारात येत आहे. ही गाडी आहे, मारुती-सुझुकी कंपनीची एसएक्स-४ क्रॉस! रेनाँ डस्टर, निसान टेरेनो आणि फोर्ड इकोस्पोर्ट या गाडय़ांना तगडी टक्कर देण्याची क्षमता या गाडीत आहे. ही गाडी कॉम्पॅक एसयूव्ही प्रकारातील असल्याने या गाडीचा अनुभव वेगळाच असेल. १.३ लिटर मल्टिजेट डिझेल इंजिन आणि १.६ लिटर पेट्रोल आणि १.६ लिटर मल्टिजेट डिझेल अशा तीन इंजिन प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध असेल. या गाडीत इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन सिस्टीम असल्याने त्याचा सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप फायदा होणार आहे. तसंच पेट्रोल इंजिनची गाडी भारतीय रस्त्यांवर १५ किमी प्रतिलिटर आणि डिझेल इंजिनची गाडी २० किमी प्रतिलिटर एवढं मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. तसंच कम्फर्टच्या दृष्टीनेही ही गाडी लोकांचं लक्ष वेधून घेणारी असेल, एवढं नक्की! या गाडीची किंमत हा काहीसा नकारात्मक भाग ठरू शकतो. आता केलेल्या अंदाजाप्रमाणे या गाडीची किंमत ११ लाखांच्या आसपास असेल.

फोक्सवॅगन अप
dr16जर्मनीतील सामान्यजनांसाठी गाडय़ा बनवणारी कंपनी, अशी ओळख असलेल्या फोक्सवॅगन या कंपनीने आपल्या पोलो, जेट्टा, पॅसॅट, बिटल अशा विविध गाडय़ांच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. आतापर्यंत फोक्सवॅगनने हॅचबॅक श्रेणीत पोलो हीच गाडी दिली होती. तर सेडान श्रेणीत व्हेंटो, जेट्टा, पॅसॅट अशा तीन गाडय़ांनी भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. खरं तर २०१२ मध्येच फोक्सवॅगन हॅचबॅक श्रेणीतील एक नवीन गाडी भारतीय बाजारपेठेत आणण्याच्या विचारात होती. मात्र तेव्हा जे जमलं नाही, ते फोक्सवॅगन आता करणार आहे. फोक्सवॅगन अप ही छोटी गाडी यंदा भारतीय बाजारपेठेत उतरवणार आहेत. ह्युंदाई आय-१०, मारुती ऑल्टो, रिट्झ, ए स्टार अशा गाडय़ांना टक्कर देणाऱ्या गाडीचं इंजिन पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत असेल. पेट्रोलसाठी १.२ लिटर ४ सिलिंडर इंजिन आणि ०.८ लिटर दोन सिलिंडर टबरेचाज्र्ड् इंजिन असेल. ही गाडी तीन डिझाइन्समध्ये उपलब्ध होणार आहे. यात दोन दरवाजांची हॅचबॅक, चार दरवाजांची हॅचबॅक आणि चार दरवाजांची वॅगन कॅरिंग गाडी यांचा समावेश आहे. या गाडीची किंमत फोक्सव्ॉगन तीन ते चार लाख रुपयांदरम्यानच ठेवणार असल्याची माहिती आहे. तसंच ही गाडी मार्च २०१५ पर्यंत भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.