मला पहिल्यापासूनच गाडी चालवायची आवड होती. मी शाळेत-कॉलेजमध्ये असताना सायकल चालवली. वडिलांचे मित्र लुना घेऊन येत असत तेव्हा लुना कधी कधी चालवायचे. कॉलेज संपल्यावर नोकरी करायला लागले. मग वाटायला लागले की आपल्याकडेपण एक टू व्हीलर असावी. मी पप्पांच्या मागे लागायची आपण गाडी घेऊ. पप्पा कधी नाही म्हटले नाही पण नकळत त्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली. एक दिवस ते म्हणाले, ‘जा कॉर्पोरेशनजवळ एक टू व्हीलरचे शोरूम आहे तिथे चौकशी करून ये, मग आपण विचार करू’. मीही गेले. चौकशीअंती कळले व सगळा हिशोब करून बघितला तर त्या गाडीचा हप्ता माझ्या पगारापेक्षा जास्त होता. दिला नाद सोडून.

मग काही वर्षांनी मी आणि मिस्टरांनी टू व्हीलर घ्यायची ठरवली. पण नंतर विचार केला की आम्ही दोघं आणि दोन मुले टू व्हीलरवर कसे बसणार? मग तीन-चार वर्षांनी अचानक एका सेलमध्ये मारुतीची झेन ही गाडी आम्ही विकत घेतली. गाडी दारात येऊन उभी राहिली आणि दुसऱ्याच दिवशी मी ड्रायव्हिंग क्लास चालू केला. मारुती गाडीधारकांसाठीचा हा विशेष ड्रायव्हिंग क्लास चांगला होता. पुरुष असो स्त्री असो नुसती गाडी चालवून काय उपयोग? गाडीच्या इंजिनची माहिती, टायर पंक्चर काढणे हे सर्व मी तेथे शिकले. शेवटच्या दिवशी त्यांनी मला टायर काढायला लावले आणि परत लावायला लावले.
सकाळची सगळी कामे उरकून मुले शाळेत गेल्यानंतर दुपारी दोन ते तीन असे मी क्लासला जायला लागले. पहिल्यांदा गाडी चालू करून कोणत्या गिअरवर गाडी उचलायची हे शिकले. पहिल्यांदा हातात स्टीअरिंग घेतल्यावर खूप वेगळे वाटले. दोन्ही बाजूचे व मधल्या आरशात बघणे त्याचबरोबर ब्रेक कधी दाबायचा, क्लच कधी सोडायचा, स्पीड वाढवून गिअर कधी बदलायचा हे सर्व एकाच वेळी करावे लागते. सगळीकडे लक्ष ठेवावे लागते. हे सर्व सुरुवातीला अवघड वाटत होते. पण सरावाने हळूहळू जमायला लागले. दररोज मुले शाळेतून आल्यानंतर त्यांचा होमवर्क करून घ्यायची सवय असल्याने मीही क्लासवरून आल्यावर माझ्या गाडीवर होमवर्क करत असे (गाडी चालू करणे, गाडी मागे घेणे). तीन-चार दिवस झाल्यावर शिकवणारे सर म्हणाले, ‘ही घ्या चावी आणि बसा सीटवर मी येतोच’. मीपण ऐटीत गाडी उघडली आणि बसले सीटवर. चावी लावायला गेले तर चावी कुठे? मग लक्षात आले की चावी तर दरवाजालाच राहिली. मग उतरून चावी काढली आणि गाडीला चावी लावली. नेहमी सर गाडीचा दरवाजा उघडून बसायचे आणि मी त्यांच्या बाजूला. त्यामुळे उडाला गोंधळ. एक महिना क्लासला गेले आणि नंतर एक महिना स्वत:च्या गाडीवर ड्रायव्हर ठेवून सराव केला. त्यांनी मला छोटय़ा रोडवर, स्पीड ब्रेकरवर, चढ असेल तर कशी गाडी चालवायची ते शिकवले. घाटात गाडी चालवणे म्हणजे तर तारेवरची कसरतच! एकदा कॉलनीच्या एन्ट्री गेटवर गाडी थांबवली, कारण गाडी थांबवायचा अडथळा खाली होता. वॉचमन आला आणि तो खांब वर घेऊ लागला, तशी मी गाडी चालू करून पुढे घेत होते आणि मला वाटले तो खांब आता गाडीला लागेल म्हणून मीच माझे डोके खाली वाकवले. अशा या अनूभवातून मी गाडी शिकले आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला.
एक दिवस मी गाडी चालवत आम्ही सगळे पुण्याला माझ्या आईवडिलांकडे गेलो. घाटात थोडी भीती वाटली, पण आता पूर्ण आत्मविश्वासाने कुठेही गाडी चालवते. आई-वडिलांनापण खूप आनंद झाला. मी गाडी चांगली चालवते याची पोचपावती मला माझ्या सासूसासऱ्यांकडून मिळाली. माझे सासरे नेहमी त्यांच्या मुलाला, म्हणजे माझ्या यजमानांना म्हणत, ‘तू जा ऑफिसला तुझी गरज नाही, आमची सूनबाई आहे आम्हाला फिरवून आणायला’. आणि गावाला गेले ते तेथे सांगत आमच्या नेरुळच्या घरी दोन दोन ड्रायव्हर आहेत. माझा लेकही गाडी चालवतो आणि माझी सूनपण. अजूनही गावाला गेल्यावर ड्रायव्हिंग सीटवर एक स्त्री बघून लोकांना खूप नवल वाटते. सासऱ्यांचे ते वाक्य आठवली की गाडी शिकल्याचा खूप आनंद वाटतो.