तुम्ही कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला आहात आणि तुम्हाला मागच्याशी गप्पा मारायच्या आहेत.. पण, सारखी सारखी मान वळवून त्रास होतो आहे.. तुमची सीटच गर्रकन वळवून तुम्हाला गप्पा हाणता आल्या तर..?
तुम्ही कार भाडय़ाने दिली आहे.. तुमच्या विश्वासातला ड्रायव्हर असला तर ठीक.. पण समजा तो तुमच्या फारसा विश्वासात नसला आणि त्याने पेट्रोल कमी भरून चुकीची पावती तुमच्या हातात ठेवून जास्तीचे पसे उकळले तर.. पेट्रोलच्या टाकीला लावलेल्या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला इंधन किती व कुठं भरलं, त्यासाठी किती पसे लागले, वगरेची माहिती मिळाली तर..?
एखादी व्यक्ती वाहतुकीचे नियम डावलून ड्रायिव्हग करीत असेल तर.. त्याच्या गाडीचा वेग जरा जास्त असेल तर.. त्याने गाडी चांगली चालवावी यासाठी तुम्हाला काही करता आलं तर.. तुमच्याकडे ड्रायिव्हग कॅरॅक्टरिस्टिक डिटेक्टर असले तर..?
एखादा बाइकस्वार हेल्मेट न घालताच बाइक चालवायला जात असेल आणि त्याने हेल्मेट घातलं नसल्याने त्याची गाडीच सुरू झाली नाही तर..?
आता या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्पी आहेत. सुरक्षित ड्रायिव्हगसाठी हे सर्व आवश्यकच आहे. त्यामुळे वरील सर्व गोष्टी कोणाला नको आहेत. त्यामुळे तुमचं वरील प्रत्येक प्रश्नाला ‘हो’ असंच असणार यात शंका नाही. मात्र, हे सर्व कसं शक्य आहे, असा प्रश्नही पडणं स्वाभाविक आहे. याचं उत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात दडलंय.
आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गेल्या साठ दशकांत अचाट प्रगती केली आहे. अनेकदा गरजेतूनच तंत्रज्ञानाची निर्मिती होत असते. त्यामुळे गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं; परंतु असंही होतं अनेकदा की, जे तंत्रज्ञान तयार होतं ते साधारणत: समाजातल्या एखाद्या विशिष्ट वर्गापुरतंच ते मर्यादित राहतं. मात्र यालाही काही सन्माननीय अपवाद आहेतच. पण असं असतं हेही तितकंच खरं. मग इथंच तर सर्जनशीलतेला वाव असतो. ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय त्यांच्याकडे लक्ष देऊन त्याचा विकास करणं हेच सर्जनशीलतेचं मुख्य काम असतं. तर मुख्य मुद्दा असा की, वरील जी काही प्रश्नावली आहे त्याच्या प्रत्येकाला उत्तर आहे. आणि त्या उत्तराचं श्रेय जातं तंत्रज्ञान विकासाला.
म्हणजे असं की, तुम्हाला तुमच्या कारमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला असलेली सीट गर्रकन वळवून मागच्याशी गप्पा मारता येऊ शकणारी खुर्ची तयार आहे.
पेट्रोल किती प्रमाणात कुठं आणि किती रुपयांचं भरलं गेलं याची इत्थंभूत माहिती मिळू शकणारं तंत्रज्ञान तयार आहे.
तसेच ड्रायिव्हग कॅरॅक्टरिस्टिक डिटेक्टरचीही यशस्वी चाचणी झाली आहे. आणि हेल्मेटशिवाय बाइक सुरू करण्याचा प्रयत्नही विफल झाल्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
या सर्वाचं श्रेय जातं राजेश गंगर या इन्व्हेंटरला. ऑटो क्षेत्राला वरदान ठरू शकेल असं काही तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहेत. त्यांचे बौद्धिक हक्कही (पेटंट्स) त्यांनी राखून ठेवली आहेत. इण्डस्ट्रियल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या गंगर यांनी आतापर्यंत अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या कामगिरी पार पाडल्या आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या कालावधीत प्रोजेक्ट दिले जातात. या प्रोजेक्ट्ससाठी त्यांना औद्योगिक क्षेत्रात फिरून एखाद्या कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवावा लागतो. नेमकी इथंच गंगर यांनी संधी शोधली. आयआयटी विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोजेक्ट दिले. स्वत: त्यांच्यासोबत काम करून वरीलप्रमाणे उत्पादनं गंगर यांनी तयार केली आहेत. यानिमित्ताने केवळ आयआयटीच नाही तर अभियांत्रिकीची पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वत: काहीतरी तयार केल्याचं समाधान तर मिळतंच, शिवाय त्याचा उपयोग जनसामान्यांच्या हितासाठीही होतो, असं या प्रयोगशीलतेमागील साधं तत्त्व गंगर सांगतात. ग्रामीण भागात पाणी आणण्यासाठी अनेकांना दूर दूपर्यंत पायपीट करावी लागते. त्यांच्यासाठी गंगर यांनी वॉटर ट्रॉली विकसित केली आहे. तसेच रेल्वेरुळांवर किंवा रस्त्यांवर काम करणाऱ्या मजुरांचं रक्षण व्हावं यासाठी एक खास जाकीटही त्यांनी तयार केलं आहे. या जॅकेटला एलईडी लाइट्स लावण्यात आले असून ते सौरऊर्जेवर चालणारे आहेत. तसेच गोरेगाव स्थानकात एक महिना गंगर यांनी विनाअपघात अभियान चालवलं होतं. त्यालाही अभूतपूर्व यश आलं होतं. ऑटो क्षेत्रातील पेटंट्सना मूर्त रूप यावं एवढीच त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.                       
गाडी हा तसा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. स्वत:च्या, दुचाकी असो वा चारचाकी, गाडीला जो तो तळहातावरील फोडासारखा जपत असतो. त्यामुळेच गाडीला काही खुट्ट झाले तरी काळजात चर्र होते. गाडी सुरक्षित राहावी, तिला काहीही होऊ नये यासाठी प्रत्येक जण काळजी घेतच असतो. मागच्या वेळी आपण थंडीत गाडीची काळजी कशी घ्यावी याची माहिती घेतली. आता गाडी धुताना नेमकी काय खबरदारी घ्यावी याची ही माहिती. अखेरीस कारवॉश ही एक कलाच आहे.. सांगताहेत केतन लिमये..