पेट्रोल की डिझेल कार?

इंधनाचे दर थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्नित झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर घटक्यात घटतात तर घटक्यात वाढतात. त्याचा परिणाम असा झालाय की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या दीडेक वर्षांत फारशी तफावत राहिलेली नाही.

इंधनाचे दर थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्नित झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर घटक्यात घटतात तर घटक्यात वाढतात. त्याचा परिणाम असा झालाय की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या दीडेक वर्षांत फारशी तफावत राहिलेली नाही. त्यामुळे डिझेल गाडय़ांच्या निर्मितीत उडी ठोकलेल्या ऑटो कंपन्यांचे तब्बल दहा हजार कोटी रुपये पणाला लागले आहेत. कारची विक्री घटली, गेल्या वर्षांत अमूक इतक्या टक्क्यांनी कारच्या विक्रीत घसरण झाली वगरे अहवाल दर पंधराएक दिवसांनी जाहीर होत असतात. मागील वर्ष ऑटो सेक्टरला खरंच कठीण गेले. त्याला कारण होते सातत्याने वाढत असलेले पेट्रोलचे दर. त्यामुळे झाले काय की ग्राहकांनी आपला मोर्चा डिझेल कार्सकडे वळवला. त्यामुळे ज्याची मागणी जास्त, त्याचे उत्पादन जास्त या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे कार उत्पादकांनीही मग डिझेल कारच्या निर्मितीकडे अधिकाधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. मारुति सुझुकी, ह्य़ुंदाई, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, फोर्ड, रेनॉ-निस्सान यांनी डिझेल कारच्या निर्मितीसाठी गेल्या दोन वर्षांत तब्बल दहा हजार कोटींची गुंतवणूक केली. मात्र, आता परिस्थिती अशी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरणीमुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमतींनाही उतरती कळा लागली आहे. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोल यांच्या किमतीत फारसा फरक राहिलेला नाही. त्यामुळे ग्राहकराजाने आपला मोर्चा पुन्हा एकदा पेट्रोल कारकडे वळवला असल्याने डिझेल कारनिर्मितीत गुंतवणूक करणाऱ्या या कंपन्या आता किंकर्तव्यमूढ झाल्या आहेत.
डिझेल कारच्या निर्मितीवर अधिकाधिक विसंबून असलेल्या कंपन्यांना याचा फटका जास्त बसला आहे. मारुति सुझुकी आणि ह्य़ुंदाई यांना मात्र त्या तुलनेत जास्त फटका बसणार नसल्याचे ऑटो तज्ज्ञांचे मत आहे. या दोन्ही कंपन्यांनी गेल्या दीड-दोन वर्षांत डिझेल कारच्या निर्मितीत उडी घेतली असली तरी इतरांच्या तुलनेत त्यांचा पेट्रोल कारविक्रीतील मार्केट शेअर बऱ्यापकी आहे. त्यामुळे पेट्रोल कारनिर्मितीत ते सहजपणे पुन्हा प्रवेश करून मार्केट शेअर राखू शकतात. जनरल मोटर्सला मात्र याचा अधिक फटका बसणार आहे. त्यांनी गेल्या वर्षी डिझेलवर चालणारी बीट ही गाडी बाजारात आणली तेव्हा तिच्या पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत तिचा मार्केट शेअर ८५:१५ असा होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या चार महिन्यांत हीच सरासरी आता ७०:३० झाली आहे. डिझेल गाडय़ांवर सर्वाधिक मदार असलेल्या टाटा मोटर्सच्या विक्रीत मात्र कमालीची घसरण होऊ लागली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांच्या पेट्रोलवर चालणाऱ्या गाडय़ा आहेत, परंतु त्यांची मागणी म्हणावी तेवढी उल्लेखनीय नाही.
सध्याच्या घडीला डिझेल आणि पेट्रोल कारच्या किमतीत ८० हजार ते सव्वा लाख रुपये एवढी तफावत आहे. एका सर्वेक्षणानुसार कारमालक किमान दर पाच वर्षांनी कार बदलतात. त्यामुळे डिझेलवर चालणारी कार किमान तीन-चार वर्षांत पसा वसूल करेल अशी आशा असते. मात्र, आता डिझेल आणि पेट्रोल कार यांच्या किमतीतील तफावत फारशी राहिलेली नसल्याने साहजिकच ग्राहक पेट्रोल कारला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. अंतिमत त्याचा परिणाम डिझेल कारच्या खपावरच होणार आहे. त्यामुळे कारउत्पादकांनी आता पेट्रोल कारवर देण्यात येणा-या सवलतीही काही प्रमाणात मागे घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात पेट्रोलवर चालणा-या कारच्या खपात वाढ झाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण अलिकडेच डिझेल कार खरेदीचा आलेख उतरणीला लागला असून सावकाश का होईना, पण पेट्रोल कारच्या खरेदीचा आलेख किंचितसा उंचावत चालला आहे. डिझेल की पेट्रोल या द्विधावस्थेत राहू नका हेच खरं.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आता शेअर बाजारातल्या निर्देशांकासारख्या झाल्या आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घसरण झाली की आपल्याकडेही मग बातम्या झळकतात की पेट्रोल अमूक इतक्या रुपयांनी स्वस्त, डिझेलचीही घसरण वगरे. किंवा मग सरकारी तेलकंपन्याच डिझेलच्या किमतीत एक रुपया वाढ होईल अथवा पेट्रोलच्या किमतीत आज मध्यरात्रीपासून अमूक रुपयांनी वाढ होईल वगरे जाहीर करतात. हे असे झालेय ते देशांतर्गत इंधनाचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त झाल्यामुळे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Petrol or diesel car

ताज्या बातम्या