पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर सातत्याने टीका होत असते. मात्र, प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला परराष्ट्र संबंध सुधारण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी, व्यापाराच्या संधी विस्तारण्यासाठी, गुंतवणूक आणण्यासाठी इत्यादी इत्यादी कारणांमुळे हे दौरे करावेच लागतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे असे आगमन-प्रस्थान सुरूच असते. इतरही देशांचे प्रमुख आपल्या देशात येत असतात. देशोदेशीचे प्रमुख हे असे देशोदेशी फिरत असताना त्यांचा ताफाही सोबत असतो. त्यात गाडय़ा प्रामुख्याने आल्या. आपल्याकडे जसा एकेकाळी अॅम्बॅसिडर गाडीला बहुमान होता तसाच इतरही देशांच्या प्रमुखांच्या दिमतीला कोणती गाडी आहे, यावरून त्या देशाची आंतरराष्ट्रीय पत ध्यानात येत असते. राष्ट्रप्रमुखाची गाडी ही जणू त्या देशाची राजदूतच असते..

राष्ट्रप्रमुखाच्या गाडीचा आब अगदी निराळाच असतो. त्यासाठी विविध व्यवधानं बाळगली गेलेली असतात. त्यात राष्ट्रप्रमुखाची सुरक्षा हा मुख्य मुद्दा असतो. त्यानुसारच संबंधित गाडीची रचना केलेली असते. अशी गाडी तयार करायला मिळणे हा त्या गाडीच्या निर्मात्यांचा बहुमानच असतो. त्यामुळेच राष्ट्रप्रमुखांच्या गाडय़ा हा चर्चेचा विषय असतो. सर्वशक्तिमान अशा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या गाडीची किंमत किती, अध्यक्षांच्या सुरक्षेसाठी त्यात काय काय खास रचना करण्यात आली आहे वगैरे मुद्दे हे तर बातम्यांचे विषय असतात. या गाडय़ांची देखभाल, गाडीचा चालक याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असते. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दिमतीला असलेली सध्याची गाडी आहे ‘कॅडिलॅक बीस्ट’. या गाडीच्या निर्मितीत तीन कारनिर्मात्या कंपन्यांचा समावेश आहे. अध्यक्षांची गाडी कुठे, कधी, किती वाजता वगैरे जाणार आहे. तीत इंधन किती आहे, प्रस्तावित मार्ग कसा आहे इत्यादी इत्यंभूत माहिती राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेची काळजी वाहणाऱ्या स्टाफला असते. ‘बीस्ट’ची किंमत नऊ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ही कार खरे तर पेट्रोलवर चालणारा एक ट्रकच आहे. या कारची इंधनटाकी स्फोटामध्ये किंवा आगीमध्ये नष्ट न होणाऱ्या धातूची बनवलेली असते. या कारमध्ये प्राणवायू पुरवठा, आणीबाणीची वैदय़कीय मदत आणि राष्ट्रप्रमुखाच्या रक्तगटाशी मिळतेजुळते रक्त यांचाही समावेश असतो. रासायनिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून अध्यक्षांचा बचाव करण्याची क्षमता ‘बीस्ट’मध्ये असते.
* अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनला आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्व आहे. एकेकाळी अध्र्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनचे राज्यकर्ते वाहनांच्या बाबतीत चोखंदळ आहेत. त्यामुळेच ब्रिटनची राणी असो वा पंतप्रधान, त्यांच्या ताफ्यात कोणती गाडी आहे याची उत्सुकता सर्वानाच असते. राणी एलिझाबेथ वापरत असलेली बेन्टले स्टेट लिमोझिन ही गाडी (हिला गाडी तरी कसे म्हणायचे, हा प्रश्नच आहे) तयार करण्याचा बहुमान रोल्स रॉइसकडे जातो.
* मोटारनिर्मितीत जपानी कंपन्या अग्रेसर आहेत. ‘टोयोटा’ तर त्यात एक पाऊल पुढेच आहे. त्यामुळेच जपानी सम्राटाच्या ताफ्यात ‘टोयोटा’लाच मान आहे. त्याप्रमाणेच झेकोस्लोव्हाकिया या देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या दिमतीला स्कोडा कंपनीची गाडी असते.
* ऑटोमोबाइलची पंढरी समजल्या जाणाऱ्या जर्मनीचे राष्ट्रप्रमुख जर्मनीतच तयार करण्यात आलेल्या मर्सिडीज बेन्झ, बीएमडब्ल्यू व फोक्सव्ॉगन या कंपन्यांच्या गाडय़ा वापरतात. फ्रान्समध्ये सीट्रोन हे पीएसए प्युजो या कंपनीचे वाहन राष्ट्रप्रमुखासाठी वापरण्यात येते.
* फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या ताफ्यात सिट्रो डीएस फाइव्ह हायब्रिड फोर ही गाडी आहे. या गाडीची निर्मिती फ्रान्समध्येच करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या होल्डान कंपनीला आस्ट्रेलियन पंतप्रधानांसाठी गाडी बनवण्याचा मान मिळाला आहे.
* आपल्याकडे राष्ट्रपतींच्या ताफ्यात मर्सिडीज एस६ लिमोझिन ही गाडी असते. या गाडीची किंमत सहा कोटी रुपये आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्यात २५ ते ३० वाहने असतात. त्यात सर्वात पुढे अर्थातच लिमोझिनचा समावेश असतो. या गाडीला क्षेपणास्त्रविरोधी तंत्रज्ञान बसवले असते. संपूर्ण बुलेटप्रूफ अशी ही गाडी आहे. फार पूर्वी अॅम्बॅसिडर गाडय़ांना हा बहुमान होता. मात्र, काळाच्या ओघात मर्सिडीजने तिची जागा घेतली आहे.
सर्व राष्ट्रप्रमुखांच्या दिमतीला असलेल्या गाडय़ा चिलखती असतात. ज्या देशांमध्ये त्या देशाच्या प्रमुखांच्या सुरक्षेसाठी वाहननिर्मिती करण्याची क्षमता असलेल्या कारखान्यांची वानवा असते, त्या देशांच्या प्रमुखांसाठी मित्र राष्ट्रांकडून गाडय़ा आयात केल्या जातात. अर्थातच ज्या देशांशी चांगले संबंध आहेत, अशा एखाददुसऱ्या देशाकडूनच या मागणीची पूर्तता केली जाते.

– डॉ. मंजुश्री डोळे 
ls.driveit@gmail.com