अंदमानपर्यंत यंदाच्या पावसाचे आगमन झाले आहे. काही दिवसात महाराष्ट्रातील भागामध्ये त्याचे आगमन होईल. पावसाचे स्वागत करण्यास तसा अजून काहीसा अवकाश आहे. यामुळेच आपल्या मोटारीच्या पावसाळ्याआधीच्या देखभालीसाठी अजून काही अवकाश आहे. यासाठीच आवश्यक आहे ती मोटारीच्या देखभालीबाबतची निगा. गेल्या पावसानंतर तशी तुम्ही मोटार बरीच वापरली असाल. पण त्या मोटारीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला मिळाले नसेल, तर आता मात्र पावसाळ्यापूर्वी नीट लक्ष द्या. तिच्या पावसाळ्यातील वापराच्या दृष्टीने काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे का ते पाहा व वेळीच उपाय करा, म्हणजे पावसाळ्याच्या मोसमातील मोटारिंगचा आनंद लुटताना विचका होणार नाही.
गाडीचे सव्‍‌र्हिसिंग पावसाळ्यापूर्वी करून घेणे आवश्यक आहे. ते करून घेताना सर्वसाधारणपणे खालील कृतींकडे अधिक लक्ष द्या. आवश्यक ते भाग नजरेखालून जाऊ द्या. आवश्यक ते भाग गरज असल्यास बदला.
मोटारीच्या तांत्रिक बाबी
* पावसाळ्यापूर्वी सव्‍‌र्हिसिंग हे अतिशय गरजेचे असते. ते करा.
* सर्व वायरिंग तपासून घ्या.
* प्लग, इंजिन सेटिंग (गरज असल्यास) करा.
* सर्व तेलाच्या पातळ्या (ब्रेक, इंजिन आदी) तपासा, नव्याने पूर्ण भरा.
* कूलन्ट पातळी तपासून ती नीट भरा.
* सर्व लाईट तपासा व ते चालू आहेत ना याची खात्री करा.
* टायर्स तपासा. ते गुळगुळीत झाले असतील, त्यांना तडे गेले असतील तर पाहा व बदला.
* टायर टय़ूबलेस नसतील तर आतील टय़ूबही नीट आहेत ना याची खात्री करून घ्या.
* ब्रेक्स तपासा व नीट जुळवून घ्या.
* शॉक अ‍ॅब्सॉर्बर्स तपासा व आवश्यक असतील तर बदला.
* मोटारीच्या चाकांचे रिम, अलॉय व्हील तपासा.
* व्हील अलायनमेंट तपासा.
* मेकॅनिक वा सव्‍‌र्हिस सेंटरमधील तज्ज्ञाबरोबर अन्य बाबींबाबत चर्चा करा व सल्ला घेऊन आवश्यक कारवाई करा.

मोटारीचे बाह्य़रंग
* मोटारीचे बाह्य़रूप हे केवळ रंगाचे नाही तर तिचा पत्राही नीट आहे का ते पाहा.
* पत्रा विशेषकरून कळातील बाजूचा नीट आहे ना, ते पाहा. तो गंजत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर गंजप्रतिबंध होण्यासाठी रंग लावून घ्यायला हरकत नाही.
* तळाकडील बाजू साधारण नवीन गाडी घेतल्यानंतर पहिली ३-४ वर्षे चांगली असते. कालांतराने त्यावर गंज चढण्याची शक्यता असते, ती बाब तपासा.
* गाडीची सर्व लॉक्स नीट चालत आहेत का, ते पाहा.
* मडगार्ड, बंपर या बाबी तपासून पाहा. प्लॅस्टिकचे भाग भक्कम व घट्टपणे मोटारीला धरून आहेत का पाहा.
* मडफ्लॅप खराब झाला असेल तर बदला. तो मोटारीच्या बॉडीला नीट घट्टपणे धरून राहिला आहे का ते तपासा.
* हेडलॅम्पच्या व टेललॅम्पच्या काचा खराब नाहीत ना ते पाहा.
* पावसाळ्यात तुमची गाडी काहीशा खराब ठिकाणी उभी केली जात असेल तर कव्हर टाकायला विसरू नका.
* दरवाजा, कोने या ठिकाणी रंग उडून तेथील पत्रा गंजण्यास सुरुवात होऊ शकते. त्यासाठी योग्य काळजी घ्या, तेथील भाग तपासून पाहा.

  मोटारीचे अंतरंग
* मोटारीच्या आतील भागामध्ये साफसफाई नीट करा.
* रबरी वा पॉलीमॅट नीट तपासा, फाडले असतील अधिक जीर्ण झाले असतील तर बदला.
* आत मऊशार कारपेटसदृश काही आच्छादन टाकले असतील तर ते तपासा, स्वच्छ करा.
* मॅट वा कारपेटच्या खाली पावसाळ्यामध्ये दमटपणामुळे ओलसरपणा येण्याची शक्यता असते. त्यासाठी कारपेट वा मॅटखाली नॅप्थॅलिनच्या गोळ्या टाका .
* नॅप्थॅलिनच्या म्हणजे डांबराच्या गोळ्या या नावाने ओळखल्या जातात, त्या सुगंधित प्रकारातही मिळतात. त्यांना एअरफ्रेशनर म्हणून टॉयलेटमध्ये वापरल्या जातात, त्याही टाकायला हरकत नाही.
* सीट कव्हर्स कापडाची असतील व खराब झाली असतील तर आताच धुऊन घ्यायला हरकत नाही, कारण पावसाळ्यात धुण्याची वेळ आल्यास त्या वाळायला वेळ जातो.
* अन्य प्रकारची सीट कव्हर्सही तपासा, स्वच्छ करा. धूळ, कचरा शक्यतो साफ करून घ्या.
* छताचे आच्छादन स्वच्छ करून घ्या.
* डिक्की वा हॅचबॅकचा मागील भाग हा देखील अशाच पद्धतीने साफ ठेवा. दमटपणा तयार होईल अशा वस्तू मोटारीत ठेवणे टाळा, अनावश्यक वस्तूही फेकून द्या. थोडक्यात हाऊस कीपिंगमधील क्लीनिंग डे सारखी दक्षता घ्या. स्टिअरिंगवरील कव्हर तपासा, पावसाळ्यात हात ओले असताना काहीवेळा त्यावरील ओशटपणामुळे स्टिअरिंगवरील पकड ढिली पडण्याची शक्यता असते.
* आपली आसन व्यवस्था तपासा. आसनाखालील पुढे-मागे आसन करण्याची लोखंडी यंत्रणा तपासा. आवश्यक असेल तर ग्रीस त्या ठिकाणी लावा.
* दरवाजे नीट उघडझाप होतात की नाही, बिजागिरे तपासा, तेथेही आवश्यक असेल तर ग्रीसचा वापर करा.
* दरवाजांमध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या कप्प्यांमधील नको त्या वस्तू फेकून द्या, तेथे काही चिकट पदार्थ नाही ना याची खात्री करा.
* एक्सरेटर, ब्रेक व क्लच जेथे असतात त्या ठिकाणी वायरी पायात अडकणाऱ्या प्रकाराने नाहीत ना, याची काळजी घ्या.
* नटबोल्ट, स्क्रू तपासा व गंजलेले नाहीत ना याचीही खात्री करा, खराब वाटत असतील तर ते बदला.
* काचा नीटपणे खाली-वर होत आहेत ना, ते पाहा. विंड स्क्रीन व मागील काच आतूनही स्वच्छ करून घ्या.