बजाजचा लकी मॅस्कॉट असलेल्या पल्सरने तरुणाईला वेड लावलंय. पल्सरच्या विविध मॉडेल्सना तरुणांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आजही पल्सरची क्रेझ कायम आहे आणि ती आणखी कशी वाढेल याची पुरेपूर काळजी बजाजनेही सातत्याने घेतली आहे. आता यात पल्सर एएस२०० आणि एएस१५० या दोन नव्या मॉडेल्सची भर पडली आहे. स्पोर्टी लूक, भन्नाट वेग आणि अनुक्रमे सहा व पाच गीअरच्या या स्पोर्ट्स बाइक्स खरोखरच अ‍ॅडव्हेंचर्स आहेत.. म्हणूनच त्यांना साजेशी टॅगलाइन देण्यात आली आहे.. अ‍ॅडव्हेंचर नेव्हर स्टॉप्स..
पल्सर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट (एएस) २०० आणि १५० या दोन्ही स्पोर्ट्स बाइक्स चालवण्याची संधी नुकतीच प्राप्त झाली. जुळ्या बहिणी शोभाव्यात अशा या दोन्ही बाइक्स आहेत. फरक फक्त क्युबिक क्षमता (सीसी) आणि गीअरबॉक्स यांच्यात आहे. एएस२००ला सहा तर १५०ला पाच गीअर आहेत. पहिला गीअर खाली आणि बाकी सारे वर अशी या गीअर्सची रचना आहे.
दोन्ही बाइक्सची फ्युएल टँक्स आणि काही बॉडी पार्ट्स फायबरचे बनवण्यात आल्याने गाडय़ांचे वजन हलके झाले आहे आणि त्याचा फायदा अर्थातच गाडीचा वेग वाढण्यात झाला आहे.
गाडीचा तोंडवळा चित्ताकर्षक आहे. नव्या स्टाइलचे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स देण्यात आल्याने कितीही अंधार असला तरी समोरचा रस्ता अगदी स्वच्छ दिसू शकतो. तसेच स्पीडोमीटर, ओडोमीटर यांना सुरक्षा म्हणून वायजरची उंची थोडी वाढवण्यात आली आहे.
गाडीचे आरपीएम लिमिट किती, बॅटरी कितपत चार्ज आहे, इंजिनाची स्थिती कशी आहे यासह डिजिटल घडय़ाळ, डिजिटल स्पीडोमीटर वगरे सुविधा दोन्ही एएस मॉडेल्सच्या डॅशबोर्डवर देण्यात आल्या आहेत.
इंधनाची टाकी हा विशेष आकर्षणाचा भाग ठरावा. इंधन टाकी पूर्णत: फायबरने बनवण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी तिचा दणकटपणा जाणवतो. हॅण्डलच्या बाजूने फुगीर असलेली इंधन टाकी मागे निमुळती होत जाते. बाइकस्वाराला दोन्ही पायांचे ढोपर बरोबर बसवता येऊन गाडीवरील ग्रिप घट्ट करता येईल, अशा खोबणी इंधन टाकीला दिल्या आहेत. हॅण्डल आणि बाइकस्वार यांच्यातील अंतर थोडे जास्त वाटते, गाडीच्या उंचीच्या मानाने हॅण्डल थोडे पुढे असल्याने बाइकस्वाराला पुढच्या बाजूला अंमळ झुकूनच गाडी चालवावी लागते.
बाइकवर बसणाऱ्या दोघांसाठी एकाच सीटवर दोन भाग करण्यात आले आहेत. पुढे बसणाऱ्याला थोडी स्पेस जास्त आहे. इंधन टाकीच्या मागच्या बाजूला सुरू होणारा हा सीटचा भाग बऱ्यापकी प्रशस्त आहे. त्यामानाने मागील बाजूला बसणाऱ्यास फारशी जागा नाही, असे जाणवते. तसेच मागचे सीट किंचित उंच आहे. अर्थात हा स्पोर्ट्स बाइकच्या निर्मितीचा अपरिहार्य भाग आहे.
एएस२०० वर मागच्या बाजूला बसणाऱ्यासाठी साडी गार्डला फूट स्टेपची सुविधा देण्यात आलेली नाही. मात्र, एएस१५०ला ही सुविधा देण्यात आलेली आहे. एएस२००ला मेन स्टॅण्डची सुविधा नाही. ही गाडी तुम्ही फक्त साइड स्टॅण्डलाच लावू शकता. तर एएस१५०ला मेन व साइड स्टॅण्ड अशा दोन्ही सुविधा आहेत. एएस१५० आणि २०० या दोन्ही गाडय़ा फोर स्ट्रोक, सिंगल सििलडर आणि मल्टी प्लग (छोटय़ा इंजिनासाठी दोन तर २०० सीसीसाठी तीन) फोर वॉल्व्ह इंजिन आणि अनुक्रमे १५० व २०० सीसीच्या आहेत. दोघींनाही सीव्ही कारब्युरेटर्सची सुविधा देण्यात आली आहे. एएस१५० एअर कुल्ड असून एएस२०० लिक्विड कुल्ड आहे.
जुन्या पल्सर१५०च्या तुलनेत नव्या एएस१५०चे इंजिन जास्त रिफाइन्ड आहे. तसंच त्याचं फायिरगही त्रासदायक नाही. त्या तुलनेत एएस२०० चे इंजिन मोठय़ाा क्षमतेचे आहे. दोन्ही गाडय़ांचे सस्पेन्शनही उत्तम आहे.
दोन्ही बाइक्सना पेटल रोटरने युक्त असलेले फ्रण्ट आणि रिअर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. परंतु एएस१५०ला मागच्या बाजूला ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. १७ इंची व्हील्स दोन्ही बाइक्सना आहेत. तसेच एमआरएफचे टायर्स गाडीला उत्तम ग्रीप बहाल करतात. कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर दोन्ही गाडय़ा  उत्तम धावू शकतात.
दोन्ही गाडय़ांचा पिकअप भन्नाट आहे. एका सेकंदात शून्यापासून ८० किमी प्रति तास एवढा वेग एएस२०० आणि १५० या दोन्ही गाडय़ा पकडू शकतात. गजबजलेल्या रस्त्यांवर आणि महामार्गावर या दोन्ही गाडय़ा सारख्याच वेगात धावू शकतात. महामार्गावर सुसाट वेगाने गाडी पळवताना कोणताही त्रास जाणवत नाही. या दोन्ही गाडय़ांचा अनुभव चांगला होता.
दोन्ही गाडय़ांची इंधन टाकी क्षमता १२ लिटर आहे. मायलेज ३५ ते ४० किमी प्रतिलिटर आहे.
किंमत
* एएस२००
एक लाख पाच हजार (ऑन रोड किंमत)

* एएस१५०
९५ हजार (एक्स शोरूम किंमत)
विनय उपासनी
vinay.upasani @expressindia.com