साधारणत: पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत स्कूटरचं मार्केट अबाधित होतं. म्हणजे फॅमिलीसाठी टू-व्हीलरचा विचार करायचा झालाच तर स्कूटरला प्राधान्य दिले जायचे. पण १९९८-२००० नंतर टू-व्हीलर उद्योगात मोठे फेरबदल होत गेले. ग्राहकांचा कल आता मोटरसायकलकडे होऊ लागला आणि स्कूटरची क्रेझ कमी कमी होत गेली. या उत्क्रांतीमध्ये स्प्लेंडर अग्रेसर ठरली. तसेच इतरही बाइक्स होत्याच. जसे सुझुकी मॅक्स, यामाहा, मोटरसायकलच्या या युगात स्कूटरपेक्षा दुप्पट मार्केट तयार झाले. पण स्कूटरनेही नंतर कशी प्रगती केली हे आपण मागे पाहिलेच.
मागच्या तीन वर्षांपर्यंत फक्त हिरो होंडा आणि बजाज या दोन कंपन्यांनी जवळजवळ ऐंशी टक्के मार्केटवर ताबा ठेवला. पण त्यानंतर इतर कंपन्याही त्यांच्या तोडीस तोड टेक्नॉलॉजी लाँच करून पुढे सरसावल्या आणि यशस्वी झाल्या. त्यामध्ये प्रामुख्याने टीव्हीएस-अपाचे, यामाहा एफझी यांचा समावेश करता येईल.
आतापर्यंत आपण टू-व्हीलरचा इतिहास, त्यात कालानुरूप झालेले बदल पाहिले. यानंतर आपण बाइक्सचे यांत्रिक कार्य कसे चालते हे पाहूया.
मयुर भंडारी