dr02* माझ्याकडे ग्रँड आय१० स्पोर्ट्स सीआरडीआय गाडी आहे. ही गाडी मी २०१३ मध्ये विकत घेतली. माझ्या गाडीचे रनिंग कमी आहे. आठवडय़ातील दोन-तीन दिवस तर गाडी दारातच उभी असते. अशा परिस्थितीत गाडीचे इंजिन अधिकाधिक कार्यक्षम राहावे यासाठी काय काळजी घेतली जावी. गाडी साधारणत किती किमी चालवली पाहिजे किंवा किती दिवस गाडी बंद असली तरी चालते. कृपया सांगा. – प्रशांत आघाव, शेगाव
* आजकालच्या डिझेल गाडय़ांना मेन्टेनन्स कमीच असतो. त्यामुळे सहा-सात दिवस गाडी बंद ठेवली तरी काही हरकत नसते. परंतु सहा-सात दिवसांनी तरी किमान ५० किमीपर्यंत गाडी चालवली गेली पाहिजे. बॅटरीतील पाणी वगैरे नियमित तपासून घ्या. गाडी नुसती रोज चालू केली तरी ती चांगली राहते. पावसाळ्यात मात्र अधिक काळजी घ्यावी. कारण पावसात गाडी सात-आठ दिवस उभी राहिली तर इंजिनात फंगस निर्माण होण्याची शक्यता बळावते. हे टाळायचे असेल तर पावसाळ्यात किमान दहा मिनिटे तरी सुरू करून ठेवावी.
* मी एक व्यावसायिक असून माझे बजेट ११ ते १३ लाख रुपये आहे. आठ लोकांना प्रवास करता येऊ शकेल अशी गाडी मला घ्यायची आहे. माझा रोजचा प्रवास सरासरी ५० ते ७० किमी आहे. तरी मला कोणती गाडी घेणे योग्य ठरेल. अर्टिगा, लॉजी आणि मोबिलिओ यापैकी कोणत्या गाडीचा विचार करावा. – बाळासाहेब बनकर, मढेवडगाव (ता. श्रीगोंदा)
* तुम्हाला १३ लाखांत नक्कीच इनोवा कार घेता येऊ शकेल. ही गाडी आठ लोकांसाठी खूप चांगली आहे. या गाडीचे इंजिन आयुष्य अडीच लाख किमीपर्यंतचे आहे. तसेच २५०० सीसीचे डिझेल इंजिन खूप ताकदवान असल्याने ताण न येता गाडी चालते. तुमचे बजेट १३ लाखांएवढे असेल तर तुम्ही लॉजी आणि मोबिलिओ या गाडय़ा शक्यतो टाळाच. इनोवाला मेन्टेनन्स कमी आणि आराम जास्त आहे. तुम्हाला ऑफ रोडसाठी गाडी हवी असेल तर त्याच बजेटात महिंद्राची एक्सयूव्ही५०० ही गाडी आहे. तिचे मिड व्हेरिएंट मॉडेल तुम्हाला अगदी सोयिस्कर ठरेल.  
* मला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे. माझे बजेट दोन ते तीन लाख रुपये आहे. मला वर्षांतून फक्त चार-पाच वेळाच जावे लागते. मला गाडी सुचवा. – शशी शिंदे
* तीन लाखांत तुम्हाला पाच ते सहा वर्षे वापरलेली होंडा सिटी मिळू शकेल. ती गाडी जुनी असली तरी तिचा मेन्टेनन्स कमी असतो. थोडी नवीनच हवी असेल तर तीन-चार वर्षे वापरलेली स्विफ्ट डिझायर मिळू शकेल. छोटी कार हवी असेल तर व्ॉगन आर सर्वोत्तम आहे.
* माझे बजेट चार-पाच लाख रुपये आहे. मला सहाआसनी गाडी घ्यायची आहे. माझे आठवडय़ाचे रनिंग साधारणत १०० किमी आहे. गाडीचा वापर वीकेंडलाच जास्त होतो. कुटुंबासाठी कोणती गाडी योग्य ठरेल. – नरेश कुवरे
* चार-पाच लाखांत सहाआसनी गाडी म्हणजे मारुती ईको. ती तुम्हाला सेवन सीटरही मिळू शकेल. मात्र, तिचा कार म्हणून वापर होऊ शकत नाही. तुमच्यासाठी योग्य ठरणारी कार म्हणजे डॅटसन गो किंवा गो प्लस. यात तुम्ही पाच मोठे आणि दोन लहान असे सात जण बसू शकता. ही गाडी तुम्हाला साडेचार लाखांत मिळू शकेल.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.
समीर ओक