‘‘आता मी म्हणू शकते की कथाकल्पना येतात- कविता पटकन् एखादा स्पार्क व्हावा, अचानक शॉर्टसर्किट व्हावं तशा होतात, पण ते अर्ध खरंय – कारण हा सर्व एक प्रवास हळूहळू पद्धतशीरपणे सुरू असतो- ती एक प्रक्रिया आहे. लिखाण- कथा- कविता-चित्रपट- नाटकं याचं बीज आधीच कुठं तरी कोपऱ्यात मेंदूत पडतं.. सर्वच गोष्टींचं झाडहोत नाही. पण ही एक अजाणता होणारी प्रक्रिया आहे. एखादी गोष्ट सगळेच पाहतात पण त्यावर लिहितो एखादाच.. आणि तेही लेखक लिहितो तोच अर्थ वाचक घेतील असंही नाही. तो त्याच्या संकल्पनेने अर्थ लावतो. मग ती कथा त्याची होते. म्हणजे कथा एकच पण दहा किंवा शंभर वाचक वाचतात तेव्हा ती कथा शंभर तऱ्हेची होत जाते..’’

‘मा निषाद्..’ हे शब्द होते पहिल्या कविकल्पनेचे! क्रौंचवध पाहिलेल्या वाल्मीकीचे..

चांगल्या न् वाईट घटनेचा परिणाम संवेदनशील मनावर आपटतो न् मग जी काही प्रतिक्रिया उमटते त्याचे तरंग मनावर मेंदूवर आत्म्यावर सर्वदूर पसरतात.. नितळ जलाशयात कुणी दगड फेकावा तसे.. मग नंतर अव्यक्त अशा घडामोडी अंतरात्म्यात होतात. त्याचं रूपांतर शब्दांत- किंवा सुरात किंवा रंगात किंवा नृत्यात कोणी कसं करत जातं हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं..

वयाच्या सातव्या वर्षी मी पहिली कविता लिहिली त्यामागे होत्या, माझ्या वडिलांच्या, शाहीर अमर शेख यांच्या काव्यरचना..! त्यांनी रचलेल्या कविता- पोवाडे- घरात सूर-नाद-शब्द-ताल आणि वगनाटय़ाच्या तालमी ऐकून ऐकून ते सारं रक्तात, विचारांत, मनात सर्वदूर पसरत अजाणता झालेले संस्कार, वाचनाचं अपार वेड यानं शब्द-कल्पना-विचार हे माझ्यापेक्षा जास्त वेगाने वयात येत होते. काल लिहिलेली कविता आज बरी वाटायची नाही. मग अशा पाचशे लिहिलेल्या कविता चक्क फाडून टाकल्या. मग साधारण आठव्या-नवव्या वर्षी एक नाटुकलं, मग हिंदी शायरी- मग ललित- चक्क विनोदी कथा- तर या सर्वामागेही एक प्राथमिक गोष्ट.. आता हे सर्व कसं सुचतं, हा प्रवास कसा झाला याचा मी जाणीवपूर्वक कधी विचारच केला नव्हता.. जो आता या लेखाच्या अनुषंगाने करतेय इतका तो सहजस्वाभाविक होता.. आहे..

पहिल्यांदा ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. नंतर मग अनुभव जीवनाचे विचार आणि मग मानवी आयुष्याचा अन्वयार्थ लावता लावता.. अस्तित्वाची असंबद्ध हतबल अपरिहार्यता.. स्वतंत्र स्वयंभू बुद्धी असूनही माणूस होण्याचा अहंकार असतानाही आपण केव्हा केव्हा हतबल-असाहाय्य होतो- घायाळ होतो- आपल्या अस्तित्वाचा, जगण्याचा, स्वत:चा न् दुसऱ्याचाही शोध घेऊ लागतो.. अनेक आरसे- आरशामधली पृथक्  पृथक्  प्रतिबिंब स्वत:चं, दुसऱ्याचं, समाजाचं, विश्वाचं. त्या सर्व असंगतीमध्येही एक प्रकारची सुसंबद्धता येत जाते.. एखाद्या कोडय़ाचे ठोकळे आपण जसे कधी इकडे कधी तिकडे लावून कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतो तसे..

माझ्याबाबतीत ही प्रक्रिया जटिल नव्हती.. नियती, दैव, देव, नशीब मी मानत नव्हते. त्यामुळं तर अशा माणसांच्या बाबतीत खरं तर आयुष्य जास्त कठीण असतं. कारण मग प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वत:वर येते. कारण मनात, विचारात, आयुष्यात खुंटय़ाच नसतात! ज्यावर बाकीचे आयुष्य टांगून निर्धास्त निवांत होतात! मग तो देव असो किंवा धर्म किंवा जात किंवा नेते किंवा एखादं तत्त्वज्ञान.. दुसऱ्या कुणीही निर्माण केलेलं मान्य करायचं नाही. प्रत्येक गोष्ट स्वत:च्या बुद्धीवर, तर्कावर घासून बघायची. ही गोष्ट कठीण खरी पण मला ते परमोच्च कोटीचं स्वातंत्र्य वाटतं. आव्हान वाटतं..

अलीकडच्या ‘एक होता उंदीर’ आणि ‘झाडपणाची गोष्ट’ किंवा ‘अथांगतेच्या पलीकडे’ किंवा ‘नैनं छिदन्ति शस्त्राणि’ या कथा माझ्या विशेष आवडीच्या, मानवी आयुष्याचा, अस्तित्वाचा शोध मी यातून घेण्याचा प्रयत्न केला. मुळात शोध हेच प्रत्येक कथेचं सूत्र आहे..

सुख-दु:ख याच्यापलीकडे मानवी अस्तित्व आहे ते काय- प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय याचं अपार कुतूहल औत्सुक्य आणि त्यातून काही कल्पना आकार घेतात. मग परकाया प्रवेश! मी झाड होते- उंदीर आणि पक्षी आणि दु:खाचे अनुभव घेतलेला माणूस- मग तो स्त्री असो की पुरुष-! विचार कधीच मला एकटं सोडत नाहीत. ‘हॅण्डल विथ केयर’ ही दीर्घकथा मी ‘सामना’मध्ये ‘पत्रकार’ म्हणून नोकरीला असताना केलेल्या प्रवासात लिहिली! ती पूर्ण कथाच पुरुषाच्या दृष्टिकोनातून लिहिली. जाणीवपूर्वक नाही. ती आली! माझा प्रिय भाऊ अस्सल हाडाचा कवी चंद्रकांतभैया देवताले मला म्हणाला एकदा, ‘‘तू काही कविता पुरुषवाचक लिहिल्यात, असं का?’’ तर मी म्हटलं ‘‘कविता – कथा जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना मुळीच विचारत नाही तू स्त्री आहेस का पुरुष? तू झाड आहेस का माणूस की प्राणी की आणि काही? त्या येतात आणि मी त्यांना येऊ देते म्हणण्यापेक्षा त्या घुसतात आणि झडप घालून मला खाऊन टाकतात, असं म्हणणं ठीक होईल!’’

आता मी म्हणू शकते की कथाकल्पना येतात- कविता पटकन् एखादा स्पार्क व्हावा, अचानक शॉर्टसर्किट व्हावं तशा होतात, पण ते अर्ध खरंय- कारण हा सर्व एक प्रवास हळूहळू पद्धतशीरपणे सुरू असतो- ती एक प्रक्रिया आहे. आपण अन्न खातो त्याची प्रक्रिया साखळी शरीरात पद्धतशीरपणे चालू असते. रक्त धावत असतं- मेंदू सूचना पाठवत असतो. आपल्या कुठं लक्षात येतात? त्या नैसर्गिक स्वाभाविक मानतो आपण सवयीमुळे. लिखाण- कथा- कविता-चित्रपट- नाटकं याचं बीज आधीच कुठं तरी कोपऱ्यात मेंदूत पडतं.. सर्वच गोष्टींचं झाड होत नाही. ही पण एक अजाणता होणारी प्रक्रिया आहे. एखादी गोष्ट सगळेच पाहतात पण त्यावर लिहितो एखादाच.. आणि तेही लेखक लिहितो तोच अर्थ वाचक घेतील असंही नाही. तो त्याच्या संकल्पनेने अर्थ लावतो. मग ती कथा त्याची होते. म्हणजे कथा एकच पण दहा किंवा शंभर वाचक वाचतात तेव्हा ती कथा शंभर तऱ्हेची होत जाते..

शब्द लिहिल्यावर ते आपले नसतात- त्यावर आपला अधिकार नसतो. ही गोष्ट प्रत्येक लेखक समजूतदारपणे सहन करतो. लेखक जेव्हा लिहितो ती कल्पना सुचायला कधी एक क्षण पुरे असतो कधी ती खदखदत राहते. सुदैवानं मला त्या यातना भोगायला लागल्या नाहीत. मोकळं सोडलं तर मी रोज दिवसाला एक कथा लिहू शकते! विनासायास! कोण वाचेल याची भीती न बाळगता! आणि भोवतालचं अवघं जग मला एवढे विषय पुरवतं की त्याला तोडच नाही! असंही!! बाकीच्या लेखकांना किती कष्ट पडतात माहीत नाही पण आता माझ्याबाबतीत ती एक स्वाभाविक प्रक्रिया झालीय. मी माझ्या एका सहकारी मैत्रिणीला म्हटलेलं की, ‘‘मी जर मेले तर मला पुरायचं हे तर ठरलंच, कारण मला मेल्यावर आगीत, विद्युतदाहिनीत जाळणं हे अमानुष क्रौर्य वाटतं.. तर मला पुरलं आणि तुला जर माझं लिखाण पाहिजे असेल तर कागद पेन ठेव फक्त. मी जमिनीतून हात वर काढून पटपट लिहून देईन..’’ तिनं विचित्र नजरेनं पाहिलं न् मान हलवली, फक्त हसली.

अगदी परवा परवाच मी एका ठिकाणी रात्री गेलेले. मुंबईतच- अगदी सुन्नाट सन्नाटा- अंधार सर्वत्र- काळी झाडं- पानांचा वाऱ्याचा न् एका गूढ शांततेचा आवाज- दूरवर काळ्या पडक्या इमारती- खूप दूर- मी कदाचित् एकटी- अगदी जवळच्या, दूरच्या रस्त्यांवरही दिवे नाहीत. एक अमानुष, खूप शक्यता पोटात असलेली निर्मनुष्य शांतता-! मी स्तब्धपणे ते वातावरण अनुभवत राहिले. एखादं इंजेक्शनमधून रसायन जसं हळूहळू इंजेक्ट करतात तसं ते वातावरण ती निर्मनुष्य शांतता माझ्या रक्तात, मेंदूत, मनात, आत्म्यात हळूहळू घुसत गेली! आता अजून ती जागा मेंदूत प्रवेश मिळून पडून आहे.. त्या एकाच जागेवर मी किमान दहा वेगवेगळ्या कथा लिहू शकते!! तर अशी असते कथा- कल्पनेच्या जन्माची!

नैनं छिदन्ति

‘नैनं छिदन्ति शस्त्राणि’ ही कथा- दीर्घकथा.. याच्या जन्माची कथा त्याच्या स्वरूपाइतकीच विशेष आहे. वयाच्या आठ- नवव्या वर्षी इतिहासात जे शिकले त्यानं, त्यातल्या एका घटनेनं मी गोंधळले. धक्काच बसला वैचारिक- सांस्कृतिक!

सम्राट अशोकानं कलिंगचं युद्ध लढताना नेहमी होणाऱ्या युद्धापेक्षा जास्त संहार केला. लाखो लोक मारले गेले. किलगचं राज्य पूर्ण धुळीला मिळालं, हा इतिहास आता सर्वज्ञात आहेच. पण त्या लढाईनंतर झालेला नरसंहार, विधवा स्त्रियांचा आक्रोश पाहून तो पश्चाताप पावला. त्याने बुद्धधर्म स्वीकारला आणि मग अनेक स्तंभ, वास्तू बांधल्या वगैरे.. आज त्याचं अशोकचक्र मानानं आपल्या राष्ट्रध्वजावर चित्रित आहे!

मी स्तंभित झाले. असं कसं? म्हणजे अनन्वित हिंसाचार करून जर केवळ कुणी पश्चाताप करेल त्याला ते क्षम्य आहे? हे मला त्या वयातपण जाणवलेलं आणि इथेच त्या कथेचं बीज रोवलं गेलं.. त्या एका प्रश्नाभोवतीच सर्व कथा खरं तर मी लिहिली. म्हणजे वय र्वष नऊ आणि वय र्वष पन्नास.. इतकी दीर्घ र्वष ते कथाबीज माझ्या मेंदूत रुजून रुतून बसलेलं. माझ्या कथेतला खलनायक जो नायक आहे. तो म्हणतो.. ‘‘मग मी ही शिसारी येईपर्यंत हिंसाचार करतो मग पश्चाताप करतो. मग मलाही क्षमा मिळेल का?’’

यात जीवनाचे- अनेक प्रश्न- युद्ध आणि प्रेम व त्याग आणि क्षमा यावरचे अनेक प्रश्न आहेत. जे शाश्वत आहेत. त्यासाठी मी पुन्हा इतिहासाचा अभ्यास सुरू केला.

मा. म. देशमुख यांचं ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ याची मला फार मदत झाली. कथा- व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येत होती. पण वातावरणनिर्मिती, काही संदर्भ खरे वाटायला हवे होते. मला आठवतं, दहा वर्षांपूर्वी मी ही कथा लिहिली. कदाचित पंधरा- पण झपाटल्यागत मी लिहीत होते. अचानक एके रात्री दोन वाजता माझे डोळे उघडले.. काही तरी आठवलं- सुचलं आणि मी लिहीत गेले. ती सगळी दीर्घकथा एक टाकी लिहिलीय्- नो ड्राफ्ट- माझ्या जवळपास सगळ्याच कथा एकटाकी- जपमाळेत कसे मणी एकामागोमाग सरकतात तसं- कथा- पात्र आपोआप येत जातात- जणू आता आपली एण्ट्री आहे हे नटांना ठाऊक असतं – तसं!

ती एक शोकात्म कथा- आणि जेव्हा शोकात्म कथा राजमहालात घडते त्याला एक वेगळा रंग चढतो. इतकं वैभव- इतकी सत्ता तरीही पराकोटीचं दु:ख- पांढऱ्याशेजारी काळाकुट्ट रंग जास्त उठून दिसतो. पाहा शेक्सपियरचं हॅम्लेट- किंग लियर- राजा इडिपस- भव्य पण प्रचंड शोकात्म- आपल्याकडे महाभारत, रामायण यातील अनेक व्यक्तिरेखा प्रचंड राजवैभवात जगणाऱ्या तरीही प्रचंड दु:खाच्या कराल सर्वनाशी जबडय़ात सापडलेल्या..

‘नैनं छिदन्ति..’ या कथेमध्ये शोकात्मिकतेचे सगळे रंग आलेत असं मला वाटतं. मौर्यानंतरचं साम्राज- बुद्धकाळ- युद्धाच्या घनघोर रणांगणात उतलेली नायिका पुरुषवेश धारण करून शत्रूशी लढताना युद्धकैदी बनते आणि नंतर जो खलनायक तिच्या प्रेमात पडतो. ज्यानं तिला बंदी बनवलेलं असतं तो राजा तिच्यावर बळजबरी न करता तिला शेवटी तिच्या मागणीनुसार उद्ध्वस्त केलेलं राज्य देतो. ती पुन:श्च शत्रूराज्याची राणी बनून उद्ध्वस्त राज्य उभं करते. पण शेवटी काय? ती शून्य बनून बौद्ध धर्मात येते तिथे तिला कोण भेटतं? अजून एक शून्य! जे राज्य उद्ध्वस्त केलेलं असतं त्याची सम्राज्ञी! शेवटी माणूस शून्याप्रत येतो! विजय- पराजय- सुख- दु:ख- प्रेम- विरह हे वाटेत भेटून जाणारे वाटसरू असतात! असंही!

माझ्या या कथेनं मला एक वेगळं समाधान दिलं. जे माझ्या महत्त्वाकांक्षी फिल्म स्क्रिप्ट ‘प्रेसिडेंट’नं दिलं. विश्वव्यापक युद्ध- दु:ख- लादणारे शेवटी धूळ होऊन राहतात.. एक धुळीच्या राखेचा लहानसा ढिगारा.. लिहिणारा लेखक हे एक निमित्त असतं- फक्त निमित्त!

-मलिका अमर शेख (साहित्यिका)