आनंदजी वीरजी शहा संगीतकार

‘‘जिंदगी का सफर है यह कैसा सफरया गाण्याच्या रेकॉर्डिगच्या वेळी मला अचानक सुचलं, की नायकाला कर्करोग झाल्यानंतर तो हे गाणं गाणार आहे, त्याचा आवाज खोल गेलेला असायला हवा. मी माइकची जागा बदलता, किशोरकुमारला खुर्चीवर बसून गायला सांगितलं. तो ऐकेना. पण मी आग्रह धरला की, ‘‘आपण रेकॉर्डिग करून तर बघू. त्यानंतरही तुला आवडलं नाही तर तुला हवं तसं रेकॉर्डिग करू.’’ त्यानं मान्य केलं. माइकपासून दूर खुर्चीत बसून किशोरनं अत्यंत तन्मयतेनं ते गाणं गायलं आणि ते अजरामर झालं.’’

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
Holi 2024; Jaipur’s traditional celebrations with ‘Gulaal Gota’
Holi 2024: ४०० वर्षांपूर्वी होळी कशी साजरी केली जात होती? काय आहे गुलाल गोटा परंपरा?

आम्ही मूळचे कच्छचे, वडील  वीरजीभाई शहा किराणा मालाचा व्यापार करण्यासाठी मुंबईत आले व इथेच राहिले. आम्ही गिरगावात राहायचो. एकदम झकास जागा! सगळ्या जाती-धर्माची, भाषा बोलणारी माणसं गिरगावात होती. दुर्गा खोटे, शांता आपटेंसारख्या स्टार अभिनेत्री या भागात राहायच्या, त्यांचा डौल पाहताना वाटायचं की आपण चित्रपटात जावं. गिरगावात नेहमी सणासुदीची रेलचेल असायची. गणपतीत मेळे भरायचे. रंगमंचावर त्यांचा खेळ पाहताना वाटायचं की, आपण कधी रंगमंचावर जाणार व तो गाजवणार? अगदी प्रारंभापासून मनावर हे गारूड होतं. गिरगावात नंतर मनमोहन देसाई, रवी कपूर (जितेंद्र), जतीन खन्ना (राजेश खन्ना) हेही राहत होते. एकुणात गिरगाव ही स्वप्न पाहणाऱ्यांसाठी योग्य जागा होती.

माझ्या बालपणी स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. बेचाळीसचं आंदोलन भरात असताना इंग्रजांचा विरोध म्हणून मी एका परीक्षेत इंग्रजीच्या पेपरवर लिहून आलो, ‘आमची भाषा हिंदी आहे व आमचा इंग्रजी भाषेला विरोध आहे. आम्हाला ती शिकायची नाही.’ घरी आल्यावर हे वडिलांना सांगितलं. ते हसले व म्हणाले, ‘‘इंग्रज आपल्या देशातून जातील, पण इंग्रजी राहील. आता वर्ष वाया गेलं तर, तू दुकानात येऊन जे कागद येतात, त्यातील इंग्रजी कागद वाचत राहा आणि ती भाषा सुधार.’’ मी त्यांचं ऐकलं. त्या कागद वाचनात मला एका परदेशी वाद्याची माहिती मिळाली. ते वाद्य म्हणजे सिंथेसायजरची प्राथमिक आवृत्ती होती. मी वडिलांना ‘ते वाद्य आपल्याला हवं’, अशी विनंती केली. तोवर, माझे मोठे बंधू कल्याणजीभाईंनीही चित्रपटात विविध वाद्ये वाजवायला प्रारंभ केला होता. ते अनेक वाद्ये लीलया वाजवत. वडिलांनी तीन हजार रुपयांचं ते वाद्य आणून दिलं. त्या वाद्यात क्लॅव्हिऑलिन नावाचं वाद्य होतं. ‘नागीन’ चित्रपटासाठीची जी बीन वाजली, ती या वाद्यातूनच!‘नागीन’चं संगीत हेमंतकुमारजींचं होतं, रवीजी सहायक होते. त्या वेळी रवीजींनी बाजावर ती धून वाजवली होती व कल्याणजीभाईंनी क्लॅव्हिऑलिनवर. पुंगीसदृश वाजवल्यामुळे कल्याणजीभाईंचं सर्वत्र नाव झालं. एखाद्या वादकाचं अशा पद्धतीनं नाव होण्याचा तो पहिला प्रसंग! कल्याणजीभाई मग चित्रपटात रुळत गेले. ते माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे होते. मी दहा-अकरा वर्षांचा असताना मला एका कामासाठी चित्रपटात बोलवण्यात आलं (१९४४) आणि मी या व्यवसायाशी जोडला गेलो.

१५-२० रुपये मिळायचे. त्या वेळी पडेल ते काम केलं. ट्रॉली लावली, प्रकाशयोजना केली, एडिटिंग टेबलपाशी बसलो, साऊण्ड पाशी गेलो. त्यामुळे सगळं समजत गेलं.

मला खरं तर हिरो व्हायचं होतं, पण वय वाढताना मी बुटका राहिलो, तर कल्याणजीभाई चांगले उंच झाले. माझं मन खट्टू झालं. वडिलांनी विचारलं की, ‘‘तू उदास का?’’ मी सांगितलं की, ‘‘कल्याणजीला हिरो नाही व्हायचं, पण तो उंच व मला हिरो व्हायचं तर मी बुटका. देव असं का करतो?’’ ते म्हणाले, ‘‘अरे, माणूस कष्ट का करतो? मान उंच राहावी म्हणून ना. तुझं एक बरं आहे, तुला खाली कधी बघावं लागणार नाही, कायम मान उंच करून जगशील.’’ या त्यांच्या बोलण्यानं माझा आत्मविश्वास वाढला, मी उंच टाचांचे बूट घालायचो, तेही बंद केले व कल्याणजीभाईंबरोबर संगीतात घुसलो.

कल्याणजीभाईंचं नाव झालेलं. त्यांनी कल्याणजी वीरजी शहा या नावानं संगीत द्यायला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘सम्राट चंद्रगुप्त’. दोन-तीन चित्रपटांनंतर त्यांनी माझंही नाव संगीतकार म्हणून सोबत जोडलं व जन्मापासूनची आमची जोडी, कल्याणजी-आनंदजी या नावानं चित्रपटातही कायम झाली. ‘सट्टा बाजार’ हा आमचा एकत्र नाव असलेला पहिला चित्रपट! पण लोकप्रियता मिळाली ती मनमोहन देसाईंच्या, राज कपूर अभिनीत ‘छलिया’मुळे. ‘छलिया’ची सारी गाणी हिट झाली. त्याच्या शीर्षक गीतातील ‘छलना मेरा काम’ या ओळीवर सेन्सॉरने आक्षेप घेतला, आम्ही ‘छलिया मेरा नाम’ ही ओळ रिपिट केली व मार्ग काढला. चित्रपटात तुम्हाला ‘छलिया मेरा नाम, छलिया मेरा नाम’ असं तर रेकॉर्डवर ‘छलिया मेरा नाम, छलना मेरा काम’ हे ऐकायला मिळेल.

चित्रपटाचं संगीत करायचं, म्हणजे फक्त गाणी नव्हेत. खरं तर हे माध्यम दिग्दर्शकाइतकंच संगीतकाराचंही आहे. चित्रपटाला खऱ्या अर्थानं संगीत बोलकं करतं. अनेक प्रसंगांना पाश्र्वसंगीतामुळे खुमारी येते. आनंद, दु:ख, राग, भय, मारामारी काहीही घ्या, त्या प्रसंगाला पाश्र्वसंगीत गडद करतं. काही वेळा चित्रपटातील शांततेलाही ‘आवाज’ असतो. तो संगीतकाराला निर्माण करावा लागतो. आम्ही चित्रपटात गीताचं स्थान काय आहे, लोकेशन कुठलं आहे- इंडोअर आहे की आऊटडोअर, ते कोणावर चित्रित होणार आहे, त्या पात्राची मानसिकता काय आहे, वेळ कोणती आहे, गाण्याची शॉट डिव्हिजन कशी आहे, कोणता कॅमेरा वापरणार, त्याला फिल्टर कोणता आहे, पात्रांचे कपडे कसे आहेत, हे सारे समजून घेऊनच संगीत करायचो. ‘ब्लफ मास्टर’मध्ये ‘गोविंदा, आला रे आला’ हे गाणं गोकुळाष्टमीच्या वेळचं होतं. शम्मी कपूर त्यात नाचणार होता. त्याने आग्रह धरला की मी गोविंदांच्या सर्वात वरच्या थरावर जाऊन हंडी फोडणार व तसं त्यानं केलंही. आम्ही शॉट डिव्हिजन समजून घेऊन गाणं केल्यानं, त्याचं हंडी फोडायला थरांवर चढणं, हे चित्रित करणं सोपं झालं. ‘सरस्वतिचंद्र’मधलं ‘मैं तो भूल चली बाबुल का देस’ हे आऊटडोअर गाणं व गरबा नृत्य होतं, त्यामुळे त्याचं संगीत मोकळंढाकळं होतं. ‘जब जब फूल खिलें’मधलं ‘परदेसियों से ना, अखियाँ मिलानां’ हे गाणं काश्मीरमधल्या शिकाऱ्यातलं व खुल्या निसर्गातलं गाणं आहे, त्यामुळे त्याचा पॅटर्न आणखी वेगळा ठेवलेला. त्यातलंच ‘ये समा..’ ऐका. दुपारच्या वेळचं गाणं! स्वत:च्या तारुण्याच्या नव्या नव्हाळीत हरवलेल्या तरुणीची मन:स्थिती दिसते, नंदाच्या कपडय़ांच्या शेड्सही तिच्या मनोवृत्तीला साजेशा. ते सारं गीतातून जाणवतं. ‘अफ्फू खुदा’मध्ये रफीसाहेबांच्या ललकारीनं तर सारा समा बदलतो..

एकदा अन्नू मलिकनं मला विचारलं की, ‘‘एक हिट गाणं देताना वाट लागते, पण सारीच्या सारी गाणी हिट झालेले चित्रपट तुम्ही कसे देता?’’ मी उत्तरलो, ‘‘अरे, मनात इच्छा हवी, की गाणं हिट व्हायला पाहिजे. ती प्रबळ इच्छाच गाणं उत्तम बनवते. दुसरं काही नाही.’’ मला चित्रपट बनविण्याच्या प्रक्रियेतही रस होता. मी दिग्दर्शकाला स्वत:हून सूचना करायचो. कारण चित्रपटकला ही सामूहिक कला आहे. चित्रपटाचं पाश्र्वसंगीत करताना शॉट केवढा हवा हे पाहणं महत्त्वाचं आहे. मोठे शॉट हे पाश्र्वसंगीतासाठी त्रासदायक असतात. दिलीपकुमारसाहेब असे लांब शॉट देत असत व काहीसे संथही असत. ‘बैराग’ करताना आम्हाला पाश्र्वसंगीतासाठी किती तरी भाग कापावा असं सुचवावं लागलं. अमिताभ बच्चनचा ‘जादूगर’ही लांब शॉट्समध्ये चित्रित केला गेला. त्याचं पाश्र्वसंगीत करताना त्रास झाला. थोडासा ग्राम्य शब्द वापरायचा झाला तर, माझ्यात एडिटिंगचा ‘किडा’ होता. त्यामुळे मी दिग्दर्शकाबरोबर बसत असे. अमुक शॉट क्लोज अप आहे की लाँग शॉट आहे, ते एकल दृश्य आहे की समूह, ती कार रेस आहे की घोडय़ांची रेस आहे, एखादं युगुल हातात हात घालून गाणं गातंय की एकटाच गातोय, पात्राच्या हातात वाद्य आहे की नाही, ते निसर्गदृश्य आहे की नागरी. एक ना अनेक प्रश्न आमच्या मनात असतात. त्याप्रमाणे आम्ही पाश्र्वसंगीत करायचो. एकदा व्ही. शांताराम यांच्याबरोबर काम करताना मी विचारलं की, ‘‘दो आँखे बारह हाथ’मध्ये पावसाळी वातावरणाचे दृश्य हे खरोखरच घेतले आहे ना, त्यात ढग पाठून येताना दिसतात.’’ त्यांना आश्चर्य वाटलं होतं, की मला त्यात गती कशी?

पाच दशकांत आम्ही २५० च्या आसपास चित्रपट केले. पारितोषिकांच्या मागे गेलो नाही. एका मोठय़ा पारितोषिक समारंभाच्या वेळी कल्याणजीभाईंना एक जण म्हणाला की, ‘‘तुमचं अमुक चित्रपटातलं संगीत हिट आहे, तुम्ही थोडा खर्च केला की तुम्हाला ते पारितोषिक मिळेल.’’ कल्याणजीभाई म्हणाले की, ‘‘बाबांनो, तुमच्या बाहुलीच्या अंगावर कपडे नाहीत. आम्ही पडलो श्वेतांबर, त्यामुळे आम्हाला दिगंबर काही चालत नाही.’’ आमचे कित्येक चित्रपट चालले. प्रेक्षकांची पसंती महत्त्वाची, बाकीच्या गोष्टी दुय्यम! आम्ही दिग्दर्शकाला मोठा मानला, पण आमच्या संगीतात त्याला लुडबुड करू दिली नाही. त्यांनीही आमचा अधिकार मानला होता. दिग्दर्शकाला काय हवं आणि प्रेक्षकांना काय रुचेल हे महत्त्वाचं मानलं. ‘सफर’चा दिग्दर्शक असित सेन आणि ‘कोरा कागज’चा दिग्दर्शक अनिल गांगुली हे दोघेही बंगाली आहेत, त्यामुळे त्या चित्रपटांचे संगीत बंगाली वळणाचं आहे. ‘सरस्वतिचंद्र’चे दिग्दर्शक गोविंद सरैया हे गुजराती आहेत. त्याच्या गाण्यांना गुजराती ‘चव’ आहे, तर ‘गीत’चे निर्माते दिग्दर्शक रामानंद सागर हे उत्तर भारतीय आहेत, त्यामुळे त्यात उत्तर भारताचा सुगंध तुम्हाला मिळेल.

आम्ही सतत प्रयोगशील राहिलो. म्हणून आमच्या संगीतात नावीन्य आलं, या नावीन्यातून परंपरा घडली. गोकुळाष्टमीच्या उत्सवात तुम्हाला ‘गोविंदा, आला रे आला’, नवरात्रीत सगळीकडे ‘मैं तो भुल चली’ तर कोणत्याही अंताक्षरीत ‘डम डम डिगा डिगा’ किंवा ‘निले निले अंबरपर’ ऐकायला मिळेल. सोप्या गुणगुणता येणाऱ्या आणि सार्वत्रिक पसंतीच्या चाली देण्याचा प्रयत्न हे आमच्या कामाचं रहस्य आहे. संगीत तयार करताना तुम्हाला त्यात घुसता आलं पाहिजे. काम करताना त्यात पूर्णपणे एकाग्र होऊनच काम केलं पाहिजे, असं आम्हाला वाटायचं.

चित्रपटातील प्रसंगाला समजून घेऊन गाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. ‘जंजीर’मधलं प्राणसाहेबांना दिलेलं गाणं घ्या- ‘यारी है इमान मेरा’ अमिताभ मनावरचा ताण दूर करायला, मित्राकडे प्राणकडे येतो. इथे गाणं कसं असावं यावर सारे अडकले. मी प्रकाश मेहरांना विचारलं, ‘प्राण हाथ में रुमाल लेके नाचेंगे क्या?’ उत्तर मिळालं- ‘हां, बिल्कूल!’ तेवढय़ात कल्याणजीभाई कुठेसे गेले. ते परत येईपर्यंत मी एक ढोलकवाला बोलावला, त्याला ठेका देऊन वाजवायला सांगितलं, दोन मिनिटांत चाल तयार झाली. कल्याणजीभाई आल्यावर त्यांना ऐकवली. म्हणालो, ‘‘बस, दोन-तीन ढोलक घेऊ  आणि रबाब हे वाद्य घेऊ.’’ प्रकाश मेहरांना फारसं आवडलं नव्हतं ते गाणं. पण माझ्यापुढे काय बोलणार? रेकॉर्ड करताना ऐन वेळी ‘दिले गुलजार क्यूँ बेजार नजर आता हैं?’ हा भाग लिहिला गेला व त्याला मन्ना दांनी ऐनवेळी गायलंही. त्या गाण्यानं धूम मचवली. प्राणसाहेबांसाठी आम्ही पाच गाणी केली, ती सारी खूप गाजली. ‘कसौटी’ चित्रपटात प्राणसाहेब व अमिताभ, दोघांनाही आम्ही किशोरचा आवाज दिला. त्या हरफनमौला कलावंतानं दोन वेगळ्या शैलीत गाणी गायली. ‘हम बोलेगा, तो बोलोगे के बोलता है’, या गाण्यात आम्ही हिंदी चित्रपट गीतात पहिल्यांदा नेपाळी फ्लेवर दिला. ‘डॉन’मध्ये दोन वेगवेगळ्या अमिताभसाठी आम्ही एकटा किशोरकुमार वापरला. स्मगलर डॉन अमिताभसाठी आम्ही किशोरला दमदार, उर्मट आवाज दिला व चालही तशीच दिली- ‘अरे, दिवानो, मुझे पहचानो’ हे गाणे ऐका. तर गावातून मुंबईत आलेल्या अमिताभसाठी किशोरला थोडासा अवखळ, चंचल, विनोदी ढंग घ्यायला लावला. ‘ई है बंबई नगरिया, तू देख बबुआ’ किंवा ‘खईके पान बनारसवाला’ ऐकल्यावर तो ग्रामीण ढंग तुम्हाला आवडेल. ‘डॉन’मध्ये ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ या गाण्याला तर ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड मिळून आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली.

‘कुर्बानी’ चित्रपटाच्या वेळी फिरोज खानला एक कॅबरेस्टाईल गाणं हवं होतं, इंदिवर महिनाभर झगडत होता. फिरोजला काहीच पसंत पडेना. उद्यावर रेकॉर्डिग आलेलं आणि गाणं हातात नाही. मी अचानक इंदिवरला म्हणालो, ‘‘अरे तू परवा तो मुखडा ऐकवलास ना मला, तो फिरोजला ऐकव. अरे, ते लैला मैं लैला, ऐसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना अकेला.’’ इंदिवरला कळेना. फिरोज उसळलाच, ‘‘अरे हेच हवं होतं मला. लिही पुढे.’’ इंदिवर वेडाच झाला- ‘‘मी कधी लिहिलं रे हे.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘अरे, मुखडा मला आत्ता सुचला, चल लिहू पुढे.’’ आम्ही मिळून ते पूर्ण केलं. मला लिखाणाचा शौक पहिल्यापासून होता. मी असा अधूनमधून पूर्ण करायचो. ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये दोन मित्र एकाच मुलीवर प्रेम करतात, त्यातील एक जण ते व्यक्त करतो, ती ते प्रेम स्वीकारते व दुसरा मूक राहतो.

विनोद खन्ना अमिताभजवळ ते व्यक्त करतो. गंभीर स्वभावाचा अमिताभ अस्वस्थ होतो, पण मित्राला दुखावत नाही. मित्र त्याच्या प्रेयसीसमवेत एकदा जेवायला येतो, त्या वेळी योगायोगानं हाही तेथे येतो, अशा नाटय़मय प्रसंगावर गाणं द्यायचं होतं. आमच्या चर्चेच्या वेळी मी म्हणालो, ‘‘यार, इथं आपण टिपिकल गाणं नको करू या. मुखडा, अंतरा वगैरेपेक्षा आपण प्रेमाबद्दलची भाष्ये देऊ  या.’’ प्रकाश मेहरा उखडलाच. नेहमीप्रमाणे आमचं भांडण झालं. गीतकार अंजान म्हणाला, ‘‘ऐसा कभी हुआ नही है.’’ मी म्हणालो, ‘‘ऐसा हुआ नही है इसका मतलब, कभीभी नही होना चाहिये ऐसा नही है. प्रयत्न तर करू या.’’ तो मान्यच करे ना. कल्याणजीभाईंना कल्पना आवडली. मी अंजानला म्हणालो, ‘‘अरे, आपण म्हणतो ना ‘त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव’ चल हे वाक्य घे, प्यार जिंदगी है, प्यार बंदगी है.’’ ‘‘बस बस अब रास्ता मिल गया,’’ अंजान म्हणाला. एक अप्रतिम गाणं बनलं.

‘हिमालय की गोद में’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिगदर्शनासाठीचा सी एम डी पुरस्कार पृथ्वीराज कपूर यांच्या हस्ते स्वीकारताना कल्याणजी-आनंदजी.  सोबत राज कपूर आणि सी रामचंद्र. 
‘हिमालय की गोद में’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिगदर्शनासाठीचा सी एम डी पुरस्कार पृथ्वीराज कपूर यांच्या हस्ते स्वीकारताना कल्याणजी-आनंदजी.  सोबत राज कपूर आणि सी रामचंद्र.

‘सफर’मधलं ‘जीवन से भरी तेरी आँखे’ गाणं ऐका. त्या गाण्यात किशोरचा आवाज तुम्हाला मोकळा ऐकायला येईल. त्या गीतात आम्ही एक मजा करून घेतली आहे. नेहमी डोळे, बाहू, चाल, रंग, रूप यावर गाणी बनली पण नाक या अवयवाचा कोणी विचारच केला नाही. ‘मधुबन की सुगंध है सांसोमें’ या ओळीत आम्ही नाकाचा सन्मान करू शकलो. हे गाणं झाल्यावर दुसरं गाणं होतं, जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं, ‘जिंदगी का सफर है यह कैसा सफर’ किती सुंदर शब्द लिहिले आहेत. त्याच्या रेकॉर्डिगच्या वेळी मला अचानक सुचलं, की नायकाला कर्करोग झाल्यानंतर तो हे गाणं गाणार आहे, त्याचा आवाज खोलवर असायला हवा. मी माईकची जागा न बदलता, किशोरकुमारसाठी एक खुर्ची मागवली व त्यावर बसून गायला सांगितलं. तो ऐकेना, पण मी आग्रह धरला की, ‘‘आपण रेकॉर्डिग करून तर बघू. त्यानंतरही तुला आवडलं नाही तर तुला हवं तसं रेकॉर्डिग करू.’’ त्यानं मान्य केलं. माईकपासून दूर खुर्चीत बसून किशोरनं अत्यंत तन्मयतेनं ते गाणं गायलं आणि ते अजरामर झालं. किशोरकुमार भन्नाटच होता. आम्ही १९७९-८० च्या आसपास ‘दूरदर्शन’साठी एक कार्यक्रम केलेला. त्या वेळी किशोरवर आकाशवाणीचा अघोषित बॅन होता. ‘दूरदर्शन’वरही त्याची गाणी लागत नसत. आमच्या कार्यक्रमासाठी ‘दूरदर्शन’ने त्याला बोलावलं, पण त्यानं नकार दिला. आम्ही प्रयत्न करतो, असं म्हणालो. किशोर म्हणाला, ‘‘मी गाणार नाही.’’ मी म्हणालो, ‘‘अरे गाऊ  नकोस. अ‍ॅक्टर म्हणून ये.’’ तो तयार झाला. मी एक युक्ती केली. ती आज उघडी करतोय. आम्ही मागे साऊंड ट्रॅक लावला व किशोरनं त्यावर ओठ हलवलेत फक्त. पण तो कार्यक्रम हिट झाला.

जगभरात गाजलेली आरती म्हणजे ‘ओम जय जगदीश हरे’ तिचं रेकॉर्डिग तर अक्षरश: एका माईकवर आम्ही केलं. निर्माते म्हणत होते की, ‘नेहमीसारखं भरपूर माईक घेऊन करा.’ आम्ही उत्तरलो, ‘‘भाई, ही मंदिरातील आरती आहे, लोकांचे आवाज दुरून येतात, जवळून येतात. तो जिवंतपणा हवा असेल तर आपण असंच करू या.’’ तेही गाणं गाजलं.

आम्ही जुन्या नव्या सर्व दिग्दर्शकांबरोबर कामे केली. आम्ही आमच्या आधीच्या एस. डी. बर्मनजींना खूप मानायचो. त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली होती. सर्वच गायकांबरोबर आम्ही काम केलं. प्रत्येकानं आम्हाला काही खास दिलं. मुकेशजींच्यासाठी आम्ही खास वेगळ्या प्रकारची गाणी लिहून घेतली होती. त्यात अनुनासिकांचा वापर केलेला असे. त्यामुळे त्यांच्या गाण्यात वेगळीच मिठ्ठास येत असे. लताजी, आशाजी, रफीसाहेब, किशोरदा, मन्नादा, महेंद्र कपूर या ज्येष्ठ गायकांबरोबरच नव्या चेहऱ्यांनाही आम्ही नेहमीच संधी दिली. कल्याणजीभाईंनी ‘कल्याणजी वीरजी शहा आणि पार्टी’ या नावाने भारतातील पहिला मानला गेलेला ऑर्केस्ट्रा सुरू केला. त्या माध्यमातून त्यांनी शेकडो कार्यक्रमांच्या द्वारे देश-विदेशात लोकांचं मनोरंजन केलं.

असं भरपूर काम सुरू असताना १९९४-९५ च्या सुमारास मी कल्याणजीभाईंना म्हणालो, ‘‘आपण खूप काम केलंय. आता आपण थांबायची वेळ आली आहे. विजू आदी मुलांचं संगीत लोक ऐकत आहेत, ते लोकप्रिय होत आहे. आता अजून काय हवं?’’ त्यांनीही वडीलकीच्या नात्याने या म्हणण्याला मान दिला. आम्ही चित्रपटांना संगीत देणं थांबवलं. आज मी पेडर रोडवर राहतो. कित्येक दशके तिथेच आहोत आम्ही. कल्याणजीभाईंनी घर घेतलं, तिथंच खालच्या मजल्यावर त्यांच्यासोबत येऊन मी राहिलो. जिथे राम तिथे लक्ष्मण हवा ना. आमच्यात कधीही भांडणं झाली नाहीत. मतभेद जरूर झाले असतील, पण मनभेद कधीही झाले नाहीत. परस्परांना समजून घेत आम्ही जगलो. आम्ही कधीही व्यसनं केली नाहीत, मांसाहार केला नाही. देवाला, त्याहीपेक्षा स्वत:च्या मनातील सदसद्विवेकबुद्धीला घाबरून राहिलो.  साधं जगणं जगलो. या साऱ्या जगण्याला साथ लाभली ती प्रेमळ पत्नीची, शांताची! त्यांच्यासोबत दीपक, भरत, धीरेन या मुलांची आणि रीटा व भावना या मुलींची, हे पाचही जण माझे पंचप्राण आहेत. सगळे आपापल्या मार्गाने स्थीरस्थावर झालेत! सफल आणि समाधानी म्हातारपणाचं गुलबकावलीचं फूल मला लाभलं! आनंदात आहे, लक्षात ठेवण्याजोग्या आठवणी आहेत! कमतरता आहे, ती फक्त अकाली गेलेल्या कल्याणजीभाईंची!

nitinarekar@gmail.com

आभार : जॉनी लिव्हर