‘‘ मला वाटते मी एक विश्वस्त आहे मिळालेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संपत्तीचा आणि कीर्तीचाही. ४२ वर्षे मी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) या एकाच कंपनीत काम केले. १९८९ ते २०११ या कालावधीत ‘एल अ‍ॅण्ड टी’ने ज्या पद्धतीने बा अधिग्रहणाचे दोन हल्ले पचविले ते देशाच्या उद्यम इतिहासात असामान्यच. कंपनीचा कारभार कसा चालवू नये याचे कठोर धडे या काळात मिळाले. अनेक वेळा खूप ताण देणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. बरेच नियम अतिशय महागडय़ा अपघातातून मी शिकलो. पण या अपयशाची बोच माझ्या पुढच्या प्रवासात कधीही अडसर बनली नाही. वयाच्या खूप उशिरा स्वतंत्र व्यवसाय चालवण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. ‘एल अ‍ॅण्ड टी’च्या पारंपरिक व्यवसायापेक्षा निराळ्या अशा वित्त सेवा व्यवसायाची सूत्रे मी २०११ पासून पूर्णवेळ हाती घेतली. त्यावेळी नवसर्जनाच्या, वेगळ्या वाटेने जाण्याच्या तरुणाईच्या लाटेवर मीही स्वार झालो. पण त्याच वेळी कुटुंबाला वेळ देता येत नाही ही एक पोकळ सबब असते. आपल्या स्वार्थासाठी आपण केलेली ती निवड असते, हे शहाणपण खूप उशिरा सुचलं. त्यामुळे आता जे जे करायचं राहिलं आहे ते मी करणार आहे..’’

मेहनत आणि सचोटीने अनेक जण काम करतात. हुशारी आणि कर्तबगारीत माझ्यापेक्षा अनेकांगांनी श्रेष्ठ माणसे मी पाहिली आहेत. म्हणूनच मला सारखा प्रश्न पडतो, पद, प्रसिद्धी, पैसा, मान अशी लौकिकार्थाने ‘यश’ मानली गेलेली बिरुदे इतकी भरभरून माझ्या वाटय़ालाच कशी आली? उत्तम शिक्षण, बडय़ा उद्योगसमूहात उच्च पदावर दीर्घकाळ काम, जनमत घडवू शकेल अशा अनेक विषयांवर मतप्रदर्शन करण्याची संधी, विविध वैधानिक समित्यांवर सरकारतर्फे नेमणूक.. हे सर्व माझ्या बाबतीत घडले यावर कसा विश्वास ठेवू?

याला नशीब, नियती वगैरे म्हणायचे की धडपड, चिकाटी किंवा थोडय़ा फार अक्कलहुशारीचे फलित समजायचे? मागे कुणीतरी प्रश्न विचारला होता की, तुम्ही नशीब मानता का? मी बहुधा हो म्हटले असावे. पत्रिका, भविष्य, ज्योतिष या गोष्टींकडे मी कधी वळलो नाही. त्यामुळे या विषयावर भाष्य करणे योग्य नाही. पण मी लहान असताना माझीही पत्रिका परंपरेनुसार केली गेली होती. चाळा म्हणून अलीकडे मी ती वाचली. त्यातल्या काही ओळी अचंबित करणाऱ्या आहेत. ‘‘कसल्याही अडचणी न येता शिक्षण पूर्ण होईल, सांपत्तिक स्थिती चांगली असेल, सुस्वभावी पत्नीमुळे भाग्योदय होईल, सगळी भौतिक सुखं उपभोगता येतील’’ वगैरे वगैरे.. पत्रिकेतील ही भाकिते बऱ्याच अंशी खरी ठरत आली आहेत. पण दुसऱ्या अंगाने विचार करताना माझ्या ‘मोठेपणा’वर खिळलेली सार्वजनिक नजर मला अस्वस्थ करते आहे. जे काही मिळविले त्याला यश हे नाव देऊ  या की यशाची खरी ओळख निराळीच आहे? मला वाटते मी एक विश्वस्त आहे मिळालेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संपत्तीचा आणि कीर्तीचाही..

सातवीपर्यंत म्युनिसिपल शाळेत मराठी माध्यमातून शिकलो. पुढची चार वर्षे गिरगावातील त्याकाळच्या प्रथितयश आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकलो. मी खूप हुशार विद्यार्थी नव्हतो. पहिल्या सात आठात नंबर असायचा. आम्हा सात भावंडांत दोघी बहिणी हुशार. माझाही त्यांच्यासारखा पहिला नंबर यावा, माझेही त्यांच्यासारखे कौतुक व्हावे असे नेहमी वाटायचे. या असोशीमुळे मी आयुष्यातली पहिली लबाडी केली. खोटा वागलो. चाचणी परीक्षेत उत्तरपत्रिका हातात मिळाल्यावर बदल केला. लबाडी पकडली गेली. प्रकरण मुख्याध्यापकांपर्यंत गेलं. पालक म्हणून भावाला माझ्या तक्रारीसाठी शाळेत बोलावण्यात आले. कौतुकाच्या अपेक्षेने केलेल्या या प्रतापातून आयुष्यभराची शिदोरी मिळाली.

सिडनहॅम महाविद्यालयाने पुढच्या सर्व आयुष्याची पुंजी दिली. वित्त आणि लेखा विषयाचा पाया बळकट केला. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आयुष्य सर्वार्थाने समृद्ध करणारा आणि आयुष्यभर साथ देणारा मित्रपरिवार दिला. जे अस्सल, खरे, तेच चिरंतन या जाणिवेने पुढच्या संपूर्ण आयुष्यात माझी संगत केली. कंपनी सुशासन (कॉपरेरेट गव्हर्नन्स) ज्याला म्हटले जाते त्याचा पाया यापेक्षा वेगळा नाहीच. निरंतर मूल्यनिर्मिती, पारदर्शक व्यवहार आणि सतत उच्च मूल्यांची कास धरणे हे ज्या कंपन्यांना जमते त्या शंभर शंभर वर्षही पहिल्या रांगेत टिकून राहातात. ही शिकवण, हा समज आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर घडत गेलेल्या प्रसंगातून पक्का होत गेला. ४२ वर्षे मी एकाच कंपनीत काम केले. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) ही कुणा व्यक्ती किंवा कुटुंबाची मालकी असणारी कंपनी नाही. गुणवत्तेला अग्रक्रम देणारी, नेतृत्व गुण, कर्तबगारी या निकषांवर भर देणारी आणि व्यावसायिक व्यवस्थापन असलेली भारतातील ही एक अग्रगण्य कंपनी. मला या कंपनीत काम करायची संधी एका सुहृद, सज्जन स्नेह्यमुळे मिळाली. बऱ्याच शिडय़ा चढता आल्या, त्या केवळ या कंपनीत काम केल्यामुळेच.

भारतात नुकताच संगणकाचा वापर सुरू झाला होता. खूप मोठाले अवजड आयबीएमचे संगणक आमच्याही कंपनीत आले. त्या संगणकाचा उपयोग करून एक अतिशय महत्त्वपूर्ण लेखाप्रणाली (अकाऊंटिंग सिस्टीम) कार्यान्वित करण्याची संधी मला मिळाली. ज्ञान आणि नेतृत्व यांचा कस अजमावणारा तो अनुभव आयुष्यातला एक मैलाचा दगड ठरला. ही प्रणाली काही फरकांनी अजूनही ‘एल अ‍ॅण्ड टी’त आणि इतर बऱ्याच कंपन्यांमध्ये सुरू आहे. त्यानंतर कंपनीमध्ये अनेक क्षेत्रात मुशाफिरी केली. मनुष्यबळ विभाग, कामगार विभाग, विक्री विभाग, लेखा आणि वित्त अशा अनेक क्षेत्रांत विहार केला. वर्ष जात राहिली. नवीन कामे, नव्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. कुठल्याही कामाला नाही म्हटले नाही. एक अद्ययावत कोषागार स्थापन झाला, सर्वासाठी सामायिक सेवा (शेअर्ड सव्‍‌र्हिसेस) आणि जोखीम व्यवस्थापन या त्यावेळी नव्या असलेल्या संकल्पना राबवल्या गेल्या, त्यासाठी नवीन विभाग स्थापन केले. मी हावरटासारख्या जबाबदाऱ्या मागायचो आणि वरिष्ठांनी माझी भूक भागवायची असा क्रम सुरू राहिला.

एक्याण्णवच्या उदारीकरणानंतर वित्तीय क्षेत्रात क्रांतीच झाली. भांडवल उभारणीसाठी नवनवीन स्रोत खुले झाले. आमच्या कंपनीने झालेला बदल लवकर आत्मसात करून वेळोवेळी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. काळाच्या पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारपेठेतून निरनिराळ्या पद्धतीने भांडवल उभे केले. भांडवल उभारणीतील एक अग्रेसर कंपनी म्हणून भारतातच नाही तर विदेशातही लौकिक मिळविला. हे सगळे करत असताना धंद्याची सर्वागीण बांधणी, विकासप्रक्रिया, संयुक्त भागीदारीचे उद्यम करणे/ तोडणे, निर्गुतवणूक, दुसऱ्या कंपन्यांचा ताबा मिळवणे आणि कंपन्या विकणे असे सर्व प्रकारचे अनुभव गोळा केले.

अलीकडेच शेअर बाजारात पदार्पण केलेल्या ‘एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक’च्या प्रारंभिक जडणघडणीत सक्रिय सहभाग घेतला. व्यवसायाच्या उभारणीसाठी, ग्राहक मिळवण्यासाठी अनेक परदेश वाऱ्या केल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कारभाराची जवळून पाहणी करण्याची संधी मिळाली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा धाटणीचे सार्वजनिक खासगी भागीदारीचे प्रकल्प नुकतेच सुरू झाले होते. सरकार आणि उद्योग क्षेत्रासाठी हा पहिलाच प्रयोग होता. या संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी मी घेतली. या नव्या वाटांवर अनेक चुकाही केल्या. काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या बांधणीत पुढाकार घेतला. काही प्रकल्प फसले.. नाव झाले, पण नुकसानही झाले.

बांधकाम क्षेत्रातील आणि सरकारच मुख्य ग्राहक असलेल्या तसेच देशभरात ठिकठिकाणी विखुरलेले मनुष्यबळ असलेल्या कंपनीची ‘एक मूल्य एक ध्यास’ वाटचाल खरे तर खूप अवघड आहे. १९८९ ते २०११ या कालावधीत ‘एल अ‍ॅण्ड टी’ने ज्या पद्धतीने बा अधिग्रहणाचे दोन हल्ले पचविले ते देशाच्या उद्यम इतिहासात असामान्यच. या कालावधीत कंपनीतील अधिकारी, कर्मचारी सगळ्यांनाच भरपूर मनस्ताप झाला. हा काळ म्हणजे आम्हावरील संस्कारांच्या कसोटीचा काळ ठरला. पारदर्शी, मूल्याधारित कार्यपरंपरेला हे एक जबरदस्त आव्हानच होते. किंबहुना कंपनीच्या पारंपरिक मूल्यांवर झालेला हा हल्लाच होता. म्हणूनच सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या लढाईत सक्रिय सहभाग घेतला. सरकार आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त निर्धाराने दीर्घकाळ चाललेला हा संघर्ष एकदाचा २०११ मध्ये संपला. कंपनीचा कारभार कसा चालवू नये याचे कठोर धडे या काळात मिळाले.

अनेक वेळा खूप ताण देणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. २००८ ची ही गोष्ट. कंपनीचा कोषागार (ट्रेझरी) विभाग बहुचर्चित आणि प्रेरणादायक म्हणून प्रसिद्ध झाला होता. कमॉडिटी ट्रेडिंगचा नवीन विभाग आम्ही सुरू केला होता. सुरुवातीचे व्यवहार खूप फायद्याचे झाले. आम्ही उलाढाल वाढवली. वाजवीपेक्षा जास्त जोखीम घेतली, सौदे केले. शेवटी व्हायचे तेच झाले. जबरदस्त नुकसान झाले. या सगळ्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून मी राजीनाम्याची तयारी दाखवली. पण माझे सर्व संचालक मंडळातील सहकारी, वरिष्ठ पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. जवळजवळ ७०/८० कोटीच्या घरात जाणाऱ्या या तोटय़ाने मला खूप अस्वस्थ केले. ही सगळी कहाणी संचालक मंडळ, भागधारक, प्रसारमाध्यमे यांना कधी एकदा सांगतो याची प्रचंड घाई मला झाली. एक संपूर्ण दिवस माध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरे जाऊन सारी हकिकत सांगितली. भागधारकांपर्यंत सर्व तपशील पोहोचला तेव्हा कुठे मला थोडे मोकळे झाल्यासारखे वाटले. भागधारकांच्या पुंजीवर चालणाऱ्या कंपन्यांनी आखून दिलेल्या सीमारेषेपर्यंतच जोखीम पत्करावी, फायद्याबरोबरच नुकसानही तितक्याच तत्परतेने आणि प्रांजळपणे भागधारकापर्यंत पोहोचवावे हे आणि असे बरेच नियम अतिशय महागडय़ा अपघातातून मी शिकलो. पण या अपयशाची बोच माझ्या पुढच्या प्रवासात कधीही अडसर बनली नाही.

वयाच्या खूप उशिरा स्वतंत्र व्यवसाय चालवण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. ‘एल अ‍ॅण्ड टी’च्या पारंपरिक व्यवसायापेक्षा निराळ्या अशा वित्त सेवा व्यवसायाची सूत्रे मी २०११ पासून पूर्णवेळ हाती घेतली. एक तर या क्षेत्रातला आमचा प्रवेश उशिरा झालेला, त्यामुळे स्पर्धक भरपूर आणि तगडे होते. त्यात या व्यवसायासाठी ‘एल अ‍ॅण्ड टी’ची अनुभवी आणि कुशल टीम उपयोगाची नव्हती. याच क्षेत्रातील सक्षम माणसे नव्याने गोळा करून एका उद्दिष्टाने आणि ध्येयाने काम करणारा संघ तयार करणे आवश्यक होते. तरुण नेतृत्वावर विश्वास टाकून पण त्याचबरोबर त्यांच्यात अपेक्षित मूल्यसंस्कार रुजवून, एकरूप संघ घडविण्याचे जिकिरीचे काम पहिल्या टप्प्यात पार पडले आहे. या संघाने ‘दृढ निर्धार, पराकोटीची जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सफलतेचा कायम ध्यास’ अशी प्रतिज्ञा बनवून जोरात काम सुरू केले आहे. एक प्रेरणादायक आणि कौतुकपात्र संस्था बनवण्याचे स्वप्न आहे. ही प्रतिज्ञा आणि हे स्वप्न म्हणजे केवळ भिंतीवर टांगायचा निर्जीव फलक नाही, तो आहे या नव्या नेतृत्वाचा दृढनिश्चय.. नवसर्जनाचा, वेगळ्या वाटेने जाण्याच्या तरुणाईच्या या लाटेवर मीही स्वार झालो आहे. हा ध्यास मलाही पुढे नेणारा, उल्हसित करणारा आहे. नकारात्मकतेची जळमटे झटकून टाकणारा आहे.

कॉपरेरेट जगतात, सामाजिक संस्थांमध्ये किंवा राजकारणातही नेतृत्वाची खरी कसोटी लागते वारसदार निवडण्याच्या वेळी. निवडलेली व्यक्ती आपल्यापेक्षा कांकणभर अधिक कर्तबगार असेल याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण संस्था चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. वारसाच्या जडणघडणीत सक्रिय सहभागी होऊन निरपेक्षपणे त्याला/तिला पुढे आणले पाहिजे. आनंदाची गोष्ट म्हणजे कंपनीचा मुख्य वित्तीय व्यवस्थापक म्हणून निवडलेला माझा सहकारी माझ्यापेक्षा सरस कामगिरी करत आहे. मी नसताना निरंतरेत तसूभरही खंड पडला नाही, ही माझ्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब आहे. वित्त सेवा व्यवसायातही असा प्रयत्न चालू आहे. तुम्ही स्वत: काय केले हे महत्त्वाचे आहेच, पण त्याहीपेक्षा तुम्ही निवडलेल्या माणसांनी काय केले हा माझ्या दृष्टीने नेतृत्वस्थानी असणाऱ्या व्यक्तींच्या कामगिरीचा मोजमापाचा प्रधान निकष असावा.

मला परंपरावादी म्हटले जाते. पण माझ्या घरातील वातावरण आणि विशेषत: आमच्या मुली अतिशय मुक्त विचारांच्या आहेत. ही तक्रार नव्हे तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एकदा माझ्या मोठय़ा मुलीने मला बोलता बोलता सहज प्रश्न केला- ‘तुमची कोलकता, दिल्लीत बदली झाली. तुमच्या करिअरसाठी आई आणि आम्ही तुमच्याबरोबर आलो. समजा तुमच्याऐवजी आईची बदली झाली असती तर तुम्ही गेला असतात का तिच्याबरोबर?’ प्रामाणिकपणे सांगायचं तर नसतो गेलो. माझी प्रगती (?), करिअर मला जास्त महत्त्वाची होती आणि त्यासाठी माझी माणसं माझ्याबरोबर आनंदाने फरफटत आली. कुटुंबाला वेळ देऊन, घरच्या आणि कामाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, त्यात समतोल साधून आनंदाचा आणि यशाचा मार्ग सापडलेल्या माणसांचे मला कौतुक वाटते. मला हे फारसे कधी जमले नाही. कुटुंबाला वेळ देता येत नाही ही एक पोकळ सबब असते. आपल्या स्वार्थासाठी आपण केलेली ती निवड असते. खूप उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे.

हे शहाणपण आणि बरेच काही माझ्या सुंदर घराने मला दिले. मला खूप सारे पटायला लागले आहे. उशिराने बदल होतो आहे. आता फारसे काही खटकत नाही, नावडत नाही. स्वीकारण्याची ताकद वाढली आहे. आत शांतता आहे. इतरांना हे कदाचित जाणवत नसेलही, पण मला बदल जाणवतो आहे. स्वत:कडे तटस्थतेने पाहण्याची वृत्ती वाढते आहे.

पण तरीही अजून खूप काही करायची ऊर्जा तग धरून आहे. गाणे तर शिकायचेच आहे, आजची गाणी म्हणायची आहेत. भरपूर वाचायचं आहे. नातींकडून सगळी नवीन गॅजेट्स शिकायची आहेत. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’नंतर आणखी काही चित्रपट बनवायचे आहेत. ‘राजवाडे’ केला कारण त्यातला गाभा मला भावला. कुटुंबात आणि समाजात विचारांच्या सहिष्णुतेची खूप आवश्यकता आहे. कुटुंबातील व्यक्तींवर जर तुमचे खरोखरच प्रेम असेल तर त्यांचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना द्या. शक्य असेल तर मदत करा आणि आपल्या निर्णयांची त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांसकट जबाबदारी घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करा. मला हा विषय आणि त्याची मांडणी आधुनिक, पुढे नेणारी वाटली. पण आपल्याला आवडणारा चित्रपट बनविणे आणि तो प्रेक्षकांना आवडणे या दोन निराळ्या गोष्टी आहेत. ही एक मोठीच जोखीम आहे. तरीही समकालीन किंवा भविष्यवेधी विषयांवर चित्रपट बनविण्याची जिद्द अजून कायम आहेच.

जांभुळपाडय़ातील ‘चैतन्य सहनिवासा’साठी पत्नी- लीनाने चालवलेल्या खटाटोपात लुडबुड करायची आहे. या सगळ्यांबरोबर घरीही वेळ द्यायचा आहे हे लक्षात आहे. भूतकाळात मी फारसा रमत नाही. आज आणि उद्या मला फार आवडतात. उमेद कायम ठेवतात. अजूनही यशाची व्याख्या शोधतोय. पुढची वाट किती शिल्लक आहे माहीत नाही. पण ती पूर्ण होण्यापूर्वी आधी चालून आलेल्या वाटेवर फुले पसरण्याचा प्रयत्न करणार आहे. आलो त्यापेक्षा वाट सुंदर, स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित तेच माझे यश असेल.

यशवंत देवस्थळी

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेड अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक