‘‘मनोविकारशास्त्रातला माझा पहिलावहिला संशोधन निबंध होता, ‘गिरणी संपाचे कामगार आणि कुटुंबांवरचे मनोसामाजिक परिणाम’. आज ३५-३६ वर्षांनंतर पाठी वळून पाहताना जाणवते की मनोविकाराच्या लक्षणांच्या पलीकडे जाऊन माणसांचे जगणे समजून घेण्याचा माझा पहिलावहिला प्रयत्न होता तो.’’ आपल्या ‘मनोविकार ते मनोविकास’ या आवर्तनाबद्दल सांगताहेत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी.

‘‘कोणकोणते त्रास होत आहेत तुम्हाला..सांगू शकाल?’’ प्रश्न विचारणारा आवाज माझा. स्थळ: मुंबईच्या केईएम् रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण विभागासाठी मनोविकारशास्त्राची १५ नंबरची ओपीडी.
‘‘झोप लागत नाही..दचकून जाग येते. विनाकारण धडधड होते अचानक.. सारखी भीती वाटत राहाते. जबाबदाऱ्या खूप आहेत हो. कमावणारा मी एकटा..’’ हे बोलणारा माणूस मध्यमवयीन, चेहऱ्यावरची रया गेलेला. काळ : गिरणी संप सुरू झाल्यापासून सहा सात महिन्यानंतरचा! मनोविकारशास्त्रामध्ये एम्.डी.चे शिक्षण घेण्याला मी सुरुवात केली होती. निवासी डॉक्टर म्हणून काम करत होतो. गिरणगावच्या वेशीवर वसलेले के.ई.एम.. समोरचा माणूस होता गिरणी कामगार. संपाची परिस्थिती चिघळलेली. त्याला चिंतेने आणि निराशेने घेरून टाकलेले. प्रामाणिकपणे काम करत, आपल्या कुटुंबाची देखभाल निगुतीने करणारा हा माणूस भांबावून गेला होता..मी त्याच्याशी बोललो. उपचार सुरू केले..मनातून हललो होतो. त्या माणसाचा हरवलेला चेहरा डोळ्यापुढे येत होता सारखा. ‘‘सरऽऽ, गिरणगावातला हा संप म्हणजे सगळ्या मुंबईला हलवून टाकणारा प्रकार आहे. आपल्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमधल्या या अशा संपकरी कामगारांचा आणि कुटुंबीयांचा आपण अभ्यास केला तर ‘मनोविकारशास्त्रातला उण्यापुरा तीन महिन्यांचा अनुभव असणारा ज्युनियर डॉक्टर म्हणजे मी, माझे प्रोफेसर डॉ. एल्.पी. शहा यांच्याशी बोलत होतो.

‘‘कल्पना चांगली आहे..लाग कामाला.. मानसिक तणाव आणि परिसरात त्या घटना यांची काय सांगड घातली जाते पाहू या तरी’’ मला सरांनी हिरवा झेंडा दाखवला. पुढच्या काही महिन्यांमध्ये मला अशा पाश्र्वभूमीच्या तिसाहून अधिक कहाण्या मिळाल्या.. ‘केसेस मिळाल्या’ असे मुद्दामच लिहिलेले नाही. मनोविकारशास्त्रातला माझा पहिलावहिला संशोधन निबंध होता, ‘गिरणी संपाचे कामगार आणि कुटुंबांवरचे मनोसामाजिक परिणाम’. आज ३५-३६ वर्षांनंतर पाठी वळून पाहताना जाणवते की मनोविकाराच्या लक्षणांच्या पलीकडे जाऊन माणसांचे जगणे समजून घेण्याचा माझा पहिलावहिला प्रयत्न होता तो.

खरे तर ‘क्लिनिकल सायकिअ‍ॅट्री’ या विषयामध्ये, मनोविकाराचे निदान, त्यावरची औषधयोजना, जरूर पडल्यास वॉर्डात अ‍ॅडमिशन्स, तीव्र लक्षणांसाठी विद्युत उपचार.. या साऱ्यांमध्ये प्रावीण्य मिळवणे पुरेसे होते. पण एम.बी.बी.एस. होता होताच माझे एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्याचे नाव होते ‘वैद्यकसत्ता’. आयव्हान् एलीच् या लेखकाच्या ‘मेडिकल नेमेसिस’ या पुस्तकाचे भारतीयीकरण करून लिहिलेल्या या पुस्तकाच्या निमित्ताने बिगर इंटरनेट जमान्यामध्ये मी बऱ्यापैकी संदर्भ-शोध आणि वाचन केले होते. वैद्यकीय व्यवसाय माणसाच्या जीवनाचे ‘मेडिकलायझेशन’ करून स्वत:ची सत्ता स्थापन करू पाहात आहे आणि त्यासाठी ‘आरोग्य’ हा शब्द फक्त सोयीसाठी वापरला जात आहे. भर आहे तो ‘आजार’ या संकल्पनेवर. आजारावरचा उपचार करणारा तो डॉक्टर. करवून घेणारा तो पेशंट..म्हणून डॉक्टर श्रेष्ठ!
वैद्यकीय व्यवस्थाही श्रेष्ठ..अगदी धर्मसत्तेहूनही पवित्र..परंतु या सत्तेला जाताना वैद्यकीय व्यवसाय आरोग्याचे संवर्धन करण्यापेक्षा लक्षणांवर काबू मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. एलीचची थोडक्यात अशी भूमिका होती. या संकुचित दृष्टिकोनाला म्हणतात बायोमेडिकल अर्थात जीववैद्यकीय दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन आहे बायो सायकोसोशल अर्थात् सर्वसमावेशक.. आरोग्याची व्याख्याच आहे समतोल! जीवशास्त्रीय, मानसिक आणि सामाजिक घटाकांचा समन्वय!

पुस्तकाच्या लेखनादरम्यान केलेल्या अभ्यासामुळे माझ्या विचारांचा कल या सर्वसमावेशक होलिस्टिक विचाराकडे झुकत होता. या पद्धतीने व्यवसाय करणारे डॉ. रवी बापट, डॉ. विजय आजगावकर,
डॉ. शरदिनी डहाणूकर, डॉ. एम्.एल्. कोठारी असे माझे शिक्षक माझे रोल मॉडेल्स होते. त्यामुळे मनोविकारशास्त्र शिकतानाही आपण काहीतरी वेगळे करायला हवे हे डोक्याने घेतलेले होते.

माझ्या प्रोफेसरनी म्हणजे डॉ. एल्. पी. शहांनी मला काही महिन्यातच ‘व्यसनाधीनता’ या समस्येवर काम करायला सांगितले. केईएम्मध्ये येणारे मद्यपी हे शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक साऱ्याच आघाडय़ांवर बेजार झालेले. आम्ही त्यांना अ‍ॅडमिट करायचो, औषधे द्यायचो. डिसचार्ज द्यायचो..त्यांच्याशी संवाद साधायला वेळ कुणाला होता? माझे दोन पेशंटस् होते. एक होता जीत आणि दुसरा अरुण! या दोघांनी मला अे अे अर्थात् ‘अल्कोहॉलिक अ‍ॅनोनिमस’ या संस्थेबद्दल सांगितले. जीतच्या स्कूटरवर बसून मी या ‘निनावी मद्यपी’ संस्थेच्या सायंसभांना जाऊ लागलो. व्यसनाधीनतेच्या मानसिक उपचार पद्धतींवर वाचन केले आणि केईएम्मध्ये साप्ताहिक गटउपचार सत्रसभा सुरू केल्या. रुग्णांचा पाठपुरावा वाढला. आठवडय़ातून एकदा भरणारी सभा दोन वेळा भरू लागली. कुटुंबीयांसाठी वेगळी सभा घेऊ लागलो. हा सारा प्रवास शहा सरांच्या पाठिंब्याने पण एकांडाच होता. गटउपचार आणि संवादाची तंत्रे मी शिकत होतो. वेगळ्या विषयांवर, वेगळ्या पद्धतीने संवाद साधत होतो. माझे पेशंटस् माझे मित्र बनत होते.

त्याच सुमारास विजय आजगावकर सरांनी माझी ओळख करून दिली बालमधुमेही मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर. मधुमेह हा खरे तर शारीरिक आजार. परंतु इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावी लागणाऱ्या या मुलांचे भावविश्व त्यामुळे ढवळून निघायचे. आहारावरची बंधने, लघवी आणि रक्ताच्या तपासण्या, रक्तातील साखरेचे प्रमाण एक तर खूप कमी किंवा खूप जास्त होण्याची भीती..किती मानसिक तणाव! मी या साऱ्या मुलांचा काका झालो. त्यांच्याही गटसभा घ्यायला लागलो. आम्ही पालकांना संघटित केले. निवासी शिबिरे घ्यायला लागलो. वय वर्षे सातच्या पुढची आमची मुले स्वत:ची इंजेक्शने स्वत: घ्यायला लागली. स्वत:चा आहार स्वत: नियंत्रित करायला लागली. भावनिक समतोलाबरोबर रक्तातल्या साखरेचे प्रमाणही स्थिर झाले.

17

सर्वसमावेशक दृष्टिकोनाची ही करामत मी अनुभवत होतो. माझा रुग्ण म्हणजे माझा सहचर. मी जर माझ्या विषयातला तज्ज्ञ तर तोही त्याच्या ‘आजाराचा अनुभव’ या विषयावरचा तज्ज्ञ..उपचार म्हणजे आमची युती..एकत्र प्रवास!
या साऱ्या प्रत्यक्ष अनुभवांसोबत मी शास्त्रीय वाचनही करत होतो. या जीव-मनो-सामाजिक आकृतिबंधावरचे, माझे पुस्तक ‘आरोग्याचा अर्थ’ प्रसिद्ध झाले तेव्हा मी एम.डी.च्या उंबरठय़ावर होतो. (आज वैद्यकसत्ता व आरोग्याचा अर्थ ही दोन्ही पुस्तके एकत्रितपणे ‘आरोग्याचा अर्थ’ या शीर्षकाखाली ग्रंथालीतर्फे उपलब्ध आहेत.)

त्याच सुमारास एका नव्याच व्यसनाचे रुग्ण आमच्या ओपीडीमध्ये यायला लागले. गर्दचे अर्थात् ब्राऊन शुगरचे व्यसन. ही जबाबदारी सरांनी ओघाने माझ्यावर टाकली. गटउपचार सुरू केले तर लक्षात आले की माझ्या रुग्णमित्रांना या व्यसनाबद्दलची योग्य माहितीही मिळालेली नाही. एक स्लाईड शो तयार केला. एक प्रोजेक्टर मिळवला. पुढच्या दोन वर्षांत मुंबईमध्ये मी जवळजवळ साडेचारशे ठिकाणी भाषणे केली. गर्दुल्ल्यांच्या अड्डय़ांपासून ते पोलीस लॉकअप्स्पर्यंत फिरलो. मुंबईत किमान पाच ठिकाणी चक्क निवासी डिअ‍ॅडिक्शन कॅम्पस् घेतले. या कामाच्या दरम्यान अनिल आणि सुनंदा (अवचट) माझ्या आयुष्यात आले..आणि बरोबर तीस वर्षांपूर्वी, ऑगस्ट महिन्यामध्ये ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा’ जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत मी या संस्थेशी विश्वस्त आणि सल्लागार म्हणून जोडलेला आहे.
गर्दच्या सवयीमुळे मी शाळा, सामाजिक संस्था, पोलीस अशा अनेक गट आणि व्यक्तींबरोबर काम करायला लागलो आणि एक मुद्दा लक्षात आला, ‘व्यसनाधीनता’ ही मनोविकार क्षेत्रातली एक समस्या असली तरी तिला अनेक पदर आहेत. यापैकी महत्त्वाच्या पदरांना हात घालायचा तर टीम बनवायला हवी. दुसरे असे की ‘मानसिक आरोग्य’ याचा नेमका अर्थ काय?

मनोविष्कार हा खरे तर मानसिक आरोग्याचा फक्त एक कप्पा आहे..एक पातळी आहे. या उपचारांमध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांचा, समाजाचा सहभाग किती?. फारच कमी. सहभाग कमी असण्याचे कारण काय? तर मनोविकार आणि मानसिक आरोग्य या विषयावरचे प्रचंड अज्ञान, गैरसमजुती, अंधश्रद्धा!.. इंग्रजीत ह्याला म्हणतात स्टिग्मा! कलंक!

माझे शास्त्र आणि समाज यातील दरी बुजवायची तर मला समाजापर्यंत पोहोचायला हवं. समाजात रुजायला हवं. तेव्हाच समाज माझ्या शास्त्राला आपलेसे म्हणेल. हेच ध्येय असलेली एक संस्था काढू या. ‘सुदृढ मन सर्वासाठी’ हे असेल या संस्थेचे उद्दिष्ट! निवासी डॉक्टर म्हणून काम करत असतानाच मी माझे स्वप्न लिहून काढले. मोठय़ा उत्साहाने माझ्या वडिलांना वाचून दाखवले. माझे वडील म्हणजे एक समर्पित शिक्षक..त्यांचे नाव प्रा. म. द. नाडकर्णी. अजूनही देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये मला त्यांचे विद्यार्थी भेटतात. माझ्या वडिलांनी मला सांगितले, ‘‘तुझा प्रोजेक्ट माझ्या टाइपरायटरवर छान टाइप करून देतो तुला.’’ पुढे १९९० मध्ये ‘आय्.पी.एच. अर्थात इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ या संस्थेची स्थापना झाली तेव्हा वडील नव्हते. त्यांचे फक्त आशीर्वाद होते.

समाजाच्या जवळ जायचे तर मनोविकारांबद्दल प्रबोधन करणे हे जसे अगत्याचे तसेच महत्त्वाचे आहे. ‘मानसिक विकास’ या विषयावर विविध उपक्रम आयोजित करणे, खरे तर मानसिक आरोग्याच्या सर्वात महत्त्वाचा स्तर आहे मनोविकास अर्थात व्यक्तिमत्त्व संवर्धन. त्यानंतरचा स्तर आहे मानसिक असंतुलन अर्थात् मेंटल डिसस्टेस. दैनंदिन आयुष्यातील ताणतणावांना तोंड देण्यासाठी व्यक्तीला वैचारिक आणि भावनिक दृष्टीने सक्षम बनवले तर या तणावाला योग्य पद्धतीने तोंड देता येईल. मानसिक आरोग्य म्हणजे डेव्हलपमेंट (विकास), डिसस्टेस (तणाव) आणि डिसऑर्डर (विकार) या तिन्ही स्तरांवर सातत्याने सेवा देणे, उप्रकम करणे. आपल्या हातात जे जे आहे ते करत राहाणे. या प्रयत्नांना संस्थारूप द्यायचे ते संघशक्तीचे सामथ्र्य जागृत करण्यासाठी.

या प्रवासामध्ये लक्षात येऊ लागले की मनोविकारांवर औषधोपचार करण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याव्यतिरिक्त इतर अनेककसब मला शिकायला हवीत. या प्रयत्नामध्ये माझी ओळख झाली

डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या आरईबीटी (रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी) या मानसोपचार पद्धतीबरोबर. किशोर फडके सरांकडून मी शिकलो आणि ज्येष्ठ सहकारी डॉ. शुभा थत्ते आणि संस्थेतल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत अजूनही शिकत आहे. शिकण्याचा भाग म्हणून शिकवतही आहे. या उपचार पद्धतीची सांगड वेदान्त तत्त्वज्ञान, महाराष्ट्राचा भागवत धर्म यांच्याशी घालण्याचा माझा अभ्यास गेली दोन दशके सुरू आहे. तसेच भारतीय इतिहासातील लोकोत्तर व्यक्तींच्या जीवनामधून मानसिक आरोग्याची तत्त्वे कशी सादर करता येतील यावरचा अभ्यास गेली दहा वर्षे सुरू आहे. त्यामुळे माझ्याकडून काही पुस्तके लिहिली गेली, सीडी-डीव्हीडी तयार झाल्या. मनोविकासाचे रस्ते लोकांपर्यंत पोहोचवता आले.

अमेरिकेतील ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि अमेरिकन सायकीअ‍ॅट्री असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप जेस्ते आय्.पी.एच. संस्थेच्या कार्याला, ‘‘मानसिक आरोग्य क्षेत्रातले फुले-आंबेडकरांसारखे मूलभूत योगदान’’ असे म्हणतात. हा सारा २६ वर्षांचा अनुभव मी ‘शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट’ या पुस्तकात लिहिला आहे. (समकालीन प्रकाशन). त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही.

परंतु एक व्यक्ती म्हणून मला या प्रवासाने खूप संपन्न बनवले एवढे मात्र खरे. माझ्या जगण्यामध्ये खूपच विविधता आणली. मी कधी ‘फोर्स वन्’च्या कमांडोज्च्या सोबत शिवाजी महाराजांच्या ‘आगऱ्याहून सुटका’ अर्थात् आपत्कालीन नियोजनांची तत्त्वे ह्या विषयावर कार्यशाळा घेत असतो. कधी मी आय.पी.एच. संस्थेत येणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ‘मेंटल फिटनेस’ शिकवत असतो. भारतातल्या अनेक कंपन्यांच्या संचालकांपासून ते तरुण कर्मचाऱ्यांबरोबर अनेकविध विषयांच्या कार्यशाळा देशभर घेत असतो. ‘वेध’ या आमच्या व्यवसाय प्रबोधन परिषदेच्या व्यासपीठावरून दरवर्षी आठ शहरांमध्ये पन्नासहून अधिक दिग्गजांच्या मुलाखती घेत असतो. या वेध परिषदेसाठी गाणी लिहून त्यांना चाली देता देता माझ्या नावावर गीत-संगीताचे तीन आल्बम लागले. आमच्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अनेक शाळांमधल्या शिक्षक-पालकांशी अनेक विषयांवर संवाद साधत असतो. ‘आयपीएच’मध्ये सलगपणे आठ आठ तास रुग्णांवर उपचार करत असतो. संस्थेमध्ये शिकायला येणाऱ्या व्यावसायिकांना शिकवत असतो. आमच्या संस्थेत वर्षभर चालणाऱ्या साठहून जास्त उपक्रमांची आखणी, शंभराहून जास्त सहकाऱ्यांबरोबर करत असतो. दर महिन्याला ‘मुक्तांगण’मध्ये व्यसनाधीन रुग्णांशी संवाद सुरू असतो. माझ्या तिथल्या सहकारी, कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रशिक्षणाचे काम सुरू असते. म्हणजे माझा एकही दिवस दुसऱ्या दिवसासारखा नसतो. काय मजा आहे. माझ्या व्यवसायाचे, मानसशास्त्राचे कितीतरी आविष्कार मला नव्याने भेटतात. माझ्या जगण्यातून मला मिळालेला प्रत्येक कण मी ओंजळीओंजळीने समोरच्यांना देत राहतो.

गेल्या आठवडय़ातली गोष्ट. मी ‘केईएम’च्या एका सभागृहामध्ये तिकडच्या डॉक्टरांची कार्यशाळा घेत होतो. अतिदक्षता विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स व नर्सेससाठी मी एक खास प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. अत्यवस्थ रुग्णाच्या कुटुंबीयांशी प्रभावी संवाद कसा साधावा या विषयावरचा!..प्रभावी संवाद असेल तर समजा रुग्ण दगावला तरी कुटुंबीय अवयवदानासाठी तयार होतील. रुग्ण सुधारला तर पुढचा फॉलोअप छान होईल.

ज्या सभागृहात १९७६ साली मी प्रथम वर्ष एम.बी.बी.एस.चे पहिले लेक्चर अनुभवले होते, त्याच सभागृहात मी त्या दिवशी शिक्षकाच्या भूमिकेत उभा राहून कार्यशाळा घेतली. जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे मन आहे. माणूस सुदृढ असला तरी, नसला तरी! जिथे मन आहे तिथे विकासाची संधी आहे, स्वीकाराची पहाट आहे, आपुलकीची लाट आहे.. जोवर माणुसकी आहे तोवर माझ्या शास्त्रशाखेला प्रयोजन आहे.
वैद्यकशास्त्रातला माझा प्रवास जिथे सुरू झाला त्या जागेचा, या दिवशी निरोप घेताना एक आवर्तन पूर्ण झाल्याचा अनुभव मी घेत होतो. ४० वर्षांपूर्वी माझ्या प्रवासाला आकाश गवसलेले नव्हते.. आणि आता मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातल्या शक्यतांचे क्षितिज माझ्या दृष्टीमध्ये मावतही नव्हते.. मनोविकार ते मनोविकास..आणखी एक नवे आवर्तन!

– डॉ. आनंद नाडकर्णी

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!

Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क