06 July 2020

News Flash

बादल घुमड बढ आये..

विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात, ‘प्लस चॅनेल’ नावाची प्रकाशवाहिनी जोरात होती

बीज रुजायला एक क्षण पुरेसा असतो, पण गर्भारपणाचा काळ सर्जनाचा. बाळ घडत असतं ती जाणीव, तो आनंद शब्दातीत असतो, पण काही वेळा प्रसववेदना जीव नकोसा करतात. चांगलं काही घडायचं तर आनंदाबरोबर वेणा सोसाव्या लागतातच. असंच घडतं अनेक कलाकृती घडत असताना. पडद्यावर जे येतं त्याच्या कदाचित दुप्पट तिप्पट पडद्यामागे घडतं. काही आव्हानात्मक घटना तर काही चटकदार, काही विनोदी तर काही नकोशा. नामवंत लिहिणार आहेत, अशाच काही घटनांविषयी. ज्या पडद्यामागे घडल्या, पण त्या घडल्यामुळे त्यातून काही नवनिर्माणही झालं. अशा‘दृष्टीआडची सृष्टी’बद्दल सांगणार आहेत, चित्रपट-नाटय़-दूरचित्रवाणी कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, लेखक, संपादक, प्रकाशक, चित्रकार, शिल्पकार, आर्किटेक्ट, डॉक्टर, शेफ, उद्योजक. दर शनिवारी. आजच्या अंकात सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांची ‘दृष्टीआडची सृष्टी.’
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात, ‘प्लस चॅनेल’ नावाची प्रकाशवाहिनी जोरात होती. त्यांनी एक अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला. आशयघन चित्रपट बनवणारे आठ-दहा दिग्दर्शक (थोडक्यात, गल्ला भरून सिनेमापासून दूर असलेले) गाठून, त्यांच्याकडून ओळीने एकेक दर्जेदार चित्रपट बनवून घेण्याचा त्यांनी घाट घातला. या यादीत माझं नाव होतं.
शबानाची ‘प्लस चॅनेल’बरोबर जवळीक होती. मला वाटतं तिचे शोहर जावेद अख्तर, त्यांच्या कार्यकारिणीत सल्लागार होते. त्यांचा प्रस्ताव घेऊन शबाना माझ्या घरी आली. आल्या आल्या तिने मुद्दय़ालाच हात घातला. ‘प्लस चॅनेल’साठी मी छानशी फिल्म बनवायची. अट अशी होती की, स्त्रीप्रधान विषय हवा आणि त्यात तिची प्रमुख भूमिका हवी. हाताशी विषय नव्हता. नायिकेवर प्रकाशझोत असेल, असा तर अजिबातच नव्हता.
22                                                              बन्सी आणि हिमान – शबाना आणि झाकीर हुसेन

‘‘असं कसं?’’ ती म्हणाली. ‘‘तुझ्या खजिना भांडारात जरा डोकावून पाहा. नक्की काहीतरी सापडेल.’’ आणि खरोखर एक दिलचस्प विषय हाती लागला. लहानपणी वाचलेली दासीपुत्र सत्यकामाची गोष्ट.
जबाला नावाच्या गणिकेचा पुत्र सत्यकाम, अतिशय बुद्धिवान आणि शिकण्याची जबरदस्त आवड असलेला, असा होता. विद्यार्जनासाठी गौतमऋ षींकडे आलेल्या ब्राह्मण कुमारांच्यात तो जाऊन बसतो आणि सर्व प्रश्नांची चोख उत्तरं देऊन गुरुजींना चकित करतो. ते त्याला पित्याचे नाव विचारतात, पण आईच्या अनेक यजमानांपैकी नेमका आपला पिता कोण हे त्याला सांगता येत नाही. इतर विद्यार्थी त्याची टर उडवतात. तो खजिल होतो. बापाचं नाव ठाऊक नसलं, तर एवढा काय अनर्थ कोसळतो, याचा मला लहानपणी अचंबा वाटे. असो. केरळचे सुप्रसिद्ध नाटककार के. नारायण पणिकर, यांनी पुराणातली जबाला आणि आधुनिक काळामधली एक कॉलगर्ल यांची समान कथासूत्र गुंफून एक नाटक लिहिल्याचं माझ्या कानी आलं होतं. शबानाला त्याची कल्पना खूपच रोमांचकारी वाटली. मग मी पणिकरांना पत्र लिहून नाटक मिळवायचं आणि त्याची पटकथा लिहायची, असं आमचं ठरलं. शबाना जायला निघाली तेव्हा एका नव्या दमदार प्रकल्पाच्या कल्पनेनं आम्ही दोघी बेहद्द खूश झालो होतो. मी तिला सोडायला लिफ्टपर्यंत गेले. गप्पांच्या ओघात नुकत्याच वाचलेल्या एका विस्मयकारक लेखाबद्दल तिनं मला सांगितलं. कुठल्याशा पत्रिकेत वर्षां भोसलेने एक लेख लिहिला होता. लहानसा, पण मर्मस्पर्शी. आपली आई आशा भोसले; आणि एकूणच एका अतिशय नामवंत संगीत परिवारामध्ये झालेलं आपलं संगोपन, याबद्दल तिनं मोकळेपणानं लिहिलं होतं. शबाना सांगण्यात आणि मी ऐकण्यात रंगून गेलो. लिफ्ट वर आली, थोडा वेळ मुकाट उभी राहिली आणि मग दुसऱ्या कुणाचा आदेश आल्यावर परत खाली गेली. गप्पा चालूच राहिल्या. तीन-चार वेळा लिफ्टचा ‘सीसॉ’ झाल्यावर मी म्हटलं ‘‘चल परत आत जाऊ.’’
संगीत हा आपल्या चित्रपटाचा प्राण आहे. पण पाश्र्वगीतांच्या खजिन्यानं समृद्ध झालेल्या या समांतर दुनियेची, पडद्यावर कुणी फारशी दखल घेतली नाही. जुने सिनेमे विसरले, तरी त्यांच्यातली शेलकी गाणी जिभेवर रेंगाळतात. मग पाश्र्वगायनाच्या सोहळ्याला कुणी कधी मूर्त रूप का नाही दिलं? मला वाटतं, आमच्या दोघींच्या डोक्यात, एकाच वेळी वीज लखलखली. पाश्र्वगायिकेवर सिनेमा करायचा! तिच्या आशा-आकांक्षा, तिचे गोड आणि कटू अनुभव, चित्रपटसृष्टीला तिने दिलेलं योगदान- थोडक्यात तिची जीवनकहाणी सादर करायची, असं आम्ही ठरवलं. जबाला पुराणातच राहिली. वर्षांच्या लेखावरून विषयाला कलाटणी मिळाली होती, तेव्हा चित्रपट आशाबाईंच्या जीवनावर बेतावा, असं आम्ही ठरवलं.

23वर्षांची आणि माझी तशी एकदा भेट झाली होती. पडद्यामागची एक गोष्ट! दिल्लीहून मी मुंबईला बस्तान हलवल्यावर, रंगभूमीच्या सेवेत खंड पडू नये, म्हणून काही उपक्रम हाती घेतले. त्यात महेश एलकुंचवार यांचं ‘वासनाकांड’ करायचं मी ठरवलं. दिल्लीला मी त्याचा हिंदीमधून केलेला प्रयोग चांगला गाजला होता. तेव्हा मोठय़ा जोशात मी मुंबईला नाटकाची हिंदी आवृत्तीच बसवायला घेतली. कलाकारदेखील कुणी हेवा करावा, असे होते. स्मिता पाटील आणि ओम पुरी. माझी आणि स्मिताची तार खूप छान जुळली. आम्हा दोघींना मांजरं अतिशय प्रिय. तिनं तालमीच्या दरम्यान एक कळकळीची विनंती केली. ‘‘माझी एक फार जवळची मैत्रीण आहे. ती सध्या निराश मन:स्थितीत आहे. तिला आपल्या नाटकात घे ना. तिचं मन रमलं, की ती नक्की डिप्रेशनमधून बाहेर येईल..हो, ती गाते पण फार सुंदर.’’
मला स्मिताच्या मैत्रिणीविषयी आस्था वाटली, पण अवघ्या दोन पात्रांच्या नाटकांत मी तिला काय भूमिका देणार? स्मितानं आपला हेका सोडला नाही आणि मग एक शक्कल सुचली. नाटकात स्मशानात घडणारा एक विदारक प्रसंग आहे. नायिका आपलं नवजात मृत मूल घेऊन तिथे येते. या स्मशानभूमीच्या एका तुटक्या भिंतीवर बसून केस मोकळे सोडलेली कुणी दु:खी स्त्री आर्त गाणं म्हणते आहे असं मी दाखवलं.
तिचे दर्दभरे सूर पार आभाळाला भिडले. वर्षां भोसलेच्या गाण्यानं या प्रवेशाला आणि एकूणच नाटकाला, चार चंद लाभले. तालमींच्या दरम्यान वर्षांशी तशी जवळीक साधली नाही. ती तशी अबोल आणि आपल्यातच हरवलेली वाटे. पण मला तिच्याविषयी अमाप कौतुक आणि आस्था वाटत राहिली. एनसीपीएच्या त्या प्रयोगानंतर पुन्हा कधी ती भेटली नाही. पण एक वेगळाच योगायोग घडून आला.
मी बऱ्याच अवधीनंतर ‘स्पर्श’चं संकलन करीत होते. ताडदेवला फिल्म सेंटरच्या इमारतीत, गच्चीवर एडिटिंग रूम्स होत्या. एकदा काम आटपून मी लिफ्टने खाली येत होते. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली. तिथे म्युझिक रेकॉर्डिग स्टुडिओ होता. दार उघडलं आणि हातात ग्लॅडिओला फुलांचा गुच्छ घेऊन एक स्त्री आत आली. हातातल्या फुलांच्या इतकीच ती प्रसन्न आणि सुंदर होती. आशा भोसले. या आधी आम्ही कधी भेटलो नव्हतो. माझ्याकडे पाहून त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘मी वर्षांची आई!’’ किती सुंदर ओळख!
पटकथा लिहायला मी घेतली खरी, पण एखाद्या अडेलतट्टप्रमाणे लेखणी पुन्हा पुन्हा अडू लागली. आशाबाईंवर सिनेमा म्हणजे आम्ही काही माहितीपट करणार नव्हतो. नाटय़पूर्ण अशी कल्पित कथा आम्हाला अभिप्रेत होती. पण ती कुणा खऱ्या व्यक्तीवर आहे म्हटल्यावर अनेक अडथळे उपस्थित होऊ लागले. मर्यादा पडू लागल्या. कुणाच्या तरी खासगी जीवनात डोकावून हवी तशी मुभा घ्यायचा आपल्याला काय हक्क आहे, हा सवाल सतावू लागला. माझे विचार शबानाला पटले आणि आशाबाईंवर सिनेमा करायचा बेत आम्ही रद्द केला. संपूर्ण कल्पित व्यक्तींवर कथा बेतायची. मात्र स्वर्गीय गाणं गाणाऱ्या दोन बहिणींचा आशय कायम ठेवायचा असं आम्ही ठरवलं.
लता-आशाच्या खास परिस्थितीचं मला नेहमीच अप्रूप वाटे. एकमेकींवर असीम माया करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी, पाश्र्वसंगीतासारख्या स्पर्धक क्षेत्रात, प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकींसमोर उभ्या राहिल्या, की मामला कसा हाताळत असतील? रक्ताचं नातं आणि व्यवसायातली तेढ यांची सांगड कशी घालत असतील? माझ्या मनामधला संभ्रम पडद्यावर आणायचं मी ठरवलं. काही थोडी साम्यस्थळं राखली. सिनेमातदेखील मुलींचे पिता हे नाटय़सृष्टीमधले एक नामवंत संगीतनट दाखवले आणि याखेरीज सर्वश्रुत असलेले एक-दोन किस्से मी वापरले. त्यातला महत्त्वाचा म्हणजे विश्राम बेडेकरांनी आपल्या ‘एक झाड, दोन पक्षी’ या आत्मवृत्तात, काळजाला हात घालणारा एक प्रसंग रेखाटला आहे, तो मला अतिशय नाटय़पूर्ण वाटला म्हणून मी घेतला. आपली मद्यपानाची तलफ शांत करण्यासाठी मास्टर दीनानाथ एका वादळी रात्री थोडे पैसे मागायला बेडेकरांचं दार ठोठावतात.
‘एवढय़ा महान कलाकाराला हे शोभत नाही’ म्हणून बेडेकर त्यांची निर्भर्त्सना करतात; तेव्हा दीनानाथ पावसात भिजत त्यांना अलौकिक गाणं ऐकवतात; आणि मग आपली हक्काची बिदागी घेऊन निघून जातात. याखेरीज राष्ट्रगीताचा किस्सा जो सिनेमात घेतला आहे, तोही जनसामान्यांना ठाऊक आहे. हे एवढं सोडलं, तर चित्रपटामधली प्रत्येक घटना, दृश्य, पात्रप्रपंच, संवाद, प्रेमसंबंध आणि इतर सर्व काही, सर्वस्वी माझ्या कल्पनेचा आविष्कार आहे. वास्तवाशी- लता, आशाच्या जीवनाशी त्याचा सुतराम संबंध नाही. पटकथा लिहू लागल्यावर ती सुरांच्या लडीसारखी उलगडत गेली. तिनं स्वत:ची अशी स्वतंत्र वळणं घेतली. वेगळेपणाचा पुरावाच द्यायचा म्हटलं तर काही घटनांचा निर्देश करते. चित्रपटात मुलींची आई त्यांच्या लहानपणीच कालवश होते. माईंनी सुदैवाने वृद्धापकाळी आपल्या मुलींचे यश पाहिले. मानसी-बन्सीचे एकाच संगीतकाराबरोबर भावसंबंध जुळतात. मानसी एका दुर्धर आजाराने अकाली जगाचा निरोप घेते. लतादीदी शतायु होवोत! एका अकल्पित आघातामुळे बन्सीचं गाणं थांबतं आणि सुरांचा शोध घेण्यासाठी ती एका मानसोपचारतज्ज्ञाचा उपचार सुरू करते- असे असंख्य तपशील लक्षात घेता, ही फिल्म म्हणजे लता-आशाचा जीवनपट आहे, असं म्हणणं अन्यायकारक आहे. पण ‘माझा सिनेमा कोणत्याही व्यक्तीवर आधारलेला नाही,’ असा मी कितीही कंठशोष केला, तरी शिव्या बसायच्या त्या बसल्याच. दोन बहिणी- आणि दोन्ही पाश्र्वगायिका, एवढं लोकांना पुरे होतं. त्या दोघींचे चाहते, विशेषत: लताबाईंचे, माझ्यावर नाराज झाले.
बारा दिवसांत माझी पटकथा लिहून झाली. ‘दिशा’ला लागलेली सतरा र्वष लक्षात घेता, हा विक्रमच म्हटला पाहिजे. संगीत हा आत्मा असलेल्या सिनेमाचं ‘साज़्‍ा’ असं समर्पक नाव ठरलं. माझ्या आजवरच्या सिनेमांमध्ये गाण्यांना तसं खूप महत्त्व नव्हतं. पण ‘साज’चा बाजच संगीतप्रधान असल्यामुळे, त्याच्यात एकाहून एक सरस अशा गाण्यांची लयलूट असणं आवश्यक होतं. ही गाणी लिहिण्याची कामगिरी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पत्करली. जावेद तसे घरचेच होते (म्हणजे शबानाच्या घरचे). शिवाय ‘प्लस चॅनेल’शी ते निगडित होते. तेव्हा ‘साज़्‍ा’ची गाणी लिहायला ते आनंदाने तयार झाले; आणि एकापेक्षा एक रसाळ गाणी त्यांनी झरझर लिहून काढली. ती सगळीच प्रसंगानुरूप होती. दोघी मुलींचं बालपण सप्त सुरांच्या सोबतीनं फुलतं. घरात सगळं काही संगीतमय. आईने केलेली गरम गरम भाकरीसुद्धा ताटात पडते, ती समेवर. वृंदावन आपल्या लेकींना संगीताचा महिमा सांगतो. ‘सूर फक्त बाजाच्या पेटीत बंद नसतात. अवघ्या वातावरणात ते व्यापून राहिले आहेत. पृथ्वीवरचं गाणं ऐकायला शिका.’ पंचम आळवणारा पपीहा; खर्ज लावणारा कावळा; ‘खुदबुद खुदबुद’ बोलणारं चुलीवरचं भातांचं पातेलं, तडतड तडका; टरार टराट करणारे बेडूक, घळघळघळ वाहणारे झरे आणि पावसाच्या थेंबाची टपटप; अशी कितीतरी बालसुलभ प्रमेयं, उपमा आणि शब्द यांनी नटलेलं गाणं या शिकवणीसाठी लिहिलं गेलं. ‘फिर भोर भई, जागा मधुबन’, जोशीलं राष्ट्रगीत ‘लहरा तिरंगा’, बन्सीचं भावपूर्ण ‘रात ढलने लगी, बुझ गये है दिये’ आणि बाळाच्या पापणीवर अलगदपणे विसावणारं अंगाई गीत ‘निंदिया है, सपना है, चंदन का पलना है; झुला झुलाये मैया, सोये गुडिया’ अशी ‘साज़्‍ा’ला साजेशी गाणी जावेदने लिहिली. एक महत्त्वाचं गाणं बाकी होतं. वृंदावन पावसात भिजत गातो, ते रोमहर्षक गाणं. ते गाणं जावेदच्या नेहमीच्या सरावापेक्षा खूप वेगळं असणार होतं. उर्दू शायरीच्या बाजापासून दूर संस्कृतप्रचुर शब्दांचं लेणं ल्यायलेलं, ते एक वेगळंच आव्हान होतं. त्यामुळे हे गाणं लिहायला जावेद खूप उत्सुक होते.
‘साज़्‍ा’ची प्राथमिक जुळवाजुळव चालू होती, तेव्हा सुप्रसिद्ध तबलापटू झाकीर हुसेन एका मैफिलीसाठी भारतात आले होते. तबल्याखेरीज, एक सिद्धहस्त संगीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या चित्रपटांचं संगीत त्यांनी करावं, अशी ‘प्लस चॅनल’मध्ये एक कल्पना निघाली. त्यामुळे चित्रपटाला निश्चित एक वेगळी आभा प्राप्त होणार होती. मात्र एक अडचण होती. सिनेमाचा विषय लक्षात घेता, त्याला फक्त एकच संगीत दिग्दर्शक नसावा, असा माझा कटाक्ष होता. गाण्यांना विविधता हवी म्हणून वेगवेगळ्या जातीच्या गाण्यांना वेगळे संगीतकार घ्यावे असं मी ठरवलं होतं. झाकीरना मी मोकळेपणाने माझा विचार सांगितला. ते फारसे उल्हसित नाही झाले, पण विचारांती त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी होकार दिला. मग प्रमुख संगीत निर्देशक झाकीर हुसेन आणि इतर तीन मान्यवर हे ‘पाहुणे संगीत निर्देशक’ अशी श्रेयनामावली ठरली. इतर तिघांनी दिलदारपणे मान डोलावली आणि हा काहीसा नाजूक मामला गोडीगुलाबीनं पार पडला. माझ्या आधीच्या नाना पगड कामगिरीत, संगीताचा बाज सांभाळून चांदीचं सोनं करणारे संगीतकार मला लाभले होते. यशवंत देव (नाटक ‘सख्खे शेजारी’ आणि ‘धिक् ताम्’) राजकमल (चित्रपट ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’) आणि भूपेन हजारिका (चित्रपट ‘पपीहा’), हे तिघेही ‘साज’साठी सुसज्ज झाले.
यशवंत देवांची शास्त्रीय संगीताची तपस्या लक्षात घेता, वृंदावनचं पर्जन्यगीत त्यांनीच स्वरबद्ध करावं हे क्रमप्राप्त होतं. या गाण्याच्या दोन आवृत्ती हव्या होत्या. वृंदावन गातो, तेव्हा आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी आक्रमिले आहे. आपल्या दु:खाला तो या गाण्यामधून वाचा फोडतो. सिनेमाच्या अखेरीस, बन्सी हेच गाणं एका संगीत सोहळ्यात गाते तेव्हा त्याचं रूपडं पार बदललं आहे. आकाश निरभ्र आहे, सूर्याच्या सोनेरी किरणांचा मुलामा धरतीवर पसरला आहे, सर्वत्र आनंद आहे.
हे गाणं अजून लिहून झालं नव्हतं. देवांना पुढे दोन महिने मुंबईबाहेर जायचं होतं, तेव्हा ते गाणं लवकर ‘डबाबंद’ होणं आगत्याचं होतं. जावेदना मी ही अडचण सांगितली आणि पाच -सहा दिवसांत रेकॉर्डिगची तारीख ठरवायला हवी, असं सांगितलं. ते ‘ठीक’ म्हणाले, काहीशा रूक्षपणे. आमच्या युनिटमधे कुणी ‘स्टार’ असेल, तर ते जावेद होते. आपली ख्याती आणि आपलं स्थान याबद्दल ते पूर्णपणे जागरूक होते. कायम आपला आब राखून ते वागत असत.
यशवंत देव साहजिकच गाणं मागू लागले. पण दोन-चार वेळा विचारूनही ‘गाणं अजून तयार नाही’ हे उत्तर मिळू लागलं. पुन्हा पुन्हा आठवण केल्यामुळे जावेद वैतागू लागले; आणि मलाच अपराध्यागत वाटू लागलं. दोनच दिवस उरले. देवांनी गाण्याच्या दोन्ही आवृत्तींसाठी
सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या तारखा घेतल्या होत्या. स्टुडिओ ठरला. वादक ठरले. पण गाणं अद्याप बेपत्ताच होतं. आणि एवढंच नाही, तर रेकॉर्डिगच्या आदल्या दिवशी खुद्द गीतकारच लापता झाले. कुणा प्रोडय़ुसरबरोबर ते खंडाळ्याला गेले असल्याचं कळलं. यशवंत देव हवालदील झाले. रेकॉर्डिग रद्द करणार? प्रश्नच नव्हता. पण गाणंच नाही, तर काय रेकॉर्ड करणार? ‘‘कधीपर्यंत गाणं मिळालं तर चालेलं?’’ मी विचारलं आणि देव म्हणाले, ‘‘दुपारी रेकॉर्डिग आहे. अगदी सकाळी माझ्या हातात पडलं, तर मी काहीतरी करू शकेन.’’
‘दिशा’ची गाणी मी लिहिली होती. गंमत म्हणून. मी गीतकार नाही, पण वेळ आली तर मी प्रसंग निभावून नेऊ शकेन, असा मला आत्मविश्वास होता. आणि आता वेळ आली होती! त्या रात्री मी झोपले नाही. सकाळी रामप्रहरी त्यांच्या हातात गाणं नेऊन दिलं. त्याचा मासला-

बादल घुमड बढ आये
काली घटा घनघोर गगन मे
अंधियारा चहु ओर
घन बरसत उत्पात प्रलय का
प्यासा क्यो मनमोर?

चित्रपटातलं हे पावसाचं गाणं रघुवीर यादवनं उत्कटपणे म्हटलं. भिजत भिजत. चांदिवली स्टुडिओमध्ये सेट लावला होता. डासांनी आम्हाला फोडून काढलं. पावसाचं मशीन लावलं होतं. ‘येरे, येरे पावसा’ म्हणायचा अवकाश, की धो धो पाणी पडायचा.
त्या वर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जावेदना ‘साज़्‍ा’च्या गाण्यासाठी मिळाला. त्यांची इतर गाणी अव्वल होती, यात शंका नाही, पण ‘बाई, माझ्या गौरवात तुमचापण खारीचा वाटा आहे’ असं बोलून दाखवण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं नाही. मीही तेव्हा मूर्खासारखी गप्प राहिले. संकोच म्हणा किंवा दडपण म्हणा, पण स्वत:वर मी तेव्हा खचित अन्याय केला.
आणि श्रेय नामावलीत या गाण्यासाठी स्वत:चे नाव नोंदवले नाही. मग इतरांना कशाला बोल लावायचा? तर तेव्हाच्या त्या हलगर्जीपणाची आता इथे भरपाई करते आहे. आता चुकून जर कधी जावेद आणि मी एका जागी उपस्थित असलो, तर आम्ही एकमेकांच्या आरपार पाहतो. असो तर प्रत्येक सिनेमात पडद्याआड अशी एखादी तरी चित्तरकथा असतेच.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2016 1:19 am

Web Title: famous women and their life journey
टॅग Chaturang
Just Now!
X