मीनल मोहाडीकर
उद्योजिका

कुठल्याही डेरेदार वृक्षाचे मूळ हे एका छोटय़ा बीजामध्ये असते. माझ्या व्यवसायाची सुरुवातही अशीच अगदी लहान गोष्टीतूनच झाली. माझी आई घरबसल्या उद्योग म्हणून ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांच्या उत्पादनांची विक्री करत असे. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या व्यवसायाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी ‘वनिता समाज’ने भरवलेल्या ‘आनंद बाजार’मध्ये मी चक्क स्टॉल लावला आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की मागे वळून पाहावेच लागले नाही. हा प्रयोग छोटेखानीच होता, पण पुढे मी सुरू केलेल्या आणि प्रचंड यश मिळालेल्या ‘ग्राहक पेठ’, ‘कन्झुमर शॉपी’सारख्या प्रदर्शनासाठीचे ते बीजच होते, असे म्हणायला हरकत नाही. १९८८ मधल्या या प्रयोगातून पुढे अनेक प्रदर्शने उभी राहिली. अनेक जणी उद्योजिका म्हणून घडल्या आणि अनेक जणींना स्वत:ला सिद्ध करता आले. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रयत्नाचे, कष्टाचे, संचित मला वाटते हेच असावे.

Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
raman bhalla
काश्मीर खोऱ्यातील लढतींची उत्सुकता

१९८८ च्या त्या छोटय़ा प्रयत्नाच्या बळावर दोनच वर्षांनी, ९ मे १९९० ला दादर येथील सावरकर स्मारक येथे पहिल्या प्रदर्शनाचे आयोजन केले आणि त्यातून जन्म झाला ‘आनंद ट्रेड डेव्हलपमेंट’चा. त्यातून घरगुती वस्तूंपासून मोठमोठय़ा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचे मुक्तद्वार अवघ्या महाराष्ट्रासाठी उघडले गेले. आज महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, अगदी परदेशात. आखाती देशांतही उद्योजकांच्या प्रदर्शनांचे आयोजन सातत्याने केले जात आहे. त्यातही स्त्री उद्योजिका घडवण्याकडे माझा विशेष कल होता. स्त्री आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होणे खूप महत्त्वाचे असते. एकदा का ती ताकद तिला मिळाली की, ती आकाशाला कवेत घेऊ शकते, कारण स्त्रियांमधली कष्ट घेण्याची, पराभवातून उठून उभे राहण्याची ताकद मला नेहमीच अचंबित करत आली आहे. अर्थात सुरुवातीच्या काळात नोकरीशिवाय दुसरा आर्थिक मार्ग तिला दिसत नव्हता. फारच कमी स्त्रिया उद्योगात होत्या, काही तर अगदी घरगुती पातळीवर. जास्तीत जास्त स्त्रियांनी उद्योगात पडावे यासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे होते. आजही स्त्रीला सुरुवातीला थोडा आधार हवा असतो. एकदा का तो मिळाला, की तिला आकाश ठेंगणे असते, हे जाणूनच ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या माध्यमातून एक चळवळ उभी राहिली.
मला तो दिवस आजही आठवतो आहे, ‘लोकसत्ता’चे माधवराव गडकरी, ‘कॅम्लिन’च्या रजनीताई दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार पुष्पाताई त्रिलोकेकर यांच्या उपस्थितीत ‘आम्ही उद्योगिनी’चे बीज रोवले गेले. ते वर्ष होते १९९८. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या अनेक शाखा आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी येथे सुरू झालेल्या या शाखा ‘ज्योत से ज्योत जलाओ’चा संदेश अनेक स्त्रियांपर्यंत पोहोचवून अनेक उद्योजिका घडत आहेत. सामान्यातील सामान्य उद्योजकाला प्रोत्साहित करत नवे उपक्रम विनामूल्य राबवले जात आहेत. या उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचा आणखी एक उपक्रम आम्ही सुरू केला तो म्हणजे पुरस्कारांचा. दरवर्षी जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून राज्यव्यापी उद्योजक स्त्री परिषद आयोजित केली जाते आणि त्यात महाराष्ट्रातल्या ६ प्रांतांतील उद्योजिकांना पुरस्कार दिला जातो. गेली १९ वर्षे हा उपक्रम सुरू असून त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घडलेल्या आणि घडू पाहाणाऱ्या उद्योजिका आवर्जून येतात. इतकेच नाही तर ‘आम्ही उद्योगिनी’ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही राज्याबाहेरही पाऊल टाकले ते आपल्या देशभगिनींना उद्योगाचे व्यासपीठ मिळावे यासाठी. नवी दिल्लीतल्या आय.आय.टी.एफ. येथे एम.एस.एस.आय.डी.सी.च्या माध्यमातून तेथील स्त्री उद्योगिनींना मोफत स्टॉल देण्यात आले, तर दुबईसारख्या आखाती देशात आरती कोरगांवकरसारखी मैत्रीण पाठीशी उभी राहिली आणि १९ फेब्रुवारी आम्ही ४० उद्योजकांचे शिष्टमंडळ घेऊन ‘बी टू बी’ आयोजित केले. ‘फुजिराह चेंबर ऑफ कॉमर्स’ला भेट दिली. त्यातून चांगले घडले ते हे की, त्यातील काही उद्योगिनींनी आपल्या उत्पादनांची निर्यातही सुरू केली आहे. असे छोटेमोठे पण महत्त्वाचे आधारच अनेक जणांना घडवत असतात, ही दृष्टिआडची सृष्टी असते. कोणतीही उद्योजिका ही एका रात्रीत घडत नाही. तिची मेहनत, नियोजन तर असतेच, पण त्यात यशापयशही असतेच. त्यासाठी असा आधार खूप गरजेचा ठरतो.

दरवर्षी भरणाऱ्या अशा प्रदर्शनाचा हात अनेकींना उद्योजिका बनायला प्रोत्साहित करतो आहे. अर्थात त्यात आम्हा पडद्यामागच्या कलाकारांचीही अनेकदा कसोटी लागलेली आहे. १४ एप्रिलचा तो दिवस. कोल्हापूरच्या आर्यविन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये प्रदर्शन लागले होते. पहिलाच दिवस. अनेक जणी उत्साहाने आपापला स्टॉल सुरू केलेला. संध्याकाळी तर ग्राहकांची गर्दी वाढू लागलेली. संततधार पडणाऱ्या पावसाने आता रौद्ररूप धारण केले आणि हळूहळू त्याचे वादळात रूपांतर झाले. पत्र्याचा मांडव होता, परंतु बाजूला चर खणले असल्याने भराभर पाणी आत आलं. अनेक जण आपापले सामान वाचवण्याच्या नादात. आम्हीही सर्वाचे सामान वर उचलून टेबलावर ठेवत होतो. त्याच वेळी उंच भागातून येणाऱ्या पावसाचा ओघ आपल्या मांडवात येऊ नये म्हणून मोठा बांध घालण्याचाही प्रयत्न करत होतो. ग्राहकांनी तर धावत पळत घरची वाट धरली. अशातच गावातली वीज गेली. आमच्याकडे जनरेटरमुळे लाइट होते, पण कधी कधी शॉर्टसर्किट होऊ शकतं म्हणून विजेचे दिवे कमी केले. स्टॉलधारकांचे थोडेफार नुकसान झाले. जे मांडवाच्या बाजूचे स्टॉल होते त्यांना काही समजायच्या आतच पाणी आत आल्यानं त्यांचे नुकसान जास्त होते. नंतर पाऊस थांबला, पण दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून वादळाचा खरा तडाखा समजला. इतर काही ठिकाणी तर मांडवांची छपरेही उडाली होती. मी सश्रद्ध आहे, मला ती आमच्या स्वामींची आणि कोल्हापूरच्या अंबाबाईची कृपाच वाटली. स्टॉलधारकांचे नुकसान होऊ नये म्हणून मग प्रदर्शन एक दिवस वाढवले, त्यामुळे तेही खूश झाले. प्रदर्शन फक्त ५ दिवसांचे असते, मात्र त्याचे नियोजन जवळजवळ एक वर्ष आधीपासून सुरू होते. हॉल, जागेचे बुकिंग वर्षभर आधी करावे लागते. आता तर पसे पूर्ण आधी भरल्याशिवाय बुकिंग होतच नाही. आम्ही ते करतो, कारण एकमेव.. लोकांच्या शब्दांवर विश्वास! अनेकदा असेही होते की, स्टॉलधारक स्टॉल बुक करतो आणि काही तरी घडते नि तो सरळ स्टॉल रद्दच करतो. गेल्या वर्षी एकाने स्टॉल बुक केला जूनमध्ये. स्टॉलमध्ये वस्तूही आल्या, परंतु मुंबईहून येणाऱ्या त्यांच्या साथीदाराला अपघात झाला आणि स्टॉल कॅन्सल केला. एकदा तर प्रदर्शन सुरू असताना दिल्लीच्या बिट्ट भयाचे वडील वारल्याचा निरोप आला. मग काय, त्यांना ताबडतोब विमानात बसवून देऊन त्यांचे सामान व्यवस्थित पोहोचवून देण्याची जबाबदारीही पार पाडावी लागली. गोव्याच्या प्रदर्शनात तर एका ग्राहकालाच हार्ट अ‍ॅटॅक आला. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेल्याने त्याचे प्राण वाचले.
एकदा तर कसोटीच लागली. प्रदर्शनाच्या तारखा ठरलेल्या, जाहिरातीही सुरू झालेल्या, संबंधितांना पत्रेही गेलेली होती आणि अचानक सांगण्यात आले की, प्रदर्शनाच्या मदानाची जागा राजकीय सभेच्या पार्किंगसाठी देण्यात आली आहे. अशा वेळी काहीच हातात उरत नाही. वाहतुकीचा प्रश्न येऊ नये यासाठी प्रदर्शनाची जागा ताबडतोब रद्द करावी लागली. खूप धावपळ झाली पण.. एकदा एका शाळेत अचानक स्पर्धा परीक्षा घ्यायचे ठरल्याने सकाळी प्रदर्शन बंद ठेवून फक्त सायंकाळी प्रदर्शन चालू ठेवणे हाच पर्याय उरला. अर्थात नातेसंबंध चांगले ठेवल्याने ठाण्याच्या शाळेच्या विश्वस्तांनी केलेली एवढी मदतसुद्धा महत्त्वाची ठरली.
काही वेळा तुमची परीक्षा असते ती योग्य निर्णय घेण्याची. काही वेळा तर कटू निर्णयही घ्यावे लागतात. दसऱ्यापूर्वीचा तो रविवार. प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. दुपारी अचानक पाऊस सुरू झाला आणि एक दुर्घटना घडली. खिशात मोबाइल असताना चिंब ओल्या झालेल्या एका मुलाच्या अंगावर अचानक वीज कोसळली. माझी लेक मधुरा आणि भाची गार्गीने ताबडतोब त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले, पण काही उपयोग झाला नाही. अचानक घडलेल्या त्या प्रसंगामुळे सायंकाळी प्रदर्शन बंद करावे लागले. स्टॉलधारक नाराज झाले, पण इलाज नव्हता.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही असे प्रसंग आलेच. ‘दु:खातही हसत राहा’ असे भाषणात सांगणारी मी, मलाही घरच्यांच्या मृत्यूच्या वेळी कामाच्या वेळा पाळायल्या लागल्या. रत्नागिरीत ‘कन्झ्युमर्स शॉपी’ अर्थात प्रदर्शन सुरू होते. माझे वडील (पद्माकर ढमढेरे) खूपच आजारी आहेत, हे समजताच मला मुंबईला परतणे गरजेचं होतं. त्यावेळी मधुरा ८ वर्षांची होती. तिला व तिच्या बाबांना, मोहनना प्रदर्शनासाठी तेथे राहाणे भाग होते. १४ मेला अखेर बाबा गेले, तो प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. ‘अपना बाझार’चे सुरेश तावडे रत्नागिरीत होते, त्यांनी मोहनला बाजूला घेऊन म्हटलं, ‘‘तुला बातमी समजली का?’’ तेव्हा मोहन एवढंच म्हणाले, ‘‘प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तेव्हा शो मस्ट गो ऑन.’’
मधुरा लहान होती तेव्हा मी तिथे ती, या न्यायाने तिला बरोबर न्यावे लागायचे. एका उन्हाळ्यात एका प्रदर्शनासाठी पोहोचले. गावात पोहोचल्यावर लक्षात आलं की, तिला कावीळ झाली आहे. तशीच परत मागे फिरले आणि मुंबईत सासूबाईंच्या ताब्यात दिलं, कारण लहानपणीच तिला दुसऱ्यांदा कावीळ झाली होती. तिची योग्य काळजी घेणे आवश्यक होतं. हॉटेलात राहून सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत पत्र्याच्या मांडवाखाली बसणाऱ्या मला ते शक्यच नव्हतं, पण तेव्हापासून तिची पूर्ण जबाबदारी सासूबाईंनी घेतली आणि म्हणूनच मी माझा व्यवसाय करू शकले. आजारी मुलीला दूर ठेवून कामावर परतताना खूप वाईट वाटायचे, आईचे हृदय बाजूला ठेवून निघावे लागायचे, पण पर्याय नव्हता. हातात घेतलेले काम करणं भाग असायचं. असाच प्रसंग सासऱ्यांच्या बाबतीतही घडला. ६ मे २०१० ला रामभाऊ मोहाडीकर, माझे सासरे यांची जीवनज्योत मावळली. नाशिकच्या गल्फ क्लबवर आम्ही प्रथमच प्रदर्शन भरवत होतो. जागा नवीन. नेमका डेकोरेटरही नवीन होता. मांडवाचं काम त्याने उशिरा सुरू केले. त्याच्याबरोबर कुणी तरी राहणे भागच होते. मी सासऱ्यांच्या बरोबर मुंबईत आणि मोहन, मधुरा नाशिकला ग्राऊंडवर ६ मेच्या पहाटे पाचपर्यंत काम करत होते. पहाटे ३ वाजता त्यांचा फोन आला- काम झाले आहे, झोपायला जातो आहे. तेव्हा अण्णांना शेवटची घरघर लागली होती. आमच्या समोर प्रश्न उभा राहिला, पण त्यांना त्या वेळी न सांगणेच योग्य होते. सकाळी ६ वाजता त्यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. ६ मेला सकाळी ११ वाजता नाशिकमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन माझ्या उद्योजक मत्रिणींच्या हस्ते होणार होते, त्या मत्रिणीला फोन करून ‘तू उद्घाटन करून घे,’ असं सांगितलं. माझी भाची गार्गी त्या वेळी तिथे होती. मोहनराव व मधुरा सकाळी मुंबईला पोहोचले आणि सायंकाळी अंत्यविधी झाला. मधुरा लगेचच दुसऱ्या दिवशी नाशिकात हजर झाली. मोहन मात्र जाऊच शकले नाहीत. मधुराने व गार्गीने स्टाफच्या मदतीने प्रदर्शन व्यवस्थित पार पाडले. ऊन-पाऊस, जन्म-मृत्यू यांचे फेरे चुकत नाहीत. हातपाय गाळून न बसता काम करणं महत्त्वाचं ठरतं.
एका बाजूला उद्योजिका घडत होत्या तर दुसरीकडे माझाही व्यक्तिगत प्रगतीचा प्रवास सुरू होताच. आधी ‘महाराष्ट्र चेंबर’ची उपाध्यक्ष, त्यानंतर वरिष्ठ उपाध्यक्ष आणि त्यानंतर तर ‘चेंबर’ची पहिली आणि एकमेव स्त्री अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. त्यापाठीमागे दगदग होती. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मतपत्रिकांसाठी भेटणे आवश्यक होते. त्यासाठी मला माझ्या विस्तृत परिवाराची खूप मदत झाली. संस्थेचे काम तर तुम्ही करायला हवे असतेच, पण तुमचा सशक्त मित्रपरिवार असणे गरजेचे असते. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे मला घरातील सर्वाचा पाठिंबा मिळाला. आजोबा व वडील चेंबरचे अध्यक्ष होते. सासरेही चेंबरचे सचिव होते. महाराष्ट्रात भेटून मत मिळवण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराचा नक्कीच फायदा झाला. वरिष्ठ उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फक्त १०० मतांनी पराभव पत्करावा लागला. पुन्हा निवडून येऊन अध्यक्ष झाले त्या वेळी ‘चेंबर’ची आर्थिक स्थिती वाईट होती. ‘चेंबर’च्या जुन्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळे प्रकल्प राबवले. १० महिन्यांत १३१ बैठका व परिषदा यांच्या माध्यमातून ७५ लाख रुपये नफा करून ‘चेंबर’च्या नवीन घटनेप्रमाणे फक्त १ वर्ष अध्यक्षपद भूषविले. त्या दरम्यान १२ विशेषांक काढून भरपूर जाहिराती मिळविल्या. ‘ग्लोबल महाराष्ट्र’ ही कॉन्फरन्स ८ देशांतील उद्योजकांना बरोबर घेऊन बी.एम.एम. (अमेरिका) यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जानेवारी २००९ ला ताजमध्ये पार पडली. त्यातच २६/११ ला मुंबई हादरली. ऑस्ट्रेलियातील जोशी यांचा फोन आला. ‘‘मॅडम, आम्हाला एस.एम.एस. आले आहेत भारतात जाऊ नका. काय करावं?’’ मी समजावले, ‘‘तुम्ही तुमच्या मायदेशी येत आहात. तुम्हाला कशाची भीती?’’ दिवसभराची ती परिषद सर्व देशांतील पाहुण्यांसकट व्यवस्थित पार पडली. सहभाग घेतलेल्या लोकांची यादी घेऊन जाताना प्रत्येकाला प्रथमच सी.डी.मधूनच कॉन्फरन्सचा डेटाबेस देण्याची प्रथा सुरू केली. संपूर्ण वर्षभर ‘चेंबर’साठी वेळ दिला. तरुण उद्योजकांचा ग्रुप तयार केला; परंतु माझ्या ऑफिसला एक दिवसही हजर राहू शकले नाही, ‘चेंबर’मधील मित्रपरिवार, कर्मचारी वर्ग त्याचबरोबरीने माझ्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांमुळेच हे शक्य झालं.
अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. त्यातूनच आत्तापर्यंतचा प्रवास पार पडला. केवळ शब्दांवर विश्वास ठेवून प्रदर्शने भरवली, पशांसाठी कधीच काम केले नाही, त्यामुळे गरजू व शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असणाऱ्या उद्योजकांना विनामूल्य स्टॉल दिले. त्यामुळे त्यांच्यात निर्माण होत असलेला आत्मविश्वास पाहून खूप आनंद झाला. मूकबधिर पण आपल्या नावीन्यपूर्ण कलाकृतींनी आपली ओळख निर्माण करणारी शुभदा रावळ. दुसऱ्या प्रदर्शनाच्या वेळी स्वत: खाणाखुणांनी म्हणाली, ‘‘मॅडम, हे मोफत स्टॉल कुणाला दुसऱ्याला द्या. मला नको यंदा.’’ तिच्यात तो आत्मविश्वास निर्माण करू शकले याचा आनंद आहे. शुभदाने प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती केली. हातातल्या कौशल्याने जिद्दीने व्यवसाय वाढवला, स्वत:चा संसार फुलवला. अशीही माझी उद्योगिनी जेव्हा जग सोडून गेली तेव्हा खरच वाईट वाटलं. अशा माझ्या उद्योगिनीला सलाम! कल्याणच्या वैशाली कांदळगावकर यांनाही शून्यातून उभे राहताना पाहिले. ‘श्रद्धा क्लासेस’ नावाने ५ वी ते १० वीपर्यंतचे कोचिंग क्लासेस त्या चालवतात. आज कल्याण, सोलापूर, ठाणे, अंबरनाथ अशा ८ शाखा आहेत. इतकेच नाही तर अलीकडे १४ एप्रिलपासून तर फॉरेन लँग्वेज क्लासेस सुरू केले. कल्याणमधल्या स्त्रियांना संघटित करून बचत गट स्थापन करून उत्तम मार्गदर्शन करत आहेत. इचलकरंजीत भेटलेली मुंबईची माधुरी पाटील ‘फायनान्शिअल प्लानर’ असून युवक व ज्येष्ठ नागरिकांचे बचत गट स्थापन करून ती ‘उद्योगिनी’च्या माध्यमातून स्थानिक निवृत्त स्त्रियांना पुन्हा स्वयंपूर्ण बनवते आहे.

रत्नागिरी शाखा आयोजित ‘मला उद्योजक व्हायचंय!’ या कार्यक्रमाच्या आधी अदिती देसाई हिचा पाय फॅ्रक्चर झाला असतानादेखील सर्व ग्रुपमध्ये लोकांना काम वाटून दिले व उद्योजकांच्या भरघोस प्रतिसादात कॉन्फरन्स यशस्वी करून दाखवली. वसमतसारख्या मराठवाडय़ातील छोटय़ा गावातील वनिता दंडे दिल्ली आय.आय.टी.एफ. व दुबईत झेंडा रोवून आली. खरी ‘उद्योगिनी’ मी तिला म्हणेन. दुबईत हॉटेलमध्ये आपल्या ‘क्रीम’च्या डेमोमुळे तेथील काम करणाऱ्या स्टाफकडून ३० दीनार कमवून त्या पशात केशर विकत घेणारी ही उद्योगिनी.. सोलारची पणती बाजारात आणून त्याचे पेटंट घेणाऱ्या मुंबईतील आशा सुर्वे यांच्या ३ हजार पणत्या ऑस्ट्रेलियाला गेल्या. एका वृत्तपत्रामध्ये मी लिहिलेल्या लेखात सवयीप्रमाणे सुर्वेबाईंचा दूरध्वनी क्रमांक दिला. त्यांच्या उत्पादनाला मागणी निर्माण झाली. त्यातूनच बंगल्याचे रूफ टॉप सोलर पॅनलच्या ऑर्डर मिळाल्या. सोलरचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यासाठी आता आशाताई तयार आहेत. रत्नागिरीजवळील तुरळमध्ये जिथे फोनची रेंज नाही त्या ठिकाणी ठाण्यातून जाऊन ‘रस्टिक हॉलिडेज्’ या नावाने शिल्पा करकरे यांनी ‘मामाचा गाव’ निर्माण केला. स्वत:चे दोनशे वर्षे जुने घर मातीने िलपून केलेल्या िभती अप्रतिम आहेत. स्थानिकांना मातीकामाचे व लॅम्पशेड बनवण्याचे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवणारी ही उद्योगिनी.. वसुधा देशपांडे क्विल्ट्स बनवतात तसेच हॉटेल्सलाही बेडस्प्रेड आणि क्विल्ट्स पुरवतात. कोकण रेल्वेचे टेंडर भरून ऑर्डर मिळवणाऱ्या आमच्या या उद्योगिनी. बोरिवलीतील जान्हवी राऊळ पहिली स्त्री ब्रॅण्डगुरू. के.व्ही.आय.सी.च्या माध्यमातून ई.डी.पी. प्रोग्राम करते. ठाण्यातील मीनल झेंडे उत्पादनांची चमकदार ओळख जाहिरातीच्या माध्यमातून करून देत सातत्याने कार्यरत आहे, ती म्हणजे ‘वन वुमन कंपनी ते ३६०० फूल सव्‍‌र्हिस अ‍ॅड एजन्सी’ असेच म्हणावे लागेल. अशा अनेक उद्योगिनी घडल्या, घडत आहेत.. त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणजे स्त्री उद्योगिनींच्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी या हेतूने सुरू झालेले दादर येथे ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांचे दालन.
या सगळ्यात सगळ्यांचा मदतीचा हात लागला. चैताली, शरद, शुभांगी, शीतलसारख्या सहकाऱ्यांबरोबरच मधुरा यांची साथ पदोपदी मिळते. ‘आम्ही उद्योगिनी’ या उद्यमशील मुखपत्राद्वारे उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. त्यासाठी मदत होते आहे शैला गोखले व वर्षां गोडबोले यांच्या लेखणीची. ‘अपना बाझार’चे कै. तावडे, जेष्ठ पत्रकार प्रदीप वर्मा, याशिवाय वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीतील पत्रकार मित्रमैत्रिणी, घरातील सर्वाचा पाठिंबा यामुळेच तारेवरची कसरत करताना सातत्याने ग्राहकाला, उद्योजकाला काम देता आले.
यशापाठोपाठ अपयश येते, वैभवाचा मत्सर होतो. सुखाला दु:खाची सोबत असते. हा परस्परविरोध पचवण्याची ताकद असणं महत्त्वाचं. गेलेल्या क्षणापेक्षा पुढचा क्षण वेगळाच असेल, सुख देणारा असेल अशी आशा करून उद्योगाचे शिखर गाठणं महत्त्वाचं..! आत्तापर्यंत हीच शिकवण बळ देत आलीय.. तीच पुढे देत राहील..
aamhiudyogini@gmail.com