रवी परांजपे
चित्रकार

चित्रकला शिक्षण वेगळं आणि चित्रकार बनणं वेगळं. चित्रकलेच्या प्रशिक्षणकाळात हे समजत नसतं, कारण त्या काळात महत्त्व असतं ते चित्रभाषेला.. त्या भाषेचं व्याकरण शिकण्याला! परंतु प्रशिक्षण संपलं, की प्रश्न उभा राहतो तो एक सर्जन-पूल बांधण्याचा! ‘एक असा पूल, की ज्यावर चित्रकार आणि रसिक, प्रेक्षक यांची मनं जुळली जातील’.. युजेन दलक्रुआ (१७९८-१८६३) या थोर फ्रेंच चित्रकारानं म्हटल्याप्रमाणं! याचाच अर्थ असा असतो, की चित्रात रसिकांना चित्रावर खिळवून ठेवण्याची ताकद हवी. ही ताकद सुंदर ते वेचताना.. आणि वेचलेलं सुंदर काही अधिक सुंदर करून मांडताना लाभत असते. सुंदर काही वेचण्यासाठी चित्रकारापाशी हवी अभिरुची. म्हणजेच संपन्न निवडक्षमता. ती चित्रकाराच्या व्यासंगी भावविश्वातून त्याला लाभत असते. अन्य, एखाद्या कलेचा रचनात्मक अभ्यास महत्त्वाचा ठरतो तो अशा वेळी.. वर उल्लेखलेला ‘सर्जनसेतू’ बांधताना.. म्हणजे चित्राच्या निमित्तानं चित्रकार आणि रसिकजन यांची मनं जुळवणारा पूल बांधताना!

या पुलाच्या, ‘सर्जनसेतू’च्या बांधकामासाठी लागते चित्रकाराची लोभस अशी चित्रशैली.. इतरांच्या ज्ञात चित्रशैलींपेक्षा खूप वेगळी अशी चित्रशैली! म्हणूनच चित्रकारानं इतर कलावंतांच्या शैलींचाही अभ्यास केला पाहिजे. त्यातूनही सुंदर काही वेचलं पाहिजे. जे वेचलं त्याला स्वत:च्या लावण्यनीतीच्या किंवा रचनात्मक अंदाजात बसवलं पाहिजे.. स्वत:च्या माफक अभिरुचीपूर्ण अलंकरणाचा साजही चित्राला लाभायला हवा.. तो आपल्या रेखांकनातून स्पष्ट होईल, याचीही काळजी चित्रकारानं घेणं महत्त्वाचं! परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे ती ‘अलंकरणाचं मीठ’ जेवढय़ास तेवढंच ठेवणारी लावण्यनीती. चित्रातली ही लावण्यनीती चित्राच्या संरचनेपासून, रंगसंगतीपासून एकजिनसी अभिव्यक्ती ठरेपर्यंत कार्यान्वित झाल्याचा अनुभव प्रथम चित्रकारास यायला हवा आणि नंतर इतरांना.. बेमालूमपणे, हे महत्त्वाचं!
हे सारं माझ्यात नकळतपणे जमा होत राहिलं, ते माझ्या भारतीय संगीताबद्दलच्या खोलवर पोहोचलेल्या आस्थेमुळं. ही गोष्ट माझ्या लक्षात आली, माझं कलाशिक्षण १९५७ मध्ये पार पडल्यानंतर वर्षभरातच.. एका नराश्यपूर्ण क्षणी केलेल्या चाळ्यातून! या चाळ्यात मी शून्य क्रमांकाच्या जलरंग कुंचल्याच्या साहाय्यानं तपकिरी रंगाची भेंडोळी कागदावर काढत बसलो होतो. चाळा खरोखरच निर्थक होता; परंतु तोपर्यंत चित्रकलेला ‘दृश्य संगीत’ मानण्यापर्यंत पोहोचलेला माझ्यातील चित्रसाधक, साक्षात्कार घडावा तसा जागा झाला. या चाळ्यातील निर्थक रेषांच्या भेंडोळ्यात मला दिसल्या काही नव्या शक्यता. माझं नराश्य दूर पळालं. कुंचल्याच्या साहाय्याने विविध आकार रेषाबद्ध करण्यात मी गढून गेलो आणि याच प्रयत्नांत मला सापडलं माझ्या चित्रशैलीचं बीज. त्या बीजाचा विकास नंतर अनेक र्वष स्वाभाविक मानसिक प्रक्रियेत होत गेला. सांगीतिक आलाप, मुरक्या, खटके, तानपलटे, शीघ्रगती तानक्रिया आणि उपज अंगानं घडणारं बरंच काही माझ्या चित्रशैलीतून प्रत्ययास येऊ लागलं.. माझं वेगळंपण सांगणारं!
या वेगळेपणानिशी माझा व्यावसायिक बोधचित्रकलेत १९५८ ते १९८० असा २२ वर्षांचा प्रवास झाला. माझ्या बाबतीत तो काळ माझी रेखांकनप्रधान चित्रशैली अधिक पलूदार ठरवण्यात व बनवण्यात पार पडला. तो प्रत्येक पलू पाडताना आत्मपरीक्षण, मार्गदुरुस्ती करण्याचं धाडस आणि सवंगपणा टाळण्याचा हव्यास यांची सोबत मला मिळाली.. माझ्या शैलीला पडलेला प्रत्येक पलू माझ्या कोषभेद क्षमतेवर मानचिन्ह ठेवून गेला. अशी २२ र्वष पार पडल्यानंतर चित्रातून दृश्यसंगीत ऐकवण्याच्या माझ्या क्षमतेबद्दलचा आत्मविश्वास मला मिळाला. १९८० मध्ये, ‘सुंदर तेचि वेचावे.. अधिक सुंदर करोनी मांडावे.. स्व-इतरांसाठी’ ही वृत्ती जपत साकारलेलं माझं पहिलं प्रदर्शन पार पडलं.. मोठं यश देऊन!

फ्लोरल मेलडी
या प्रदर्शनाआधी मी केलेलं पहिलं चित्र होतं ‘फ्लोरल मेलडी’, अ‍ॅक्रेलिक रंग, कॅन्व्हासवर, आकार ४८ इंच बाय ३६ इंच. या चित्राची प्रेरणा मी भारतीय लघुचित्रशैलीमधून घेतली. या लघुचित्रशैलीची अनेक ‘स्कूल्स’ भारतात आहेत. त्यापकी अमुक एक स्कूल प्रमाण मानण्यापासून मी दूर राहिलो, कारण मला अभिप्रेत होती ती लघुचित्रशैलीतील द्विमितीजन्य मांडणी.. त्रिमिती-आभासाचा केलेला संकोच. सदर संकोच १९०६ पर्यंत पाश्चिमात्य चित्रकलेतही ‘अभिजात म्हणून मान्यता पावला होता. असा त्रिमितीभासाचा संकोच करून वास्तववादी-अलंकारिक अशी चित्रशैली विकसित करणारा माझा आवडता चित्रकार होता गुस्ताव क्लिम्ट(१८६२-१९१८, ऑस्ट्रियन).
‘फ्लोरल मेलडी’ हे चित्र साकारताना मी विचार केला, की गुस्ताव क्लिम्टनं भारतीय लघुचित्रशैलीमधून प्रेरणा घेत चित्रनिर्मिती कशी केली असती? माझं ‘फ्लोरल मेलडी’ हे चित्र या प्रश्नार्थक विचाराचं फळ. हे चित्र मी जोपासलेल्या माझ्या सौंदर्यशास्त्राचं उदाहरण म्हणून पण महत्त्वाचं. माझ्या सौंदर्यशास्त्रात कुठल्याही दोन आकारांच्या चित्रात टक्कर होताना दिसू नये याबद्दल मी खूप दक्षता घेतो. असे आकार एकमेकांपासून काही अंतरावर तरी दिसावेत किंवा एक आकार दुसऱ्याला गरजेनुसार आच्छादित करताना तरी दिसावा, याबद्दलही मी खूप काळजी घेतो. पुनरावर्तित आकृतिबंधांतून तयार होणारे लहानमोठय़ा झाडांचे, झुडपांचे, पाना-फुलांचे भूमितीजन्य आकार ही माझ्या अशा चित्रांची खासियत. ते मला अनसर्गिक पण सुसंवादी रंगसंगती साधण्यास पूरक वाटतात. शिवाय अशा पुनरावíतत आकारांनी तयार केलेलं पोत-वैविध्यही माझ्या स्व-सौंदर्यशास्त्राचा भाग ठरत आलं आहे. माझ्या चित्रातील रंगसंगतीत मी कुठल्या रंगाशेजारी कुठला दुसरा रंग साजिरा वाटेल, याबद्दलही खूप जागरूक असतो. माझ्या चित्रात रंगसंगतीनुसार पांढरा ठरणाऱ्या रंगाने व्यापलेल्या लहानमोठय़ा जागा चित्रातील संतुलन साधताना दिसतात. शिवाय त्या पांढऱ्या जागा आणि चित्राची एकूण पिवळट पाश्र्वभूमी या चित्राच्या रंगसंगतीला पोषक तर आहेच, शिवाय ती या चित्राला अत्यावश्यक असा श्वास-अवकाश पुरवते. माझ्या मानलेल्या गुरुजनांपकी एक प्रा. ना. श्री. बेंद्रे या थोर चित्रमहर्षीनी माझं हे चित्र खूप आवडल्याचं मला सांगितलं होतं. या चित्र प्रकाराला ‘पिक्टोरियल कंपोझिशन’ म्हणतात.

द प्रेशस् ब्ल्यू
हे माझं चित्र.. ३२ इंच बाय ३४ इंच या आकाराच्या कॅनव्हासवर चितारलेलं.. अ‍ॅक्रेलिक रंग-माध्यमातलं, १९९२ मधलं! नदीकाठच्या वाळवंटाचा ऐन उन्हाळ्यात मी कॅमेऱ्यात टिपलेला एक फोटो या चित्राची कुंडली मांडून गेला. खरं तर ते दृश्य पाहताच या चित्राचा विषय, रंगसंगती आणि शीर्षक त्या दृश्यानंच मला सांगितलं होतं. माझ्या नेहमीच्या पद्धतीनं मी फोटोवरून माझं छोटं ‘थंबनेल’ चित्र तयार केलं. हे ‘थंबनेल’ म्हणजे ३२ इंच बाय ३४ इंच या मोठय़ा आकाराचं छोटं प्रारूप होतं. हे प्रारूप करण्यामागे माझी एक भूमिका होती. तिच्यानुसार मी निवडलेलं दृश्य म्हणजे मी निवडलेल्या ‘रागा’प्रमाणे मला वाटे. त्या दृश्य-रागाची रंग-भाव सुरावट ध्यानी आलेली असायची. ‘थंबनेल’चा प्रमाणशीर आकार म्हणजे चित्राच्या ‘ताला’चा अवकाश असं मी मानावयाचो आणि थंबनेल चित्र म्हणजे माझी मीच रचलेली ‘बंदिश’ आणि ती थंबनेल बंदिश दृश्य स्वरूपात गाणं म्हणजे साकारलं जाणारं प्रत्यक्ष मोठं चित्र.. ही भूमिका!
या माझ्या भूमिकेनुसार माझी बंदिश मला खूप आनंद देऊन गेली. नंतरच्या आठवडय़ात मोठं चित्रही तयार झालं, पण माझा आनंद? त्या मोठय़ा चित्रात काही सापडेना. उत्तम बंदिश असूनही गाणं पडावं असं काहीसं झालं. विवंचनेत पडलो. नंतरचे चार दिवस िभतीवर टांगलेल्या त्या चित्राशी संवाद करण्यात घालवले. पाचव्या दिवशी ते चित्र माझ्याशी बोललं, ‘‘चित्राच्या वरच्या अध्र्या भागातील रेषात्मक अभिव्यक्तीला चित्राच्या खालच्या अध्र्या भागातून रेषात्मक प्रतिसाद मिळत नाहीये.. तो काहीही करून मिळवून दे!’’.. चित्रानंच केलेली दुर्मीळ आज्ञा ती.. मी तात्काळ पाळली! माझं चित्र हसू लागलं.. आणि अर्थातच मीही! माझ्या या चित्राच्या शीर्षकात माझ्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यथा आणि आस्था लपलेल्या आहेत. माझ्या स्वररंगी चित्रप्रवासात जी संवेदनशीलता माझ्यात जमा झाली, ती त्या व्यथा-आस्थांना दूर ठेवूच शकली नाही. म्हणूनच उजळ रंगसंगतीच्या माझ्या चित्रमफलीत मातकट पण मातेरं न करणाऱ्या रंगछटा अशा चित्रातून स्पष्ट झाल्या. शीत-उजळ अशा निळ्या रंगाला सोबत करत राहिल्या!

‘द हँडसम टू
तलरंगात, २० इंच बाय २२ इंच या आकारात चितारलेलं माझं हे चित्र, १९९७ चं. त्या आधीच्या वर्षी अमेरिकेतून परतताना मी ‘लिक्विन’ या तलरंग माध्यमाची बाटली सोबत आणली होती. भारतात परतल्यानंतर हे माध्यम वापरून मी अनेक प्रयोग करून पाहिले. ‘आज केलेलं या माध्यमातील तलरंगकाम दुसऱ्या दिवशी खडखडीत वाळलेलं असतं’- ही या माध्यमाची खासियत.. कुठल्याही तलरंग चित्रकाराला आकर्षति करणारी! परंतु कुठल्याही रंगमाध्यमाची एक प्रकृती असते.. त्या माध्यमाचं असं पौरुषत्व असतं. अशा गोष्टी समजण्यासाठी प्रयोग करून पाहावे लागतात.
मला माझ्या रेखांकनप्रधान चित्रशैलीसाठी हे तलरंग माध्यम खूपच उपयोगी वाटलं. ‘द हँडसम् टू’ या चित्राची बंदिश मी ‘थंबनेल’ स्वरूपात बांधली होतीच, मात्र ती साकारताना या ‘लिक्विन’ माध्यमाचा वापर मी केला नव्हता. ते थंबनेल मी अपारदर्शक जलरंगात केलं होतं; परंतु थंबनेल बंदिशीचं मोठय़ा चित्र-ख्यालात रूपांतर करताना या नवीन तलरंग माध्यमाची साथसंगत खूप आनंद देऊन गेली.. ‘द हँडसम् टू’ या चित्रातून माझ्या ग्रामीण जीवनविषयक आस्था तर स्पष्ट होतातच; परंतु ग्रामीण चित्रविषय लावण्यानीतीच्या, डिझाइन स्ट्रॅटेजीच्या अंगानं मांडले गेले, की ते आंतरिक समाधानाच्या पातळीवर कसे पोचतात हेही लक्षात येतं.
या चित्राची लावण्यनीती २२ इंच बाय २२ इंच या चित्र अवकाशाच्या ३ मूलभूत छोटय़ा अवकाशांच्या फेरमांडणीतून तयार झाली आहे. त्या छोटय़ा अवकाशातील सर्वात मोठा अवकाश चित्राच्या तळापासून डाव्या हाताच्या बलाच्या पोटाखाली जी आडवी रेषा जाणवते, तिथपर्यंत आहे. त्याच्या खालोखाल मोठा अवकाश आहे या आडव्या रेषेपासून चित्राच्या वरच्या कडेपर्यंतचा आहे. या अवकाशाची पुनर्माडणी करून बलांच्या पाश्र्वभूमीचा अलंकारिक फलकासारखा एक अवकाश मी तयार केला आहे. बस्स! ही या चित्राची मूलभूत लावण्यनीती.. असमान स्थूल आकार एकमेकांना आणि चित्र-अवकाशाला (पिक्टोरियल स्पेसला) जुडले जाऊन तयार होणारी! चित्रातील उर्वरित तपशिलाची गुंफण (कम्पोझिशन) या मूलभूत लावण्यनीतीनं स्फुरवल्याप्रमाणे चित्रात उतरली आहे.
माझं हे संयत, परंतु आनंददायक रंगसंगतीतलं चित्र, माझ्या दिशादर्शक रेषांच्या सुसंवादाचंही चित्र आहे. उदाहरणार्थ बलांच्या पाठीवरच्या काळ्या रेषाचे आकृतिबंध.

‘नोटस् ऑफ ए डेझर्ट साँग’
‘केसरिया बालम आओ, नि पधारो म्हारे देस’ हे ‘मांड’ रागातलं राजस्थानी लोकगीत.. आजवर अनेक गायक-गायिकांनी आणि वादकांनी अजरामर केलेलं! हे गीत माझ्याही विशेष आवडीचं. एक दिवस माझ्या एका वाया गेलेल्या, अंमळ मोठय़ा आकाराच्या थंबनेलकडे ‘काय चुकलं?’ हा प्रश्न मनी बाळगत विचार करत बसलो होतो. ‘केसरिया ऽऽ बा ऽऽ लमा आ ओ..’ ही धून गुणगुणत! अचानक त्या थंबनेलचा एक विशिष्ट भाग मला आकर्षति करून गेला. त्यावर मी पांढऱ्या कागदातील एक चौकट ठेवून अंदाज घेऊ लागलो अन् मला एका वेगळीच चित्र-धून शब्दरूपात समोर आली :
कुठून आला हा प्रकाशाचा पुंज
वाळवंटी दाट अंधारात
छटा कृष्ण घनतम केशरी सावल्यांच्या
ऐकविती मज ‘जीवन-मांड’ झालं..!
वाया गेलेल्या त्या मोठय़ा थंबनेलच्या छोटय़ा भागानं स्फुरवलेल्या ओळीच माझ्या नव्या चित्राचा विषयही मला देऊन गेल्या. ‘नोटस् ऑफ ए डेझर्ट साँग’, २० इंच बाय २० इंच, तलरंग, कॅनव्हास बोर्ड, या २००७ या माझ्या चित्राची ही आगळीवेगळी जन्मकथा!. वैश्विक सुबोध-सुंदर-भावस्पर्शी चित्र-परंपरेतील माझ्यातल्या छोटय़ा साधकाची ओळखही करून देणारी. त्या थोर परंपरेची एक छोटीशी नाव मी बनवू शकलो हे माझं भाग्य. दृश्यवास्तवाच्या महासागरात ती नाव नेण्याचं धाडस केलं एवढंच माझं योगदान. दृश्यवास्तवाच्या सागरातील अवघड ‘सागरवाट’ शोधू शकलो हे माझ्या भाग्याचं श्रेय. हे सागर आणि कल्पनेचं आभाळ मिळून तयार होणारी क्षितिजरेषा निर्मिती-आव्हानं समोर ठेवत गेली.. दिशाही दाखवत गेली. खूप मोठय़ा संख्येची जरी नाही, तरी काही स्वत:ची अशी चित्रनिर्मिती माझ्याकडून घडली. त्यातली चार चित्रं या लेखासोबत वाचकांसमोर आणू शकलो याचा मला आज आनंद वाटतो. हे माझे यश आहे वा नाही, हे ठरवायचा अधिकार रसिक वाचकांचा आहे. वास्तवाच्या महासागरातील ‘वादळ-वाऱ्यात’ मी सुबोध-सुंदर-भावस्पर्शी चित्रपरंपरेची नाव शाबूत राखू शकलो, हे मात्र कमी ठरू नये!
raviparanjape@gmail.com