06 August 2020

News Flash

पडद्यामागील नाटक

हास्यविनोद चालले असताना मी आत शिरताच वातावरण उगाचच गंभीर झालं.

‘‘अठ्ठेचाळीस तासांच्या आत माझ्या घरी हॅन्ड डिलिव्हरीनं सेन्सॉर सर्टििफकेट आलं. कोणताही भाग न वगळता मंजूर. धन्य ते सेन्सॉर बोर्ड! गमतीचा भाग म्हणजे प्रमोद नवलकरना किंवा सुशीलकुमार िशदेंना मी पत्राची किंवा नाटकाची प्रत पाठवलीच नव्हती आणि पाठवणारही नव्हतो. त्याची गरज पडणार नाही, याची मला खात्री होती. माझा कयास बरोबर ठरला.. कोणतंही नाटक रंगमंचावर येण्याआधी काही ना काही घडतच असतं. अनेकदा हे पडद्यामागचं नाटक मूळ नाटकापेक्षा जास्त नाटय़मय असतं.’’

‘मला उत्तर हवंय’ हे माझं चौथं नाटक. त्या आधी माझी ‘सागर माझा प्राण’, ‘स्वर जुळता गीत तुटे’ आणि ‘काचेचा चंद्र’ ही नाटकं रंगमंचावर आली.
पाश्चात्त्य नृत्यशाळा म्हणजे डािन्सग स्कूलच्या नावाखाली छुपा वेश्याव्यवसाय, कॉल गर्ल पुरवण्याचा व्यवसाय चालत असे. हे नाटक लिहायला एक निमित्त झालं. माझ्या परिचयातली एक चांगल्या घरातली, सुशिक्षित, देखणी मुलगी या जाळ्यात अडकली आहे, हे जेव्हा मला समजलं तेव्हा या घटनेनं मी हादरून गेलो. हे का आणि कसं घडलं याची उत्तरं शोधताना नाटक आकाराला येऊ लागलं. आई, वडील, भाऊ ही कुटुंबातील माणसं आणि त्यांचं कथानक जरी महत्त्वाचं होतं तरी तितकंच महत्त्व ‘डािन्सग स्कूल कम ब्रॉथेल’ या पाश्र्वभूमीला होतं. बाप आणि मुलगी गिऱ्हाईक आणि कॉलगर्ल म्हणून समोरासमोर येतात या नाटय़मय घटनेतून पुढे संपूर्ण नाटय़ घडत गेलं. ही पाश्र्वभूमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे डािन्सग स्कूलची परिभाषा, तिथलं वातावरण, तिथं येणाऱ्या मुली, सौदा ठरवण्याची रीत कल्पनेतून रंगवणं खोटं वाटलं असतं. मी डािन्सग स्कूल्सना भेट द्यायचं ठरवलं.

मी मुंबईतल्या सात-आठ डािन्सग स्कूल्सना भेट दिली. गिऱ्हाईक म्हणून मी जायचो. तिथल्या मुलींशी बोलायचो. सांगायचो, मी एक निरुपद्रवी लेखक आहे. मी एक नाटक लिहितोय, तुमच्या लाइफवर. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. बाकी मला काही नको. मी तुम्हाला वेगळे पसे देईन.’ काही बोलायला तयार व्हायच्या नाहीत पण काहींनी माकळेपणानं सांगितलं, ‘माझा नवरा इथं मला पाच वाजता आणून सोडतो आणि रात्री पिक्अप करायला येतो.’ हे सांगणारी जेनी, ‘आई-वडील गेल्यानंतर मामानं मला वाढवलं आणि मी वयात आल्यावर पहिला बलात्कार त्यानेच केला.. आणि मग हे रोजचंच झालं. एवीतेवी कुणी तरी हे शरीर फुकट लुटणारच मग मी धंदा करून पसे केले तर माझं काय चुकलं?’ असं विचारणारी रोशन, ‘मला इथं फसवून आणून सापळ्यात अडकवलं,’ असं सांगणाऱ्या मिसेस नाडकर्णी, अशा सगळ्या हाडामांसाच्या स्त्रिया मला इथं प्रत्यक्ष भेटल्या. एकेकीच्या शहारे आणणाऱ्या कथा. सौदा कसा ठरवतात, चॉईस कसा असतो, रेटस् कसे असतात, सांकेतिक परिभाषा कशी वापरतात याची इत्थंभूत माहिती मला मिळाली.

16नाटक लिहून पूर्ण झालं. सेन्सॉर बोर्डाकडे गेलं आणि त्याचबरोबर आम्ही तालमी सुरू केल्या. स्पध्रेसाठी हे नाटक पाठवायचं ठरलं. पण मुख्य अडचण उभी राहिली ती डािन्सग स्कूलमधल्या मुलींच्या कामासाठी हौशी रंगभूमीवर मुली मिळेनात. ‘या असल्या रोलसाठी आम्ही आमची मुलगी पाठवणार नाही,’ अशी उत्तरं यायला लागली. वास्तविक त्या भूमिकांसाठी तसले सीन्स नव्हते. पण संवाद अपरिहार्य होते. मग दिग्दर्शक नंदकुमार रावते यांच्या दोन मुली रावतेंनी घ्यायच्या ठरवलं. माझ्या मुली अगदीच लहान होत्या. मी माझ्या मेहुणीला एका रोलसाठी तयार केलं. तर नेपथ्यकार बाबा पास्रेकर यांनी आपल्या पुतणीला आणलं. दिग्दर्शकाच्या मुली, लेखकाची मेहुणी, नेपथ्यकाराची पुतणी, डािन्सग स्कूलमधल्या मुलींचा प्रश्न सुटला. आम्हाला हायसं वाटलं. पण ते तात्पुरतं होतं. खरी समस्या पुढेच उभी राहणार होती.
सेन्सॉर बोर्डाने जे संहितेत कट्स सुचवले ते पाहून मी हबकून गेलो. त्यांचे कट्स स्वीकारायचे म्हटले तर नाटक करता येणं शक्य नव्हतं. नाटकाच्या प्रारंभीच बाप आणि मुलगी गिऱ्हाईक आणि कॉलगर्ल म्हणून समोरासमोर येतात हा सर्वात नाटय़मय प्रसंग. ज्यामुळे पुढचं नाटक घडतं. हा प्रसंग उभा करण्याकरिता तिथल्या परिभाषेत असे संवाद होते. ‘कशी हवी? काय वय? मराठी, गुजराती, ख्रिश्चन, सिंधी?’ या संवादावर हरकत घेतली गेली. ‘युवर मदर इज फ्रिजिड, तुझी आई थंड आहे.’ यातल्या ‘थंड’ या शब्दावर हरकत घेतली. थंड हा शब्द अश्लील आहे. (फ्रिजिड हा शब्द अश्लील नाही.) सगळेच कट्स (सुचवलेले) मी सांगत बसत नाही. पण सुचवलेले सगळेच कट्स अनाकलनीय व हास्यास्पद होते. मी ते स्वीकारायचे नाहीत, असं ठरवलं आणि तसं कळवलं. सेन्सॉर बोर्डानं मला भेटायला बोलावलं. कुठे? तर सांगलीला. तिथे त्यांची मीटिंग होती.

सांगलीला मी मीटिंगला गेलो. मला आत बोलावलं. आधी हास्यविनोद चालले असताना मी आत शिरताच वातावरण उगाचच गंभीर झालं. काही क्षण शांततेत गेल्यावर कुणी तरी विचारलं, तुम्हाला आम्ही सुचवलेले कट्स मान्य नाहीत म्हणता. का मान्य नाहीत? मी शांतपणे सांगितलं, कारण ते मान्य करता येण्यासारखे नाहीत. माझ्यासमोर बसलेली सर्व मंडळी थोर साहित्यिक, समीक्षक होती. (पूर्वी, फार फार वर्षांपूर्वी, सेन्सॉर बोर्डावर नामवंत साहित्यिक, समीक्षक नेमायची खुळी पद्धत होती.) माझ्यावर प्रचंड मानसिक दडपण आलं. मला उगाचंच लांडग्यांच्या कळपात शिरल्यासारखं वाटलं. ते ज्या तऱ्हेने मला प्रश्न विचारीत होते त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत होती. त्यांना माझ्याबद्दल अजिबात सहानुभूती नव्हती. मी माझ्या परीनं, त्यांचे विचार कसे चुकीचे आहेत, हे पटवायचा प्रयत्न करीत होतो, पण त्यांचं पालुपद एकच होतं, ‘आम्हाला नाही तसं वाटत.’ ‘फ्रिजिड शब्द श्लील आणि थंड अश्लील हे कसं?’ या माझ्या प्रश्नाला कुणीही उत्तर देऊ शकलं नाही. या सबंध प्रकारात दोनच व्यक्ती माझ्या बाजूनं होत्या. डॉ. सरोजिनी वैद्य आणि डॉ. कुमुद मेहता. बराच वेळ वाद घातल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी िभतीवर डोकं आपटतोय. माझ्या डोक्याला टेंगळं येतील. िभतीला काही होणार नाही. मी मनाशी काय करायचं ते ठरवलं आणि त्यांना सांगितलं, आपण सारी थोर माणसं आहात. वयानं, योग्यतेनं. मी एक अननुभवी लेखक आहे. आपण द्याल ते प्रमाणपत्र मी स्वीकारीन. आतापर्यंत वाद घालणारा हा माणूस एकदम कसा बदलला हे त्यांना कळेना. मीटिंग संपली.

मी मुंबईला परत आलो. दिग्दर्शक रावते आणि सारे कलाकार माझी वाटच पाहत होते. मी घडलेलं सारं सविस्तर सांगितलं. सगळे विचारात पडले. मी सांगितलं की, मुंबईला गेल्यावर ते फायनल निर्णय कळवणार आहेत. थोडय़ाच दिवसांत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष चंद्रकांत गोडसे यांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर डॉ. सरोजिनी वैद्य आणि डॉ. कुमुद मेहता यांच्या प्रयत्नानं फ्रिजिड ठेवा, थंड काढा असे काही हास्यास्पद कट्स काढून टाकले आणि प्रमाणपत्र मिळालं. पण त्यातही स्वीकारता न येण्याजोगे बरेच कट्स होते. रावतेंना मी काय ठरवलं होतं ते सांगितलं, ‘हे नाटक करायचं. कोणताही भाग न वगळता.’ ‘आणि पुढं काही झालं तर?’ रावतेंनी विचारलं. ‘काहीही होणार नाही. आपण प्रयोगात प्रमाणपत्रानुसार वाक्यं वगळली आहेत का, हे बघायला एकही सभासद फिरकणार नाही, गॅरंटी. त्यांना एवढा वेळ कुठाय? अन्याय निमूटपणे सहन करण्यापेक्षा त्याच्या विरुद्ध उभे राहू आणि परिणाम भोगू,’ मी शांतपणे सांगितलं.
एवढं सगळं रामायण घडल्यावर आम्ही ‘मला उत्तर हवंय’ नाटकाचा प्रयोग राज्य नाटय़स्पध्रेत केला. एकही कट् न पाळता. परिणाम? अंतिम स्पध्रेत आमच्या नाटकाला द्वितीय पारितोषिक, अन्य तीन-चार पारितोषिकं आणि लेखक सुरेश खरे यांना लेखनाचं दुसरं पारितोषिक! इतकंच नाही, तर पुढे या नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवर पावणेदोनशे प्रयोग झाले. एकही शब्द न गाळता!
‘मी बबन प्रामाणिक’

१९७२ साल. माझी चार नाटकं रंगमंचावर आली होती. एक दिवस सकाळी सकाळी ‘थ्री स्टार्स’ या नाटक कंपनीचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते बाबूराव गोखले माझ्याकडे आले. त्यांचं ‘करायला गेलो एक’ हे तुफान विनोदी नाटक प्रचंड लोकप्रिय झालं होतं. त्यांनी माझ्याकडे चक्क विनोदी नाटकाची मागणी केली. मला आश्चर्यच वाटलं. त्यांना ज्या कथेवर नाटक हवं होतं तिची रूपरेषा त्यांनी मला थोडक्यात सांगितली. मला कथासूत्र आवडलं. एक चांगलं नाटक होऊ शकेल, हे माझ्या लक्षात आलं. मुख्य म्हणजे स्वत: बाबूराव गोखले आणि राजा गोसावी व शरद तळवलकर या त्यांच्याकडे काम करणाऱ्या दोन्ही विनोद सम्राटांना फिट्ट भूमिका होत्या. मी नाटक लिहून द्यायचं कबूल केलं. छान मूड लागला आणि दोन एक महिन्यांत मी नाटक लिहून पूर्ण केलं. नाटकाला नाव दिलं, ‘चिमणीला हवाय चिमणा’ बाबूरावना नाटक आवडलं. त्यांनी मला शकुनाचा रुपये शंभरचा धनादेश दिला आणि हस्तलिखित घेऊन गेले.बाबूरावनी नाटक सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलं. पुढे काय झालं ते मला कळलं नाही. काही दिवसांतच बाबूराव अचानक हे जग सोडून गेले. माझ्याकडे नाटकाची प्रत नव्हती. टाईप केलेल्या तीनही प्रती बाबूराव घेऊन गेले होते. त्या काळी झेरॉक्सचं तंत्र आलं नव्हतं. आपलं एक चांगलं नाटक वाया गेलं असं समजून मी कपाळाला हात लावून स्वस्थ बसलो. बाबूरावांच्या घरच्यांनाही काही कल्पना नव्हती.

काही वर्षांनी मला अचानक आठवण झाली. बाबूराव म्हणाले होते, नाटक सेन्सॉरला पाठवलंय. त्या अर्थी सेन्सॉर बोर्डाकडे त्याची प्रत निश्चित असणार. माझे स्नेही सुधीर दामले त्या वेळी सेन्सॉर बोर्डावर होते. त्यांच्याकडे विचारणा केली. ते म्हणाले, ‘असणार. गोडाऊनमध्ये कुठे तरी मिळेल. शोधावी लागेल.’ मी त्यांना सांगितलं, ‘कुणा प्यूनला सांगा. त्याला आपण दोन-अडीचशे मेहनताना देऊ’ आणि काय आश्चर्य! ‘चिमणीला हवाय चिमणा’ची प्रत मिळाली आणि सेन्सॉर बोर्डाच्या सर्टििफकेटची प्रतही मिळाली.
नंतर काही दिवसांनी दिग्दर्शक कुमार सोहोनीनं जेव्हा नवीन नाटकासाठी विचारणा केली तेव्हा मी त्याला हे नाटक वाचायला दिलं. कुमारला नाटक आवडलं आणि त्यानं ते करायचं ठरवलं. त्याच्या मनात नायकाच्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डेला घ्यायचा विचार होता. लक्ष्मीकांत (लक्ष्या) माझा मित्र होता. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. लक्ष्याला नाटक आवडलं पण त्याची प्रकृती ठीक नव्हती. ती दिवसेंदिवस बिघडतच गेली आणि त्यातच त्याचा अंत झाला.

पण ही झाली पुढची गोष्ट. त्याआधी उदय धुरत या निर्मात्यानं नाटकात रस दाखवल्यामुळे मी त्याचा विचार केला. त्यानं सांगितलं, ‘चिमणीला हवाय चिमणा’ हे नाव बालनाटय़ाचं वाटतं. ते मला एकदम पटलं आणि ‘मी, बबन प्रामाणिक’ या नवीन नावानं तेच नाटक पुन्हा सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलं. मी नििश्चत होतो. एक दिवस सेन्सॉर बोर्डाचं पत्र मिळालं. त्यांनी घेतलेल्या हरकती आणि कट्स हास्यास्पद (सौजन्य म्हणून मी आणखी वाईट विशेषणं वापरणार नाही) होते. उदाहरणार्थ, कोलकात्याहून नायक विमानानं येतो. त्याच्या हातात फक्त एक लहान सूटकेस असते. नायिका त्याला विचारते, ‘हे काय, एवढंच तुमचं सामान?’ तो सांगतो, ‘अर्ध बाहेर आहे.’ सेन्सॉर बोर्डानं ‘सामान’ हा शब्द अश्लील म्हणून गाळायला सांगितलं. मला हसावं की रडावं ते समजेना. मी हसावं असं ठरवलं. ‘मला उत्तर हवंय’च्या अनुभवानं मी शहाणा झालो होतो. या खेपेस हे प्रकरण वेगळ्या पद्धतीनं हाताळायचं मी ठरवलं. मी सेन्सॉर बोर्डाला एक पत्र लिहिलं.
सन्माननीय महोदय,

आपले दिनांक १३ मार्च १९९५चे एलपीबी/१ ए.६५/९५/१८९४ क्रमांकांच्या पत्राच्या संदर्भात संहितेचा लेखक या नात्यानं हे उत्तर.
आपले आक्षेप वाचून खूप करमणूक झाली. क्षणभर हसावं की रडावं ते समजेना; परंतु एखादा कुशाग्र बुद्धीचा, जाणकार, व्यासंगी, रसिक भाषाप्रभू परीक्षक काय काय अर्थ काढू शकतो, हे पाहून आदरानं मान झुकली. आपण सुचवलेला भाग गाळल्यानं संहितेच्या परिणामांत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा खुलासे प्रतिखुलासे देऊन माननीय सदस्यांचा अमूल्य वेळ मी फुकट घालवणं योग्य होणार नाही. तसंच परीक्षक मंडळाच्या न्यायालयासमोर आरोपी म्हणून उभं राहून आक्षेपांना उत्तरं देण्याची माझी तयारी नाही. अतएव मी आपले आक्षेप मान्य करून तो भाग गाळीत आहे. सदर नाटकातील सुकुमार सेन हे पात्राचे नाव सुशीलकुमार िशदे या नावाची आठवण करून देते, तरी सदरचे नाव बदलण्याची सूचना आपण केली आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ‘प्रोहिबिटेड नेम्स’ची यादी मिळू शकेल का? ते शक्य नसल्यास परीक्षण मंडळ त्यांच्या पसंतीचे नाव सुचवू शकेल का? ते त्यांच्या कार्यकक्षेत बसत नसल्यास क्षयझकुमार हे नाव आपल्याला चालू शकेल का? त्याचा खुलासा व्हावा. जाता जाता एक सांगतो. हे नाटक वीस वर्षांपूर्वी लिहिलं होतं. जेव्हा सामान्य माणसाला सुशीलकुमार िशदे हे नाव इतकं परिचित नव्हतं. आपण सुशीलकुमार िशदे यांचं साम्य (नावापुरतं आणि तेही ओढूनताणून आणलेलं) शोधून काढलंत! अभिनंदन! नाटकाची प्रत आणि आपल्या आक्षेपांची प्रत करमणुकीसाठी सुशीलकुमार िशदे यांना पाठवीत आहे.
अश्लीलता ही शब्दात नसून माणसाच्या मनात असते हे सिद्ध करणारं आणखी एक सत्य सांगतो. आपल्याला (आता) आक्षेपार्ह वाटलेला भाग ज्या संहितेत होता ती हीच संहिता वेगळ्या शीर्षकाखाली आपल्या परीक्षण मंडळाने कोणताही भाग न वगळता मंजूर केली आहे. आणि तिची प्रमाणपत्रित प्रत प्रमाणपत्रासहित माझ्या संग्रही आहे.

या पत्राद्वारे आपल्याला फेरविचार करण्याची विनंती मी करीत नाहीए याची कृपया नोंद घ्यावी. आपण आक्षेपार्ह भाग वगळण्याची सूचना देणारं प्रमाणपत्र दिलंत तरी चालेल.
कळावे. असाच लोभ असू द्यावा.

आपला
सुरेश खरे

माहितीसाठी प्रत : माननीय श्री. प्रमोद नवलकर, सांस्कृतिक मंत्री
माहितीसाठी प्रत : नाटकाच्या प्रतीसहित
श्री. सुशीलकुमार िशदे, नवी दिल्ली

अठ्ठेचाळीस तासांच्या आत माझ्या घरी हॅन्ड डिलिव्हरीनं सेन्सॉर सर्टििफकेट आलं. कोणताही भाग न वगळता मंजूर. धन्य ते सेन्सॉर बोर्ड! गमतीचा भाग म्हणजे प्रमोद नवलकरना किंवा सुशीलकुमार िशदेना मी पत्राची किंवा नाटकाची प्रत पाठवलीच नव्हती आणि पाठवणारही नव्हतो. त्याची गरज पडणार नाही, याची मला खात्री होती. माझा कयास बरोबर ठरला.

कोणतंही नाटक रंगमंचावर येण्याआधी काही ना काही घडतच असतं. अनेकदा हे पडद्यामागचं नाटक मूळ नाटकापेक्षा जास्त नाटय़मय असतं. प्रामाणिकपणानं सांगतो. ‘मला उत्तर हवंय’ च्या वेळेला (अनुभव नसल्यामुळे) मी बिथरलो होतो. ‘मी बबन प्रामाणिक’च्या वेळेला त्याकडे विनोदी प्रकार म्हणून पाहिलं. त्यामुळे भरपूर करमणूक झाली. नाटकांपूर्वी घडलेल्या या दोन्ही नाटकांमध्ये प्रमुख भूमिका होती, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची!

 

– सुरेश खरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:05 am

Web Title: life story of suresh khare
टॅग Chaturang
Next Stories
1 मनोविकार ते मनोविकास
2 ‘आवरण’मागचं वास्तव
3 कला एक आकलन, अभिव्यक्ती
Just Now!
X