‘‘मी का चित्र काढतो, असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा माझं उत्तर असतं की मी चित्र काढू शकतो म्हणून मी चित्र काढतो किंवा चित्राशिवाय दुसरं कुठलंच प्रभावी माध्यम व्यक्त होण्यासाठी मला खुणावत नाही. जेव्हा मी चित्र काढतो तेव्हा किती तरी अज्ञात कवाडं उघडतात, एक परिपूर्णतेचा अनुभव मनाला सुखावतो, त्या समाधानाला परत एकदा अनुभवावं अशी इच्छा मनात निर्माण होते आणि मी पुन्हा चित्र काढतो.. हा एक प्रवास आहे, विचारप्रक्रियेचं वर्तुळ आहे. कला ही उपयुक्ततेसाठी नसून ते एक आकलन आहे, एक बोध आहे, अभिव्यक्ती आहे, स्वातंत्र्य आहे.’’

समुद्राकाठची कोरी करकरीत संध्याकाळ, अस्ताला आलेला सूर्य, संधिप्रकाशाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलेली रात्र आणि अंधार उजेडाच्या खेळात निसर्गाच्या कुंचल्याचे मनसोक्त फटकारे.. एखादं जुनं दुर्लक्षित घर, कुठल्या तरी काळात खूप नांदतं असावं, असं छोटी मोठी घरं, काही एकाकी, काही चिरेबंदी वाडे, अनेक ऊन-पावसाळे अनुभवून थकलेली परिपक्व घरं, पडकी घरं, एखादी सुंदर, शहरी आलिशान काचेची इमारत.. सायकल, रिक्षा, वाहने, रस्ते, सकाळ, दुपार, संध्याकाळ, गर्दी, छोटय़ा छोटय़ा गल्ल्या, सुनसान पण कसले अभिनिवेश, कसलेच मुखवटे नसलेल्या..

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?
UK First Lady Akshata Murty visits Bengaluru book market with Narayana Murthy Video Viral
“याला म्हणतात साधेपणा!” ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नी असूनही रस्त्यावर पुस्तक खरेदी करताना दिसल्या अक्षता मूर्ती, Video Viral
Marathi Bhasha Din 2024 Oldest Inscription at Akshi Alibaug in Marathi
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?

किती विषय! शोधू तितके थोडेच! एखाद्या चित्रकाराला खुणावणारे, भुलवणारे. दृष्टी हेच चित्रकाराचं साधन, ओळख. एखादा कॅमेरा आणि चित्रकार यात काय फरक असू शकतो.. तर तो दृष्टीचा.. कॅमेरा फक्त आहे ते जसंच्या तसं साठवणारा आणि चित्रकार हा स्वत:च्या दृष्टीनुसार त्या दृश्याला एक संज्ञा, एक परिभाषा देणारा. एखादं समोर दिसणारं चित्र हे चित्रकाराचा त्या चित्रापर्यंतचा प्रवास असतो. त्यामागे जोडलेल्या काही आठवणींचा प्रवास. चित्राला परिपूर्ण करणारा प्रवास. आज मागे वळून बघताना माझ्या लक्षात येतो माझ्या प्रत्येक चित्रामागे असलेल्या विचारप्रक्रियेत होत गेलेला सूक्ष्म पण स्थिर बदल. जेव्हा मी विचारप्रक्रिया म्हणतो तेव्हा ती दोन गोष्टींत अभिप्रेत आहे, एक म्हणजे माझं चित्र आणि एक मी स्वत: कलाकार म्हणून. जसा एखादा कलाकार वयानुसार प्रगल्भ, अनुभवसिद्ध होत जातो तसतशी आपोआपच त्याची चित्रकलेची पद्धत बदलत जाते. चित्रासाठी वापरली जाणारी तंत्रं, रंगसंगती, विषय प्रत्येक गोष्टच परिपक्वतेच्या एका ठरावीक स्तरावर जाते. या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो आहे कलाकाराच्या मनाची स्थित्यंतरं, जी चित्रातून व्यक्त होतात. एखादं गाणं, एखादं नृत्य, एखादं परिणामकारक भाषण, एखादा मनस्वी कलाकाराचा नाटय़विष्कार या जशा मनोप्रवासाची अभिव्यक्ती असतात तसंच एखाद्या चित्रकारासाठी चित्र ही एक पराकोटीची अभिव्यक्ती आहे. मी का चित्र काढतो, असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा माझं उत्तर असतं की मी चित्र काढू शकतो म्हणून मी चित्र काढतो किंवा चित्राशिवाय दुसरं कुठलंच प्रभावी माध्यम व्यक्त होण्यासाठी मला खुणावत नाही. जेव्हा मी चित्र काढतो तेव्हा किती तरी अज्ञात कवाडं उघडतात, एक परिपूर्णतेचा अनुभव मनाला सुखावतो, त्या समाधानाला परत एकदा अनुभवावं अशी इच्छा मनात निर्माण होते आणि मी पुन्हा चित्र काढतो.. हा एक प्रवास आहे, विचारप्रक्रियेचं वर्तुळ आहे.
एक निसर्ग चित्रकार या नात्यानं माझ्यासाठी विषयाचा स्रोत अतिशय महत्त्वाचा आहे. प्रवासाचे माझ्या आयुष्यात म्हणूनच खूप महत्त्व आहे. जरी मी काही खूप प्रवासाचा भोक्ता नसलो तरी जेव्हा केव्हा प्रवासाचा योग येतो तेव्हा हातात कॅमेरा आणि मनात कुंचला घेऊन मी माझा प्रवास अनुभवतो. प्रवासातले अनुभव हे चित्रकाराला अधिक समृद्ध बनवत जातात. तुम्हाला दिसणारी दृश्यं तुमच्या आत जितकी साठवत जाल तितके चित्रातून व्यक्त व्हाल. प्रवासात तुमचं मन जितकं तरल आणि ग्रहणक्षम तितकी चित्रात साधली जाणारी परिणामकारकता अधिक. तितकी चित्रातली अभिव्यक्ती प्रभावशाली. मुळात अभिव्यक्ती ही लहानपणापासून तुमच्यावर होणाऱ्या संस्कारातून, सामाजिक जडणघडणीतून, आजूबाजूच्या परिस्थितीतून, सापेक्षतेच्या परिभाषेतून उतरत असते. त्यासाठी गरज असते ती डोळे उघडे ठेवण्याची आणि खुलेपणाने एखादी गोष्ट स्वीकारण्याची. माध्यम मग कुठलंही असो, ती समोरच्यापर्यंत तुम्हाला हवी तशी पोहोचणारच! चित्र हे असंच एक माध्यम आहे आणि त्यासाठीचा गरजेचा घटक आहे अनुभवाचा. या संदर्भात मला माझ्या दोन प्रवासांचा उल्लेख करावासा वाटतो.. एक म्हणजे बनारसला केलेला प्रवास आणि दुसरा व्हेनिसचा प्रवास.

बनारसला मी खूप गोष्टी पाहिल्या, मनात साठवून ठेवल्या. कॅमेरात बद्ध केल्या. चित्र काढण्यासाठी लागणारं सर्व सामान नेहमीच माझ्याबरोबर असतं तसंच ते बनारसलाही होतं. त्या त्या ठिकाणी थांबून मी अनेक चित्रं काढली, अनेक देवळं, घाट, नदीपात्र, साधू, बैरागी यांची अनेक दृश्यं मी माझ्या कागदांवर तिथल्या तिथे टिपत होतो पण मला मजा येत नव्हती. विचारप्रक्रियेतल्या समाधानाची, अभिव्यक्तीच्या अंतर्गत वर्तुळाची अनुभूती येत नव्हती. एक प्रकारचं असमाधान मला त्रस्त करत होतं. बनारसमध्ये अजून किमान १० दिवस तरी राहिलं पाहिजे तरच मनाजोगती चित्रं काढता येतील, असा माझ्या मनाने समज करून घेतला होता. अनेक चित्रं तिथे काढल्यानंतर मी नंतर फक्त माझ्या मनात पुढची दृश्य साठवत राहिलो, मनातल्या मनात त्याचा अल्बम बनवत राहिलो, मला आलेल्या काही अनुभवांवर विचारमंथनातून माझ्या काही समजुती पक्क्या होत होत्या. जेव्हा मी परत आलो तेव्हा त्या अनुभवसमृद्ध आठवणींच्या आधारावर चित्रांचा अख्खा खजिना व्यक्त करू शकलो, कारण माझ्या मन:चक्षूंनी अनेक गोष्टी निरीक्षणातून मनावर कोरल्या होत्या. म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रवासात असाल तेव्हा फक्त मनाची कवाडं आणि दृष्टी उघडी ठेवून वावरलात तर तुमच्यातल्या चित्रकाराला अधिक प्रगल्भ बनण्यास मदत होईल.

व्हेनिसचा अनुभव अजूनच वेगळा. व्हेनिसला जाणं हे माझं स्वप्न साकार झाल्यासारखं होतं, कारण माझ्यासाठी चित्रकलेत जे आदर्श होते/आहेत त्या सगळ्यांची व्हेनिसची चित्र आहेत. म्हणूनच व्हेनिसबद्दल अत्यंत कुतूहलही होतंच. एक चित्रकार म्हणून प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी व्हेनिसमधल्या एखाद्या दृश्याचं चित्र काढलं पाहिजे असंच मला वाटायचं. असो. तर सांगण्याचा मुद्दा हा की व्हेनिसला मी १९९६ मधे गेलो आणि त्या वेळी आधी या प्रवासाची कसलीही तयारी केलेली नव्हती. मी जशी कल्पना केली होती अगदी तसंच व्हेनिस माझ्यासमोर दृश्यस्वरूपात उभं होतं. त्या वेळी तिथे कसला तरी ऑपेरा फेस्टिवल असल्याकारणाने माझ्या राहण्याची पंचाईत झाली. मी खूप फिरलो जागा मिळवण्यासाठी. एका ठिकाणी मला राहण्यासाठी कशीबशी जागा मिळाली. मी सामान टाकून सहज म्हणून फिरायला बाहेर पडलो आणि नंतर मला हॉटेलच्या माझ्या रूमवर जाण्यासाठीचा मार्ग सापडेना. मी व्हेनिसच्या रस्त्यावर पूर्णपणे हरवलो होतो. असं म्हणतात की, व्हेनिसचं सौंदर्य हे तिथल्या रस्त्यांवर हरवल्यावरच कळतं पण त्याक्षणी मी हे असले काहीही विचार करण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. शेवटी केव्हा तरी त्या जगन्नियंत्यालाच (अशा वेळीच हमखास देवाची आठवण होत असावी!) माझी दया आली आणि मी माझ्या हॉटेलवर पोहोचलो. या सगळ्या हरवण्याच्या प्रक्रियेत माझ्या मनाने व्हेनिसमधल्या ज्या गोष्टी टिपल्या होत्या त्या माझ्यासाठी पुढच्या अनेक दिवसांसाठीच्या चित्रांच्या विषयाचा स्रोत ठरल्या. जेवढी चित्र मी व्हेनिसला काढली त्यापेक्षा किती तरी जास्त चित्र मी परत आल्यावर काढू शकलो, फक्त मनातल्या अनुभवांच्या आधारावर. कुठल्याही प्रवासात कॅमेऱ्याबरोबर आपली चित्रकलेची वही नेहमी बरोबर ठेवली की चटकन एखादं दृश्याला पूरक छोटंसं चित्र काढून ठेवता येतं ज्याचा पुढे संदर्भ वापरता येतो; ज्याच्यापासून स्फूर्ती घेऊन तुम्ही पूर्ण चित्र काढू शकता. ते पाहून तुम्ही पुन्हा ते ठिकाण अनुभवू शकता आणि तिथला परिसर तुमच्या चित्रातून साकारू शकता.

आपण जेव्हा एखादं दृश्य बघतो, फोटोग्राफ अथवा प्रत्यक्ष..त्या वेळी प्रत्येकाच्याच मनात त्याची एक प्रतिमा तयार होत असते. माझ्या मनात त्याच्या रंगसंगतीची, छटांची प्रतिमा तयार होते. त्या वेळी माझी जशी मन:स्थिती असेल त्यानुसार माझ्या मन:पटलावर रंगछटांची एक आकृती तयार होत जाते. चित्रकाराच्या परिपक्वतेसाठी ही गोष्ट माझ्या मते महत्त्वाची असावी. त्या प्रतिमेतल्या गोष्टी टिपताना त्यात गुंतून न पडता त्यापासून थोडंसं अलिप्त होऊन मी त्या चित्राच्या रंगसंगतीचा वेध घेऊ  शकतो, जो माझ्यातल्या चित्रकलेच्या अभिव्यक्तीला योग्य तऱ्हेने कागदावर उतरवण्यास मदत करतो. एखाद्याला शहरी दिनचर्येत फारसं काही चितारण्यासारखं मजेदार वाटत नसेल पण मला मात्र या गोष्टी खूप खुणावतात. तिथे खूप गोंधळ, गडबड, ध्वनिप्रदूषण अशा बऱ्याच गोष्टी तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या असतात. प्रत्येकाला कुठं तरी पोहोचायची घाई असते. कधी कधी जाहिरातीचे फलक इतक्या जास्त प्रमाणात लावलेले असतात की त्याला तुम्ही दृश्य प्रदूषण म्हणू शकता. पण मला या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या चित्रकलेसाठीचं खाद्य मिळतं. एक कलाकार म्हणून आपण हे सगळं अनुभवत असतो पण यापासून थोडेसे अलिप्त होऊ  शकलो तर त्या दृश्यातले विविध आकार, त्याचे रंग, छटा, त्या आकारांच्या हालचाली आपल्याला जाणवू लागतात.

आपोआप एक आकृतिबंध आपल्यासमोर साकार होऊ  लागतो आणि आपण फक्त चित्र काढत नाही तर त्या सगळ्या आजूबाजूच्या प्रदूषणाचा आपल्याला त्रास होणं ही बंद होतं आणि पुन्हा एकदा आपल्या अभिव्यक्तीच्या वर्तुळाची अनुभूती  घेऊ  शकतो. हेही नसे थोडके!

माझ्यासाठी माझा स्टुडिओ हे माझं हक्काचं घर आहे जिथे माझ्या सर्व कल्पनांना, भावनांना, विचारांना, आठवणींना दृश्य स्वरूप देता येतं. तिथे मी फक्त एक माध्यम असतो आणि माझा स्टुडिओ हे या सगळ्याच केंद्रस्थान असते..मग ती चित्रकला असू दे, वाचन असू दे, नुसताच वेळ घालवणं असू दे, स्टुडिओत मी माझा मी असतो. अशी एक जागा जिथे कसलेच अभिनिवेश नाहीत, ढोंग, सोंग, बतावणी, बहाणे नाहीत, मी एकटा असतो, स्वतंत्र असतो, प्रयोगशील असतो. कधी कधी स्टुडिओला भेट द्यायला आलेले लोक किंवा माझे विद्यार्थी मला विचारतात की तुम्ही एकच चित्र परत परत का काढत राहता? तुम्हाला कंटाळा येत नाही का? तर त्याचं उत्तर आहे की मी तेच चित्र वेगवेगळ्या रंगाच्या माध्यमातून काढत राहतो. प्रत्येक वेळी चित्र काढताना मला वेगळा अनुभव, वेगळं शिकायला मिळतं, वेगळी दृष्टी, वेगळी जाणीव मिळते. प्रत्येक वेळी रंग वेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देतात, ज्यातून एक प्रकारची अपूर्णता येत राहते आणि मला परत परत तेच तेच चित्र काढण्यासाठी उद्युक्त करत राहते. हे सगळं माझ्या स्टुडिओत सहज शक्य असतं कारण तिथे भरपूर वेळ आणि पुनरावृत्तीची मोकळीक असते. पूर्ण चित्रकलेचा प्रवास हा जसा बाहय़ स्वरूपात असतो तसाच तो अंतर्गतही असतो. आयुष्यात येणारे अनुभव, दृश्य अनुभव, तयार होणाऱ्या प्रतिमा, कल्पनाशक्ती या सगळ्या गोष्टी व्यापक स्वरूपात व्यक्त करणं गरजेचं असतं. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यावर बळजबरीने लादली जाते, जसं की सिग्नलला थांबणं तिथे तुमची निरीक्षणशक्ती जागृत ठेवली तर चित्रकलेत अनेक प्रयोग करता येऊ  शकतात. जे तुमच्या चित्रकलेच्या प्रवासात प्रेरणादायी ठरू शकतात. हे मला स्टुडिओत शक्य होतं.

रोज मला प्रश्न पडतो, कुठलं चित्र काढावं. जुन्या संदर्भाने चित्र काढावं की कुठल्याशा अपूर्ण राहिलेल्या चित्राला नव्या आठवणींनी उजाळा द्यावा. का मग कुठले तरी जुने विषय जे अनेक दिवस मनात घोळत राहिलेत त्यांना चित्रातून मूर्त रूप द्यावं? एखादं वास्तववादी चित्र काढावं की वेगळे काही प्रयोग करावेत. मोठं चित्र काढावं, माझे स्वत:चे विचार मांडावेत की एखाद्या प्रदर्शनासाठी चित्र काढावं, काय विषय निवडावा, पेपर आडवा धरावा की उभा? असे किती तरी प्रश्न मनात रोज गर्दी करतात. एका चित्रावरून मनात हे किती गोंधळ! प्रत्येकाच्या आयुष्यात हे असे छोटय़ा छोटय़ा निर्णयप्रक्रियेचे गोंधळ चालू असतात. आपला आपल्याशी सतत एक वाद चालू असतो. याला काही एक निश्चित असं उत्तर नाही. एक तर तुम्ही स्वत:च एक काही तरी ठरवून त्या दिशेने जाऊ  शकता किंवा निर्णयप्रक्रियेत जे घडेल ते घडेल. काही प्रश्न सुटतात, काही तसेच राहतात. एखादे चित्र सुरू करायच्या वेळी मला नेहमी हा प्रश्न पडतो की मी ‘टोनलिस्ट’ म्हणून चित्र काढायचं की ‘कलरिस्ट’ म्हणून. म्हणजे चित्रात रंग कमी वापरून छटांना जास्त महत्त्व द्यायचं की रंगांचीच विविधता अधिक परिणामकारक वाटेल. का मी दोन्हीचा समन्वय साधू एकाच वेळी. चित्र सुरू करण्याच्या आधी चित्राकाराच्या मनात या प्रश्नांची उत्तरं तयार पाहिजेत असं अजिबात माझं म्हणणं नाही. चित्राचा विषय किंवा आपली मन:स्थिती जशी असेल तशी प्रतिक्रिया चित्राला दिली जाते. मी स्वत:ही बरेच वेळा गोंधळात पडतो की चित्राला कसं हाताळावं. याला समाधानकारक उत्तर मिळालंच पाहिजे, असं नाही पण चित्र काढताना या गोंधळाची जाणीव जरी असली तरी तेवढं पुरेसं असतं कधी कधी!

चित्र काढणं कधी थांबवावं हा एक सर्वसामान्य पण खूप जास्त वेळा अनुभवला जाणारा गोंधळ आहे. आपल्या एखाद्या अनुभवावर/आठवणीवर आधारित किंवा छायाचित्राच्या साहाय्याने चित्र काढत असताना बरेच वेळा असं होतं की आपण त्या प्रतिमेने भारावून गेलेले असतो. एका अनुभवसिद्ध वास्तव चित्राला एखाद्या दर्शकाकडून स्वाभाविक ‘वॉव’ आल्यावर जे समाधान कलाकाराला मिळतं ते अति तपशिलात शिरून चित्र कोरत बसण्याने मिळेलच असं नाही. थोडक्यात, आयुष्यात काय आणि चित्रात काय, कुठे थांबायचं हा गोंधळ खूप जाणवतो. चित्रकाराला जोपर्यंत माहिती नसतं की तो चित्र कसं काढतोय तोपर्यंत ते चित्र छान असतं. जेवढं जास्त एखाद्या गोष्टीचं ज्ञान, तेवढं जास्त सावध आपण होत जातो की चित्र कसं येईल आणि त्यामुळे बरेचदा चित्रातली सहजता आपण घालवून बसतो. स्वयंस्फूर्तीला आवर घालून आपण पूर्ण चित्र ठरवून काढलं तरी त्यात गैर काहीच नाही. फक्त त्यात चित्र कसं येईल ही चिंता बाळगण्याचं कारण नाही. थोडक्यात तुम्हाला जे जसं वाटेल तसा दृष्टिकोन चित्राच्या बाबतीत असू द्यावा.

एखाद्या चित्राला जेव्हा ‘वाहवा’ मिळते तेव्हा चित्रातल्या तांत्रिक बाबींना ती दाद नसते तर सौंदर्य स्थळांना असते. चित्रकाराच्या दृष्टीला असते. चित्रकाराचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो की त्याला कुठल्या प्रकारे ते चित्र दर्शकांसमोर ठेवायचं आहे. तुमची मन:स्थिती ही ती दृष्टी ठरवण्यासाठी गरजेची असते. चित्रकलेचे तंत्र, विषय सोडून कुठलाही मुद्दा असू शकतो, उदाहरणार्थ, एखाद्या जागेची अनुभूती, शहरातला गडबड गोंधळ, निसर्गातील शांतता, प्रसन्नता, एखाद्या गोष्टीतली भावनिक गुंतवणूक, वैयक्तिक आनंद, दु:ख..काहीही! थोडक्यात चित्रकाराच्या भावना या चित्राला एक नुसती कागदावर रेखाटलेली कलाकृती न ठेवता एक जिवंतपणा देत असतात. एखाद्या आंतरिक भावनेचं प्रकटीकरण म्हणजेच चित्रकाराची दृष्टी जी भावनिक प्रतिसादावर ठरते..जाणिवेच्या पलीकडचे विचार मला चित्र काढायला उद्युक्त करतात. माझी व्यक्त होण्याची पद्धत आपण समोरच्या दृश्याशी कसे जोडले जातो त्यावर अवलंबून आहे. अभिव्यक्तीत प्रामाणिकपणा हवा म्हणजे हवा तो परिणाम साधता येतो. थोडक्यात ती दृष्टी तयार होणं गरजेचं आहे. त्यासाठीची कसलीही ठरावीक सूत्र नाहीत. ग्रहणक्षमता आणि स्वानुभव यावर त्या दृश्याशी जोडलं जाणं अवलंबून असतं.

या सगळ्या विचारमंथनाचं सार काढायचं तर मनाचा जास्तच गोंधळ उडेल. बुद्धिनिष्ठांच्या आयुष्यातले सातत्य, सुसंगती हे त्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे असतात. त्यामुळे माझ्या मते इथे कसलाच निष्कर्ष काढण्याची गरज नाही. जोपर्यंत आपल्या विचारप्रक्रियेत, धाटणीत, हाताळणीत एक पुरोगामी बदल दिसून येतोय तोपर्यंत या प्रवासाला अंत नाही. पण मग मनातल्या गोंधळाला कसं हाताळायचं?. एका मुलाखतीत मला विचारलं होतं की माझा सल्ला काय या बाबतीत. त्यावर माझा स्वत:चा विश्वास असलेलं एकच वाक्य मी सांगू शकलो ते म्हणजे ‘२ँ४३ ४स्र् ंल्ल िस्र्ं्रल्ल३ ’.. गप्प बसा आणि चित्रावर लक्ष द्या ) जे मीही रोज स्वत:च स्वत:ला बजावत असतो. हे वाक्य एखाद्याला खटकू शकेल पण जितकी तुम्ही त्या चित्राची चर्चा कराल तेवढी त्यातली गंमत हरवून बसाल. त्यामुळे फक्त चित्रातून व्यक्त व्हा! यामागचा अजून एक गर्भितार्थ असा की जेवढा आतला गोंधळ संपुष्टात येईल तेवढी सर्जनशीलता चित्रात वाढत जाईल. माझ्या ‘एक्स्प्रेशन्स इन वॉटरकलर’ या ज्योत्स्ना प्रकाशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी पुस्तकात  चित्रकार म्हणून माझी भूमिका मी अधिक नेमकेपणाने आणि विस्तृतपणाने मांडली आहे.
एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की प्रत्येक माणूस वेगळा आहे, अद्वितीय आहे. प्रत्येकाने या प्रवासातला आपापला रस्ता निवडायचा आहे. कसलेही नियम नाहीत, सूत्र नाहीत. कला ही उपयुक्ततेसाठी नसून ते एक आकलन आहे, एक बोध आहे, अभिव्यक्ती आहे, स्वातंत्र्य आहे. तरीही आपण सर्वच मान्यता मिळावी म्हणून चित्र काढतो, स्वत:ला आनंद मिळावा म्हणून चित्र काढतो. चित्रकलेचा कुठलाच एक असा उद्देश, हेतू नाही. मग काय आहे आपल्या चित्र काढण्यामागचा उद्देश? शोधून काढायचंय? मग चित्र काढत राहा! सापडेल आपलाच आपल्याला कधी तरी तो हेतू!

– मिलिंद मुळीक