News Flash

माझ्या लेखकांच्या छायेत मी सुखावलो, नावाजलो

माझा जन्मच पुस्तकांच्या दुकानात झालेला. बालपणापासून ग्रंथकर्मीचा घरी राबता असायचा

‘‘ज्याला ललितेतर, माहितीपर साहित्य-‘लिटरेचर ऑफ नॉलेज’ म्हणता येईल अशा क्षेत्रांत प्रकाशकाला खूप काही करता येते हे मला जाणवत होते. मी माझ्या कॉलेजच्या दिवसांतच मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाला सुरुवात केली. माझे लेखक एवढे मोठे की त्यांच्या छायेत मी सुखावलो आणि प्रकाशक म्हणून नावाजलो गेलो.’’

माझा जन्मच पुस्तकांच्या दुकानात झालेला. बालपणापासून ग्रंथकर्मीचा घरी राबता असायचा. एक प्रकाशक मित्र आपल्या व्यवसायाचा ‘पुस्तकांचे गठ्ठे सांभाळणारा’ अशी व्याख्या करायचे. पुढे कोणी तरी ‘लेखकांना आरती ओवाळणारा’ अशीही केली. त्याच्याकडे आलेल्या हस्तलिखितांतून निवड केलेली पुस्तके छापून घेऊन ती पुस्तक विक्रेत्यांमार्फत विकू पाहणे हे निरुद्योगी प्रकाशकांचे मुख्य काम अशी बहुतेकांची समजूत असते. पण ललित साहित्याच्या बाबतींत पुस्तकांची निवड करताना प्रतिभावान लेखक-लेखिका जे लिहितील त्यातून निवडून योग्य ते छापणे असे निदान मी मानत आलो. हरिभाऊ मोटे किंवा श्री. पु. भागवत हे सर्जनशील प्रकाशक लेखकांबरोबर काम करताना मी पाहिले आहे. तरीही लेखकांच्या प्रतिभेला जागृत करणे, स्फुरण देणे, क्वचित वळण लावणे या पलीकडे प्रकाशकच काय, तर इतर कोणीही विद्वान मास्तरही काहीही करू शकत नाही.
परंतु ज्याला ललितेतर, माहितीपर, साहित्य-‘लिटरेचर ऑफ नॉलेज’ म्हणता येईल अशा क्षेत्रांत प्रकाशकाला खूप काही करता येते हे मला जाणवत होते. मी माझ्या कॉलेजच्या दिवसांतच मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाला सुरुवात केली. माझे लेखक एवढे मोठे की त्यांच्या छायेत मी सुखावलो आणि प्रकाशक म्हणून नावाजलो गेलो. परंतु पॉप्युलरचा व्यवहार सुरुवातीपासून प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांचा. आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवत होतो तो ब्रेड आणि केक खाऊन, चपाती किंवा फुल्का खाऊन नव्हे. मी पूर्ण वेळ कामाला लागलो तो इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशनाने.
माझे वडील वैद्यकीय पुस्तके प्रकाशित करू लागले आणि दादा सदानंद याने प्रा. घुय्रे आणि प्रा. कोसंबी यांसारख्या विद्वानांची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यामुळे डॉक्टर, विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्यात ‘पॉप्युलर’चे नाव पोचले. परंतु त्या बाहेरच्या वाचकांपर्यंत पोचण्याची संधी मिळाली १९६४ साली. त्या वर्षी नोव्हेंबरमधे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ७५ वष्रे पूर्ण होणार होती. त्यांच्या अमृत महोत्सवासाठी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित समितीने तयार केलेल्या चित्रमय चरित्राचे प्रकाशन ‘पॉप्युलर’ने करावे असे ठरले. मे महिन्यामध्ये जवाहरलालजींचा मृत्यू झाल्याने तो स्तुतिग्रंथ स्मृतिग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला.
यानंतर प्रकाशक म्हणून माझी काही कर्तव्ये आहेत याची मला जाणीव झाली. नेहरूंच्या अखेरच्या वर्षांत ‘नेहरूंनंतर कोण’ हा प्रश्न सारखा समोर येत होता. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रश्न वेलेस हँगन या एका अमेरिकन पत्रकाराने केला होता. त्या पुस्तकातील आठ प्रकरणांत एक प्रकरण लालबहादूर शास्त्री यांच्यावर होते. प्रत्यक्षात अनपेक्षितपणे ते पंतप्रधान झाले तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी या प्रकरणाबाहेर काहीही माहिती नव्हती. ही परिस्थिती सुधारणे प्रकाशक म्हणून माझ्या हाती आहे याची मला अंधुकपणे जाणीव झाली. त्यांचे विस्तृत चरित्र लिहून घेऊन ते प्रसिद्ध व्हायला हवे होते. त्या वेळी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक डी. आर. मंकेकर हे होते. त्यांचा आमचा परिचय होता. लांबचे नाते होते म्हणायला हरकत नाही. चरित्र कोणी लिहावे याबद्दल त्यांचा सल्ला आम्ही घेतला. ते म्हणाले, ‘माझा आणि शास्त्रीजींचा प्रत्यक्ष परिचय आहे. मीच ते चरित्र लिहू शकेन.’ त्यासाठी त्यांच्या जाण्यायेण्याची आणि दिल्लीत राहण्याची व्यवस्था आम्ही केली. काही आठवडय़ांतच ते चरित्र ‘लालबहादूर : ए पोलिटिकल बायॉग्राफी’ या नावाने प्रसिद्ध झाले.
ही १९६४ची गोष्ट. पुढील वर्षी मी दीर्घकाळ अमेरिकेत फिरत होतो. या चरित्राच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीत जॉन डे या प्रकाशन संस्थेला रस होता. या संस्थेचे चालक पर्ल बक या कादंबरीकर्तीशी संबंधित होते. ते ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या नेहरूंच्या पुस्तकाचे मूळ प्रकाशक. त्यांनी मला न्यूयॉर्कला बोलावून घेतले आणि आंतरराष्ट्रीय आवृत्तीसाठी कसा विचार करावा लागतो ते समजावून सांगितले. मिस्टर वॉल्श मला म्हणाले, ‘‘मिस्टर भटकळ, हे पुस्तक भारतीय वाचकांसाठी ठीक आहे. पण लालबहादूरना आम्ही ओळखत नाही. आता ऑगस्टमधील इंडो-पाक युद्धानंतर सर्व अमेरिकनांच्या मनात आदर वाढला आहे तो मिस्टर शास्त्रींविषयी. तेव्हा शीर्षकापासून सुरुवात केली पाहिजे.’’ मग त्यांनी दोन-चार पाने मला तपासून दाखवली. सुरुवातीलाच ‘राजाजी’ आणि ‘अवर इण्डिपेण्डन्स’असे उल्लेख होते. राजाजी यांचा उल्लेख सी. राजगोपालाचारी, िहदुस्थानाचे पहिले िहदी गव्हर्नर जनरल किंवा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असा केल्याशिवाय देशाबाहेर कोणाला काही कळले नसते. तसेच ‘स्वातंत्र्य आपले’ हे पुरणार नव्हते. ते िहदुस्थानचे हा खुलासा आवश्यक होता.
मी ऑक्टोबरमधे भारतात परतल्यावर हे सारे मंकेकरांना समजावून दिले. त्यांची सुधारलेली प्रत तयार होईपर्यंत शास्त्रीजींचे ताश्कंदमध्ये निधन झाले आणि परकीयांचा या विषयातील रस संपला. हे पुस्तक तरीही बऱ्यापकी यशस्वी झाले. लगेच नव्याने पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांच्याविषयी हाच प्रश्न उपस्थित झाला. एकूणच नेहरू कुटुंबाशी मत्रीचे नाते असलेल्या ख्वाजा अहमद आब्बास यांची आठवण झाली. त्यांचा माझ्याशी प्रत्यक्ष परिचय नव्हता तरी आमच्या दुकानाशी होता. जुहूच्या त्यांच्या घरी मी गेलो आणि पहिल्या भेटीतच आमची दोस्ती झाली. बरीचशी माहिती त्यांना होती, तरीही इंदिराबाईंना एक-दोनदा जाऊन भेटणे आवश्यक होते. आब्बास म्हणाले की मी लिहीत जाईन, ते तुम्ही वाचून वाचकाच्या दृष्टीने तुमचे मत द्या. त्या एक-दोन महिन्यांत आमच्या सात-आठ तरी बठका झाल्या. त्यांनी लिहिलेला भाग प्रेसमधे पाठवण्यापूर्वी आमची चर्चा होत असे. मी त्यांच्यासोबत दिल्लीला इंदिराबाईंकडे जाऊन फारसे काही साधले नसते. माहिती मिळवणे त्यांना एकटय़ाला अधिक सोयीचे होते. परंतु आब्बाससाहेबांनी लिहिलेली प्रकरणे वाचत वाचत त्यांच्याशी चर्चा करणे हा एक नवीन अनुभव होता. या पुस्तकासाठी आम्ही करारपत्र केले होते. त्यानुसार या पुस्तकाचे अनुवाद किंवा इतर आवृत्या यांचे हक्कही पॉप्युलरकडे होते. ‘इंदिरा गांधी : रिटर्न ऑफ दी रेड रोज’चे लेखन फार रसपूर्ण झाले होते. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास, त्यातील नेहरू कुटुंबाचा आणि विशेषत:, इंदिरांचा सहभाग, नेहरू पंतप्रधान असताना काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष म्हणून इंदिरा गांधींची कारकीर्द या सगळ्यांशी आब्बास यांचा परिचय होताच. त्यांच्या नात्याला आपुलकीची झालर होती.
आधीचा अनुभव लक्षात घेऊन मी या पुस्तकाच्या निरनिराळ्या आवृत्यांचा पाठपुरावा केला. मूळ पुस्तकाच्या तीन हार्ड कव्हर आवृत्या संपल्या, एक पेपर बॅक आवृत्ती निघाली आणि एकूण आठ भाषिक आवृत्यांचे हक्क आम्ही विकू शकलो. यातून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा फार मोठा नव्हता. तरीही त्या मिळकतीतून आम्हाला मिळणाऱ्या हिश्शाचे आम्हाला कौतुक होते. आब्बास यांनाही अनपेक्षित द्रव्यलाभ झाला.
बांगलादेशच्या निर्मितीनंतर इंदिरा गांधी यांची लोकप्रियता शिगेला पोचली. त्याहून म्हणजे या चार वर्षांत झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श आवश्यक होता. हे सारे इतक्या महत्त्वाचे होते की दुसरे एक पुस्तकच आवश्यक वाटले. आब्बासांनी पुन्हा जबाबदारी स्वीकारली. एव्हाना त्यांना पहिल्या पुस्तकांवर बऱ्यापकी मानधन मिळाले होते. त्यात निरनिराळ्या आवृत्त्यांतून मिळणाऱ्या मानधनाचा त्यांचा हिस्साही होता. आमचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. तरीही त्यांच्या लेखनाच्या जोरावर इतर आवृत्त्यांवर मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग प्रकाशकाला मिळावा हे त्यांना तेव्हा पटले नाही. मी स्वत: मूळ पुस्तकासाठी आणि या विविध आवृत्यांसाठी कष्टही घेतले होते. आणि थोडाफार खर्चही केला होता. तेव्हा या व्यवस्थेत गर काहीही नव्हते. मी करारपत्रात बदल करायला नकार दिला.
दुसऱ्या एका नवीन संस्थेशी त्यांचे बंधू के. जी. सय्यदीन यांचा संबंध होता. त्या संस्थेने ‘दॅट वूमन’ या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन केले. त्यात प्रामुख्याने रणरागिणी इंदिराची करामत होती.
मध्यंतरीच्या काळात इंदिराबाईंनी आणीबाणी पुकारल्यामुळे व्यक्तिश: मी दुखावलो होतो. तरीही त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या एकूण कार्याचे वस्तुनिष्ठ समालोचन आब्बास यांनी करावे असे मला वाटले. आता आब्बासांनी मुलाखत वगरे घेण्याचा प्रश्न नव्हता. त्यांचेही वय झाले होते. जवळजवळ वीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेत तिसरा भाग पूर्ण करायचा होता. आब्बास यांनी तो लिहून दिला. दुसऱ्या भागाच्या आवृत्त्यांचे सर्व हक्क लेखकाकडेच होते. परंतु ते किंवा त्यांचे प्रकाशक मूळ पुस्तक छापण्यापलीकडे काहीही करू शकले नाहीत. या वेळी आब्बास यांनी कोणत्याही हक्कांचा हट्ट तर धरला नाहीच. इतकेच नव्हे तर ‘इंदिरा गांधी : द लास्ट पोस्ट’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आमचे कौतुक करून हे तिन्ही भाग छापण्याची पूर्ण मुभा ‘पॉप्युलर’ प्रकाशनाला दिली. काही प्रमाणात या प्रकारचे काम चालू राहिले.
डॉ. झाकिर हुसेन राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्याविषयी ए. जी. नूराणी आणि व्ही. व्ही. गिरी यांच्यावर जी. एस. भार्गव यांचीही चरित्रे प्रसिद्ध केली ती कर्तव्यभावनेनेच. प्रकाशक म्हणून सार्वजनिक स्वरूपातली आपली कर्तव्ये आहेत याची जाणीव तीव्रपणे झाली ती निवडणुकींच्या संदर्भात. घटना स्वीकारल्यानंतर १९५२, १९५७ आणि १९६२ अशा निवडणुका नियमितपणे दर पाच वर्षांनी होत्या. त्या निवडणुका झाल्यानंतर त्यांचे विवरण करणारी पुस्तके प्रसिद्ध करून आम्ही मागोवा घेत होतो. पण ते नंतरचे शहाणपण होते. या निवडणुका प्रामुख्याने जवाहरलाल नेहरू यांच्या बाजूने किंवा विरुद्ध या प्रकारच्या होत्या. १९६४ मधील त्यांच्या मृत्यूनंतरची १९६७ मधील निवडणूक तरी सिद्धांताच्या जोरावर लढवली जाईल अशी अपेक्षा होती. निवडणुका होत असताना आपण काय करू शकतो याचा मी विचार करू लागलो. त्या दिवसांत निवडणुकांचा काळ निश्चित असायचा आणि प्रत्यक्ष मतदानासाठी बराच अवधी दिलेला असायचा. मतदारांना मार्गदर्शक अशी पुस्तके आपण प्रसिद्ध करावीत असे माझ्या मनाने घेतले. त्या वेळी फक्त सात पक्षांना अखिल भारतीय पक्ष अशी मान्यता होती. प्रत्येक पक्ष आपापला जाहीरनामा प्रसिद्ध करत असे. परंतु बहुतेक जाहीरनामे जुजबी, क्वचित फसवेही असत. मी आधी काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या सल्ल्याने एक प्रत्येकाला ग्रासणाऱ्या प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. सगळी नावे आठवत नाहीत. परंतु ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चे तत्कालीन संपादक ए. एस. रामन हे एक होते. इतर मंडळींत कोणी राजकारणी नव्हते, हे नक्की. या जनतेच्या प्रश्नांना प्रत्येक पक्षाच्या वतीने उत्तर लिहून घेऊन ती नियोजित अवधीत उपलब्ध करून द्यायची होती. यासाठी प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांपासून सुरुवात करून योग्य त्या नेत्याकडून साठेक पानांची पुस्तिका तयार करून ती एक एक रुपयाला बाजारात आणायची होती. तीही महिनाभरात. पहिले आव्हान या व्यग्र राजकारण्यांकडून लिहून घेण्याचे होते.
सर्वात मोठा पक्ष काँग्रेस. मी दिल्लीला जाऊन अध्यक्ष कामराज नाडर यांना भेटलो. त्यांना भाषेची अडचण होतीच. शिवाय पक्षाचे सचिव सादिक अली यांच्याकडे बोट दाखवणे त्यांना सोयीचे होते. त्यांनीही इतर काही कारणे सांगितली. पक्षात निरनिराळ्या प्रवृत्तीचे नेते होते. कोणाचे म्हणणे हे पक्षाचे म्हणणे मानावे, हा प्रश्नच होता. तरीही मी उजवे समजले जाणारे स. का. पाटील आणि डावे समजले जाणारे यशवंतराव चव्हाण यांना विचारून पाहिले. ते आपापल्या प्रचारकार्यात मग्न होते. मी त्या वेळी स. गो. बर्वे यांचे एक पुस्तक प्रसिद्ध करत होतो. प्रशासकीय सेवेतून निवृत्त होऊन ते राजकारणात शिरले होते. काँग्रेस सोडून गेलेले कृष्ण मेनन यांच्याविरुद्ध ते त्या वेळी मुंबईतून अटीतटीची निवडणूक लढवत होते. मी त्यांना माझी अडचण सांगितली. ते स्वत:च्या प्रचारात गुंतले होते, तरीही त्यांनी कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारली. रोज पहाटे काही काळ माझ्यासाठी राखून ठेवला.
17
जनसंघाचे तीन महत्त्वाचे नेते होते. त्यापकी कोणाचीच माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांना दिल्लीत गाठायचा प्रयत्न केला. परंतु पक्षाचा जाहीरनामा असताना हे असे काही पुस्तक करण्याचे महत्त्व त्यांना पटेना. मुंबईत जनसंघाचे काम डॉ. वसंतकुमार पंडित बघत. त्यांची मदत मागितली. त्यांचा एका पुस्तकाच्या निमित्ताने आमच्या दुकानाशी संबंध होता. पण ते कशाचे डॉक्टर हे कोणालाच सांगता येईना. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या कन्सिल्टग रूममधे एक एक जण जात असे. दरवाजा उघडाच होता. पण ते कोणाला तपासताना दिसत नव्हते. एकदा वाटले की ते होमिओपॅथ असावेत, फक्त लक्षणे विचारणारे. प्रत्यक्षात ते एक अत्यंत यशस्वी ज्योतिषी होते. सगळी मंडळी त्यांचा भविष्यविषयक सल्ला घेत होती. त्यांच्या मदतीने बलराज मधोक यांनी जनसंघाचे म्हणणे मांडले. मधोक मंबईत आले होते त्यामुळे काम सोपे झाले. स्वतंत्र पक्ष चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी सुरू केला होता. एके काळी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, शिवाय ते महात्मा गांधीजींचे व्याही होते. पण आता त्यांना उदारीकरणाचे महत्त्व पटले होते. मुंबईत मिनू मसानी त्यांचे काम पाहात. मसानी उत्तम प्रशासनाशिवाय पट्टीचे लेखक. त्यांनी ठरल्यानुसार लिहून दिले. या उजव्या पक्षांच्या विरुद्ध टोकाला जे चार पक्ष होते त्यात समाजवादी पक्षाचे प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी असे दोन पक्ष झाले होते. त्या दोन्ही पक्षांचे अध्यक्ष पुण्यातलेच. एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे. त्यांना राजी करणे कठीण नव्हते. प्रत्यक्ष लेखन मधू दंडवते आणि मधू लिमये यांनी केले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामधून माíक्सस्ट वेगळे झाले होते. डांगेंच्या कम्युनिस्ट पक्षासाठी श्रीनिवास सरदेसाई पुढे सरसावले. माíक्सस्ट पक्षाला अध्यक्ष नसतो. त्यांचे सचिव सुंदरैया यांनी पत्राने कळवले की, पक्षाच्या जाहीरनाम्यापलीकडे कोणीही लिहिणार नाही. या बहुतेकांना भेटूनच मी त्यांना लिहायला उद्युक्त करत असे. आपल्या या लेखनाला काही महत्त्व आहे असे त्यांना वाटायचे हे आजच्या दूरचित्रवाणीच्या काळात कोणाला खरे वाटणारे नाही.
‘व्हाय काँग्रेस?’ इत्यादी सात पुस्तकांचा संच तयार करताना फक्त सी.पी.एम.चा जाहीरनामाच छापावा लागला. ते लेटरप्रेसचे दिवस. छपाई मशिनचा वेग फार नसायचा. तेव्हा या पुस्तिका रोटरी मशीनवर छापून घेतली. वेळेच्या संदर्भात एक अडचण लक्षात आलीच नव्हती. पुस्तके कितीही घाईत लिहवून आणि छापून प्रसिद्ध केली तरी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचायला त्वरेने पाठवणे कठीण होते. शिवाय पुस्तके स्वस्त देतो ही आमची मिजास, पण अशी एक एक रुपयांची पुस्तके घाईघाईत विकण्यात नेहमीच्या विक्रेत्यांना रस नव्हता. फेरीवाल्यांकडे आम्ही पोचू शकत नव्हतो. एकूण हा सगळा उपक्रम ‘गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले’ या थाटाचा झाला.
आनंद फक्त वैयक्तिक पातळीवर- आपण काही तरी करायचा प्रयत्न केल्याचा, निराळ्या पद्धतीने प्रकाशन केल्याचा. हे सर्व थोर नेते होते. आपापल्या निष्ठेने अनेक वष्रे सार्वजनिक कामात म्हटले तर नि:स्वार्थ वृत्तीने गुंतलेले होते. सत्ता मिळवणे हे राजकारणाचे उद्दिष्ट असे मानतात. ती ईर्षां या सर्वाना वैयक्तिक आणि पक्षीय पातळीवर असणारच. तरीही आपापल्या सिद्धांतांचे महत्त्व त्यांना पटले होते. गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला माझ्या एकूण योजनेची कल्पना होती. तरीही मी जणू त्यांच्या पक्षाचाच हितचिंतक आहे असे त्यांना वाटत होते. त्यांच्याशी जुळवून घेतल्याशिवाय त्यांच्याकडून हे काम करून घेणे अशक्य होते, माझ्या राजकीय शिक्षणाची ही एक मोठी संधी होती.
प्रामुख्याने दोन गोष्टी शिकलो. देशाचे आणि समाजाचे प्रश्न सोडवायचे अनेक मार्ग आहेत. त्या सर्वाचा गंभीरपणे विचार होऊ शकतो. या उलट प्रत्येक पक्षाच्या विचारांत काही पटण्यासारखे तर काही अजिबात न पटण्यासारखे असते. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा स्वीकार करण्यापूर्वी दहादा विचार केला पाहिजे आणि सर्वात म्हणजे पक्षीय राजकारण टाळले तरी नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याचे भान ठेवले पाहिजे.

नोव्हेंबर १९६४ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ७५ वष्रे पूर्ण होणार होती. त्यांच्या अमृत महोत्सवासाठी राष्ट्रपती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित समितीने तयार केलेल्या चित्रमय चरित्राचे प्रकाशन ‘पॉप्युलर’ने करावे असे ठरले. पण मे महिन्यामध्ये जवाहरलालजींचा मृत्यू झाल्याने तो स्तुतिग्रंथ स्मृतिग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला.

माझे वडील वैद्यकीय पुस्तके प्रकाशित करू लागले आणि दादा सदानंद याने प्रा. घुय्रे आणि प्रा. कोसंबी यांसारख्या विद्वानांची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यामुळे डॉक्टर, विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्यात ‘पॉप्युलर’चे नाव पोचले. पॉप्युलरचा व्यवहार सुरुवातीपासून प्रामुख्याने इंग्रजी पुस्तकांचा. आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवत होतो तो ब्रेड आणि केक खाऊन, चपाती किंवा फुल्का खाऊन नव्हे. मी पूर्ण वेळ कामाला लागलो तो इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशनाने.

ramdasbhatkal@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2016 1:30 am

Web Title: popular publication ramdas bhatkal share his life experiences
टॅग : Reading
Next Stories
1 गजऱ्यातला न दिसणारा दोर
2 इंद्रायणीकडून चंद्रभागेकडे..
3 सुख सुख म्हणजे याहून काय असतं?
Just Now!
X