12 July 2020

News Flash

.. आणि अनेक उर्मिला भेटल्या

मी-मुंबईतल्या माझ्या अवतीभवतीच्या स्त्रियांच्या दु:ख वेदनेवर लिहीत होते

19उर्मिला पवार
लेखिका, कार्यकर्त्यां

१९८०-८२ पासून दलित वर्गातील स्त्रियांचं लेखन जातीवादाबरोबरच स्त्रीवादाकडेही झुकू लागलं होतं. स्त्री हीसुद्धा एक माणूस आहे. दलित स्त्री ही क्लास, कास्ट आणि जेंडर या तिन्ही पातळ्यांवर सर्वापेक्षा जास्त दु:ख भोगते आहे त्यादृष्टीने या स्त्रियांचा विचार झाला पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशा अर्थाचा एकूणच गोषवारा आम्ही व्यक्त करत होतो. ‘आयदान’ लिहिताना माझ्याकडून या गोषवाऱ्याचा वळसा जरा जास्तच झाला म्हणजे बाईला तिच्या शरीराच्या अवस्था, गरजा, भुकांवरही बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार आहे हे मी अगदी जैविक अधिकारानं लिहिलं. अर्थात मीच हातात दिलेल्या या सगळ्या शस्त्रांनी मग एक-दोघांनी माझीच व्यवस्थित चिरफाड केली. असं जरी असलं तरी ‘आयदान’चं स्वागत
चांगलं झालं.. नाटकाच्या निमित्तानं तर मला अनेक उर्मिला भेटल्या..

एकदा भगवान वर्धमान महावीरांना भेटायला त्यांचा मित्र त्यांच्या प्रासादात आला. तळातच त्याला वर्धमानांची आई भेटली. तिला त्याने विचारलं, ‘‘वर्धमान कुठे आहे?’’ ती म्हणाली, ‘‘वर आहे.’’ तो प्रासादाच्या वरच्या भागात गेला तिथे त्याला वर्धमानांचे वडील दिसले. ते म्हणाले, ‘‘वर्धमान खाली आहे.’’ ही दोघंही खोटं का सांगत आहेत असा विचार करत तो मित्र खाली उतरत असता मधल्या भागात त्याला वर्धमान भेटले. तो प्रसंग पुढे ठेवत एखाद्या घटनेचा आपण सर्वागाने विचार कसा केला पाहिजे हे तत्त्वज्ञानच अनेकांतवादातून वर्धमान महावीरांनी सांगितलं आहे. लेखक लिहिताना या वादाचा कळत नकळत विचार करतच असतो. तरीही त्याचा डोळा चुकवून काही गोष्टी राहून जातात किंवा वेगळे अर्थ घेऊन येतात जे अर्थ वाचक, समीक्षक आणि काही वेळेला प्रकाशकही नेमकेपणानं समोर आणतात. काही जण त्यावरून रण पेटवतात तर काही ‘दृष्टी आडची सृष्टी’ तसे अगदी गाभ्यातले अर्थ उलगडून चकीतही करतात..
मी लिहायला लागले तो काळ १९७५-७६चा, दलित चळवळ भरात आल्याचा आणि स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाल्याचा होता. जन्माने दलित आणि स्त्री असे दोन्ही अनुभव माझ्या गाठीशी होते. १९७२ला दलित पॅन्थर चळवळ ‘ठोशास ठोसा’ याच तत्त्वावर उभी राहिली होती. त्यामुळे पॅन्थरमध्ये स्त्रियांना जमेस धरलेलं नसावं. तशी दलित स्त्री ही समाज मनावर अदृश्यच होती. मी आणि मीनाक्षी मून, आम्ही दोघींनी ‘आम्हीही इतिहास घडवला’ या पुस्तकासाठी आंबेडकरी चळवळीत प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलेल्या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्या स्त्रियांच्या अगदी दारापर्यंत जाऊनही, ‘‘अहो कायतरीच काय कुठे होत्या चळवळीत स्त्रिया?’’ असे नकारात्मक प्रश्न लोक आम्हालाच विचारत होते. ही नकारात्मक दृष्टी आताशी मात्र थोडीशी बदलू लागली आहे. त्या वेळी नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, राजा ढाले, अर्जुन डांगळे असे आंबेडकरी विचाराने भारलेले अनेक तरुण प्रत्यक्ष लढा आणि लेखनातून चळवळ पुढे नेत होते त्याचे पडसाद स्त्रियांच्या लेखनातूनही उमटत होते. हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, कुमुद पावडे, बेबीताई कांबळे यांच्या सोबत मीही नव्या जाणिवांनी लेखन करत होते.
मी-मुंबईतल्या माझ्या अवतीभवतीच्या स्त्रियांच्या दु:ख वेदनेवर लिहीत होते, पण माझ्या मनात मात्र माझं बालपण ज्या आयाबहिणींच्या आणि गावातल्या स्त्रियांच्या सहवासात गेलं त्या सगळ्या स्त्रिया टक्क जाग्या होत्या. मी त्यातल्या कुणावरही फारसं लिहिलं नव्हतं. आत्मकथन लिहावं हे फक्त मनात होतं.. ‘सहावं बोट’ या माझ्या कथासंग्रहावर लिहिताना
मधु मंगेश कर्णिक म्हणालेसुद्धा की, ‘‘ही लेखिका ज्या समाजात जगली, वाढली त्यातलं लिहायला बरंच काही असताना आत्मकथनाकडे न वळता कथेकडे वळली.’’ कदाचित माझ्या कथेचा वकूब पाहून त्यांनी तसं म्हटलं असावं. लेखकाचं सुरुवातीचं लेखन आत्मकथनच असतं म्हणतात. म्हणूनच की काय मी माझ्या बहिणीला तिच्या सासरची माणसं कशी सासुरवास करत होती त्यावर ‘वेगळी’ नावाची कथा लिहिली. माझा भाऊ मुलगा होण्याची वाट पाहात होता त्यावरही ‘शल्य’ ही कथा लिहिली. त्या कथा अंकांमधून प्रसिद्ध झाल्या. पण मला मात्र भीती वाटली की त्या भावाने किंवा मेव्हण्यांनी वाचल्या तर ते रण पेटवतील. पण ते अंक पुढय़ात असूनही आणि त्यात तुमच्यावर लिहिलेलं आहे असं माझ्या नवऱ्याने त्यांना मुद्दाम सांगूनही ‘नंतर वाचू’ म्हणत त्याकडे दोघांनीही ढुंकून पाहिलं नाही. त्यातून वाटलं, लेखक जन्मावा लागतो तसा वाचकही जन्मावा लागत असावा.
18
एका दिवाळी अंकासाठी आमच्या गावाकडच्या काही आंबे विकणाऱ्या स्त्रियांची माझ्या मनात डुचमळणारी वेदना ‘कवच’ नावाच्या कथेत मी लिहिली. आंबा, केळी, भोपळा वगैरे विकणाऱ्या स्त्रियांना त्याच्या आकारावरून काही आंबटशौकीन पुरुषांच्या द्वय़र्थी बोलण्याला सामोर जावं लागतं. मिळेल त्या पैशात बाजारहाट करून गावाकडे भुकेजल्या पोराबाळांजवळ जाऊ बघणारी गरीब स्त्री त्या द्वय़र्थी बोलण्यातला अपमान लक्षात येऊनही दुर्लक्ष करते. स्त्रियांच्या या अगतिकतेचा फायदा घेणाऱ्याकडे त्या कथेतून लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला. तर अशा पुरुषांवर, त्यांच्या विकृतीवर काही न बोलता माझी कथाच अश्लील ठरवण्यात आली. एवढंच नाही तर एस.एन.डी.टी.च्या अभ्यासक्रमात १९९१ला घेतलेली ती कथा आणि तशाच एक-दोघींच्या कथा काढून टाकाव्या यासाठी आंदोलनेही झाली. तेव्हा ‘पोहरा बुडतो, बोलणारा अडतो आणि लिहिणारा नडतो’ या म्हणीचा मला अर्थ कळला. करणाऱ्यालाच त्रास असतो.
१९८०च्या सुमारास मी नोकरी संसार करून माझं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पुढे नेत होते. एम.ए.ला आम्हाला डॉ. व. दि. कुलकर्णी, रमेश तेंडुलकर, गंगाधर पाटील अशी समीक्षेतली दिग्गज मंडळी ‘मराठी’ शिकवत होती. त्यातून अक्षरवाङ्मय वारंवार समोर येत होतं. जी. ए. कुलकर्णी, मर्ढेकर, पानवलकर, भालचंद्र नेमाडे, प्र. ई. सोनकांबळे, लक्ष्मीबाई टिळक वगैरे शिकताना समोर आलेल्या रूपबंधात्मक, आदिबंधात्मक, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय वगैरे समीक्षांमुळे आपल्या लेखनाची जागा कोणती, असा प्रश्न पडला नि कथाबिथा लिहिण्याची भीतीच वाटली. खरं तर त्या समीक्षांच्या वाटेला गेलेल्या कोणत्याही लिहित्या माणसाला ती वाटावी असाच त्यांचा दरारा होता. पण नंतर माझं मीच समजून गेले की माझ्यासाख्या ए, बी, सी गिरवणाऱ्या व्यक्तीनं तशी भीती बाळगणं हा त्या निकषांचाच अपमान आहे. मी मग पुन्हा निर्धास्त होऊन लिहू लागले. आत्मकथन डोकं वर काढत होतं, पण अशा मोठय़ा लेखनाला वेळ हवा. वेळेचं काय? कवितेचं ठीक आहे ती उद्गारासारखी उमटते आणि कागदावर निमूटपणे उतरूनही जाते. पुरुषांना वाटेल तितका वेळ लेखनाला देता येतो. आयतं पानावर बसता येतं. स्त्रियांना ते पान तयार ठेवावं लागतं. लिहिणारा पुरुष कौतुकाचा आदराचा धनीही होतो तर बाई घरकाम टाकून हे काय करते म्हणून तिच्या नावाने खडे फुटतात. म्हणूनच बाया उतारवयातच सिंहावलोकन करत असाव्यात. माझ्या कामाच्या रगाडय़ात माझंही तसंच झालं होतं, पण आठवणी धडका देतच होत्या. ‘आयदान’ तेव्हा न लिहिण्याचं आणखी एक कारण असं झालं होतं की, आत्मकथनातला प्रांजळपणा लेखकावर कसा उलटतो ते मी जवळून पाहात होते. १९७६ला दया पवारांचं ‘बलुत’ प्रकाशित झालं आणि त्यातल्या सत्य घटनांनी काही वाचकांची डोकी फिरली. ते प्रकाशित झाल्यापासून त्याच्यावर कौतुकाबरोबरच स्वकियांकडून टीकाही जास्त झाली. ‘या लेखकाने आमच्या आयाबहिणींची अब्रू वेशीवर टांगली. आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी हे पुस्तक बुटाच्या ठोकरीनं उडवलं असतं,’ असं आपल्यालाच बाबासाहेब कळले अशा आविर्भावात भर सभेत म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. आत्मकथन आपल्याला झेपणार नाही असं वाटलं. हे म्हणजे सरस्वती नदी जशी हिमालयात उगम पावून कुरुक्षेत्रातून वाहात जाऊन राजस्थानच्या वाळवंटात लुप्त झाली पुन्हा अबू पर्वतात प्रकट होऊन कच्छच्या रणात नाहीशी झाली. पुन्हा तिने सौराष्ट्रात डोकं वर काढून पुढे ती प्रभास इथे समुद्रात विलीन झाली तसं माझ्या आत्मकथनाचं चाललं होतं.
चर्चा, परिसंवाद, अस्मितादर्श मेळावे, दलित साहित्य संमेलने यातून लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, पार्थ पोळके, कुमुद पावडे, बेबीताई कांबळे वगैरेंच्या आत्मकथनावर कुणाकुणाला बोलता, लिहिताना मी पाहात ऐकत होते तेव्हा मला प्रकर्षांने जाणवत होतं की हे सगळं घाटावरच्या काळ्या मातीतलं बोलत आहेत. गावकुसाबाहेरचं सांगत आहेत. यात कोकण नाही. खरं तर कोकणातली दलित वस्ती गावकुसाबाहेर नाही. मात्र बरेचदा ती कडेकपारीत, डोंगरावर असते. तिथली लाल माती, कडेकपारी इथे कुणाच्या लेखनात बोलण्यात दिसत नाही. मग मात्र एकदा ‘आयदान’नं डोकं वर काढलं ते काढलंच. माझ्या बालपणाबरोबरच अनेकजण मग दिसू लागले. गावात जांभा दगड कोरून चिरे काढणारे, तासणारे त्या दगडाचाच भाग झालेले घामाच्या धारात निथळणारे पुरुष, शिक्षणानं त्या कष्टातून सुटका करून घेतलेले शिक्षक बनलेले माझे वडील, सूप, रोवळ्या अशी ‘आयदान’ बनवणारी माझी आई, डोंगर-घाटय़ा चढत उतरत, धापा टाकत मैलोगणिक अनवाणी चालत लाकडाच्या भाऱ्या, गवताच्या वरंडी, आंबे, काजू बाजारात विकायला येणाऱ्या गावातल्या नात्यातल्या बायका एकेक करत सर्वजण पुढय़ात ठाकलेच. मी मग ‘लोकसत्ता’च्या २००३च्या दिवाळी अंकात प्रथम त्या स्त्रियांना वाट मोकळी करून दिली. ‘लोकसत्ता’नेही कोकणातल्या डोंगरांचे चढते उतरते घाट दाखवून त्या स्त्रियांच्या मूक वेदनेला गहिरं केलं. ‘अबब हत्ती’ या मुलांच्या मासिकासाठी मी कधी तरी लिहिलेले; शाळेला दांडय़ा मारण्यावरून मार खाल्ल्याचे, खाण्यापिण्याच्या दुर्भिक्षाचे वगैरे दोन-तीन भाग मी माझ्या बालपणाला जोडले आणि मग माझ्या लेखनाने वेग घेतला. इथे एक गोष्ट झाली की आयुष्यातील कोणते प्रसंग लिहावे आणि वगळावे, हा प्रश्न मला पडला नाही कारण माणूस म्हणून उभं राहण्याची जी प्रक्रिया असते ती या वयापर्यंत मला उमगलेली होती. त्यातून आपोआपच आवश्यक ते प्रसंग एकापुढे एक येत गेले. उदाहरणार्थ १९५६ नंतर गावोगावी झालेल्या धर्मातरापैकी १९५७ मध्ये माझ्या वयाच्या ११-१२व्या वर्षी आमचं रत्नागिरीत झालेलं धर्मातर, त्यामुळे देवाधर्माची मनातून गेलेली भीती, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा विशेषत: शिक्षण घेण्याबाबतचा प्रभाव, वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर सवलतींमुळे आणि आईने घेतलेल्या कष्टामुळे झालेलं आम्हां भावंडांचं शिक्षण नंतर नोकरी, लग्न, मूलबाळ, घरसंसार, लेखन, चळवळी वगैरे वगैरे. हेच सिंहावलोकन असेल कदाचित.
स्त्रीमुक्तीच्या परिचयातून साधारण १९८०-८२ पासून दलित स्त्रियांचं लेखन जातीवादाबरोबरच स्त्रीवादाकडेही झुकू लागलं होतं. स्त्री हीसुद्धा एक माणूस आहे. उपभोगाची वस्तू नाही. तिच्या शरीरावर तिचाच अधिकार आहे. दलित स्त्री ही वर्ग, जात आणि लिंग (क्लास, कास्ट आणि जेंडर) या तिन्ही पातळ्यांवर सर्वापेक्षा जास्त दु:ख भोगते आहे त्यादृष्टीने या स्त्रियांचा विचार झाला पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशा अर्थाचा एकूणच गोषवारा आम्ही व्यक्त करत होतो. ‘आयदान’ लिहिताना माझ्याकडून या गोषवाऱ्याचा वळसा जरा जास्तच झाला म्हणजे बाईला तिच्या शरीराच्या अवस्था, गरजा, भुकांवरही बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार आहे हे मी अगदी जैविक अधिकारानं लिहिलं. म्हणजे पहिली पाळी, पहिली रात्र, आमची नवरा-बायकोतली भांडणं, नवऱ्यानं टोकाचं बोलणं वगैरे. अर्थात मीच हातात दिलेल्या या सगळ्या शस्त्रांनी मग एक-दोघांनी माझीच व्यवस्थित चिरफाड केली. असं जरी असलं तरी ‘आयदान’चं स्वागत चांगलं झालं.. लेखक संजय पवार यांनी ‘आयदान’ शब्दावरून एक विनोदी संवादही ‘लोकसत्ता’त दिला होता. ‘‘तो तिला विचारतो तू ‘आयदान’ वाचलंस? ती म्हणते हो, ते डोळ्यांचं दान ना?’’
‘आयदान’ची अनेक भाषांतरं झाली. काही विद्यापीठांतून ते शिकवलं जातंय. डॉ. माया पंडित यांनी केलेल्या ‘आयदान’च्या भाषांतरांचं ‘द वेव ऑफ माय लाइफ’चं अमेरिकेतील कोलम्बिया युनिव्हर्सिटीकडून तिथल्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्मुद्रण करण्यात आलंय. अलीकडे नोकरी मिळायला, टिकवायला, बढतीला दलित विषयांवर प्रबंध लिहिणाऱ्यांची संख्या वाढतेय. त्यातून अनेक लेखकांची पुस्तके एम.ए., एम.फील., पीएच.डी.चे अभ्यासविषय झाली आहेत. त्यात ‘आयदान’वर लिहिणाऱ्यांत स्त्रियांची संख्या जास्त आहे. बाईचा आवाज बाईला जास्त कळत असावा. माझा आवाज रामू रामनाथन या दिग्दर्शकाला आणि सुषमा देशपांडे या अभिनेत्री, दिग्दर्शिकेला लोकांपर्यंत नाटय़रूपाने पोचवावा असं वाटलं आणि सुषमाने लेखकाची परवानगी या सदरात मला विचारलं. इथे माझ्यापुढे मोठं संकट उभं राहिलं. ‘आयदान’ लिहिताना मला स्वकीयांच्या मृत्यूची जी वेदना पुन्हा पुन्हा अनुभवावी लागली होती; जी दलित समाजात गरिबी, रोगराई, अज्ञान, हेळसांड, जातीय शोषण यातून अगदी ठाण मांडून बसलेली असते. शिकल्या सवरलेल्या सुस्थितीत पोचलेल्या दलित व्यक्तीचीही तिच्या मुळाशी असलेल्या या परिघापासून सुटका नसते. ती वेदना नाटय़रूपाने पुन:पुन्हा समोर यावी, तिची चर्चा व्हावी हे मला नको होतं. ‘आयदान’मधली स्त्री ही फक्त उर्मिला नाही ती काही जणींची प्रतिनिधी आहे हे मलाही माहीत होतं. पुढे त्या विचाराशीच मी थांबले. आणि ‘आयदान’ नवा चेहरा घेऊन लोकांसमोर आलं. नाटकाच्या रूपानं एक नवी कलाकृती जन्माला आली. मला न जाणवलेल्या अनेक प्रसंगांतल्या बारीकसारीक गोष्टी सुषमाने नाटकात अत्यंत कुशलतेने दाखवल्यायत. पहिल्या अंकात माझं बालपण आहे. त्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी जास्त आल्यात अशी काहींनी आणि मीही सूचना केली. पण वंचित समाजातील लहान मुलाचं लक्ष खाण्यापिण्याकडेच जास्त असतं हे सुषमाने दाखवलेलं वास्तव कणकवलीतले चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉ. शेट्टी यांनी अगदी काल-परवा लक्षात आणून दिलं तेव्हा जेवण शिजेपर्यंत चुलीकडे इतकंच काय पण भाकरी आणि भाजलेला मासा हातावर घेऊन वाटेने खात जाणाऱ्या कुळवाडी माम्यांच्या हातावरच्या भाकरीकडे मी कशी आशाळभूतपणे पाहात होते ते मलाही आठवलं आणि पटलं. आता ‘आयदान’ ५०व्या प्रयोगाकडे आलंय. सुषमाने केलेली त्यातल्या प्रसंगांची अचूक निवड, क्लास-कास्ट-जेंडर यातून वाटय़ाला आलेलं अधिकचं दु:ख किंवा मी, माझी आई आणि समस्त बायांची वेदना अशी तिहेरी वीण ‘आयदान’च्या तिपेडी विणकामाशी जोडणाऱ्या तीनच पात्रांची योजना आणि कोकणच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारं कोकणात महार समाजातल्याच स्त्रिया, माझी आई वगेरै आयदान करायची त्या बांबूंचंच केलेलं नेपथ्य. शिवाय प्रसंग नेमकेपणानं प्रेक्षकांच्या मनात झिरपवत नेणारं पाश्र्वसंगीत.. ही सर्वसमावेशकता, कलात्मकता आणि सर्वागानं बघण्याची दृष्टी हे सारंच ‘आयदान’च्या यशाचं कारण आहे. एन.सी.पी.ए.ला सादर झालेला ‘आयदान’चा पहिला प्रयोग मी पाहिला आणि मला दलित आणि स्त्री चळवळीशी नातं सांगणाऱ्या ‘आयदान’च्या आतल्या अगदी तळातल्या.. अनेक उर्मिला भेटल्या..
pawar.urmila@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:02 am

Web Title: renown marathi writer urmila pawar sharing her life experiences
Next Stories
1 साठ वर्षांची साहित्ययात्रा!
2 प्रकाशवाटा
3 होय, मी तो गुन्हा केलाय..
Just Now!
X