20ह.मो. मराठे
जेष्ठ पत्रकार, साहित्यिक

‘‘आम्हीच खरे सिनेशौकीन’पासून सुरू झालेला साठ वर्षांचा साहित्यिक प्रवास आजच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रवासात वाटा-वळणं खूपच आली. वाटा-वळणं नसतील तर तो प्रवास कसला? शाळा-कॉलेजात असतानाच माझ्या कथा, कविता विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या, स्पर्धात बक्षिसं मिळवू लागल्या. ‘स्वराज्य’, ‘किलरेस्कर’, ‘मनोहर’, ‘सत्यकथा’ असे टप्पे मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच ओलांडले. वृत्तपत्रांत प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून प्रवेश मिळवला. एम.ए.ही उत्तम प्रकारे पास झालो आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये रीतसर मराठीचा प्राध्यापक म्हणून नोकरीलाही लागलो. आता जीवन सरळ आणि सुखाचं जाईल असं वाटू लागलं, पण नाही. ते होणे नव्हते!..’’
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मालवण या गावातून ‘जनयुग’ नावाचं एक साप्ताहिक निघतं. त्या साप्ताहिकाच्या १९५६ च्या दिवाळी अंकात मी लिहिलेली एक नाटिका प्रसिद्ध झाली होती. नाव होतं ‘आम्हीच खरे सिनेशौकीन!’ मी त्या वर्षी त्याच गावातील भंडारी हायस्कूलमध्ये आठवी (क)च्या वर्गात शिकत होतो. वय होतं सोळा वर्षांचं. हे माझं छापून आलेलं पहिलंवहिलं लिखाण! माझ्या वयाला नुकतीच शहात्तर वर्षे पूर्ण झाली. १६ ते ७६. बरोबर साठ वर्षांचा काळ. सहा दशकं. गेली साठ र्वष माझा लेखनप्रवास सुरू आहे.
सोळाव्या वर्षी फक्त आठवीत? त्या काळीही मुलांना पाचव्या वर्षी शाळेत घालीत असत. तेराव्या वर्षीच तुम्ही आठवीत असायला हवं होतात, मागं का राहिलात? आजारी पडून काही र्वष फुकट गेली का? की अगदीच ‘ढ’ होतात? असे प्रश्न वाचकांच्या मनात आले असणारच! नाही. आजारीही पडलो नव्हतो, की ‘ढ’ही नव्हतो. त्याआधी पुष्कळ गावी काही काही दिवस मी शाळेत जाऊन बसत होतो, पण कोणत्याही शाळेतून मी पहिलीसुद्धा पास झालो नाही. कारण? भटकंती. दिशाहीनता, अस्थिरता. काही दिवस या गावी तर काही दिवस त्या गावी. अन्नान्नदशा. नाही घर, नाही झोपडी, नाही अन्न, नाही वस्त्र. कशामुळे हे? वडिलांवर ओढवलेली परिस्थिती!
माझा जन्म झोळंबे या खेडय़ातला. कुठे येतं हो हे झोळंबं या विक्षिप्त नावाचं गाव? हे गाव येतं सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील दोडामार्ग या तालुक्यात. तिथं वडील खंडाने जमीन घेऊन ती कसून राहात होते. आम्ही मूळचे गोव्याचे. साखळीजवळच्या सुर्ल या खेडय़ातील तेलबांधवाडी इथले. तिथं किती पिढय़ा होते आमचे पूर्वज हे माहीत नाही. घरात मुलं खूप. मुली लग्नं होऊन त्यांच्या घरी जात. मुलगे वयात येऊ लागले की, आपापल्या पोटाची वाट शोधीत कुठं कुठं जात. तसे माझे वडील त्या वेळच्या ‘ब्रिटिश’ इंडियात आले. गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली होता. झोळंबं गाव त्यांनी निवडलं. वेंगुर्ले येथील पुराणिक नावाच्या एका गृहस्थांकडून त्यांनी खंडाने जमीन घेतली. त्या जमिनीत दिवसरात्र कष्ट केले. माडा-पोफळींची लागवड केली. इतर उत्पन्न देणाऱ्या झाडांचीही लागवड केली. उत्पन्न वाढवलं. घर बांधलं. गाईगुरं घेतली. परिस्थिती बरी झाली, पण वडिलांचा स्वभाव (त्या काळच्या अनेक पुरुषांप्रमाणे) कोपिष्ट आणि तिरसट होता. अति धार्मिक आणि देवभक्त. दरवर्षी कुठली ना कुठली यात्रा करीतच. त्यांनी किती वेळा काशी-रामेश्वर यात्रा केली असेल माहीतच नाही.
17
सगळं ठीक चाललेलं असताना त्यांचं गावातल्या एकाशी भांडण झालं. ते झालं जुगार खेळण्यावरून. त्या माणसाने वडिलांना ठार मारायची धमकी दिली. वडिलांनी त्या धमकीचं मनावर घेतलं नाही, पण आई घाबरली. गाव सोडायचा आग्रह करू लागली. वडिलांनी जमिनीचा कूळ हक्क एकाला विकला. (जमीन स्वत:च्या मालकीची नव्हतीच!) थोडे पैसे आले. (पुष्कळसे यायचे राहिले.) वडिलांना वाटलं सर्वाना घेऊन काशीयात्रा करावी. तशी ती सुरू झाली. आई ओली बाळंतीण होती. तिची प्रकृती प्रवासात बिघडली. आमची नवजात बहीण वारली. पैसे संपले. काशीयात्रा झाली. वडील आम्हाला घेऊन परतले. आम्ही म्हणजे मी, मोठा भाऊ, आई. जमीन तर हवीच होती कसण्यासाठी, पोट भरण्यासाठी. गोव्यातील वडिलोपार्जित जमिनीत काही वाटा मिळतो का यासाठी वडिलांच्या कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. प्रयत्न व्यर्थ. झोळंब्याचा कूळ हक्क विकला, पण नव्या कूळ कायद्यानुसार उर्वरित रक्कम मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. गाठीचा पैसा तर कधीच संपला होता. चरितार्थासाठी कर्ज तरी कसं कोण देणार? गहाण ठेवायला काही तरी नको का? परवड सुरू झाली. आईचं आजारपण सुरू असतानाच तिला एका अनाकलनीय आजारानं गाठलं. त्यातच हाल होऊन तिला मरण आलं. वडिलांनी आम्हा दोघा मुलांना घेऊन नरसोबाची वाडी गाठली. तिथं दारोदार माधुकरी मागून उपजीविका सुरू झाली. वडील ज्या घराच्या दारात उभे राहून ‘ओं भवति भिक्षां देहीऽ’ म्हणत त्याच घरासमोर उभं राहून आम्हीही ‘ओं भवति भिक्षां देही’ म्हणत पुकारा करायचा. अन्न घालायला कोणी घरातून बाहेर आलं तर त्याच्यासमोर झोळी पसरायची. झोळीत पडेल ते घेऊन पुढल्या घरी जायचं, मिळेल ते खाऊन राहायचं.
जमिनीचा एखादा तुकडा मिळवण्याची वडिलांची धडपड चाललीच होती, पण यश येत नव्हतं. अधूनमधून त्यांचा मनोविकार चाळवेच. आता तो अधिक हिंसक स्वरूप धारण करू लागला. एकदा माझ्या थोरल्या भावाचं (तो माझ्याहून सहा-सात वर्षांनी मोठा आहे.) आणि वडिलांचं कडाक्याचं भांडण झालं. तो पळून गेला. मालवणला पोहोचला. काही दिवसांनी मला घेऊन वडीलही मालवणला आले. आम्ही तिघे एकत्र राहू लागलो. माझी रीतसर शाळा सुरू झाली. तेव्हा मी बारा-तेरा वर्षांचा झालो होतो! वयाची सात ते बारा ही पाच वर्षे फार हालअपेष्टांत गेली. या अनुभवांचं काही तरी केलं पाहिजे असं मला खूप र्वष वाटत होतं. मोठं काही तरी लिहावं, पण सगळं मला सुसंगत आठवत नव्हतं. कशामुळं काय घडलं ते समजत नव्हतं. ते लक्षात आलं थोरल्या भावाने (देवदास ऊर्फ बाबल) संक्षिप्त स्वरूपात सांगितलेल्या आठवणींमुळे. त्याने सांगितलेल्या आठवणी त्याची सून जयश्री हिने वहीत लिहून ठेवल्या. त्या मी वाचल्या आणि ठरलं- आता ‘बालकाण्ड’ लिहायचं! तोपर्यंत मी वयाची साठी गाठली होती. प्रत्यक्षातलं जगणं आणि त्याला शब्दरूप देणं यात जवळजवळ पन्नास वर्षांचा काळ गेला होता. मलाही थोडीशी साहित्यदृष्टीची प्रगल्भता आली असावी. ‘बालकाण्ड’चं अमाप आणि उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. काही पुरस्कार लाभले. गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद (निवडणूक न लढवता!) सन्मानपूर्वक देण्यात आलं.
‘बालकाण्ड’नंतर ‘पोहरा’ लिहिलं. मधे पाच वर्षांचा काळ गेला. ‘बालकाण्ड’ला कोणतं आशयसूत्र नव्हतं. जे जे घडलं ते ते तटस्थपणे कथन करणं एवढंच होतं. ‘पोहरा’ लिहिताना एक धूसरसं आशयसूत्र मनासमोर होतं. ‘बालकाण्ड’मधल्या ‘हनू’ला त्याच्या ‘स्व’चा लागलेला शोध! (माझं नाव हनुमंत. ‘हनू’ हे घरगुती संक्षिप्त रूप. ‘हनू’ आपली कहाणी कथन करतो आहे, अशी कल्पना करून मी ‘बालकाण्ड’ आणि ‘पोहरा’ लिहिलं आहे.) बालकाण्डच्या शेवटी हनू अभ्यासाला सुरुवात करतो असा उल्लेख आहे. ‘पोहरा’मध्ये त्याला समजतं की, आपण लेखक आणि पत्रकारच व्हायचं आहे. ‘बालकाण्ड’मधला सर्वार्थानी नगण्य असलेला बापुडवाणा, दयनीय ‘हनू’ आणि ‘पोहरा’मधला बी.ए. ऑनर्सची परीक्षा फर्स्ट क्लासमध्ये पास होणारा, आपण लेखक-पत्रकारच व्हायचं असं मनोमन ठरवणारा ‘हनू’ या दोन्ही हनू-रूपांनी मराठी वाचकांना भुरळ घातली. इतकी की, अनेकांनी या पुस्तकांवर (विशेषत: ‘बालकाण्ड’वर) उत्स्फूर्तपणे रसग्रहणात्मक लेख लिहिले, लेखकांनी पत्रं लिहून मला अभिप्राय कळवले, वृत्तपत्रांनी परीक्षणं छापली, वाचकांनी माझ्यावर पत्रांचा पाऊस पाडला. या सर्वाचा समावेश असलेलं एक ३६० पानांचं पुस्तकच मी नुकतंच प्रसिद्ध केलं आहे- नाव आहे ‘बालकाण्ड आणि पोहरा- समीक्षा आणि समांतर समीक्षा’. बारा-पंधरा वर्षांपूर्वी वाचकांनी पाठवलेली पत्रं वाचताना मला जाणवलं की, सर्वसामान्य वाचकांनी केलेलं विश्लेषण आणि दिलेल्या प्रतिक्रिया ही या पुस्तकांची समांतर समीक्षाच आहे. समीक्षकांच्या समीक्षेपेक्षा वेगळी आणि अपारंपरिक! या पत्रांना समीक्षेचा दर्जा आणि प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न आपण (स्वखर्चाने) केला पाहिजे. या विचारातून हे पुस्तक मी छापलं आहे.
18
‘आम्हीच खरे सिनेशौकीन’पासून सुरू झालेला साठ वर्षांचा साहित्यिक प्रवास या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रवासात वाटा-वळणं खूपच आली. वाटा-वळणं नसतील तर तो प्रवास कसला? ते ‘पर्यटन!’ शाळा-कॉलेजात असतानाच माझ्या कथा, कविता विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. स्पर्धात बक्षिसं मिळवू लागल्या. ‘स्वराज्य’, ‘किलरेस्कर’, ‘मनोहर’, ‘सत्यकथा’ असे टप्पे मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच ओलांडले. मराठी साहित्य हा मुख्य विषय घेऊन मी बी.ए.ची परीक्षा फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. वृत्तपत्रांत प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून प्रवेश मिळवला. एम.ए.ही उत्तम प्रकारे पास झालो आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून नोकरीलाही लागलो. आता जीवन सरळ आणि सुखाचं जाईल असं वाटू लागलं.
पण नाही. ते होणे नव्हते! राजाराम हे सरकारी कॉलेज. माझी नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात होती. सरकारने नवीन माणूस तिथं प्राध्यापक म्हणून पाठवला. माझी नोकरी संपली. त्यानंतर मी प्राध्यापकीसाठी मुलाखती पुष्कळ कॉलेजांत दिल्या. मुलाखतीत नंबर पहिला, पण नेमणूक नाही! हा भ्रमनिरासाचा कालखंड होता. नंतर ठरवलं- यापुढं पत्रकारितेतच राहायचं. पुणं गाठलं. तिथं आधी ‘तरुण भारत’ दैनिकात दिवसपाळ्या, रात्रपाळ्या सुरू झाल्या. त्याच काळात ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ लिहिली. शंकर सारडांनी ‘निष्पर्ण’चं हस्तलिखित वाचलं. १९६९च्या ‘साधना’च्या दिवाळी अंकात त्यांनी ‘निष्पर्ण’ छापली. तिथून सुरू झाला माझा खरा साहित्यिक प्रवास! दरम्यान मी ‘किलरेस्कर’ मासिकाच्या संपादकीय विभागात नोकरीला लागलो. त्याच सुमारास इंदिराजींचा राजकीय नवअवतार झाला. सर्वत्र असंतोषाचं वातावरण तयार होऊ लागलं. कामगार आंदोलनं सुरू झाली. युवकांच्या असंतोषाचा उद्रेक होऊ लागला. माझीही ओळख बदलली. मी प्राध्यापकाचा श्रमिक पत्रकार झालो. वेतनवाढीसाठी चाललेल्या श्रमिक पत्रकारांच्या आंदोलनात भाग घेऊ लागलो. स्वत:ला श्रमिक कामगार समजू लागलो. माझी आयडेंटिटी बदलली. मध्यमवर्गीय उरलो नाही. कामगार झालो. श्रमिक कामगारांच्या जगाशी आणि जीवन-जाणिवांशी मी एकरूप होऊ लागलो. त्यातून निर्माण झाल्या औद्योगिक जगताचं चित्रण करणाऱ्या अनेक कथा-कादंबऱ्या. ‘घोडा’, ‘युद्ध’, ‘ज्वालामुख’सारख्या अनेक कथा आणि ‘सॉफ्टवेअर’, ‘मार्केट’सारख्या अनेक कादंबऱ्या. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर प्रत्यक्षच जात होतो. वृत्तपत्रांचं जगही आतून-बाहेरून बदलत होतं. त्यातूनच लिहिल्या गेल्या ‘न्यूज स्टोरी’, ‘सापेक्ष’सारख्या कथा आणि ‘इतिवृत्त’सारखी कादंबरी. गंगाधर गाडगीळ प्रवर्तित नवकथेला तीसेक र्वष होऊन गेली होती. बहुतेक मराठी कथालेखक पात्रांच्या अंतर्मनाचे पापुद्रे उलगडून दाखवण्यात व्यग्र होते. त्यातलं नावीन्य संपत आलं होतं. मी समाजमनाचे पापुद्रे उलगडून दाखवू लागलो. वाचकांना त्यात नावीन्य जाणवू लागलं. नेहरूंच्या काळापासून इंदिराजींच्या कारकीर्दीपर्यंत देशभर समाजवादी अर्थव्यवस्थेचा बोलबाला होता, पण त्यानंतर तो ओसरत गेला. बेकारीचे आणि गरिबीचे प्रश्न सोडवण्यासाठी खासगी क्षेत्राचा विकास करण्याचे धोरण अंगीकारण्यात येऊ लागले. त्याचे प्रारंभिक परिणाम समाजजीवनावर होऊ लागले. मी या स्थित्यंतराच्या प्रेरणांतून कथा-कादंबऱ्यांसाठी विषय शोषून घेत होतो. औद्योगिकीकरण आणि खासगीकरण होणाऱ्या समाजाचे किंवा साध्या भाषेत, औद्योगिक आस्थापनांच्या परिघातल्या मनुष्यजीवनाचे जेवढे रंग मी कथा-कादंबऱ्यांतून चित्रित केले तेवढे दुसऱ्या कोणत्याही मराठी लेखकाने चितारलेले नाहीत, असं मी म्हणालो तर ते औद्धत्य ठरू नये. वृत्तपत्र व्यवसाय हा कारखानदारीचाच एक भाग आहे. वृत्तपत्राची किंवा साप्ताहिक-मासिकाची, मी माझ्यापुरती एक व्याख्या केली आहे- न्यूजपेपर इज अ प्रॉडक्ट टू बी सोल्ड इन द न्यूज मार्केट’. ‘मार्केट’चे सर्व नियम आणि प्रेरणा वृत्तपत्र व्यवसायासारख्या ‘उदात्त’ व्यवसायालाही लागू झाल्या आहेत. माझी मराठी वृत्तपत्र क्षेत्रात ‘नियतकालिकाचा खप वाढवून देणारा संपादक’ अशी ओळख आहे. ही माझी ओळख तयार व्हायला मला आलेलं आणि वरील व्याख्येत सांगितलेलं भानच कारणीभूत आहे. मला प्राध्यापकी नाकारणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांचे मी आता आभारच मानतो. मी प्राध्यापकच राहिलो असतो तर मी केवळ ‘कॅम्पस पॉलिटिक्स’च रंगवीत राहिलो असतो. वृत्तपत्रांचा/ नियतकालिकांचा संपादक म्हणूनही मला अनेक प्रकारचं लिखाण नावाने किंवा टोपणनावानं करावं लागलं. अनेक प्रकारची सदरं मी लिहिली. गंभीर, वैचारिक आणि टिंगलटवाळीच्या शैलीतलीही! मला ज्या प्रकारचं सदर मी संपादक असलेल्या नियतकालिकात किंवा दैनिकात हवं असतं, ते लिहिणारा कोणी लेखक मला सापडला नाही, तर मी स्वत:च ते सदर लिहीत असे. त्यातील एक – ‘एक माणूस, एक दिवस’ हे सदर.
वैयक्तिक आयुष्यातील अकल्पित घटनाक्रमांमुळे मी ‘लोकप्रभा’चं संपादकपद अचानकच सोडलं. संपादक म्हणून मी त्या वेळी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होतो. मिलिंद रत्नपारखी आणि त्यांचे काही मित्र यांनी पुण्यात ‘सोशल पब्लिकेशन्स’ नावाची प्रकाशन संस्था सुरू केली. त्या संस्थेतर्फे ‘घरदार’ मासिक सुरू करायचं ठरलं. मला त्यांनी संपादक म्हणून घेतलं. या मासिकात मला एखादी नावीन्यपूर्ण लेखमाला सुरू करायची होती. कल्पना सुचली. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या सहवासात एक दिवस घालवून ती व्यक्ती आणि तिच्या भोवतीचं वातावरण यांचं शब्दचित्र रेखाटायचं! त्या लेखमालेतला पहिलाच लेख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच्या एका दिवसाचा करायचं ठरलं. गेल्या अर्धशतकातली ऑल टाइम कुतूहलजनक व्यक्ती म्हणजे
बाळ ठाकरे! त्यांनी माझा प्रस्ताव मान्य केला. लेख अप्रतिम झाला. ज्या शैलीत आणि ज्या दृष्टीने ‘तो’ दिवस शब्दबद्ध केला, ती शैली आणि ती दृष्टी एकदम अपारंपरिक होती. पहिल्या लेखापासूनच ती लेखमाला वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. ‘घरदार’ बंद पडल्यावर काही काळाने ही लेखमाला मी ‘किलरेस्कर’ मासिकात लिहिली. बाळासाहेबांप्रमाणेच शरद पवार, मनोहर जोशी, प्रभाकर पणशीकर, जयंत नारळीकर, नाना पाटेकर, हितेंद्र ठाकूर, नरेंद्र महाराज अशा भिन्न क्षेत्रांतील माणसांचा ‘एक दिवस’ मी शब्दांकित केला. ही मराठीतलीच नव्हे तर भारतीय नियतकालिकांमधील एक ‘अ-पूर्व’ अशी लेखमालिका ठरली. एकूण २६ व्यक्ती ‘कव्हर’ केल्या. त्या त्या दिवसाचा तपशील टिपण्यासाठी मला माझ्यातला पत्रकार उपयोगी पडला, तर ती व्यक्ती समजून घेताना लेखक उपयोगी पडला. लेखक आणि पत्रकार ही माझी दोन्ही रूपे ही लेखमाला लिहिताना एकरूप होऊन गेलेली मला जाणवली.
अलीकडली काही र्वष मी व्यंगकथा लिहितोय. व्यंगलेखनाची सुरुवात झाली नि मी संपादन करीत असणाऱ्या नियतकालिकांची गरज म्हणून किंवा सरळ पैसे मिळवण्याच्या गरजेतून! मी र्अध आयुष्य बेकारीत काढलं. त्या काळात सदर लिहून पैसे मिळवणं हाच एक मार्ग मला जमण्यासारखा होता. वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्यांत आपलं कोणत्या प्रकारचं सदर खपेल याचा विचार करता माझ्यातला संपादक लेखकाला म्हणाला, ‘उघड आहे! उपहासपर शैलीतलं!’ नमुन्याचे लेख लिहून संपादक मित्रांकडे पाठवले. काहींनी ते ‘सिंडिकेटेड कॉलम’ (एकच लेख एकाच वेळी अनेक वर्तमानपत्रांत छापला जाणं.) म्हणूनही छापायची तयारी दाखवली. प्रत्येकाकडून थोडे थोडे पैसे मिळायचे. अशा सदरांच्या व्यंगलेखनातूनच हळूहळू व्यंगकथा हा कथा फॉर्म घडत गेला. हळूहळू भोवतीच्या समाजजीवनाकडे बघण्याचं आशयसूत्र जाणवलं. समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांतील व्यंग, विसंगती आणि हास्यास्पदता! राजकारणापासून साहित्यापर्यंतची सर्व क्षेत्रे या सूत्रात बांधता येतात. आतापर्यंत पाच व्यंगकथासंग्रह प्रसिद्ध झाले. आणखी तीन संग्रह होतील. एवढय़ा छापून आलेल्या व्यंगकथा माझ्याकडे फाइलमध्ये आहेत. शिवाय, पंचवीस तरी व्यंगकथांचे विषय तयार आहेत. व्यंगकथांच्या पुस्तकांचं परीक्षण लिहिताना प्रा. अनंत मनोहर म्हणाले की, कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर यांचीच ‘स्पेशल सटायर’ची परंपराच पुढे चालवतो आहे. माझ्या व्यंगकथा लेखनाकडे अद्याप समीक्षकांचं लक्ष गेलेलं नाही, पण ते तरी किती लेखकांच्या लेखनाची समीक्षा करणार? माझं या पत्रकारिता आणि वृत्तपत्रीय सदरं यांच्या लेखनाच्या धबडग्यात कादंबरी लेखनाकडे दुर्लक्ष झालं आहे की काय? नाही. दुर्लक्ष नाही झालेलं. १९६९ मध्ये ‘निष्पर्ण’ प्रसिद्ध झाल्यापासून मी एकदमच दिवाळी अंकांचा ‘स्टार रायटर’ झालो. १९७० मध्ये ‘साधना’ दिवाळी अंकातच ‘काळेशार पाणी’ प्रसिद्ध झाली. नंतर कोणत्या कोणत्या दिवाळी अंकांतून इतिवृत्त. नंतर ‘सॉफ्टवेअर’. नंतर ‘मार्केट, ‘कलियुग’, ‘नो सेंटिमेंट्स्’, ‘नरिमन पॉइंटचा समुद्र’पर्यंत सर्व लहान-मोठय़ा कादंबऱ्या मी लिहिल्या त्या दिवाळी अंकांसाठीच! साधारणपणे १९९५-९८ पर्यंत दिवाळी अंकांत कादंबऱ्या छापण्याची प्रथा होती. त्या कादंबऱ्या ७०-८० पृष्ठांच्या असत. पु. भा. भावे, श्री. ना. पेंडसे, दांडेकर, कर्णिक, खानोलकर, दळवी, गौरी देशपांडे अशा नामांकित मराठी लेखकांनी दिवाळी अंकांसाठी कादंबऱ्या लिहिल्या. मीही लिहिल्या. अर्थात, संपादकांनी मागितल्या म्हणूनच. त्यांची पुस्तकंही निघाली. काही पुस्तकांत दोन दोन लघुकादंबऱ्या छापल्या गेल्या. गेल्या पंधरा-वीस वर्षांत दिवाळी अंकांत कादंबरी छापण्याची प्रथा संपली. त्यामुळे लघुकादंबरी हा मराठीतला एक साहित्य प्रकारही संपला! साहित्यनिर्मितीवर मार्केट ट्रेण्ड्स प्रभाव कसा टाकतात, त्याचं हे एक उदाहरण!
दिवाळी अंकांच्या संपादकांकडून मागणी नाही म्हणून मी मनात खूप विषय असूनही गेल्या वीस वर्षांत, लहान किंवा मोठी, एकही कादंबरी लिहिलेली नाही. याचं एक कारण असं संभवतं की, समकालीन समाजजीवनाच्या आकलनाचं नवं सूत्र मला सापडलेलं नाहीय. औद्योगिक पाश्र्वभूमीवरच्या कथा-कादंबऱ्या लिहिताना सामाजिक शोषणप्रक्रियेचं धूसर असं सूत्र मनाशी असे. ‘बालकाण्ड’ लिहिताना मला जाणवलं की, केवळ याच एका सूत्राने आमच्या कौटुंबिक वाताहतीचं आकलन करून भागणार नाही. त्यामुळेच बहुधा, जीवनाच्या आकलनाचं कोणतंही विशिष्ट सूत्र मनाशी न बाळगता जसं घडलं तसं मी ‘बालकाण्ड’ कथन केलं. समाजजीवन काय आणि माणसाचं जीवन काय, केवळ शोषणाच्या सूत्राने पूर्णपणे आकळून घेता येईल असं मला अलीकडे वाटत नाही. तिसरं कारण म्हणजे कथा-कादंबऱ्यांचा खपच कमी झाल्याचं प्रकाशकही सांगतात आणि पुस्तक विक्रेतेही. कथासंग्रहांना तर प्रकाशक हातही लावीत नाहीत. जर ‘फिक्शन’ला (कथा, कादंबरी, इ. ललित साहित्य) खपत नसेल तर त्यांची पुस्तकं छापण्यात कोण पैसा गुंतवणार? सध्याच्या मराठी साहित्याचा काळ हा ‘नॉन फिक्शन’ पुस्तकं खपण्याचा काळ आहे. व्यक्तिमत्त्व विकास, पैसा कसा मिळवावा, योगासनांची उपयुक्तता, देशविदेश भ्रमण करण्यासाठी टुरिस्ट गाइड्स्, अशा विषयांवरच्या पुस्तकांचा आहे. माहिती, ज्ञान, विचार, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र खूप खपतात, पण कथा-कादंबऱ्या खपत नाहीत. शिक्षणप्रसाराबरोबर वाचकवर्ग वाढला आहे. पण तो मी ज्याला ‘जीवनविद्या’ म्हणतो, त्या प्रकारच्या पुस्तकांचा. कथा-कादंबरीतून चित्रित होणारी जीवनाची शोकान्तिका वाचकांना नको आहे, त्यांना हवी आहे ती जीवनाची सुखान्तिका. विलापिका नव्हे, तर विलासिका- असं तर नसेल?
ललित साहित्याला उठाव नसल्याने कादंबऱ्या लिहिण्याची तात्कालिक प्रेरणा प्रबळ नाही. पण मनात साचलेले विषय तर खूपच आहेत. शिवाय, मला नवनवे विषय सुचतातही! लिहायचं नाही असं ठरवून कसं चालेल? मनातले खळबळते विषय लिहायला तर हवेतच. कोणी तरी कादंबरी छापतो का, याचा शोध घ्यायचा तो त्यानंतरच!
hamomarathe@gmail.com