02 July 2020

News Flash

होय, मी तो गुन्हा केलाय..

आपल्या आजूबाजूची परिस्थितीच आपल्याला घडवत असते.

‘‘वेदना सहन करावी लागते लिहीत असताना आणि वेदना सहन करावी लागते ती कलाकृती लिहून झाल्यावरही! अनेक वर्षे उलटून जातात, पण एखाद्या चुकार क्षणी कुणी तरी भेटतो आणि लेखनवेदनेखालची खपली काढून टाकतो, आपल्या विषारी वाग्बाणानं! जखम भळाभळा वाहू लागते.. का म्हणून लिहिलं हे? मित्र जवळचे दुरावले. आस्थेनं विचारणा करणारे टाळू लागले आणि फोनवर गरळ.. ‘अरे, चळवळीचा लेखक ना तू? चळवळीच्या विरोधात कसं लिहितोस?’ हा त्या कलाकृतीचा विजय की पराजय? असं काय लिहिलं होतं मी? माणसांच्या जगण्याचं ‘व्याकरण’ समजून घेणं हा काय गुन्हा आहे? आणि असेल गुन्हा.. तर होय, मी तो गुन्हा केलाय. मी आजवर जे लिहिलं ते सारेच गुन्हे आहेत माझ्यासाठी! दृष्टीआडची सृष्टी दाखवणारे गुन्हे! ‘किरवंत’, ‘गांधी आंबेडकर’, ‘शुद्ध बीजापोटी’, ‘तन-माजोरी’ या लिखाणांतून केलेले; पण ही सृष्टी सहजी गवसली?..’’

18जे दृष्टीला दिसतं तेच सत्य मानलं जातं, पण कलावंताला दृष्टीच्या पलीकडे दडून बसलेलं शोधावं लागतं. म्हणजे ‘दृष्टिआडची सृष्टी’ शोधावी लागते. ती सृष्टी गवसली तरच नव्या कलाकृतीचा जन्म होतो. दर वेळी अनपेक्षित, अलौकिक वगैरे असं काही असेलच असंही नाही, पण जे काही जन्म घेते ते स्वत:चे डोळे, कान, तोंड, नाक सारं घेऊन जन्मते. कुठली कथा, कादंबरी, नाटक वाचताना ते आपल्याला जाणवत असतं. एखादं गाणं सुंदर केव्हा होतं? सातव्या सुरानंतरचा आठवा सूर जेव्हा गवयाला गवसतो तेव्हा आणि हा आठवा सूर असतो सातही स्वरांच्या एकरूपतेचा. वाङ्मय कलेचंही असंच आहे.
नाटकात एखादी व्यक्तिरेखा आपल्याला भावून जाते.. मनात घर करते.. त्या व्यक्तिरेखेतील सत्त्व आणि तत्त्व मोडून टाकते. याचा अर्थ त्या लेखकानं ते क्षण आपल्या दृष्टीच्या सृष्टीतून वेचून काढून त्या व्यक्तिरेखेला बहाल केले असतात. हे सहजी सोपं नव्हे, तर त्या कलावंतानं विविध अनुभवांतून साकारलेला तो आठवा सूर असतो. आठवा सूर कधी गवसतो, कधी गवसतही नाही; पण प्रयत्न करायचा असतो आठव्या सुरासाठी. मी एकांककार.. नाटककार म्हणून ओळखला जातो. दर वेळी नवं देण्याचा प्रयत्न करतो. यावर काही लिहायचं तर एक ग्रंथ सहज सिद्ध होईल; पण इथं एकाच कलाकृतीसंबंधात मी शोधलेली सृष्टी मला दाखवता येईल. तूर्त काही एका मर्यादेत.. आठवेल तसं.. खरं तर माझ्या नाटय़कृतीतून माझंच अंतरंग पुन्हा शोधून, तपासून पाहणं आहे. एका अर्थानं दृष्टिआडची सृष्टी!
वेदना सहन करावी लागते लिहीत असताना आणि वेदना सहन करावी लागते ती कलाकृती लिहून झाल्यावरही! अनेक वर्षे उलटून जातात; पण एखाद्या चुकार क्षणी कुणी तरी भेटतो आणि लेखनवेदनेखालची खपली काढून टाकतो, आपल्या विषारी वाग्बाणानं! जखम भळाभळा वाहू लागते.. का म्हणून लिहिलं हे? नसतं लिहिलं तर?.. लिहून तरी काय फरक पडला?.. फरक पडला.. मित्र जवळचे दुरावले. आस्थेनं विचारणा करणारे टाळू लागले आणि फोनवर गरळ.. ‘अरे, चळवळीचा लेखक ना तू? चळवळीच्या विरोधात कसं लिहितोस? वर म्हणतो, जणू स्वत:ला अलिप्त करत, लोक फार खवळलेत तुझ्यावर.’ हा त्या कलाकृतीचा विजय की पराजय? असं काय लिहिलं होतं मी? ‘पांढरा बुधवार’ आणि ‘नूर महंमद साठे ’ ही माझी दोन नाटके अत्यंत पुरोगामी म्हणवणाऱ्या दिग्दर्शकाकडे मी दिली होती. व्यावसायिक रंगभूमीवर सादर करतो, असं आश्वासनही त्याने मला दिले होते. पण जेव्हा सादरीकरणाची वेळ आली तेव्हा या दिग्दर्शकाने नाटकातील विचार माझ्या विचारांशी जुळत नाही असे सांगितले. अशी ही इथली समाज व्यवस्था! पण हेच ‘पांढरा बुधवार’ नाटक आज अमरावती विद्यापीठात एम.ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले गेले.. काय झालं नेमकं? माणसांच्या जगण्याचं ‘व्याकरण’ समजून घेणं काय गुन्हा आहे? आणि असेल गुन्हा.. तर होय, मी तो गुन्हा केलाय. मी आजवर जे लिहिलं ते सारेच गुन्हे आहेत माझ्यासाठी! दृष्टिआडची सृष्टी दाखवणारे गुन्हे! ‘किरवंत’, ‘गांधी आंबेडकर’, ‘शुद्ध बीजापोटी’, ‘तन-माजोरी’ या लिखाणांतून केलेले.. पण ही सृष्टी सहजी गवसली?
आपल्या आजूबाजूची परिस्थितीच आपल्याला घडवत असते. त्या बातमीनं दचकून गेलो मी. बातमी होती ‘धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची.’ कोयना धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या, घरदारं गेली,. विस्थापित होण्याची पाळी आली, ती माणसं.. सर्वस्व हरवून बसलेली. ज्या भूभागात (भूमीत) आपला जन्म झाला ती जागाच गेली. ज्याची जागा गेली त्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला क्षणभर तरी उभं करून पाहावं. मग त्याची वेदना आपल्याला कळू शकते! पुनर्वसन न झालेली ती माणसं.. त्यांचं कुटुंब.. सरकारनं दिलेल्या जागेकडे निवाऱ्यास निघालेली ती कोमेजल्या मनाची माणसं.. देशाचा विकास व्हायचा तर धरणं वगैरे बांधणं आलंच, पण जे लोक विस्थापित होणार असतात त्यांच्यासाठी साऱ्या सुविधांसह नवी वस्ती उभारून देणं हे सरकारचं काम, पण ते प्रामाणिकपणे करत नसतील तर..
विस्थापित होणारी माणसं विरोध करतात, आंदोलन करतात. आंदोलनाला नेतृत्व लागतं. प्रकल्पांना होणाऱ्या विरोधामुळं अनेक प्रकल्प सोडून दिले सरकारनं वा ते दुसऱ्या राज्यात गेले. कारण माणूसपणानं जगायला मिळेल की नाही हे माणसांचं भय! इथं मला विदर्भातील गोसीखुर्द धरणग्रस्तांची आठवण होतेय. धरणातील विस्थापितांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं अत्यंत सुपीक जमिनी ताब्यात घेतल्या आणि ज्या जमिनीत शेती करून आयुष्य जगत होते सुखाचं; त्यांच्या वाटय़ाला दैन्यावस्था आणून दिली. विस्थापितांचं पुनर्वसन करण्यासाठी इतरांना विस्थापित करणं ही सरकारची कुठली नीती? या शेतकऱ्यांना विस्थापित न करता सरकारी जमिनीवर सहज पुनर्वसन शक्य होतं, कारण या जमिनींना लागूनच सरकारी जंगल आहे. अशा अनेक प्रश्नांनी मन सैरभैर झालं आणि धरणग्रस्तांच्या मनीची वेदना- व्यथा समजून घेण्यासाठी माझं मन स्वत:च धरणग्रस्त झालं.
16
जगातील सर्वात आवश्यक आणि मूल्यवान वस्तू म्हणजे पाणी. घरी पाहुणा आला तर त्याचं स्वागत तांब्याभर पाणी देऊन केलं जायचं. आता तो काळ कुठाय? आता तर बाटलीबंद पाणी. पाण्याचा व्यापार होऊ शकतो हे काळानं सिद्ध केलं. आपणही ते पाणी विकत घेतो. अमेरिकेप्रमाणे आपणही बाटलीबंद पाण्याचे कारखाने काढले. किती कंपन्या या व्यवसायात उतरल्या! अनेक! आणि शुद्ध पाण्याच्या नावाखाली की काय तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल अशी भाकितं.. पाणीच नसेल तर माणूस जगेल कसा? बरोबरच आहे. पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल की नाही, मला माहीत नाही, पण पाण्यासाठी मोठा वाद आणि हाणामाऱ्या झालेल्या आहेत या भूमीत. अडीच हजार वर्षांपूर्वी याच भूमीत रोहिणी नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न उभा राहिला होता की, पहिल्यांदा पाणी कुणी घ्यावं? शाक्यांनी की कोलीयांनी! आणि हा वाद युद्धानंच सुटू शकतो इथवर चर्चिला गेला; पण ‘‘युद्धानं प्रश्न सुटत नसतात, तर नव्या युद्धाची बीजं पेटली जातात. तेव्हा नको’’ हे सांगणाऱ्या सिद्धार्थालाच देश सोडावा लागला. देश सोडावा लागला म्हणजे त्यानं स्वत:च तो निर्णय घेतला होता. खरं तर तसा निर्णय घेणं भाग पडलं. कारण शाक्यगण संघाची घटना. संघात सामील असणाऱ्यानं संघाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे; पण युद्धाला विरोध केल्यामुळं संघप्रमुखानं तीन अटी ठेवल्या सिद्धार्थासमोर.. सैन्यात सामील होऊन शत्रूशी युद्ध करणं.. किंवा देहान्ताची शिक्षा मान्य करणं अथवा सामाजिक बहिष्कार कबूल करणं. सिद्धार्थानं तीनही गोष्टी नाकारल्या आणि झाला परिव्राजक.. पण हे करताना पत्नीला विश्वासात घेतलं आणि पत्नी यशोधरेनंही सिद्धार्थाचं म्हणणं मान्य केलं. पदरात मूल- राहुल असताना. म्हणाली, ‘‘जा, घे शोध मानवी दु:खाचा.’’ राजवैभव सोडून तो अरण्यात निघून गेला, मानवी दु:खाचा शोध घेण्यासाठी.. आणि मी.. मीही या धरणग्रस्ताच्या वेदनेचा शोध घेऊ पाहात होतो, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या आश्रयानं; पण तो कुठं आणि मी कुठं? माझी मती.. माझी नाळ माझ्या काळाशी बांधलेली. जग प्रचंड बदललेलं. दोन महायुद्धं खेळलेलं.. प्रचंड हानी पचवून पुन्हा हानी करण्यास सिद्ध असलेलं. पाण्यासाठी तिसरं महायुद्ध?
15
पाण्यानं भरलेली सारी धरणंच उद्ध्वस्त केली जातील काय? एक मन भयभीत, भीती मनात! केवळ घोटभर पाणी प्राशन करून माणुसकी हक्क सिद्ध करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर घुटमळू लागले मनात माझ्या. तोही एक जलसंग्रामच होता.. महाडच्या चवदार तळ्यावर केलेला. पाणी तर जीवन.. आणि तरीही हे मानवी जीवन.. एक माणूस दुसऱ्या माणसाला वंचित ठेवतो पाण्यापासून! धर्मकारण! हा कुठला धर्म पाणी वंचित करणारा? आणि तळे बाटवले म्हणत जेवण करीत असलेल्या माणसांवर हल्ला करून त्यांच्या जेवणात माती कालवणारा? अन्न हे पूर्णब्रह्म असेल तर त्या भुकेल्या पोटात पडू पाहणाऱ्या त्या पूर्णब्रह्माची ही काय अशी दशा? का वागतो माणूस असा? जगणं एवढं कसं भयग्रस्त? भयभीत..
ते भयभीत धरणग्रस्त चेहरे मला आता नकोसे वाटतात आणि त्याच वेळी हजारो वर्षांचं अंतर कापत एक ध्वनी माझ्या कानात कुजबुजतो.. ‘‘प्राणिमात्राविषयीची करुणा चालवते हे जग! हे कुरूप जग सुंदर करायचं तर जागी ठेव तुझ्यातील करुणा..’’ मी चिंतित, तर दुसरा एक ध्वनी.. ‘‘धरणग्रस्तांच्या हक्कासाठी तू ठाम उभं राहायला हवंस. सारे वंचित तुझेच आहेत. त्यांच्या न्यायाची लढाई; तुला लढलीच पाहिजे.. ’’चवदार तळ्यावरून येणारा तो ध्वनी.. आता मी एकटा नव्हतो. खरं तर कुठलाही कलावंत एकटा नसतोच कधी! त्याच्या कळत्या बालपणापासूनच्या अनंत आठवणी- अनुभव – त्यांची सोबत करीत असतात. पूर्वज मानवीय काम केलेले. पूर्वजानुभव आणि स्वानुभव.. एक मिश्रण.. पुढच्या वाटचालीसाठी!
लहान असताना एका धरणावर स्वत: काम केलेलं आहे. तो अनुभव ‘तन-माजोरी’ या नाटकात अनुभवला आहे. नाना पाटेकरने व्यावसायिक रंगमंचावर ही भूमिका साकार केली. नाना मुळातच राकट देहयष्टी असलेला. तो जेव्हा वाश्याला आसूडानं मारायचा तेव्हा थरकाप उडायचा आणि
उदय म्हैसकरचा मास्तर केवळ पायजम्यावर असणारा- आसूडाचे फटके तो कसा सहन करायचा त्याचं तोच जाणे! त्याही नाटकात धरणाचा बंधारा होता/ आहे. धरणावर मी घेतलेला अनुभव त्या वेळी कामी आला. या नव्या नाटकातही तो अनुभव माझ्या कामी येणार होता, पण रूप वेगळं होतं. अनुभव तोच असला तरी तो अनुभव परिस्थितीसापेक्ष रूप बदललेला.. एवढी ताकद असते कलेत?
मला तो एक क्षण आजही- आताही आठवतो आहे. वीसेक र्वष झाली असतील. नाटकाची तालीम संपवून बहुधा शेवटची गाडी पकडून घरी निघालो होतो. विक्रोळी स्टेशनला उतरून कन्नमवार नगरच्या दिशेनं पायीच निघालो होतो. एकटाच होतो. मनात वेगवेगळे विचार.. माझ्याच तंद्रीत.. आणि तरीही मी भानावर आलो एका आवाजानं, ‘‘अरे, पोस्टर उलटं लागलं.’’ पोस्टर होतं, ‘‘विस्थापितांना न्याय कधी मिळणार?’’ ती पोरं ओळखीची होती. मी म्हणालोही, ‘‘किती दिवस अशी पोस्टरच लावत बसणार?’’ ती पोरं चळवळीत काम करणारी होती. अधूनमधून भेटत. त्यातल्या एकाशी माझी मैत्री झाली. तो चळवळीविषयी खूप बोलायचा. त्याचं बोलणं मी ऐकत राहायचो. आजही त्याची-माझी मैत्री आहे. तो आता पत्रकार आहे. राकेश त्याचं नाव.
एक दिवस चहा पिताना टपरीवर.. म्हटलं, धरणग्रस्तांच्या प्रश्नावर नाटक लिहायचंय. तो एकदम सजग झाला. ‘‘काय लिहिणार आहात?’’ मी म्हटलं, चळवळी यशस्वी का होत नाही? कारण चळवळीचं व्याकरण चळवळीच्या खांद्यावर नीट उभं नसतं. मी विषय सांगितला.. खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यामुळं सारं जग जवळ आलं. ग्लोबल व्हिलेज झालं. या ग्लोबल व्हिलेजवर सत्ता असेल ती अमेरिकेची. कारण अमेरिकेला प्रतिस्पर्धी असा कुणीच उरला नाही. शीतयुद्ध संपविण्यासाठी त्यांनी रशियाची शकलं उडवली. सद्दामला वठणीवर आणलं. कुणी विरोध केला? नाही.
भारत सरकार एक धरण बांधू इच्छिते. ते धरण असेल सह्य़ाद्रीच्या खोऱ्यात. ‘सह्य़ाद्री जल प्रकल्प’ हे त्याचं नाव. हा प्रकल्प पूर्ण करण्याचं काम भारतीय कंपनी ‘गंगोत्री’ करणार असते, पण नेहमीप्रमाणेच माशी शिंकते आणि ते काम अमेरिकन कंपनीला दिलं जातं. तिचं नाव, ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’. या धरणासोबतच भारतातील सर्व नद्या कालवे काढून एकमेकींना जोडल्या जाणार. असं केल्यामुळं एखाद्या भागात पाऊस पडला नाही तर या कालव्यातून पाणीग्रस्त भागाला पाणी पोहोचवता येईल. भूमिपूजन ठरतं आणि नेमकं त्याच वेळी ‘जनराज्य गण परिषद’ अनू गोरेच्या नेतृत्वाखाली विरोध सुरू करते; धरणग्रस्त आदिवासींच्या हितासाठी! प्रकरण न्यायालयात जातं. न्यायालय धरण बांधायला परवानगी देतं. तरीही अनू गोरेचा विरोध- मोर्चे निदर्शनांच्या रूपात सुरूच असतो. धरणांची उंची वाढवू नये म्हणून पुन्हा न्यायालयात; पण दर वेळी कोर्ट धरणाची उंची वाढविण्याची परवानगी ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’ला देते. दरम्यान विरोध करणाऱ्या अनू गोरेला अटक होते. खटला चालतो आणि न्यायालय अनू गोरेला धरणकामात अडथळा आणते म्हणून देशद्रोही ठरवतं. तुरुंगामध्ये पाठवतं. पुढं तिची निदरेष सुटका होते; पण धरणाचा ९० मीटरचा पहिला टप्पा बांधून पूर्ण होतो. या नाटकात धरणग्रस्त आहेत आणि अनूला सजग करणारी एक व्यक्ती आणि जोडीला प्रेमाचा त्रिकोण. अनूच्या वडिलांनी आदिवासी पाडय़ावरून घरी आणलेला एक मुलगा कोंडू – तो अनूच्या प्रेमात तर अनू तिचा वर्गमित्र सांध्यच्या प्रेमात. नाटय़रचनेसाठी व नाटकाला योग्य परिमाण प्राप्त होण्यासाठी आणि व्यामिश्रता येण्यासाठी हे आवश्यकच होतं. नाटकात आणखी तीन महत्त्वाच्या आदिवासी व्यक्तिरेखा आहेत. फुला आणि तिचा भाऊ जंगलू. जंगलूची मुलगी तानी- तिचं लग्न कोंडूशी व्हावं असं फुलाला म्हणजे त्याच्या आईला वाटतं. आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा इन्स्पेक्टर मोरे. खरं तर कथानक सांगणं म्हणजे उगाच जागा व्यापणं; पण एक गोष्ट ध्यानी ठेवलेली बरी. पुढे देशद्रोहाच्या गुन्हय़ातून अनू मुक्त होते, पण आंदोलन फसतं. हे अपयश झाकण्यासाठी ऐन पावसाळ्यात जलसमाधीची घोषणा करते. कशी सूत्रं फिरतात कुणास ठाऊक? पण अमेरिका, ‘आदिवासींची मायमाऊली’ म्हणून अनूला एक कोटीचा, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हा पुरस्कार जाहीर करते आणि त्याच वेळी ‘गंगोत्री’ला ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’मध्ये समाविष्ट केलं जातं. कसं घडतं हे? आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भाष्यकार हे जाणतातच. अर्थात पुढचं सगळं धरणाचं काम बिनबोभाट पूर्ण होतं. यावर या नाटकातील ‘व्यक्ती’ म्हणते, ‘‘पाणी निसर्गाची देन, पण तेही विकत देण्याची नि विकत घेण्याची सवय लावली या दुष्टांनी. धरणं बांधली जातील, कालवे काढले जातील, नद्या जोडल्या जातील. अमेरिकाच जोडून देईल, पण सारा खर्च वसूल होईपर्यंत पाण्याचा थेंबन् थेंब वेठीस धरला जाईल.’’
या नाटकाचा पहिला प्रयोग ‘असीम एन्टरटेन्मेट’नं १५ जानेवारी २०१० ला सादर केला. अजित भुरेंनी त्याचं दिग्दर्शन केलं. मुख्य भूमिकेत होती
17
शीतल क्षीरसागर. नाटकाचं मूळ नाव ‘व्याकरण’ ते बदलून, ‘डॅम इट अनू गोरे’ केलं गेलं; पण जाहिरात इतकी वेगळी.. केवळ धरणाचं चित्र.. त्या जाहिरात कल्पनेला प्रणाम!
साहित्य/वाङ्मय समाजाचा आरसा. तो आरसा समाजासमोर धरला तर.. चळवळीच्या विरोधातलं कसं ठरतं हे नाटक.. नाटक पाहिल्यावर वा वाचल्यावर एखादी व्यक्तिरेखा एखाद्या व्यक्तीप्रमाणे जाणवणे किंवा त्या व्यक्तीची आठवण होणे हा कुठल्या प्रकारचा चळवळ द्रोह? खरं तर त्या लेखनकृतीचा विजय; पण तसं न घडता मला ऐकवण्यात आलं, ‘‘मी तुमचा त्रिवार निषेध करते.. निषेध, निषेध, निषेध! चळवळीतल्या कुठल्या व्यक्तीनं स्वीकारला अमेरिकेचा पुरस्कार?’’ मी शांत! काय उत्तर देणार! दृष्टिआडची सृष्टी जी मला अनुभवता आली ती त्या व्यक्तीला ठाऊकच नसावी!
हे नाटक लिहिताना सरकारी यंत्रणा कशी काम करते; पासून, माझ्या गाठीशी असलेला बालपणी धरणावर काम करतानाचा तो अनुभव आणि शहाडपासूनचा आजूबाजूचा सगळा आदिवासी परिसर बघून- तिथल्या लोकांशी भेटून साधलेला संवाद. अंगावर धड वस्त्रही नसलेली ती भुकेकंगाल माणसं.. त्यांच्या जमिनीवर आम्ही धरणं बांधतो.. नळानं पाणी घराघरांत पोहोचवतो; पण ती आदिवासी माणसं मात्र पाण्यापासून वंचित.. शिक्षणापासून वंचित.. नोकऱ्यांपासून वंचित.. उत्तम जीवन जगण्यापासून वंचित.. सर्व सुखापासून वंचित हे जीव आजही उन्हाळ्याच्या दिवसांत मैलोन्मैल चालत जाऊन एखाद्या ओढय़ात पाणी असलंच तर जाऊन आणतात.. आपली तहान भागवतात, अशा लोकांना नक्षलवादी ठरवण्यापर्यंत जाते ही आमची शहरी वृत्ती. मानवी वृत्तीचं हे ‘व्याकरण’ समजून घेण्यात आणि सोडवून दाखविण्यात माझ्यातील कलावंताला किती यश मिळालं की मी पार नापास झालो हे माझं मला नाही सांगता येणार! पण आज ‘मेक इन इंडिया’च्या दिवसांत हे नाटक आरसा म्हणून नक्कीच काम करील. याचा मला मनस्वी आनंद वाटतो आहे. सामान्य माणसाला माहीत नसणाऱ्या सृष्टीचं हे व्याकरण.. माझ्या दृष्टीतून.. माहीत नाही आठवा सूर गवसला की नाही; पण ती सृष्टी समजून घेण्याचा मी मनापासून प्रयत्न केला हे नक्की.
premanandgajveeg@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 1:40 am

Web Title: renowned writer premanand gajvi sharing his life experiences
Next Stories
1 ‘वस्त्रहरण’ नाबाद ५०००
2 समृद्ध अनुभव
3 हे चित्र कुणाचं?
Just Now!
X