‘‘माझ्या लेखनशैलीचा ‘कणेकरी’ शैली असा उल्लेख होऊ लागला तशा माझ्या मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. साहित्यशारदेच्या मंदिरात या पामराचंही चिमूटभर योगदान मान्य झालं होतं. हळूहळू माझं या ‘कणेकरी’ शैलीचं कौतुक ओसरायला लागलं. दिवाळी अंकांचे संपादक मला ‘कणेकरी’ शैलीतील लेख पाठवायला सांगू लागले. मी चक्रावलो. मीच ना तो शिंचा कणेकर? मग मलाच काय कणेकरी शैलीत लिहायला सांगता? लिहिताना मी ‘कॉन्शस’ व्हायला लागलो. लिहिता लिहिता मध्येच थांबून मी सगळं ‘कणेकरी’ शैलीत ठीक चाललंय ना हे बघू लागलो. माझा गोंधळ वाढला. माझ्या लक्षात आलं की ही ‘कणेकरी’ शैली मलाच माहीत नव्हती. माहीत नसताना मी ‘कणेकरी’ शैलीत कसा काय लिहीत होतो? ..’’
मला कायदा शिकायचा नव्हता, शिकलो. मला पत्रकार व्हायचं नव्हतं, झालो. मला एकपात्री कलाकार व्हायचं नव्हतं, झालो. मला लेखक व्हायचं नव्हतं, झालो. मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं होतं, पण नाही झालो.
माझी एकमेव इच्छा देवानं पूर्ण होऊ दिली नाही. माझ्या अन्य तथाकथित कर्तृत्वाची माझ्या लेखी माती झाली. कोणी लेखाचं कौतुक केलं तर माझं अपयश मला सलत राहतं व माझ्या आनंदात विष कालवतं.
आज पन्नास वर्षे मी लिहितोय. इतक्या वर्षांच्या निकट सहवासानंतर माझा लेखणीवर जीव जडलाय. आज माझ्या नावावर एकेचाळीस पुस्तके आहेत. एक काळ होता की आयुष्यात दहा पुस्तकांचा पल्ला गाठायचा हे माझं अव्यक्त स्वप्न होतं. नुसत्या कल्पनेनं मला गुदगुल्या व्हायच्या. कोणापाशी वाच्यता करायलाही मी धजावत नव्हतो. वाटायचं की दृष्ट लागेल. आज सगळ्याचंच हसू येतं. पुस्तकांच्या संख्येचा हव्यास आता राहिलेला नाही. बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांची संख्या जयवंत दळवींपेक्षा खूपच जास्त भरेल परंतु तेवढय़ानं बाबूराव जास्त मोठे लेखक ठरतात की काय? ज्ञानेश्वर माउलींनी केवळ ४ पुस्तके लिहिली म्हणून मी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांपेक्षा आठ पट मोठा लेखक असा आचरट निष्कर्ष मी काढू की काय? किती लिहिलंय यापेक्षा काय लायकीचं लिहिलंय याला महत्त्व आहे. रद्दीही तागडीतच तोलतात, या साक्षात्कारानं माझे पाय जमिनीवर ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावलीय. आपण लिहीत राहायचं. वाचणारे वाचतील, आवडणारे आवडून घेतील. छापायला माणसं उत्सुक आहेत हा आधार पुरेसा आहे. पु. लं नी विनोदाच्या बाबतीत एक मार्मिक विधान केलंय. ते म्हणतात की विनोद हे गोलंदाजासारखे असतात. प्रत्येक विनोदावर नाहीही हशा येणार. प्रत्येक चेंडूवर कुठे विकेट पडते? तरीही तो टाकतच असतो. फक्त विकेट घेणाराच चेंडू टाक; बाकीचे उगीच कशाला टाकायचे, असं आपण म्हणतो का? विनोदकारानं असेच विनोद करत राहायचे; कुठला चालून जाईल काय माहीत?..पु. लं.चं अनुभवसिद्ध तत्त्वज्ञान मी शिरोधार्य मानलंय.
‘माझी फिल्लमबाजी’ या देशोदशी प्रयोग केलेल्या माझ्या एकपात्री कार्यक्रमात एका ठिकाणी चाळीत एका खोलीत किती जण राहातात हे सांगताना मी म्हणतो, ‘‘हिरॉइन, तिचे आई-वडील, सात भावंडं, एक लग्न न होऊ शकलेला मामा..’’ यातली ‘लग्न न होऊ शकलेला’ मधली खोच काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचते व काहींपर्यंत पोहोचत नाही. अन् पोहोचली तरी त्यांनी उत्स्फूर्तपणे हसायलाच हवं असं थोडंच आहे? प्रेक्षकांनी व वाचकांनी कसा प्रतिसाद द्यायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे; आपण त्यात लुडबुड नाही करायची.
मी एकदा लिहिलं होतं की माझे वडील मला नेहमी सांगायचे, ‘‘मी पाय मोकळे करायला जातोय. तुझी काही कामं असतील, पेनं बिनं रिपेअर करायची असतील तर माझ्याजवळ दे.’’ आज मी माझ्या मुलांना अगदी हेच सांगतो, ‘‘मी बाहेर पडतोय. तुमची काही कामं असतील, पेनं बिनं रिपेअर करायची असतील तर माझ्याजवळ द्या.’’ त्यानंतर मला रस्त्यात एक वाचक भेटला. तोंडभर हसून तो म्हणाला, ‘‘तो परवाचा पेनचा जोक सॉलिड होता.’’ माझ्या तोंडाची चव गेली. तरी मी बळेबळे हसलो आणि मनाशी म्हणालो, इटस् अ पार्ट ऑफ द गेम!’’

2
प्रदीर्घ काळ एक प्रश्न माझ्या मनाला छळत होता. लेखन व रंगमंचाविष्कार यातलं मला जास्त प्रिय काय? दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यापासून मिळणारा आनंद वेगळा आणि म्हणूनच मला दोन्ही सारखेच प्रिय आहेत, असं उत्तर मी माझं मला देत राहिलो. मेंदू शिणवून, मान मोडून दोन दीडक्यांसाठी तावच्या ताव लिहीत बसण्यापेक्षा दोन तासांत, प्रेक्षकांचा जिवंत प्रतिसाद अनुभवीत कित्येक पट जास्त पैसे कमावणं चांगलं, असं मला कधीही वाटलेलं नाही. त्याचबरोबर ‘बुकिंग’चं टेन्शन घेत, प्रकृती अस्वास्थ्य व सराव मूड यांच्याशी झुंजत घसा खरवडून बोलण्यापेक्षा घरी पाय पसरून बसून, निवांतपणे, स्फूर्तीच्या कौलानुसार शब्दांचा आनंद घेत त्यांना कागदावर उतरवण्याचा आनंद घेणं अधिक चांगलं, असंही मला कधी वाटलेलं नाही. दोनो बातें अलग और अपनी जगह है!
माझा खरा कौल कुठे आहे याचा शोध मला अनपेक्षितपणे लागला. मी अमेरिकेत फिनिक्स (अरिझोना स्टेट) येथे प्रयोग करीत होतो. माझी ओळख करून देणारा माणूस माझ्या एकपात्री प्रयोगांची भरपूर स्तुती करून शेवटी म्हणाला, ‘‘शिवाय ते लेखकही आहेत.’’ शेपटावर पाय पडलेल्या कुत्र्यासारखा मी चवताळलो व म्हणालो, ‘‘तसं नाही – तसं नाही. मी लेखक आहे. शिवाय मी एकपात्री कार्यक्रमही करतो.’’ मला ‘पाकीजा’ फेम कमाल अमरोहींचा एक किस्सा आठवला. त्यांची व मीनाकुमारीची ओळख करून देताना एकदा कोणीतरी म्हणालं, ‘‘ही भारताची सर्वश्रेष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी व हे तिचे पती दिग्दर्शक कमाल अमरोही.’’ त्याला अडवत कमाल अमरोही म्हणाला, ‘‘तसं नाही- तसं नाही. मी दिग्दर्शक कमाल अमरोही व ही माझी पत्नी भारताची सर्वश्रेष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी.’’ सांगण्याचा क्रम बदलल्यानं कमाल अमरोही दुखावला होता. तसंच बोलणाऱ्यानं अहेतूकपणे माझ्यातील लेखकाला दुय्यम स्थान दिलेलं मला सहन झालेलं नव्हतं. फर्स्ट अ‍ॅण्ड फोरमोस्ट मी लेखक आहे. बाकी सगळं नंतर. रंगमंच मी पुढेमागे ‘मिस’ करीन. ‘जियेंगे मगर मुस्काराना सकेंगे के अब जिंदगी में ‘स्टेज’ नही है.’ देव न करो पण उद्या लेखणी म्यान करायची वेळ आली तर मी जगू शकेन का, मला माहीत नाही. रंगमंचानं माझं घर चालवलं; लेखणीनं मला प्राणवायू पुरवला. श्वास घेईन तेव्हाच ना घर चालवीन! ‘लेखक शिरीष कणेकरांचे निधन’ असे वृत्तपत्रातील अभद्र मथळे माझ्या नजरेसमोर तरळतात व माझा थकलेला जीव सुखावतो.
माझ्या लेखनशैलीचा ‘कणेकरी’ शैली असा उल्लेख होऊ लागला तशी माझ्या मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. आपली एक शैली आहे व ती आपल्या नावानं ओळखली जाते ही भावना क्वचितच सुखद होती, अहंकार गोंजारणारी होती. साहित्यशारदेच्या मंदिरात या पामराचंही चिमूटभर योगदान मान्य झालं होतं. मोठय़ा लेखकांच्या वाटय़ालाही हे भाग्य आलं नव्हतं. नशिबाच्या नावानं बोटं मोडताना नियतीनं माझ्या पदरात टाकलेलं हे ‘कणेकरी’ शैलीचं दान मी विसरू शकत नाही. हळूहळू माझं या ‘कणेकरी’ शैलीचं कौतुक ओसरायला लागलं. ‘घी देखा लेकिन बडगा नही देखा’ अशातला प्रकार होता. दिवाळी अंकांचे संपादक मला ‘कणेकरी’ शैलीतील लेख पाठवायला सांगू लागले. मी चक्रावलो. मीच ना तो शिंचा कणेकर? मग मलाच काय कणेकरी शैलीत लिहायला सांगता? मी लिहीन तिलाच ‘कणेकरी’ शैली म्हणायला हवं ना? लिहिताना मी ‘कॉन्शस’ व्हायला लागलो. लिहिता लिहिता मध्येच थांबून मी सगळं ‘कणेकरी’ शैलीत ठीक चाललंय ना हे बघू लागलो. माझा गोंधळ वाढला. माझ्या लक्षात आलं की ही ‘कणेकरी’ शैली मलाच माहीत नव्हती. माहीत नसताना मी ‘कणेकरी’ शैलीत कसा काय लिहीत होतो? शास्त्रोक्त संगीतातलं आपल्याला काही कळत नाही असा शपथेवर दावा करणाऱ्या ओ. पी. नय्यरनं ‘फागुन’ या चित्रपटातील सर्व गाणी एका ‘पिलू’ रागात कशी दिली होती? माझ्या ‘कणेकरी’ शैलीचंही तसंच असणार..
एक सरकारी पारितोषिक प्राप्त लेखक, माझी मुलाखत घ्यायला आला होता, (त्याच्यावर ही वेळ का आली असावी?) त्यानं पहिलाच प्रश्न हा विचारला,- ‘‘तुमची आवडी ‘कॉलगर्ल’ कोणती?’’
मी हबकलो. माझ्या तोंडचं पाणी पळालं, माझ्या चारित्र्याविषयी ही बहुमोल माहिती त्याला कोणी दिली असावी? मी म्हणालो,‘‘पूर्वी कथांतून राजाची आवडती व नावडती अशा दोन राण्या असत. त्याप्रमाणे माझी आवडती व नावडती अशा दोन ‘कॉल गर्ल’ आहेत अशी तुमची समजूत आहे की काय? तुम्हाला मी अशी हाक मारायला हवी का? -‘अगं, रेश्मा बाहेर ये पाहू.’’
‘‘ही ‘कणेकरी’ शैली’’ तो खुशीत म्हणाला.
त्यानं पुढचा बॉम्ब टाकला, – ‘‘तुम्हाला कोणाची बायको आवडते?
‘‘आँ?’’ मी चिरकलेल्या आवाजात ओरडलो, ‘‘अहो, आम्ही असे लोकांच्या बायका आवडून घेत फिरत नसतो हो. त्यातून कोणी आवडलीच तर आम्ही त्याची जाहीर वाच्यता करीत नसतो.’’
‘‘मला वाटलं होतं तुम्ही डॉ. श्रीराम नेनेंची बायको म्हणाल. ‘‘तो नाराजीनं म्हणाला.
अच्छा-अच्छा. म्हणजे ‘कणेकरी’ शैलीतली माझी उत्तरं तोच घरून ठरवून आला होता. आता त्याच मसण्या ‘कणेकरी’ शैलीची भ्रष्ट नक्कल मी उघडय़ा डोळ्यांनी बघत असतो.
आमच्या घराण्यात कोणी लेखणीशी खेळ केल्याचे ऐकिवात नाही. मी पहिलाच. छापून आलेल्या लेखाचं मनातल्या मनात विश्लेषण करीत मी कोपऱ्यात एकटाच बसायचो तेव्हा माझी मुलगी म्हणायची, ‘‘बसला स्वत:चंच वाचत चोंबडा!’’ माझी मुलगी माझं वाचते, पण तिला कळत नाही; दुसऱ्या कोणाला कळत असेल असं तिला वाटत नाही. माझा मुलगा माझं वाचत नाही; दुसरं कोणी वाचत असेल असं त्याला वाटत नाही. माझी बायको माझं वाचते की नाही, वाचलं तर तिला कळतं की नाही आणि कळलं तर तिला आवडतं की नाही हे तिच्या भारत भूषणसारख्या निर्विकार चेहऱ्यावरून कळत नाही. ‘कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे मी इथवर वाटचाल केल्येय ‘असं धादांत असत्य मी पुढे-मागे मुलाखतीत सांगीन.
मी लेखनाची सुरुवात क्रिकेटपासून केली. म्हटलं प्रथमच लिहायचं तर आपल्या आवडत्या विषयावर लिहावं. लवकरच मी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या हिंदी चित्रपट व चित्रपट संगीत या विषयांकडे वळलो. त्यामुळे स्वाभाविकच ‘क्रिकेटचे वेध’ हे माझे पहिले पुस्तक क्रिकेटवर व ‘गाये चला जा’ हे दुसरं पुस्तक चित्रपट संगीतावर होतं. अनेक र्वष मी या दोन दरडींवर पाय ठेवून होतो. विषयांच्या बंधनामुळे माझ्या लेखनाविष्कारावर मर्यादा येतायत हे लक्षात आल्यावर विनोदी, ललित, भावरम्य लिहू लागलो. त्यांची अनेक पुस्तकंही आली. माझ्या ‘लगाव बत्ती’ या विनोदी संग्रहाला ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचं’ पारितोषिक मिळालं. शेवटी ‘मी माझं मला’ हे आत्मचरित्र लिहिलं. अल्पावधीत त्याची दुसरी आवृत्ती आली. माझ्या अमेरिकेत रहाणाऱ्या मुलीला मी आता सांगू शकेन – ‘नॉट अ बॅड परफॉरमन्स फॉर अ स्वत:चं स्वत:च वाचत बसणारा चोंबडा!’
माझा कुठला तरी हृदयस्पर्शी लेख वाचून अहमदनगरला एक खेडवळ कॉलेज विद्यार्थी मला म्हणाला, ‘‘विनोदी लेखकाला रडविण्याचा काय अधिकार?’’ मी निरुत्तर झालो. त्याच्या प्रश्नानं मला अंतर्मुख केलं. जेव्हा जेव्हा माझं वाचून वाचकांच्या मनात कालवाकालव होते तेव्हा तेव्हा मला तो अहमदनगरचा मुलगा आणि त्याचा प्रश्न आठवतो. हसवण्याचं व्रत घेतलेल्या विदूषकानं रडायचं आणि रडवायचं नसतं. स्ट्रिक्टली नॉट अलाऊड!
मी लिहायला सुरुवात करून दोन वर्षे होण्याआधीच अण्णा गेले. मी लेखक म्हणून व एकूणच आयुष्यात स्थिरावल्याचं पाहायला ते थांबले नाहीत. त्या अल्प काळातलं माझं लेखन वाचून ते मला म्हणाले होते, ‘‘मिस्टर शिरीष, तुम्ही कधी कंटाळवाणं लिहीत नाही.’’ आजवर मला मिळालेली ही सर्वात मोठी कॉम्प्लीमेंट समजतो. वाचनीयता ही चांगल्या लेखनाची एक कसोटी आहे. असं मी मानत व म्हणत आलोय. आताशा मला वाटतंय की वाचनीयता ही चांगल्या लेखनाची एकमेव कसोटी आहे. अप्रतिम पुस्तक आहे पण चार पानांपुढे वाचवत नाही, हे मला कळू शकत नाही.
एका कार्यक्रमात माझी (कै.) मंगेश पाडगांवकरांशी ओळख झाली. मी आपसूक नतमस्तक झालो. ‘‘तुमचं कुठंही काही दिसलं तरी मी आवर्जून वाचतो. का विचारा.’’ ते म्हणाले.
‘‘का?’’ मी आज्ञाधारकपणे विचारलं.
‘‘कारण तुमचे शब्द मला कानात ऐकू येतात.’’
म्हणजे मी बोली भाषेत लिहितो असंच ना?’’
‘‘नाही- नाही ते वेगळं. वाचताना ते शब्द ऐकू येणं वेगळं.’’ कविराज म्हणाले. मला नीटसं कळलं नाही, पण एवढा मोठा साहित्यिक माझ्या लेखनाविषयी चांगलं बोलतोय हा दिलेला दिलासा पुरेसा होता. थँक यू, मंगू अण्णा. तुमचे मोरपीसासारखे शब्द मी सरणावर बरोबर घेऊन जाईन.
मी माझी कक्षा सोडून कधी भरकटलो नाही. कथा, कादंबऱ्या, नाटक, कविता यांच्या मागे जाण्याचा आगाऊपणा मी केला नाही. प्रत्येक माणूस आयुष्यात कधी न कधी म्हणे कविता करतो. असेल बाबा, पण ती नाजूक हळुवार स्टेज माझ्या आयुष्यात कधी आलीच नाही. मी विनोदी नाटक चांगलं लिहू शकेन, असं जयवंत दळवींना वाटायचं. ते भेटायचे तेव्हा तसं बोलून दाखवायचे. त्यांचा चांगुलपणा. माझ्या पदरात त्यांनी कुवतीपेक्षा जास्त दान टाकलं होतं.
मी पु. लं. ना अनेकदा बघितलं, ऐकलं पण त्यांना एकदाही भेटू शकलो नाही ही खंत उरी आहे. ते विनोद विद्यापीठाचे कुलगुरू होते. मी त्यांना एकदा माझ्या महोत्सवी प्रयोगाचे फोनवरून निमंत्रण दिलं होतं. ‘‘मी मुंबईत असलो तरी निश्चित येईन.’’ ते प्रसन्नपणे म्हणाले, ‘‘पण जाहीर करू नका. मी येईन आणि बसेन.’’
‘‘अच्छा! म्हणजे प्रेक्षकांतल्या कोणी मला विचारलं की पु. लं. आलेत म्हणे तर मी काय सांगायचं- आले असतील तर बसले असतील कुठेतरी; आपल्याला काय करायचंय?’’
पु. लं. खो खो हसले. मी साक्षात पु. लं. ना हसवलं एवढय़ावरच मी तरंगत राहिलो..
.. हा लेख लिहून पूर्ण झाल्यावर मी या लेखावरून एक शोधक नजर फिरवली. हे बघायला की सगळं ‘कणेकरी’ शैलीत जमलंय ना?..
shiresh.kanekar@gmail.com

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?

savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”

lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..