News Flash

उलाढाल एका स्वप्नाची!

येत्या एक एप्रिलला, १५ मे २०१६ रोजी ‘वीणा वर्ल्ड’चं बीज रुजायला तीन र्वष होतील

‘‘तीस वर्र्षांत केलेलं काम तीन वर्षांमध्ये केलं, ही झाली ‘वीणा वर्ल्ड’ची दृश्य बाजू. पण हे सगळं घडत असताना पडद्यामागे खूप धावपळ सुरू होती, अनेकदा ‘आता संपलो!’ अशी अवस्था आली. कधी खूप तणाव आला तर कधी मनाला उत्साहित करणाऱ्या घटना घडल्या, पण या साऱ्या प्रवासात हितचिंतकांनी, सहकाऱ्यांनी, पर्यटकांनी आम्हाला साथ दिली आणि पर्यटनक्षेत्रात ‘वीणा वर्ल्ड’चा ब्रॅण्ड ठसठशीतपणे नावारूपाला आला. आम्ही सर्वजण त्यात स्थिरावतोय, पण वेग कमी करायला स्कोप नाहीये. कारण पुढचं स्वप्न खुणावतय, ‘भारत की सबसे बडी ट्रॅव्हल कंपनी’ बनविण्याचं!’’

येत्या एक एप्रिलला, १५ मे २०१६ रोजी  ‘वीणा वर्ल्ड’चं बीज रुजायला तीन र्वष होतील आणि अधिकृतपणे संस्था तीन वर्षांची होईल. आत्ता जर कुणी माझं वय विचारलं तर मी म्हणते अडीच वर्ष. चांगलं आहे की नाही? लहानपण जर पुन्हा अनुभवायला मिळालं तर आपल्यासारखे नशीबवान आपणच. आता तर कुठे आयुष्याला सुरुवात झालीय. खूप काही करायचं बाकी आहे, बाल्यावस्थेत असल्यामुळेच पूर्वीपासून पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात वेळ आहे, सोबतीला माणसं आहेत, वेग घ्यायला तंत्रज्ञान हात जोडून उभं आहे आणि मन प्रसन्न असल्याने डोक्यात सतत नवनवीन कल्पनांचा उदय होतो आहे.
आमच्या कॉपरेरेट ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या डेस्कवर आम्ही आमचं स्वप्न लिहिलेलं आहे आणि ते आहे, ‘हम बना रहे है भारत की सबसे बडी ट्रॅव्हल कंपनी.’ स्वप्न बघितल्याशिवाय ते सत्यात कसं उतरणार? आयुष्य तर अनेक स्वप्नांचाच खेळ आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजचं स्वप्न, उद्यासाठीचं स्वप्न, या वर्षीसाठी पाहिलेलं स्वप्न, लांब पल्ल्याचं स्वप्न, स्वप्नंच स्वप्नं सगळीकडे. ८ एप्रिल २०१३ रोजी एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला, आता काय करणार? म्हटलं ‘‘जे ३० वर्षांत केलं ते तीन वर्षांत करणार!’’ त्या क्षणी माझ्या मनाने पाहिलेलं पुढच्या तीन वर्षांसाठीचं ते स्वप्नच होतं नाही का? आणि स्वप्नं आपण अशीच बघतो, ज्याला कोणत्याही गणिताचा-शास्त्राचा- विचाराचा आधार नसतो. ‘‘जो मनमें आया बोल दिया’’ असाच काहीसा स्वप्नांचा मामला आणि मीसुद्धा फिल्मी स्टाईलमध्ये बोलून गेले. हे माझं स्वप्नवत वाक्य वृत्तपत्रात छापलं गेलं आणि मग आम्हाला त्यातलं वास्तव दिसायला लागलं. आता जे बोललोय ते प्रत्यक्षात उतरवायलाच पाहिजे हे आमच्या मनाने घेतलं, त्यानंतर मात्र मी त्यावर प्रत्यक्षपणे बोलायचं टाळलं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला जबरदस्त मेहनत आम्ही घेत होतो, पण येणारा तीन वर्षांचा काळच ठरवणार होता- ‘बोलण्यात आणि करण्यात’ काय फरक आहे ते.
आता अडीच र्वष झाली आहेत आणि तीन वर्षांसाठी पाहिलेलं पहिलं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. जे ३० वर्षांत केलं ते तीन वर्षांत पुन्हा एकदा आम्ही नव्याने करू शकतो, आणखी रिफाइंड स्वरूपात. पहिल्या दीड वर्षांत आम्हाला अंदाज यायला लागला की ३० वर्षांचं काम आपण तीन वर्षांमध्ये करू शकणार आहोत. तेव्हा आम्ही आणखी मोठं स्वप्न पाहायचं ठरवलं आणि ते म्हणजे, ‘चलो बनाते है भारत की सबसे बडी ट्रॅव्हल कंपनी.’ स्वप्नांचं असंच असतं, एक स्वप्न पूर्ण होताना दिसलं रे दिसलं की लगेच दुसरं त्याहून मोठं स्वप्न पाहायला मन धजावतं, आपल्या शरीरात उत्साह संचारतो, रोमारोमात चैतन्य सळसळू लागतं आणि नवजीवन मिळाल्यासारखे आपण नवी घोडदौड सुरू करतो. असंच सतत काहीतरी नवं कोरं शोधत असल्याने ‘वीणा वर्ल्ड’मध्ये असलेल्या सर्वामध्येच एक आगळी ऊर्जा सतत जाणवत राहते आणि रोज कार्यालयात येण्यासाठी मन आसुसलेलं असतं.

18‘३० वर्र्षांत केलेलं काम तीन वर्षांमध्ये केलं’ ही झाली ‘वीणा वर्ल्ड’ची दृश्य बाजू. पण हे सगळं घडत असताना पडद्यामागे खूप धावपळ सुरू होती, अनेकदा ‘आता संपलो!’ अशी अवस्था आली. कधी खूप तणाव आला तर कधी मनाला उत्साहित करणाऱ्या घटना घडल्या. आजच्या या ‘दृष्टीआड सृष्टी’मध्ये त्याचा संक्षिप्त आढावा घ्यायला मलाही आवडेल, त्यानिमित्ताने थोडं मागे वळून बघता येईल. कारण आजकालच्या धावपळीत मागे बघायलाही वेळ नाहीये.

एकाच क्षणी निष्कांचन झालेल्या आपल्या आईवडिलांच्या पाठी अनेक माणसं कोणताही विचार न करता यायला तयार आहेत, हे पाहिल्यावर नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये तिथल्या मनी माईंडेड- सुशेगाद वातावरणात चार र्वष शिकून आलेला आमचा मोठा मुलगा नील आश्चर्यात पडला होता, थक्क झाला होता. तो आम्हाला म्हणाला, ‘‘आपण ट्रॅव्हल कंपनी त्याच लेव्हलला सुरू करायची.’’ माणसांची शक्ती त्याने जाणली होती आणि त्यानं ते स्वप्न पाहिलं. आम्हीही ‘‘व्हाय नॉट?’’ म्हणत त्याच्या सुरात सूर मिळवला. बँकेचे व्यवहार पाहणाऱ्या आमच्या प्रकाशला विचारलं की, ‘‘आमच्याकडे पर्सनल अकाउंटमध्ये किती पैसे आहेत?’’ त्याने खात्री करून सांगितलं की, ‘‘१२ लाख रुपये.’’ अनेक लोकांच्या कथा ऐकल्या होत्या की शून्यातून साम्राज्य उभं केलं म्हणून, आमची अवस्था त्यामानाने खूपच श्रीमंत होती असं म्हणायला हरकत नाही. मग आम्ही आमचे मित्र संदीप शिक्रे आणि अल्पा शिक्रे यांना फोन केला की, ‘‘आता आमची ऑफिसेस तयार करून द्या, जरा एखादी थीम वापरा किंवा तुम्हीच ठरवा कशा तऱ्हेची ऑफिसेस बनवायची ते.’’ संदीप म्हणाले की, ‘‘नाही. मी तशी सुरुवात करणार नाही. तुम्ही आधी नाव ठरवा- ब्रॅण्ड ठरवा-कलर स्कीम ठरवा- पोझिशनिंगवर विचार करा मगच मी सुरुवात करेन. मीच चारपाच ब्रॅण्ड डिझायनर्सना बोलावतो. त्यांच्याशी मीटिंग करू या.’’ संदीपशी संवाद सुरू असताना आमचे हात मात्र आमच्या खिशाकडे जायचे आणि म्हणायचे, ‘जास्त उडय़ा मारू नका. फक्त १२ लाख रुपयेच आहेत तुमच्याकडे’, पण सांगणार कसं? एका ठिकाणी त्याच लेव्हलला कंपनी उभी करण्याचं अवास्तव स्वप्न दिसत होतं तर दुसरीकडे ‘पैशाचं सोंग आणता येत नाही’ हे वास्तव. तरीही आम्ही दिवस ढकलत होतो.

संदीपच्याच ऑफिसमध्ये आम्ही पहिल्या दोन तीन मीटिंग्ज केल्या आणि ब्रॅण्ड डिझायनर एजन्सी फायनल केली. त्यांनी कोटेशन दिलं २२ लाख रुपये. झालं पहिल्या गोष्टीतच आमच्या पूंजीची ‘ऐशी की तैशी’ होणार होती. पण एव्हाना आमचं सगळ्यांचं मत झालं होतं की प्रोफेशनल कंपनीला घेऊनच ब्रॅण्ड डिझाइन करायचा, कारण कमी वेळात ब्रॅण्ड एस्टॅब्लिश करायचा असेल तर नाव, रंग सगळंच व्यवस्थित असायला हवं आणि ज्यांनी या गोष्टींचा अभ्यास करण्यात आयुष्याची काही र्वष घातलेली असतात त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं हे आम्हाला कळलं हे आमचं नशीब. आम्ही त्यांच्याकडून पेमेंटचं शेडय़ूल घेतलं आणि ‘हो’ म्हणून टाकलं. अर्थात त्यांनी नाव काय असावं याची गाईड लाइन देऊन आम्हाला नाव फायनल करायला सांगितलं.

मधल्या वेळात म्हणजे प्रत्यक्ष १ एप्रिल २०१३ पासून आणि त्यापूर्वीही संपूर्ण घडामोडीचे साक्षीदार असलेले आमचे हितचिंतक राज ठाकरे यांना भेटून ‘नाव काय असावं’ यावर त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतच.. आणि ‘वीणा वर्ल्ड’ हे नाव फायनल झालं. यलो-ब्लॅक कलरस्कीम फायनल झाली, लोगो डिझाइन झाला. अल्पा शिक्रेने एकापाठोपाठ एक ऑफिसेसची डिझाइन्स बनवायला सुरुवात केली. आमच्या राहत्या घरात ३८ जणांचं ऑफिस सुरू झालं. आता तुम्ही म्हणाल पण १२ लाखांचं काय? एवढं सगळं काम काढलं होतं तर खर्च अवाच्या सव्वा असेल. पैसे कुठून आले? पैसे नव्हतेच. हक्काने पैसे मागितले ते आमचे दुसरे हितचिंतक अभिजित गोरे याच्याकडून. तेही त्याला सांगून की, ‘‘अभी, सहा महिने किंवा वर्षभरच लागतील पैसे, नंतर व्याजसह परत करू बरं का!’’ अभीने त्यावेळी फटाफट ५०-६० लाखांची तरतूद केली. तरीही पैसे कुठे पुरणार होते, ऑफिसेसची इंटेरिअर्स व्हायला लागणार होती. आम्ही कफल्लक अवस्थेत, पण धाडसाने एक एक पाऊल पुढे टाकत होतो ते आणखी एका गोष्टीच्या बळावर, ती म्हणजे ‘वसई विकास सहकारी बँक लिमिटेड.’

वृत्तपत्रात टेलिव्हिजनवर ज्या दिवशी बातमी झळकली त्या दिवशी ‘वसई विकास बँके’च्या सीईओंचा दिलीप संत यांचा फोन आला, ‘‘जरी तुम्हाला आम्ही पूर्वी विद्याविहार ऑफिससाठी कर्ज दिलं असलं तरी तुम्ही जे काही कराल त्यात आम्ही तुम्हाला साथ देऊ.’’ त्यांच्या शब्दावर आम्ही उडय़ा मारत होतो, हा पराकोटीचा आत्मविश्वास नाही का? आता लिहिताना मला असं वाटतंय की जर ‘वसई विकास’ने त्यावेळी पैसे दिले नसते तर? बापरे परिस्थिती बिकट झाली असती, पण पैसे येतील या बाबतीत आम्ही इतके पॉझिटिव्ह होतो की काही विचारू नका. ‘वसई विकास’ने पैसे दिले. पती, सुधीरच्या सारख्या मीटिंग्ज चालायच्या बँकेसोबत, आमच्याकडे आमचं राहतं जुनं घर याव्यतिरिक्त तारण ठेवायला होता आमच्यावर असलेला पर्यटकांचा विश्वास! एकदा का संस्था सुरू झाली की पर्यटक आपल्याकडे येणार याची खात्री होती. तरीही असं झालं की आम्ही घरात ऑफिस चालवत असताना, एक दिवस प्राची आली आणि म्हणाली, ‘‘ताई आता कोणत्याही बँकेत पैसे नाहीत आणि इंटिरियरचं कार्पेन्टरचं सहा लाखाचं बिल आलंय.’’ मी आवंढा गिळला आणि अभीला फोन केला, त्यावेळी अभिजित गोरे ही आमची बँक बनली होती. ‘‘अभी किमान १५-२० लाख रुपये पाठव.’’ अभीने ताबडतोब चेक पाठवला आणि त्या चार पाच दिवसांची गरज आम्ही भागवू शकलो.

19एव्हाना घरात ऑफिस सुरू होऊन एक महिना झाला होता, आमच्या पाठी आमच्यासारखेच मागचापुढचा विचार न करता आलेल्या टीमला पैसे देणं गरजेचं होतं. त्यातल्या कुणीही हूँ की चँू केलं नसतं जरी सहा महिने काही मिळालं नसतं तरी, पण आमचं कर्तव्य होतं. त्यांचं भविष्य ही आमची जबाबदारी होती आणि आम्ही एक महिना झाल्याबरोबर टीमच्या प्रत्येक मेंबरला जेवढे पैसे मिळत होते तेवढे दिले. एकही पैसा कमी केला नाही, कारण त्यांनी जे आमच्यासाठी केलं होतं ते ऋण कधीही फिटण्यासारखं नव्हतं. टीममधला एकहीजण पैसे घ्यायला तयार नव्हता. त्यांना समजावलं की आज पैसे घ्या, लागले तर तुमच्याकडून मागून घेऊ, पण आज घ्या. मला या ठिकाणी सांगायला अगदी आनंद वाटतोय की त्या पहिल्या महिन्यापासून आजपर्यंत ५० जणांच्या टीमपासून ५५० जणांच्या टीमपर्यंत अडीच वर्षांत एकदाही पगाराचा दिवस चुकवला नाही, बँकेचा एकही हप्ता कधी पुढे-मागे होऊ दिला नाही आणि पहिल्या वर्षीचे पहिले सहा महिने वगळता आमच्या देशविदेशातील कोणत्याही सप्लायरचं पेमेंट उशिरा दिलं नाही. पहिल्या सहा महिन्यांत आमच्या सगळ्या सप्लायर्सकडून हक्काने एक महिन्याची किंवा दोन महिन्यांची सवलत मागून घेतली होती. आमच्या अभिजित गोरेलाही शब्द दिल्याप्रमाणे आम्ही त्याचेही पैसे वेळेत परत केले, एका अटीवर ‘‘लागणार नाहीत पण कधी लागलेच तर पुन्हा तेवढय़ाच हक्काने मागेन बरं का!’’

घरात आम्ही जेमतेम दोन महिने ऑफिस चालवू शकलो, रोज टीम वाढत होती. आता पन्नासच्यावर. आम्ही घरात मावेनासे झालो. ‘निळकंठ बिल्डर्स’चे मुकेश पटेल आणि मी सोमय्या पॉलिटेक्निकलमधले क्लासमेट्स. विद्याविहारचं ऑफिस घेताना हा संदर्भ मिळाला होता. त्यांना सुधीरने फोन केला की, ‘‘आम्हाला कमी भाडय़ात शंभरेक जण मावतील एवढी जागा मिळेल का?’’ ते म्हणाले की, ‘‘तुमच्या विद्याविहार ऑफिसच्या बिल्डिंगमध्येच बरीच ऑफिसेस आहेत त्यातलं घ्या.’’ पण ते आमचं ऑफिस ‘केसरी’कडे लीज्ड असल्याने तिथे जायचं नव्हतं. मग त्यांनी एक सुचवलं की, ‘‘त्यांच्या आजोबांनी जिथून ‘निळकंठ बिल्डर्स’चा उद्योग सुरू केला ते ऑफिस आहे, ते मी तुम्हाला देईन, जे आम्ही आठवण म्हणून ठेवलंय. कुणाला देत नाही, पण तुम्हाला देतोय. तिथे काही दिवस सोय होईल आणि पैसे द्यायचे नाहीत.’’ बघा कसे एक एक जण सढळ हस्ते मदत करायला तयार होते. ५ जून २०१३ ला आम्ही आमच्या माहीमच्या घरातलं ऑफिस घाटकोपरला हलवलं. त्या दिवशी ते मोठं वाटलं, पण जुलैपर्यंत टीम दीडशे जणांची झाली. पुन्हा ‘निळकंठ बिल्डर्स’चं ऑफिस कमी पडायला लागलं. आमचे फॅमिली डॉक्टर विनय जोशी आमची धावपळ बघत होते. ते म्हणाले, ‘माहीमला एक ऑफिस आहे त्यांच्या मित्राचं, ते बघा.’ ऑफिस मोठं होतं, पण त्यांच्या नियमाप्रमाणे कंपनीचं भांडवल एक कोटीच्या वर असेल तरच ते ऑफिस लीज करू शकत होते. आता आली का पंचाईत. ‘वीणा वर्ल्ड’ सुरू होऊन एक महिनाच जेमतेम झाला होता. एवढं भांडवल कुठून असणार? पण विनय जोशींमुळे त्यांनी नियम धाब्यावर बसवला आणि आम्हाला ते ऑफिस दिलं. मुंबईला पहिलं ऑफिस सुरू झाल्यावर पुण्याहून बुकिंगला सुरुवात झाली. पण तिथे ऑफिस तयार नव्हतं तेव्हा सुधीरचा मित्र गिरीश करंदीकर मदतीला आला आणि त्यांनी त्यांचं पुण्याचं ऑफिस वापरायला दिलं.

एकीकडे पर्यटकांची गर्दी वाढत होती, सहली वाढत होत्या, कुठे खूप छान छान प्रतिक्रिया येत होत्या तर कुठे आम्हाला झेपत नव्हतं म्हणून रोषही पत्करावा लागला. पण त्यातून आम्ही पहिल्या वर्षांतच सावरलो. आपल्या चुकांमुळे पर्यटकांचा आनंद लोपता कामा नये. त्यामुळे ‘बी अ‍ॅलर्ट ऑलवेज’ हेच आमचं ‘कल्चर’ झालं. पर्यटकांनी साथ दिली आणि ‘वीणा वर्ल्ड’चा ब्रॅण्ड ठसठशीतपणे पर्यटनक्षेत्रात नावारूपाला आला. आधी आम्हीही थोडे साशंक होतो, पिवळा रंग ब्रॅण्ड कलर म्हणून घेण्यासाठी. पण डिझायनर एजन्सी ठाम होती आणि आज ‘वीणा वर्ल्ड’ म्हणजे यलो कलर हे समीकरण झाल्यावर त्यांच्या आग्रहाला दाद द्यावीशी वाटते. आता आम्ही स्थिरस्थावर झालोय. विद्याविहार ऑफिसही ‘केसरी’ंकडून आमच्याकडे परत आलंय आणि आम्ही सर्वजण त्यात स्थिरावतोय, पण वेग कमी करायला स्कोप नाहीये, कारण आता पुढचं स्वप्न खुणावतेय, ‘भारत की सबसे बडी ट्रॅव्हल कंपनी’ बनविण्याचं!

आणखी एक, हे सगळं असताना अनेकदा नको अशा कमेंट्सनाही सामोरं जावं लागलं. गॉसिप म्हणून ज्याला म्हटलं जातं तेही बरंच झालं पण तिकडे अजिबात लक्ष दिलं नाही. कारण ते जर मनावर घेतलं असतं तर आज ‘वीणा वर्ल्ड’ एवढय़ा दिमाखात उभं राहिलं नसतं. गमतीशीर घटना पण घडल्या, एकदा मी काश्मीर सहलीला गेले असताना एका पर्यटकाने येऊन मला विचारलं की, ‘‘हे तुम्ही फक्त दाखवायला आणि इन्कम टॅक्स वाचवायला दोन कंपन्या केल्यात नं’’ एका पत्रकाराने थेट विचारलं, ‘‘अहो कसं शक्य आहे, आम्हाला माहितीय राजकारण्यांचा पैसा आहे, अशी काय एवढी मोठी कंपनी उभी राहू शकते का?’’ पण एकंदरीतच मजा आली. या अडीच वर्षांच्या प्रवासात. यात मधून मधून माझे वडील म्हणजे केसरीभाऊ पाटील आशीर्वादपर पत्र पाठवीत असायचे. ‘वीणा वर्ल्ड’ची नवीन ऑफिसेस झाली की कौतुक करायचे. दोन वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला आई-बाबा बऱ्याच मोठय़ा रकमेचा चेक देऊन गेले. तो मी आजही तसाच सांभाळून ठेवलाय. बाबांना त्याबद्दल ‘थँक्यू’ म्हणतानाच मी सांगितलं की, ‘‘भाऊ, हा चेक म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे. तो मी माझ्याजवळ ठेवणार, अगदी निकड लागली तरच तो मी वापरीन, पण सतत प्रयत्न करीन की तशी वेळ येणार नाही.’’

कधी कधी मला वाटतं की मी जरा अतिस्वाभिमान दाखवते का! पण मनापासून वाटतं की पैसा ही गोष्ट वरदान आणि शाप दोन्ही ठरू शकते. काय करायचं ते आपल्या हातात असतं; बिझनेस मोठा करायचा तो स्वबळावर आणि एकदा बिझनेस मोठा झाला की मग मोठमोठय़ा संधी चालून येतात आपोआप.

हा लेख वाचणाऱ्या- नव्याने उद्योग करणाऱ्या तरुण-तरुणींना मला सांगावंसं वाटतं की, ‘अमुक एक असल्याशिवाय मोठं होता येत नाही’ किंवा कुणाचं तरी पैशाचं पाठबळ असल्याशिवाय उद्योग शक्यच नाही. या मानसिकतेतून आपण बाहेर येऊ या. आज जगात एवढी उदाहरणं आपल्याला पटवून देताहेत की शून्यातून विश्व निर्माण करता येतं. मग आपण का नाही त्यातलं एक बनायचं?

– वीणा पाटील
ल्ल ५ील्लं@५ील्लं६१’.िूे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:02 am

Web Title: veena patil shares her experiences about starting veena world
टॅग : Chaturang
Next Stories
1 ..आणि पदार्थ वाफाळू लागला
2 आव्हानांशी जुगलबंदी
3 बादल घुमड बढ आये..
Just Now!
X