‘‘नंदीहिलहून येताना भैरप्पांबरोबर आम्ही त्यांच्या बंगळुरूमधल्या ‘साहित्य भांडार’ या प्रकाशन संस्थेत गेलो. आम्ही तिथं फार-फार तर अर्धा तास असू. तेवढय़ा अवधीत सात-आठ जण तिथं त्यांची कादंबरी ‘आवरण आली?’ असं विचारायला येऊन गेले. काही वर्षांपूर्वी आम्ही रेशनच्या दुकानात ‘रॉकेल आलंय?’ असं विचारायचो, तेच आठवलं! एखाद्या पुस्तकासाठीही हे घडावं याचं आश्चर्यही वाटलं.’’ सुप्रसिद्ध कन्नड लेखक भैरप्पा यांच्या ‘आवरण’ कादंबरीच्या प्रकाशनामागच्या आठवणी जागवत आहेत लेखिका उमा कुलकर्णी ..

मी भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्यांनंतर त्यांची ‘आवरण’ ही कादंबरीही अनुवादित केली. भरपूर अभ्यासानंतर भैरप्पांनी ही कादंबरी लिहिली होती. कर्नाटकात या कादंबरीनं विक्रीचे सगळे उच्चांक मोडले आणि नवे उच्चांक स्थापन केले होते. एकूणच कथा-कादंबऱ्यांच्या जगतात निर्माण झालेली मरगळ या कादंबरीनं झटकून टाकली. वर्षांनुवर्षे समाजाला तथाकथित बुद्धिवाद्यांनी झाकोळून टाकलं होतं. या कादंबरीनं वर्षांनुवर्षे कोंडलेल्या या भावनेला वाट मिळाल्यासारखं झालं होतं.
‘आवरण’ प्रकाशित होण्याआधी सुमारे महिनाभर कर्नाटकात काही घटना घडल्या होत्या. त्या वेळी सत्तेवर असलेल्या एका भाजपच्या मंत्र्यानं एका भाषणात ‘टिपू सुलतान हा कन्नडविरोधी होता. त्यानं राज्यभाषा असलेल्या कन्नडला हटवून उर्दू ही राज्यभाषा केली होती. त्यामुळे कर्नाटकानं त्याचं इतकं स्तोम माजवायची गरज नाही..’ अशा अर्थाचं विधान केलं. यावर कर्नाटकातील बुद्धिवाद्यांनी रान उठवलं. या मंत्र्यानं राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांनी गांधीजींच्या फोटोपुढं बसून आंदोलन केलं. त्या बातम्या दररोज भैरप्पांच्या कानांवर यायच्या. एखादा माणूस इतिहासाविषयीचं सत्य सांगतोय आणि काही माणसं ते सत्यच झाकोळू पाहाताहेत हे पाहून त्यांनी एका वृत्तपत्राला एकापाठोपाठ एक असे दोन लेख लिहून दिले. टिपू सुलतानानं आपल्या राजवटीत काय-काय अत्याचार केले यावर ऐतिहासिक पुराव्यासह लिहिलेले ते लेख होते.
वाचकांनी हे दोन्ही लेख उचलून धरले. त्या वृत्तपत्राकडे या लेखांच्या समर्थनार्थ शेकडो पत्रं आली. पत्रकार त्यानंतर आंदोलनकर्त्यांकडे गेले. या आंदोलकांमध्ये गिरीश कर्नाडही होते. त्या वेळी त्यांचं ‘टिपू सुलतानचं स्वप्न’ हे नाटक नुकतंच प्रकाशित झालं होतं. वृत्तपत्रांनी त्यांचंही म्हणणं छापलं. तोपर्यंत भैरप्पांनी तुघलकच्या राजवटीवर आणि व्यक्तिमत्त्वावर ऐतिहासिक दाखल्यासह प्रकाश टाकणारा लेख प्रकाशित केला. यावर मात्र कर्नाडांनी उत्तर दिलं नाही. ते परदेशी निघून गेले होते. यानंतर भैरप्पांची ‘आवरण’च्या संदर्भात एक मुलाखतही प्रसिद्ध करण्यात आली. अशा तापलेल्या वातावरणात ‘आवरण’ प्रकाशित झाली.
याच वेळी, म्हणजे २००७च्या जानेवारीअखेर आम्ही दोघं काही घरगुती कारणासाठी बंगळुरूमध्ये होतो. भैरप्पाही म्हैसूरहून बंगळुरूला आले आणि त्यांनी आधीच आमच्याबरोबर ‘होगेन कल्लु’ आणि ‘नंदीहिल्स’ अशा दोन ठिकाणी ट्रिपा ठरवल्या. आम्हाला सुप्रसिद्ध एम.टी.आर.मध्ये ब्रेकफास्टला नेले. सोबत त्यांच्या सूनबाई अनुराधा या उत्तम जेवणाचा डबा बांधून द्यायच्या. दिवसभर आमच्या भरपूर गप्पा व्हायच्या.
एम.टी.आर.मध्ये गर्दी असल्यामुळे आधी नाव नोंदवायची गरज होती. भैरप्पा हे मीडियामध्ये फारसे झळकणारे नसल्यामुळे तिथं त्यांना कुणी ओळखायचा प्रश्नच नव्हता. नाव नोंदवून आल्यावर त्यांनी सांगितलं, ‘‘मी कुलकर्णी नाव नोंदवलंय!..’’ या दोन्ही ठिकाणी भैरप्पांना कुणी वाचकांनी फारसा त्रास दिला नाही. लांबून त्यांच्याकडे बघून आपसात बोलत निघून जात. फक्त ‘नंदी हिल’वर एक उत्तर कर्नाटकातला माणूस त्यांच्यापाशी आला. भैरप्पा त्याच्याशी एक-दोन वाक्यं बोलले आणि ‘आम्ही बोलतोय.’ असं सांगून त्याला सूचकपणे जायची सूचना दिली. तो माणूसही नम्रपणे क्षमा मागून निघून गेला.
नंदी हिलहून येताना त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या बंगळुरूमधल्या ‘साहित्य भांडार’ या प्रकाशन संस्थेत गेलो. या छोटय़ाशा संस्थेत भरपूर गडबड चालली होती. आणखी आठवडय़ानं ‘आवरण’ अधिकृतरीत्या बाजारात येणार होती. कर्नाटकभरच्या पुस्तक-विक्रेत्यांकडून असलेल्या मागणीची पूर्तता करण्यात सगळे खाली मान घालून गढून गेले होते. त्या गडबडीतच त्यांनी आम्हा तिघांची कशीबशी खुच्र्या टाकून बसायची व्यवस्था केली. भैरप्पांची दरवाज्याकडे पाठ होती. आम्ही तिथं फार-फार तर अर्धा तास असू. तेवढय़ा अवधीत सात-आठ जणं तिथं ‘आवरण आली?’ असं विचारायला येऊन गेले. प्रकाशक-बंधूंपैकी राजा त्यांना ‘सात तारीख!.’ असं सांगत होते. मला तर काही वर्षांपूर्वी आम्ही रेशनच्या दुकानात ‘रॉकेल आलंय?’ असं विचारायचो, तेच आठवलं! एखाद्या पुस्तकासाठीही हे घडावं याचं आश्चर्यही वाटलं. शेवटी प्रकाशक राजा भैरप्पांना म्हणाले, ‘‘सात तारखेला तरी यांना आम्ही काय देणार आहोत कोण जाणे! कारण आवृत्ती तर संपली आहे! दुसऱ्या आवृत्तीचं काम घाईनं सुरू केलंय, पण वेळेवर तयार करणं कितपत जमणार आहे, कोण जाणे!.’’
कर्नाटकातील सर्वाधिक खपणारी पुस्तके भैरप्पांचीच आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी त्यांच्या आधीच्या सगळ्या कादंबऱ्यांपेक्षा या कादंबरीला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. वाचकांनी कुणाच्याही अपेक्षेपेक्षा जास्त या कादंबरीचं स्वागत केलं. अक्षरश: सुरुवातीला दर आठवडय़ाला, दर पंधरवडय़ाला आणि दर महिन्याला मोठमोठय़ा आवृत्त्या काढाव्या लागल्या.
या कादंबरीवर लोकप्रिय वेबसाइटवर मुक्त चर्चा होऊ लागली. कर्नाटकातील प्रमुख कन्नड वृत्तपत्रांबरोबर इंग्लिश वृत्तपत्रांनीही या कादंबरीची दखल घेतली. नंतर ही चर्चा अखिल भारतीय पातळीवरही पसरली. या कादंबऱ्यांवर कर्नाटकातील विविध गावांमधून चर्चासत्रे घेण्यात येऊ लागली. या चर्चासत्रांना हजारोंच्या संख्येनं वाचक हजेरी लावू लागले. त्या चर्चासत्रांमध्ये वाचल्या गेलेल्या निबंधांची पुस्तकं निघू लागली. वृत्तपत्रांनी या संदर्भातील वाचकांच्या मतांनाही प्राधान्य दिले आणि शेकडो-हजारो पत्रे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊ लागली.
संपूर्ण वर्षभर ही कादंबरी कन्नड माध्यमांच्या नजरेत होती. पहिल्या सहा महिन्यांत बंगळुरूमध्ये ६ चर्चासत्रे झाली. शिवाय शिवमोगा, बेळगाव, हुबळी, धारवाड अशा अनेक गावी चर्चासत्रे झाली. एका प्रकाशकानं या कादंबरीवर समीक्षा-स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेलाही प्रकाशकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाच्या निमित्तानं जी चर्चासत्रे झाली, त्यांत कन्नडमधील सर्वच्या सर्व ख्यातनाम साहित्यिकांनी हजेरी लावली आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे सहभाग घेतला. काही जणांनी विरोध केला, तर काही जणांनी या कादंबरीची भलावण केली; पण साहित्य क्षेत्रातलं कुणीही या कादंबरीवर कुठलाही अभिप्राय न देता राहू शकलं नाही.
अशा प्रकारे काही काळ चर्चा होऊन वातावरण शांत होऊ लागलं होतं. आठ-दहा आवृत्त्यांनंतर पुस्तकाची विक्रीही आपोआप मंदावू लागली होती. अशा वेळी यू.आर. अनंतमूर्तीनी या वादंगात भाग घेतला. त्यामुळे त्याला वेगळंच परिमाण लाभलं. त्यांनी एका ठिकाणी विधान केलं, ‘‘भैरप्पा हे कादंबरीकारच नाहीत, ते फक्त डिबेटर आहेत!’’ पाठोपाठ त्यांनी भैरप्पांची तुलना बुश, नारायण मूर्ती आणि मोदीं यांच्याशी केली. त्यामुळे तर वाचकांचं सरळ-सरळ ध्रुवीकरण झालं. पाठोपाठ, लेखकानं कितीही ‘केवळ साहित्यिकाचा आव आणला तरी त्यांचे सैद्धांतिक रूपही सामोरं यायला मदत झाली’ असं म्हटलं जाऊ लागलं! कारण या सर्व चर्चेत ‘आवरण’चं एक साहित्यकृती, त्यात लेखकानं केलेले रचनेचे प्रयोग, पात्र-निर्मिती, वातावरण-निर्मिती, कादंबरीचं यशापयश यांचं मूल्यमापन होण्याऐवजी ‘यांनी असं का लिहावं?’ अशा स्वरूपाची चर्चाच जास्त झाली.
‘‘भैरप्पा हे कादंबरीकारच नाहीत..’’ या अनंतमूर्तीच्या विधानानं भैरप्पांचे विपुल संख्येनं असलेले वाचक भडकले. या वाचकांच्या मनात आधीच ज्ञानपीठाच्या संदर्भात भैरप्पांवर जाणूनबुजून अन्याय होत असल्याची भावना होती. अनंतमूर्तीच्या या उद्गारांनी त्या असंतोषाला वाचा फुटली. त्यांनी वृत्तपत्रांवर पत्रांचा भडिमार केला. अक्षरश: हजारोंनी पत्रांचा पाऊस पडला! ‘‘ज्यांनी केवळ अडीच कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यांनी सारं आयुष्य केवळ कादंबरीलेखन केलेल्या भैरप्पांना कादंबरीविषयी सांगू नये!’’ असा सगळ्यांचा सूर होता. त्यानंतर सुमारे महिनाभर वृत्तपत्रे केवळ या पत्रांना प्रसिद्धी देत राहिले.
काही का असेना, या सगळ्याचा परिणाम म्हणून लेखक आणि प्रकाशकांचा फायदा असा झाला, तोपर्यंत मंदावलेल्या कादंबरीच्या विक्रीनं पुन्हा उसळी घेतली एवढं मात्र खरं!
पुस्तक गाजू लागताच भैरप्पांचे विरोधक एकत्र आले आणि त्यांनी या कादंबरीचा निषेध करणारी तीन पुस्तकं काढली. तोवर कादंबरीच्या बाजूनं आलेल्या पुस्तकांची संख्या सात झाली होती. त्यातला एक ग्रंथ ‘आवरण’वर विविध माध्यमांमध्ये काय-काय घडलं, हे विस्तारानं सांगणारा आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून ‘आवरण’च्या आवृत्तींची संख्या पाच-सहा वर्षांत पन्नासवर गेली! कर्नाटकभर आणि कर्नाटकाबाहेर सर्वत्र भैरप्पांचे या विषयावर अगणित कार्यक्रम झाले. देशी भाषांमधील साहित्य वाचणाऱ्यांची संख्या काळजी करावी, अशा पातळीवर उतरत असताना एका कादंबरीनं हा इतिहास घडवला!
मराठी ‘आवरण’
मराठीतही मी केलेल्या ‘आवरण’च्या अनुवादाचं चांगलं स्वागत झालं. यावर चर्चाही बरीच झाली. पुण्यात ‘विवेक साप्ताहिका’नं या संदर्भात भैरप्पांची एक प्रकट मुलाखत ठेवली होती. त्या वेळी पुण्यात सवाई गंधर्वाचे कार्यक्रम सुरू होते, ‘जी.ए. कुलकर्णी महोत्सव’ चालला होता. अशा वेळी भैरप्पांच्या मुलाखतीलाही मोठय़ा प्रमाणात श्रोते जमले होते. त्यावरून वाचकांची उत्सुकता दिसून येत होती.
त्यानंतर परभणी आणि पंढरपूर येथेही या कादंबरीच्या निमित्तानं कार्यक्रम झाले. परभणीला स्थानिक वाचकांनी दोन निबंध लिहिले होते आणि त्यात काही प्रश्नही उपस्थित केले होते. अनुवादिका या नात्यानं मी त्यांची उत्तरं दिली. पंढरपूरला स्वत: भैरप्पा सपत्नीक आले होते. हे वैशिष्टय़ होतं! ‘‘संयोजकांनी दोघांना मिळून निमंत्रण दिलं तरच मी बायकोला सोबत नेतो. नाही तर संयोजकांना अडचणीत टाकल्यासारखं होतं. आम्हाला जिथं जायचं असतं तिथं आमचे आम्ही आमच्या खर्चानं जातो..’’ असं त्यांचं म्हणणं. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोदी कथाकार द.मा. मिरासदार होते. तिथं भैरप्पांचं स्वतंत्र भाषण झालं. यानंतरही भैरप्पांना भाषण आणि मुलाखतीसाठी निमंत्रणं येत होती; पण ते दुसऱ्या कादंबरीत गुंतल्यामुळे त्यांनी एका टप्प्यावर या विषयावरची निमंत्रणं घेणं बंद केलं.
‘आवरण’चे अनुवाद इतरही भारतीय भाषांमध्येही झाले. मराठीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्येही तिचं उत्साहानं स्वागत झालं.
‘कवलु’वरही वाद
‘आवरण’पाठोपाठ भैरप्पांनी ‘कवलु’ नावाची कादंबरी लिहिली. हीही वादग्रस्त ठरली आणि दुसरीकडे ‘आवरण’च्या निमित्तानं त्यांच्याकडे वळलेल्या वाचकांनी तीही उचलून धरली. त्यामुळे तिच्याही कन्नडमध्ये बऱ्याच आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीत भैरप्पांनी आधुनिक काळातल्या काही स्त्रीविषयक कायद्यांचा भारतीय महिला कसा गैरवापर करतात आणि पुरुष या प्रश्नाला कसे भिडतात, परिणामी भारतीय संस्कृतीचं बलस्थान असणारी कुटुंबव्यवस्था कशी मोडकळीला येते, हे सांगणारं कथानक सांगितलं आहे. यातील प्रमुख स्त्री-पात्रे स्वार्थी आणि संधिसाधू दाखवली असून कायद्याचा आणि स्त्री-मुक्तीचा कसा त्यासाठी वापर करतात हे दाखवताना यातील पुरुष-पात्रेही स्खलनशील आणि काहीशी दुबळी दाखवली आहेत. तसंच, स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनांना हवा देऊन त्यावर आपला स्वार्थ साधणारीही पुरुष-पात्रं त्यात आहेत.
साहजिकच पुरोगामी विचारवंत आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्यां या पुस्तकावर तुटून पडल्या. या पुस्तकावर बंगळुरूमध्ये चर्चा ठेवण्यात आली होती. सभागृहाबाहेर काही जणांनी भैरप्पांचा निषेधही केला; पण हजार लोकांची बसायची व्यवस्था असलेल्या त्या सभागृहात बसलेल्या दोनेकशे स्त्रिया भैरप्पांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. या सगळ्या साठीतल्या आणि साठी उलटलेल्या प्रौढा होत्या. बंगळुरूमधल्या ‘दुखावलेल्या सासवांच्या संघा’च्या त्या सभासद होत्या. या स्त्रियांनी पुढं होऊन आपलं दु:ख समजून घेतल्याबद्दल भैरप्पांचे आभार मानले. ‘‘या कायद्यांमुळे पत्नीच्या स्थानावर आलेल्या एका महिलेला कदाचित न्याय मिळतही असेल; पण त्याच पुरुषाच्या आई आणि बहीण या नात्याच्या स्त्रियांवर अन्याय होतो! या सगळ्यांची जबाबदारी कुटुंबव्यवस्थेनं ज्या पुरुषावर सोपवली आहे, त्या पुरुषावरही अन्याय होतो. तुम्ही तुमच्या कादंबरीत आमचं सगळ्यांचं दु:ख मांडलं आहे! त्याबद्दल आभार मानायला आम्ही आलो आहोत!’’ असंही त्यांनी मत मांडलं.
मराठीत ‘तडा’ या नावानं मी तिचा अनुवाद करताच महाराष्ट्रातही यावर अशाच प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पुण्यातल्या आणि मुंबईमधल्या कार्यक्रमांमध्येही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तेव्हाही भैरप्पांनी सांगितलं, ‘‘तुम्ही जर माझ्या आधीच्या कादंबऱ्या वाचल्या असतील तर तिथं मी माझी स्त्रियांविषयीची भावना व्यक्त केली आहे. ही कादंबरी मी दोन हजार दहामध्ये लिहिली आहे. जर तुम्ही डोळे उघडे ठेवून सभोवताली संवेदनशीलपणे पाहिलं तर अशी उदाहरणे तुम्हालाही दिसत नाहीत का? वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या आणि संवेदनशील वकिलांचं म्हणणं तुम्हाला ऐकू येत नाही का?’’ त्यांच्या या म्हणण्याविषयी दुमत व्हायचं कारण नव्हतं. पुढे न्यायालयानंही या कायद्याची अंमलबजावणी करताना सावधपणे करायच्या सूचना दिल्या. या कादंबरीविषयी मत व्यक्त करताना एका मराठी वाचकानं भैरप्पांचं वय विचारलं आणि म्हणाले, ‘‘या वयात समाजातील एवढा संवेदनशील प्रश्न टिपण्याची या माणसाची संवेदनशीलता मानली पाहिजे!..’’
शतावधानी
‘शतावधानी’ हा एके काळी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात चालणारा बौद्धिक खेळाचा प्रकार होता. ‘शतावधानी’ उपाधी असलेली व्यक्ती काव्य-शास्त्र-विनोदात पारंगत असते. त्या व्यक्तीला मधोमध बसवून एकाच वेळी त्यांना कुठल्याही विषयावरील कुठलाही प्रश्न विचारला जातो. एक जण काव्यावर विचारेल, दुसरा गणितातला, तिसरा एखादी कुठली तरी काव्यपंक्ती कुठल्या काव्यातली आहे हे विचारेल, कुणी कूटरचनेचं उत्तर विचारेल. यातच कुणी एक जण फुटकळ गप्पा मारून त्याचं मन एकटं होणार नाही याची काळजी घेईल! अशा सर्व गोंधळात ‘शतावधानी’ योग्य ती उत्तरं देत असतो. हा सर्व प्रकार संस्कृतमधून चालतो.
आता महाराष्ट्रातून हा प्रकार नाहीसा झाला आहे; पण आंध्र प्रदेशात आणि कर्नाटकात असे मोजकेच ‘शतावधानी’ आढळतात. इंजिनीयरिंगमध्ये पीएच.डी. केलेले डॉ. आर. गणेश हे अशा प्रकारचे ‘शतावधानी’ आहेत. त्यांना पाहातच त्यांच्या बुद्धिमत्तेला साष्टांग दंडवत घालणारा मोठा समाज कर्नाटकात आहे. केवळ रामायण-महाभारत, वेद, चाणक्य आणि कालिदासाच्या रचनांसारख्या संस्कृत महाग्रंथांवर ‘शतावधाना’चे कार्यक्रम करणाऱ्या आर. गणेश यांनी अलीकडेच ‘पद्मश्री’ मिळाल्याबद्दल भैरप्पांच्या सगळ्या कादंबऱ्यांवर आठ जणांना मध्यभागी बसून ‘अष्टावधाना’चा कार्यक्रम बंगळुरूमध्ये केला. हे ‘अष्टावधान’ अर्थातच कन्नडमधून झाले आणि हजारांहून जास्त श्रोत्यांनी त्याचा आनंद घेतला.
सुधा मूर्तीसह कर्नाटकातील साहित्य क्षेत्रातील सगळे अतिरथी-महारथी हजर होते.
‘यूटय़ूब’वर हा ‘अवधाना’चा कार्यक्रम पाहाताना अंगावर रोमांच उभे राहिले. तिथं एक कलाकार भैरप्पांच्या एखाद्या कादंबरीतल्या प्रसंगानुरूप चित्र काढत होता आणि गणेश संदर्भानुसार त्या चित्राविषयी बोलत होते. एक जण अमुक पात्राचं वर्णन करणाऱ्या एका जुन्या कन्नडमधल्या पद्याच्या निर्मितीची आज्ञा सोडत होता. कुणी एखादा राग गाऊन दाखवून तो कुठल्या कादंबरीत आणि कुठल्या परिस्थितीत म्हटला आहे, हे विचारत होतं. कुणी ‘सुडोकू’मध्ये भैरप्पांच्या कादंबऱ्यांच्या संदर्भातल्या कुठला आकडा कुठं टाकला पाहिजे, हे विचारत होतं. हे होताना शतावधानींचं लक्ष विचलित करण्यासाठी एक माणूस यापैकी कुठलाही संदर्भ नसलेलं काही तरी विचारून त्यांचं लक्ष एकाग्र होऊ देत नव्हता.
हे सगळं समोर बसलेला हजार-दीड हजारांचा भैरप्पांचा वाचक-समूह अधूनमधून टाळ्यांचा कडकडाट करत एकाग्रपणे ऐकत होता! सगळंच अचंबित करणारं होतं!

उमा कुलकर्णी
 virupaxuma@gmail.com

दृष्टीआडची सृष्टी