फटाके हे फोडले गेलेच पाहिजेत. कारण तो आपल्या प्रदूषणधर्माचा भाग आहे….

‘ते’ फटाके वाजवतात, ‘ते’ भोंगे लावून ध्वनिप्रदूषण करतात, ‘ते’ आणखी काय काय करून आणखी कसले कसले प्रदूषण करतात आणि हे प्रदूषणविरोधी एनजीओवाले, न्यायालये आणि काही माध्यमे आपल्याच प्रदूषण करू नका असे सांगतात. नेमका आपल्या सणांच्यावेळीच यांना प्रदूषणाचा मुद्दा कसा आठवतो? म्हणे फटाक्यांमुळे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वापराने, थर्माकोलमुळे, ध्वनीक्षेपकांमुळे प्रदूषण होते. मग रस्त्यांवरील वाहनांमुळे, कारखान्यांमुळे होणा-या प्रदूषणाचे काय? आधी ते बंद करा. मगच आम्हाला सांगा. परंतु हे पडले राज्यघटनावादी. ते तसे करणार नाही. आणि आपल्यालाच बजावणार की प्रदूषण करू नका. परंतु ही दमबाजी आता खपवून घेतली जाणार नाही. दिवाळीत फटाके नाही वाजवायचे तर काय फुटके डबे? प्रत्येक सणाची काही एक प्राचीन परंपरा असते. दिवाळीत फटाके वाजवण्याची परंपरा आहे. धर्मशास्त्रानुसार ही परंपरा पाळली नाही तर दिवाळीचा सण साजरा केल्याचे पुण्य मिळत नाही. तेव्हा फटाके हे फोडलेच पाहिजेत. त्यांचा आवाज जेवढा मोठा तेवढा फोडण्याचा आनंद मोठा.

म्हणूनच या दिवाळीत भल्या पहाटे सर्व जग झोपलेले असताना लक्ष्मी बॉम्ब, एटम बॉम्ब आणि थंडर बॉम्ब हे प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक गल्लीत फोडले गेलेच पाहिजेत. या तिन्ही बॉम्बचा आवाज अनुक्रमे ११४, १०८ आणि ११३ डेसिबल एवढा असतो. सरकारचे आवाजाबाबतचे नियम आहेत. त्यानुसार निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल एवढा आवाज चालू शकतो. म्हणजे त्याने मानवी आरोग्यावर कमी परिणाम होतो. परंतु त्याच्या किमान दुप्पट आवाजाचे फटाके एखादे आठदहा दिवस भल्या शांततेत फोडले तर त्याने काय माणसे मरणार आहेत? मग सरकारी नियमांनुसार हा कसा काय गुन्हा ठरू शकतो? समजा लहान मुलांना, वृद्धांना, गरोदर महिलांना, आजारी व्यक्तींना त्याचा त्रास झाला, तर त्यांनी तो परंपरेसाठी सहन करायला नको? आपल्या घरात समजा असे कोणी आजारी असेल, पाळण्यातील मूल असेल तरीही आपण लावणारच ना फटाके? मग इतरांनीही ते सहन करायलाच हवे. कारण प्रश्न परंपरेचा आहे.

फटाक्यांत अल्युमिनियम ऑक्साईड असते. वृद्धांतील मूत्रपिंडाच्या विकारांना ते म्हणे कारणीभूत ठरू शकते. त्याने अशक्तपणापासून निद्रानाशापर्यंतचे बारकेसारखे विकार म्हणे जडू शकतात. फटाक्यांत बेरियम असते. त्याने म्हणे स्नायू दुखणे, श्वासास त्रास होणे, एवढेच नव्हे तर जुलाब होणे यासारखे आजार म्हणे जडू शकतात. फटाक्यात सल्फर डायऑक्साईड असते. त्याने म्हणे प्रसंगी जीवाला धोका होऊ शकतो. फटाक्यांत पोटॅशियम नायट्रेट असते. त्याने श्वासविकार, चक्कर येणे असे प्रकार म्हणे घडू शकतात. एकंदर फटाके हृदयरोगी, रक्तदाब, दमा, खोकला यांचे रोगी यांच्यासाठी म्हणे घातकच. पण एखादे आठ-दहा दिवस आपल्या आजुबाजूला हजारांच्या संख्येने अशा फटाक्यांच्या माळा फुटल्या. त्याच्या धुराचे ढग हिवाळ्यामुळे वातावरणाच्या खालच्या थरात दिवसरात्र तरळत राहिले, तरी त्याबद्दल फार आरडाओरडा करून ध्वनिप्रदूषण करण्याचे कारण नाही. कारण हा परंपरेचा प्रश्न आहे. उलट फटाक्यांच्या आवाजामुळे निर्माण होणा-या आनंदामुळे अशा रूग्णांना बरे वाटण्याचीच जास्त शक्यता असते. तेव्हा असे फटाके हे फुटलेच पाहिजेत. त्यातून प्रसंगी आपलेच एखादे लहान मूल भाजले तरी चालेल. एखाद्याचा डोळाबिळा गेला तरी चालेल. कुठे जळीत घडले तरी हरकत नाही. एरवी असे अपघात काय अन्यत्र घडत नाहीत? त्याबद्दल फटाक्यांनाच दोष देण्यात काय अर्थ आहे? ते शतदा फुटलेच पाहिजेत. कारण त्यातच आपला धर्म सामावला आहे.

मुळात आपल्याला शुद्ध हवा मिळते कोठे, तर तिच्या शुद्धतेची कोणी एवढी काळजी घ्यावी. भूविज्ञान मंत्रालय आणि उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या सहकार्याने मुंबईत नऊ ठिकाणी हवेची प्रतवारी मोजणारी केंद्रे उभारण्यात आली आहेत. बोरिवली, मालाड, भांडुप, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, वरळी, माझगाव आणि कुलाबा येथे ती आहेत. तेथे हवेच्या प्रतवारीची नोंद केली जाते. प्रदूषकांच्या मापनावरून हवेची उत्तम, मध्यम, खराब आणि धोकादायक अशी प्रतवारी केली जाते. या केंद्रांच्या म्हणण्यानुसार सुरू असलेली बांधकामे आणि वाहने यामुळे दिवाळीआधीच मुंबईकरांना श्वसनकोंडीचा त्रास जाणवू लागला आहे. तो फटाक्यांच्या धूमधडाक्यामुळे अधिक वाढणार आहे, एवढेच. हीच स्थिती कमीजास्त प्रमाणात इतर शहरांचीही असणार. परंतु आपण परंपरापालक असल्याने त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही.

फटाके फोडल्याने जी आनंदप्राप्ती होते त्यापुढे सारेच किरकोळ आहे. शिवाय आपण किती रूपयांचे फटाके फोडले, किती हजाराच्या माळा लावल्या, किती आवाज होणारी रॉकेट उडवली यावर आपली समाजातील पत ठरत असते. तेव्हा हा प्रतिष्ठेचा आणि सोसायटीत भाव खाण्याचा प्रश्न आहे. परंतु त्याबरोबरच आपण अर्थव्यवस्थेलाही हातभार लावत असतो. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे असोचेमने केलेल्या एका पाहणीनुसार सरकारने चिनी फटाक्यांवर बंदी घालूनही फटाके उद्योगाला आज फटके बसत आहेत. या उद्योगाला यंदा सुमारे एक हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे देशांतर्गत फटाक्यांची ३० ते ४० टक्क्यांनी उतरलेली मागणी. फटाके खरेदी न करणे हा म्हणूनच अर्थव्यवस्थेशी केलेला द्रोह आहे. फटाके फोडून आपण केवळ फटाक्यांचे कारखानदारच नव्हे तर त्या कारखान्यांत काम करणारे हजारो बालमजूर यांनाही जगवणार आहोत. त्याचबरोबर त्याचा आडपरिणाम म्हणून वैद्यकीय क्षेत्रालाही आपण साह्य करणार आहोत. अखेर गरज सरो वैद्य मरो असा कृतघ्नपणा करणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. वैद्य जगलेच पाहिजेत, एवढेच नव्हे तर उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊन एकेका डॉक्टरचे किमान शंभर खाटांचे इस्पितळ झाले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रकारचे प्रदूषण करून आपण त्यांना साह्य केले पाहिजे.

तेव्हा ही दिवाळी आपण भरपूर फटाके फोडून आनंदाने साजरी करू या. आपल्यातील काहींच्या घरातील मुलांनी शाळांमध्ये फटाके न फोडण्याची शपथ घेतली असेल. त्यांना त्या धर्मद्रोहापासून परावृत्त करू या. याला जे धर्मातील प्रदूषण म्हणतात त्यांनी खुशाल पाकिस्तानला निघून जावे. कारण हे धर्मातील प्रदूषण नसून आमच्यावरील संस्कारांनी आम्हांस दिलेला प्रदूषणाचा धर्म आहे.

आपणां सर्वांना दिवाळीच्या खूपखूप मोठ्ठ्या शुभेच्छा!