विधानसभा निवडणूक जिंकली तर तो केंद्रीय नेतृत्वाचा विजय आणि हरली तर मात्र त्याला जबाबदार स्थानिक समीकरणे आणि कारणे हा काँग्रेसी युक्तिवाद आता भारतीय जनता पक्षानेही आपलासा केला असल्याने बिहारमधील निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाबद्दल त्या पक्षातील एकही नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरणार नाही. धरतही नाहीत. पक्षाचे एक संघनिष्ठ नेते राम माधव यांनी तर, हा निकाल म्हणजे मोदी यांच्या प्रतिमेला गेलेला तडा मानता येणार नसल्याचे सकाळीच जाहीर करून टाकले.  असे असले तरी ही निवडणूक मोदी आणि त्यांचे निकटवर्ती, भाजपचे अध्यक्ष अमित शहा विरुद्ध इतर अशाच पद्धतीने खेळली गेली होती. त्यात भाजपच्या स्थानिक मातबर नेत्यांनाही त्यांनी दुय्यम भूमिका दिली होती. मोदी यांनी तर भारत-आफ्रिका परिषदेतूनच नव्हे, तर आपल्या परदेश दौ-यांतून वेळ काढून बिहारमध्ये तुफानी प्रचार केला होता. तेव्हा या निकालाचे अपश्रेयही त्यांनाच घ्यावे लागणार आहे. बिहारच्या जनतेने या निवडणुकीत मुख्यमंत्री नीतिशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीला पसंती दिली. आपला अहम बाजूला ठेवून काँग्रेसने त्यांना साथ दिली. त्याचा काँग्रेसलाही फायदा झाला. ही या निकालाची एक बाजू झाली. परंतु त्याहून त्याची दुसरी बाजू अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत बिहारी जनतेने ज्यांना डोक्यावर घेतले त्यांना त्या विजयाने चढलेली मस्ती पाहून उचलून फेकून दिले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि संघाच्या परिघावरील संघटनांच्या डोक्यात जी हवा गेली होती ती खरे तर दिल्लीतील पराभवानंतर कमी व्हायला हवी होती. दिल्ली विधानसभेत भाजपला एकदा नव्हे तर दोनदा पराभव पत्करावा लागला. परंतु त्यातून धडा शिकण्याऐवजी भाजपचे नेते अधिकच मगरूर झाले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देशात सहिष्णुतेचा मुद्दा उसळी मारून आला. त्यावरील भाजप आणि मोदी समर्थकांच्या प्रतिक्रिया बिहारमधील जनता पाहात नव्हती असे नाही. याच जनतेने आधी मोदींना आपल्या गळ्यातील ताईत बनविले होते. मोदी यांचे परदेश दौरे, तेथील त्यांचे बॉलिवुडी पारितोषिक सोहळ्यांनाही लाजवतील असे लखलखाटी भाषणसोहळे, अनिवासी भारतीयांकडून त्यांचे होणारे स्वागत, त्यांतील चित्कार याने देशातील जनतेचे डोळे दिपले होते. मोदी यांचे विविध राष्ट्रप्रमुखांकडून होणारे स्वागत पाहून अनेकांनी त्यांना विश्वपुरुष या रूपात पाहिले होते. त्यांची नाटय़मय भाषणबाजी ऐकून अनेकांचे काळीज थिरकले होते. परंतु कालांतराने त्यांच्या हे लक्षात आले होते, की याचा आपल्या जीवनावर थेट काहीच परिणाम होत नाही. महागाई कमी झाल्याचे आकडे दिसतात, पण कांदा परवडत नाही आणि तूरडाळीला काजूबदामाची कळा आलेली. हे जमिनीवरचे वास्तव होते. ते पॅकेजच्या घोषणांनी आणि विकासाच्या भाषणांनी बदलत नाही हे मतदारांच्या लक्षात आले होते. तसे ते भाजपच्याही ध्यानी आले होते. त्यामुळेच बिहारमधील भाजपच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील विकासाचा मुद्दा नंतर कोणत्याही टप्प्यांत दिसला नाही. मुखवटय़ांमागील मुखवटे उतरावेत आणि त्यातून हळूच खरा चेहरा समोर यावा तशा पद्धतीने प्रचाराच्या बदलत्या रणनीतीतून भाजपचा चेहरा समोर येत गेला. विकासाचा मुद्दा चालत नाही हे पाहिल्यानंतर भाजपने तेथे जातीचे पत्ते पिसण्याचाही प्रयत्न केला. मोदी हे देशातील पहिले ओबीसी पंतप्रधान असा खोटा प्रचारही करण्यात आला. जितनराम मांझी यांना सोबतीला घेतलेले होतेच. उच्चवर्णीय, इतर मागासवर्गीय आणि महादलित यांची मोट बांधण्याचा तो प्रयत्न होता. तेव्हा जातींहून वरचा असा धर्माचा मुद्दा हाती घेण्यात आला. लालू आणि नीतिशकुमार हे ओबीसींच्या आरक्षणातील वाटा मुस्लिमांना देतील असे भय घालण्यात आले. परंतु जातीच्या या गणितात लालू आणि नीतिशकुमार हे अधिक तरबेज होते. तेव्हा पुढच्या टप्प्यांत महाआघाडीला मत म्हणजे पाकिस्तानलाच मत असा प्रचार सुरू करण्यात आला. गाईचे शेपूट धरून विजयाचा स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न तर सुरूच होता. तो इतक्या थराला गेला की अखेरच्या टप्प्यांत भाजपच्या गाईबाबतच्या जाहिरातींवर निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली.