लालू राबडी यांच्या राजवटीत जंगल राज म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि गरीबीच्या विळख्यात गुरफटलेल्या बिहारचा गाडा सुशासनाच्या रुळावर आणल्याच्या पुण्याईचे फळ नितीश कुमारांना मिळाले. तरीही पुढील वाटचालीसाठी मात्र लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठबळावरच महाआघाडी सरकारचा गाडा हाकावा लागणार असल्याने, जंगल राजचे नामोनिशाण पुसणे हे आव्हान नितीश कुमारांच्या मानेवर पुन्हा स्वार झाले आहे.

केंद्रातील प्रचंड बहुमताच्या सत्तेमुळे निर्माण झालेल्या भाजपकेंद्रित राजकारणाला बिहारच्या निवडणुकीने जोरदार हादरा दिल्याने विशेषत: उत्तरेकडील सर्वच बिगरभाजप पक्षांच्या राजकीय महत्वाकांक्षांना नवे धुमारे फुटले आहेत. केंद्रातील सत्तेवर काँग्रेसचा अंकुश होता तेव्हाही भाजपविरहित बिगर काँग्रेसी पक्ष अधूनमधून आघाडीचे प्रयोग करतच असत. पण तेव्हा असे प्रयोग अनेकदा गाजराची पुंगी ठरत असत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह अन्य भाजपविरोधकांनी लालू व नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली बनवलेली गाजराची पुंगी प्रथमच दमदारपणे वाजली हे या पालवलेल्या नवआकांक्षांचे कारण! भाजपला धोबीपछाड देऊन सत्तेवर आलेल्या नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सत्ताग्रहण होत असताना, बिगरभाजपा विरोधकांच्या शक्तिप्रदर्शनाकडेेही आज साऱ्या नजरा लागल्या आहेत. नितीशकुमारांचा शपथविधी समारंभाकडे त्या नजरेनेही पाहिले जात आहे.

शपथविधी सोहळ्याचे शक्तिप्रदर्शनात रूपांतर करण्याची मूळ कल्पना राबविण्याचे प्रथम श्रेय इव्हेन्ट गुरू असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याकडेच जाते. त्यामुळे नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्यातील शक्तिप्रदर्शनाची तुलना याआधी मोदी यांनी घडविलेल्या अशा सोहळ्यांशी होणार हे साहजिकच आहे. याची जाणीव अर्थातच, नव्या आकांक्षांवर स्वार झालेल्या साऱ्या बिगरभाजप पक्षांना असणार. नितीश कुमारांनी हे आव्हान पेलले आणि भाजपविरोधातील शक्तिप्रदर्शनाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला, तर नितीश कुमार हे उत्तरेकडील राज्यांतील बिगरभाजप पक्षांचे लोकमान्य नेता ठरणार आहेत. सत्ताकेंद्राच्या विरोधातील राजकीय पक्षांना एकत्र आणणे मुळातच जेवढे कठीण असते, त्याहूनही, त्यांची मोट सातत्याने टिकविणे हे अधिक कठीण असते. नितीश कुमार यांना तर, बिहारमध्ये काकणभर सरसच ठरलेल्या लालूप्रसादांच्या यादवकुलोत्पन्नांना सोबत घेऊन हे आव्हान पेलावे लागणार असल्याने, राजदसोबत कारभार करून सुशासन टिकविण्याची कसरतच करावी लागणार आहे. बिहार निवडणुकीतील पराजयानंतर आता भाजपमध्येही गंभीर आत्मचिंतन सुरू झाल्याची चर्चा आहे. शिवाय विरोधातील राजकीय आघाड्यांना खिंडारे पाडणे हा सत्ताधीशांचा आवडता व तुलनेने सोपा असा खेळ असतो. अशा परिस्थितीत भाजपविरोधी शक्तिप्रदर्शन केवळ सोहळ्यातून दाखविणे पुरेसे नाही, तर ही शक्ती सातत्याने सांभाळणे ही खरी कसोटी ठरणार आहे.

नितीश कुमारांच्या सरकारवर तेजस्वी, तेजप्रताप या लालुपुत्रांप्रमाणेच, गुन्हेगारी आरोपाचे डाग असलेल्यांचाही प्रभाव असल्याने आता शक्तिपरीक्शेपाठोपाठ एक नवी अग्निपरीक्षाही सुरू झाली आहे. नितीश कुमार किती धैर्याने आणि विश्वासाने त्याला सामोरे जातात, त्यावर या परीक्षेचे यश अवलंबून राहणार आहे. गाजराची पुंगी आता वाजली आहे. त्यातून तुतारीचे सूर उमटावेत अशी बिगरभाजप पक्षांची अपेक्षा आहे. त्याची जबाबदारीही नितीश कुमार यांच्यावरच पडली आहे.