आनंद साजरा करण्याचे आपले मार्ग सवयीने का होईना, शांततामय जगण्यापासून दूर चालले आहेत की काय अशी शंका आता दिवसागणिक घडणाऱ्या घडामोडींवरून अधिकाधिक दृढ होऊ लागली आहे. एकीकडे वैचारिक संघर्षांचे मार्ग बंद होऊन मुद्दय़ांना गुद्दय़ांची उत्तरे मिळू लागली आहेत, हिंसाचाराने कहर माजविला आहे, आणि सभोवतीच्या साऱ्या संभ्रमातही, समाज जणू निर्ढावल्यासारखा शांतपणे आपले व्यवहार पार पाडत आहे, अशी परिस्थिती दिवसागणिक वाढीस लागलेली असताना, प्रथा आणि परंपरांच्या नावाखाली आपल्या हिताला बाधा आणणाऱ्या बाबींचाही समाजाला विसर पडतो की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती बळावल्यासारखे वाटू लागले आहे. दिवाळी हा आनंदाचा, प्रेम वाटण्याचा आणि वाढविण्याचा सोहळा. या सणाच्या निमित्ताने माणसांनी एकमेकांविषयीच्या आदराची, प्रेमाची आणि सौख्याची देवाणघेवाण करावी आणि जगण्याचा आनंद द्विगुणीत करावा अशी अपेक्षा असते. त्यासाठी पारंपरिक प्रथा पुरेशा असतानाही, सणांचे बाजारीकरण किंवा व्यापारीकरण सुरू झाल्यामुळे, दिवाळीचा सण हा उलाढालीचा ‘इव्हेन्ट’ बनला आणि आपल्या धंद्याच्या बाजारपेठांना बरकत आणण्याचा मुहूर्त म्हणून या सणाचे महत्व जाणीवपूर्वक वाढविले जाऊ लागले. पुढे ते एवढे वाढले, की बाजारपेठांना झळाळी आली तरच दिवाळी उत्साही झाली असे मानण्याची प्रथाच पडून गेली. फटाक्यांच्या विषारी धुराने आकाशाला विळखा घातला की दिवाळी दणक्यात साजरी झाली असे मानण्याची सवयच होऊन गेली आणि फटाके हा बघता बघता दिवाळीच्या प्रथेचा अविभाज्य भाग बनून गेला. आता प्रदूषणाची समस्या ऐरणीवर आल्याने आपण भानावर आलो असलो, तरी प्रथा म्हणून रूढ झालेला फटाक्यांचा विषारी विळखा कसा सोडवायचा या प्रश्नाने आता डोके वर काढले आहे. शिवकाशी हे फटाक्यांच्या उद्योगाचे सर्वात मोठे माहेरघर. सुमारे दहा अब्ज रुपयांची उलाढाल येथे फटाक्याच्या व्यवसायातून होते. एवढी मोठी आर्थिक शक्ती सोबत असलेला हा व्यवसाय, तीन लहान मुलांच्या एखाद्या याचिकेस तोंड देण्यासाठी न सरसावता, तरच नवल होते. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या फटाक्यांवर संपूर्ण बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या या मुलांच्या याचिकेविरुद्ध शिवकाशीतील एका बडय़ा फटाके उत्पादकाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि फटाके हा दिवाळीच्या हिंदू प्रथेचा अविभाज्य भाग असल्याचा दावा करून बंदीच्या मागणीलाच विरोध केला. फटाक्यांचा धूर विषारी असतो, त्यामुळे प्रदूषण फैलावते, हे खरे असल्याने, आता धर्माशी नाते जोडून धंदा वाचविण्याचा हा प्रयत्न केविलवाणा असला, तरी फटाके ही धार्मिक प्रथा असल्याचा दावा करण्याचे धाडस एखाद्याच्या अंगी निर्माण करण्यास प्रथाप्रिय समाजच एका अर्थाने कारणीभूत आहे. दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव असतो. अंधाराकडून प्रकाशाकडे जा, असा संदेश देणाऱ्या या सणातील अप्रिय बाबींना प्रथा म्हणून कवटाळून पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे जायचे, की अंधाराकडे जाणाऱ्या वाटा नव्या प्रकाशाने उजळून टाकायच्या हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे.